घरफिचर्समित्रोचा प्रवास सुरुच आहे...

मित्रोचा प्रवास सुरुच आहे…

Subscribe

कृष्णा सोबतींनी कादंबरीत रंगवलेली मित्रो ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली सून आहे. स्वत:च्या शारीर गरजांविषयी ती कमालीची जागरुक आहे. मित्रो स्वत:वर प्रेम करणारी आणि स्वत:च्या इच्छा आंकाक्षांना पूर्ण करण्यात कुठलाच संकोच बाळगत नाही. शारीर गरजांना ती अपराधी भावनेतून पाहत नाही.

हिंदी साहित्यविश्वातल्या प्रसिद्ध लेखिका कृष्णा सोबती यांची ‘मित्रो मरजानी’ ही लघुकांदबरी नुकतीच वाचून झाली. ही कादंबरी 1966 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. सत्तावन्न वर्षांनतरही कादंबरीतली ‘मित्रो’ आजही तंतोतंत रिलेट करुन गेली. स्त्रीच्या कामभावनेचं मध्यवर्ती सूत्र या कांदबरीत आहे. शरीरसुखाची अपेक्षा उघडपणे मान्य असणार्‍या एका धाडसी मित्रोचं पात्र या कादंबरीत भेटतं तेव्हा लक्षात येतं की अजूनही आपल्या समाजात स्त्रीदेहाच्या गरजांबाबत उघडउघड नाहीच बोललं जात.

सोबतींनी कादंबरीत रंगवलेली मित्रो ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली सून आहे. स्वत:च्या शारीर गरजांविषयी ती कमालीची जागरुक आहे. मित्रो स्वत:वर प्रेम करणारी आणि स्वत:च्या इच्छा आंकाक्षांना पूर्ण करण्यात कुठलाच संकोच बाळगत नाही. शारीर गरजांना ती अपराधी भावनेतून पाहत नाही. उलट तिच्या शारीरिक गरजांची पूर्तता पतीकडून होत नाहीत याबाबत कुटुंबात उघडपणे उच्चार करण्यास ती जराही कचरत नाही.

- Advertisement -

पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कादंबरीतल्या पात्राची धग अजूनही कमी झालेली नाही. भारतीय समाजात आजही स्त्रियांच्या कामभावनेकडे मानवी दृष्टीकोनातून फार कमीवेळा पाहिले जाते. स्त्रियांमध्ये असणार्‍या कामभावना पुरुषांहून काही वेगळ्या नसतात. स्त्री-पुरुष आणि बहुलिंगी या सार्‍यांच्याच देहाची तृष्णा सारखीच तर असते. पण आजही हे सत्य आपल्याला स्वीकारता येत नाही. नैतिकतेच्या चौकटी घालून आपण शुचितेच्या गप्पांमध्ये सहभागी व्हायला तयार असतो, पण कामजीवनाच्या मुळ मुद्यांमध्ये आपल्याला अजिबात रस नसतो. स्त्रियांच्या कामजीवनाबाबत तर कोणालाच बोलायचे नसते.

कृष्णा सोबती यांनी कांदबरीत याच मुद्यांना हात घातला आहे. कांदबरीत गुरुदास लाल आणि धनवंती यांची तीन मुले आहेत. बनवारीलाल, सरदारी लाल, गुलजारी लाल. या तिघांचीही लग्न झालेली आहेत. त्यांच्या पत्नींची नावं अनुक्रमे सुहागवंती, समित्रावंती आणि फुलावंती अशी आहेत. या तिघींमध्ये समित्रा म्हणजेच मित्रो ही अत्यंत निडर स्त्री आहे. आपल्याला जे वाटेल ते ती बोलत असते, मग अगदी आपल्या शरीराची उपेक्षा होते हेही. सरदारी लाल तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करु शकत नसतो. त्याच्यामध्ये कुठली कमी नसते, मात्र तिच्या देहाची जितकी गरज असते तितकं तो देऊ शकत नसतो. त्यामुळेच ती त्याचा उद्धार करत असते. सरदारी लालला जेव्हा कळतं की ती त्याच्या मित्रांसोबत उठबस करते तेव्हा तिच्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करतो, तेव्हादेखील आणि त्यानंतरही मित्रो आपल्या गरजांचा उल्लेख करणं थांबवत नाही.

- Advertisement -

मित्रो सरदारी लालच्या मित्रांशी गप्पा मारते त्यावरुन तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो तेव्हादेखील ती फारच स्पष्ट म्हणते की, तुम्ही लावत असलेला आरोप खरा आहे आणि खोटादेखील. ‘‘सच तो यूं, जेठ जी की दीन दुनिया बिसरा मैं मनुक्ख की जात से हंस लेती हूँ. झूठ यूं की खसम का दिया राजपाट छोडी मैं कोठे पर तो नहीं जा बैठी.’’ आपण इतरांशी मित्रत्वानं बोलायला जातो याचाही कुटुंबियांना होणारा त्रास मित्रो असं वैतागत बाहेर काढते. मित्रो स्षष्टवक्ती असली तरी ती वाईट नक्कीच नाही. सरदारी लालला जेव्हा पैशांची चणचण निर्माण होते त्यावेळेस ती झटदिशी माहेराहून मिळालेली रक्कम देऊन टाकते. त्याही वेळेस ती नवर्‍याला जे म्हणते त्यातून मित्रोचं शरीरच नव्हे तर दुखावलेलं मनही बोलतं. ती म्हणते, महाराज जी, न थाली बाँटते हो, न नींद बाँटते हो, दिल के दुखडे ही बाँट लो!

एका प्रसंगात तिची मोठी जाऊ तिला म्हणते की, तुझा नवरा तर देवता पुरुष आहे त्याच्यासोबत तू असं खोटं नाटं का वागतेस? वाईट मार्गाला जाणं सोडून दे. शेवटी सगळ्यांनाच न्यायनिवाड्याच्या दरबारी हजर व्हायचं आहे. यावर मित्रो फार मार्मिक उत्तर देते, काहे का डर? जिस बडे दरबारवाले का दरबार लगा होगा, वह इंसाफी क्या मर्द जाना न होगा? तुम्हारी देवरानी को भी हांक पड गई तो जगजहान का अलेबला गुमानी एक नजर तो मित्रो पर भी डाल लेगा! जगाचा नियंत्यांच्या न्याय पुरुषांनाही तर लागू आहेच की आणि तो तिचीदेखील फर्याद ऐकवेळ ऐकेलच की!

कृष्णा सोबतींनी रंगवलेली इतकी निर्भय आणि स्पष्ट वागणारी मित्रो तर आपल्याला आजच्या काळातही नकोशी वाटते. स्वत:च्या नवर्‍याकडे स्पष्टपणे शरीरसुखाची मागणी करणारी स्त्रीदेखील वाईट चालीची ठरवली जाते. कामजीवन स्त्रियांनाही आनंद आणि सुख देण्यासाठी आहे याची अनेकदा स्त्रियांनाही जाणीव नसते आणि ज्यांना तशी जाणीव असते आणि त्यासाठीचा मार्ग शोधू लागतात त्यांना हरतर्‍हेनं बदनाम केलं जातं.

मागे एकदा एक तरुणीची गुंतागुंतीची समस्या होती. लग्नाच्या काही महिन्यांत ती गरोदर राहिली आणि नवरा एकाएकी घर सोडून निघून गेला. सासरच्यांनाही काही ठावपत्ता नाही. शेवटी सासरच्यांनी तिला माहेरी सोडलं. ती बाळंत झाली तरी नवर्‍याचा पत्ता नव्हता. बाळ पाच सहा महिन्यांचं झाल्यावर उपजिविकेसाठी ती एका दुकानात कामाला लागली. तिथंच काम करणार्‍या एका सहकार्‍यासोबत तिचे प्रेमसंबंध सुुरू झाले. कामाच्या ठिकाणी जवळच एक खोली करून ती एकटी राहत होती. हळूहळू सहकारी तिच्या घरी येऊ लागला आणि त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. तो तिला लग्नाची स्वप्न दाखवत होता. कालांतराने त्यानं तिच्याशी देवळात लग्नही केलं, पण त्याचा तिच्याकडे कसलाही पुरावा नव्हता आणि आता तोही तिला सोडून निघून गेला होता. त्या तरुणीचं म्हणणं होतं, मी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता. पण मी तरी वेगळं काय करणं अपेक्षित होतं. जोवर लग्न नव्हतं तोवर शरीरसुख माहीत नव्हतं. ते कळू लागलं तेव्हा नवरा गायब झाला, मग ते अन्य कुणाकडून मिळतंय म्हटल्यावर मी विश्वास टाकला. माझं प्रेम होतं असं नव्हे, पण मला सुख हवं होतं. पण याचा अर्थ असाही नव्हता की, मी त्याच्याबरोबर निभावायला तयार नव्हते. मी त्याच्याबरोबर आयुष्य काढायला तयार होते. पण तो नेभळटासारखा गेला आणि आता मला स्वत:ची लाज वाटतेय.

तिला तिच्या कुटुंबियांनी, कामाच्या ठिकाणच्या लोकांनी तिची कशी चूक आहे, तिनं ‘लफडं’ करायला नको होतं हे हरतर्‍हेनं पढवून दिलेलं होतं. या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक दोषी कोण असेल तर ती, असं सगळ्यांनी तिला सुनावलेलं होतं. तिच्या विस्कटलेल्या आयुष्यात कुणाचा तरी आधार मिळतोय म्हटल्यावर ती तो धरायला गेली त्या आधारात तिच्या शरीराची गरजही अंतर्भूत होतीच. पण त्यावेळी सर्वांनी तिला केवळ तिने स्वत:च्या शरीराचाच विचार केला म्हणत तिला वेगवेगळी लेबलं लावून टाकली होती. त्यातूनच तिला लाज-बिज वाटत होती. मुळातच तिच्या चारित्र्याची पारख, ती बरी स्त्री आहे की वाईट हे यावरुन ठरवून कसं टाकता येईल? तिने स्वत:ला न्यूनगंडात ढकलून दिलं होतं. तिच्याशी सातत्यानं बोलून त्यातून बाहेर पडायला तिला मदतीची गरज होती.

आपण सरसकट इतरांच्या प्रेमसंबंधांना आणि शरीरसंबंधांना लफडी म्हणत त्यांची हेटाळणी करत राहतो. माणूसपणाच्या पातळीवर उतरुन सारासार विचार करायचा आणि त्या दिशेनं उत्तर शोधायचा प्रयत्न करत नाहीच अजूनही. खरंतर मित्रो मरजानी या कादंबरीला पन्नास वर्षे झाली तेव्हा कृष्णा सोबतींनी माध्यमांमध्ये सांगितलं होतं की, ‘मित्रो’ अब किताब की किरदार नहीं रही बल्कि वह एक व्यक्तित्व बन चुकी है, जो अपनी इच्छाएं व्यक्त करती है और उसे पुरा करना भी चाहती है.

खरंतर अशा कितीतरी खर्‍या खुर्‍या व्यक्तीमत्त्वांना आजही झगडणं चुकलेलं नाही आणि त्यासाठी एकूणच समाजात बदल होण्यास अद्याप बरंच काही घडणं बाकी आहे.

-हिनाकौसर खान-पिंजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -