घरफिचर्सपुलवामानंतर मुंबई सावध

पुलवामानंतर मुंबई सावध

Subscribe

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्याराज्यामध्ये राजकीय पक्षाच्या सभा सुरू झालेल्या असून देशात एकीकडे निवडणुकीचे वारे असून दुसरीकडे पुलवामा हल्ल्यानंतर देशावर हल्ल्याचे सावट आलेले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात या दहशतवादी संघटनांकडून मुंबईला लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, यासाठी गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणेला दिलेल्या आहेत.

पुलवामात जैश-ए-महम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने देश हादरला होता. मात्र भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले, भारतीय वायूसेनेच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानची चांगलीच नांगी ठेचली गेली. या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने माघार घेत भारतापुढे शरणागती पत्करली असली तरी पाकिस्तान हा देश पाठीमागून वार करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

- Advertisement -

पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादी संघटनेकडून भारताला कुठल्याही क्षणी क्षती पोहचवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारताने गाफील न राहता या दहशतवादी संघटनांचा हा मनसुबा लक्षात घेऊन गुप्तचर विभागाने सतर्क राहण्याचा इशारा देशातील सुरक्षा यंत्रणांना दिला आहे. गुप्तचर विभागाच्या या इशार्‍यानंतर देशात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, गुजरात, दिल्ली ही शहरे दहशतवाद्यांच्या कायम लक्ष्यावर आहेत, या शहरामध्ये दहशतवादी हल्ला करून मोठा नरसंहार घडवण्याचा मनसुबा दहशतवादी संघटनांचा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या शहरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्थानिक सुरक्षा यंत्रणेसह देशातील इतर सुरक्षा यंत्रणादेखील या संघटनांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई शहराला या दहशतवादी संघटनेने कायम आपले लक्ष्य केले आहे. या शहरात हल्ले घडवून आणण्यासाठी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला आहे. रेल्वे, बस स्थानके, गर्दीच्या ठिकाणांवर स्फोटके पेरून स्फोट घडवून आणले गेले आहेत. 26/11चा दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो, या हल्ल्यात केवळ भारतीयच नाही तर इतर देशातील नागरिकांनादेखील लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणेत असलेल्या त्रुटी भरून काढण्यात आल्या, त्यामुळे मुंबईच्या सुरक्षा यंत्रणेची परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली आहे. मुंबई पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा यापुढे या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे. यापुढे शहरात या प्रकारचे दहशतवादी हल्ले रोखण्याचे बळ येथील सुरक्षा यंत्रणेत असल्याचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

रेल्वे, विमानतळ, धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, सागरी किनारे, हॉस्पिटल, गर्दीचे ठिकाण ही कायम दहशतवाद्यांच्या लक्षावर राहिली आहेत. या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत बरीच सुधारणा झाली असून यापुढे या प्रकारचे हल्ले परतवून लावण्याची क्षमता येथील सुरक्षा यंत्रणेत आहे. मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, तटरक्षक दल, नौदल, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

मुंबई सुरक्षित आहे, नागरिकांनी सतर्क राहावे, मुंबईला लक्ष करू पाहणार्‍या दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मुंबईतील सुरक्षा यंत्रणा तसेच मुंबई पोलीस सक्षम असल्याचे नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी केले स्पष्ट केले आहे. मुंबईने गेल्या अनेक वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले सोसले आहेत. तरीही मुंबई पुन्हा ताठ मानेने उभी आहे.

राम प्रधान अहवाल
26/11च्या हल्ल्यानंतर राम प्रधान समितीने गृह विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी सुचवलेल्या 70 टक्के शिफारशींची गृह विभागाने अंमलबजावणी केली आहे. त्यामध्ये सागरी किनार्‍याचे रक्षण करण्यासाठी सागरी पोलीस ठाण्यांची बांधणी, फोर्स वनची स्थापना, गुप्तचरांचे जाळे वाढवण्यात आले, अत्याधुनिक शस्त्र व संपर्काची साधने आदी बहुतेक गोष्टी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

सागरी सुरक्षेसाठी 57 बोटींची खरेदी करण्यात आली असून प्रशिक्षित मनुष्यबळही भरती केले गेले आहे. समुद्र किनार्‍यांच्या सुरक्षेसाठी नऊ सागरी पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली आहे. किनार्‍यानजीकच्या कोळी समाजासाठी खास बायोमेट्रिक कार्ड बनवण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांचे जाळे वाढवण्यासाठी 250 जणांना विशेष प्रशिक्षण देऊन गृह विभागात भरती करण्यात आले. तसेच महाराष्ट्र गुप्तचर अकादमीमध्ये दोन हजार पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मुंबईत ठिकठिकाणी शंभरहून अधिक नवे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.

26/11च्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 36.65 कोटी रुपयांचा निधी 2008-09 मध्ये देण्यात आला. त्यातून डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, बुलेटप्रूफ हेल्मेट्स, वाहने, यंत्रसामुग्री व शस्त्रे यांची खरेदी करण्यात आली.

निवडणुकीवर दहशतवाद्यांचा डोळा
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्याराज्यामध्ये राजकीय पक्षाच्या सभा सुरू झालेल्या असून देशात एकीकडे निवडणुकीचे वारे असून दुसरीकडे पुलवामा हल्ल्यानंतर देशावर हल्ल्याचे सावट आलेले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात या दहशतवादी संघटनाकडून मुंबईला लक्ष करण्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणेला दिलेल्या आहेत.

मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता मुंबई पोलीस या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे. मुंबईत कुठलाही घातपात, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत सर्वत्र पोलीस बंदोबस्त, नाकाबंदीत वाढ करण्यात आली आहे. मुंबईत होणार्‍या राजकीय सभा, रेल्वे स्थानके, गर्दीची ठिकाणे येथे होणार्‍या संशयास्पद हालचालींवर शहरात बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेरे लक्ष ठेऊन आहेत.

26/11च्या हल्ल्यांनतर मुंबईत ‘फोर्स वन’ची स्थापना करण्यात आलेली असून फोर्स वनच्या जवानांना दहशतवादी हल्ल्याला सामोरे कसे जायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईत केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचा विभाग असणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा जवानांचे (एनएसजी) तळ मुंबईत कायमस्वरूपी उभारण्यात आला आहे. सागरी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून समुद्रातील संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यात प्रत्येकी दहशतवाद विरोधी सेल(एटीसी) सुरू करण्यात आलेले आहे. पथकाकडून शहरातील मॉल, चित्रपटगृह येथील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

एनएसजी, फोर्स वन, क्यूआरटीचे कमांडो शस्त्रसज्ज
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती घडल्यास अवघ्या काही मिनिटांत दहशतवाद्यांना एनएसजी, फोर्स वन, शीघ्र प्रतिसाद पथकातील (क्यूआरटी) प्रशिक्षित, अद्ययावत शस्त्रसुसज्ज कमांडो चोख प्रत्युत्तर देऊ शकतील. हल्ल्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, अद्ययावत शस्त्रे, साधनसामुग्री, प्रशिक्षित कमांडो पथकांचे तळ याबरोबरच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर भर देण्यात आला. दहशतवादी हल्ला होऊच नये, केला तरी प्रत्युत्तराचा अवधी कमी असावा आणि हल्ल्याचा बीमोड त्वरित करावा, असा उद्देश समोर ठेवून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. आजच्या घडीला कोणत्या प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ शकतील अशा कमांडोंची तीन पथके मुंबईत सज्ज आहेत. त्यांनी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. ती अद्ययावत शस्त्रे, दारूगोळा, क्षणात कुठेही धडकू शकेल अशा साधनसामुग्रीसह सज्ज आहेत. त्यांच्या जोडीला शहरात सीसीटीव्हींचे जाळे आहे. अतिरेक्यांनी हल्ला केल्यास सर्वप्रथम त्यांच्यावर तुटून पडतील अशा कॉम्बॅट व्हॅनही सज्ज आहेत.

सागरी कवच
समुद्रसीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाने एकत्रितरित्या सागर कवच या उपक्रमाद्वारे प्रभावीपणे सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली. शहरात ठिकठिकाणी मॉकड्रील्स सुरू करून पोलीस किती सतर्क आहेत आणि हल्ला परतवून लावण्यास कितपत सज्ज आहेत याची प्रात्यक्षिके करण्यात येत आहेत.

जागृत मुंबईकर
नागरिकांना सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘जागृत मुंबईकर’ हा उपक्रम सुरू केला. शाळा-महाविद्यालये, शासकीय कचेर्‍या, खासगी-कॉर्पोरेट कार्यालये, वस्त्यांमध्ये जाऊन दहशतवाद म्हणजे काय, मुंबईसह जगातल्या प्रमुख शहरांमध्ये घडलेले हल्ले, दहशतवादाचे बदलते स्वरूप, सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी, काय करावे-काय टाळावे याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येते.

एटीसीचे कार्य
प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अ‍ॅन्टी टेररिस्ट सेल’ पथकाची उभारणी करण्यात आली आहे. हे पथक कार्यक्षेत्रात भाड्याने घर घेणारे, मोबाईल-सीमकार्ड घेणारे, शिधापत्रिकांसह विविध कागदपत्रे बनवून घेणारे अशा प्रत्येकावर या ‘सेल’चे लक्ष आहे.
कसा होऊ शकतो हल्ला

‘राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांच्या मते मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, या आर्थिक राजधानीत दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम असेल. मात्र हे हल्ले 26/11प्रमाणेच असतील असे नाही. हल्ला कसाही होऊ शकतो. मधल्या काळात जगाच्या विविध बड्या शहरांना एकल हल्ला (लोन वूल्फ अ‍ॅटॅक), आत्मघातकी हल्ल्यांनी हादरवले. मुंबईत अशा प्रकारचा हल्ला होऊ नये या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात आहेत.

-संतोष वाघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -