घरफिचर्समायमहानगर ब्लॉगदिल्लीतले पुतीन...राज्यातले झेलेन्स्की!

दिल्लीतले पुतीन…राज्यातले झेलेन्स्की!

Subscribe

राज्यात अकल्पितपणे अस्तित्वात आलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारची तडफदारपणे बाजू लावून धरणारी मुलुख मैदानी तोफ शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ‘सामना’चे कार्यकारी संपादक असले तरी आपल्या ‘मार्मिक’ वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मागे जेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याला गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र संबंधितांना पाठवले होते, तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की, ही वसुली कुणी करायला सांगितली, त्याच्या मुळापर्यंत पोहोचायला हवे, त्यांचा शोध लागायला हवा. त्यावर संजय राऊत म्हणाले होते की, राजकारणात पैसे कसे येतात हे इतकी वर्षे राजकारणात असलेल्या फडणवीसांना माहीत नाही का, हमाम मे सब नंगे. त्यानंतर महात्मा गांधीजींची हत्या करणार्‍या नथुराम गोडसे यांचे काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून उदात्तीकरण होऊ लागले तेव्हा राऊत म्हणाले होते की, गोडसेला देशाची फाळणी रोखायचीच होती तर देशाची फाळणी मागणार्‍या महमदअली जिनांची हत्या करायला हवी होती. गांधीजींची हत्या करून काय मिळवले.

राऊत यांच्या विधानात अगदीच तथ्य नाही, असे म्हणता येत नाही, पण तो जर तरचा विषय आहे. राऊत यांचा गेली अनेक वर्षे लेखनकार्याशी संबंध राहिल्यामुळे त्यांची कल्पनाशक्तीही चांगली आहे. त्या कल्पकतेच्या बळावरच त्यांनी शरद पवारांसोबत यशस्वी खलबते करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी स्थानापन्न केले. इतकेच नव्हे तर गेली अडीच वर्षे भाजपने ठाकरे सरकार पडण्याच्या केवळ तारखाच जाहीर केल्या अशातला भाग नाही तर ते पाडण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले, पण अद्याप त्यांना यश आले नाही. भाजपकडून होणार्‍या विविध घोटाळ्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्याचे काम राऊत दररोज करत असतात. मध्यंतरी शिवसेना भवन येते राऊत यांनी जंगी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राऊत हे पवारांच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करतील की काय, अशी अटकळ बांधली जात होती, पण राऊत यांनी ती खोटी ठरवली.

- Advertisement -

गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील भाजपचे नेते ठाकरे सरकार पडावे आणि आपले सरकार यावे, निदान आपले सरकार नाही आले, तरी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊन आपल्या मर्जीतील राज्यपालांच्या हाती राज्याच्या सत्तेची सूत्रे यावीत यासाठी जंग जंग पछाडत आहेत. किरीट सोमय्या यांच्यासारखे नेते तर सत्ताधार्‍यांच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांच्या घोटाळ्यांचे कागदोपत्री इतके पुरावे देत आहेत की, ही सगळी कागदपत्रे एकत्र करून त्यावर अनेक पीएचड्या घेता येऊ शकतील. सोमय्या यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप करण्यात मागे नाहीत. पण या आरोपांचा सरकार पडण्यासाठी काही उपयोग होताना दिसत नाही. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्यावरील शस्त्रक्रियेचे संकट आल्यावरही सरकार व्यवस्थित चालत होते. मुख्यमंत्र्यांशिवाय महाराष्ट्र चालला आहे. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवा, अशी खोचक टीका भाजपचे चंद्रकांत पाटील आणि इतरांकडून होत होती, पण त्यामुळे डगमगून न जाता संजय राऊत भाजप नेत्यांची ही बोचरी टीका बोथट करून टाकत, सरकार मजबूत आहे, असे खंबीरपणे सांगत होते.

महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आणण्याची स्वप्ने तर भाजप नेत्यांना केवळ रात्री नव्हे तर दिवसादेखील पडत असतात. त्या स्वप्नांचा अखंड पाठलाग करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यात चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता पुन्हा आली. त्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रभारी असलेल्या गोव्यात भाजपला आपली निसटती का होईना पण सत्ता राखता आली. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये बेसुमार उत्साह संचारला होता. जणू काही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, अशा थाटात नागपुरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यात त्यांनी २०२४ साली आम्हीच येणार, अशी घोषणा केली.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडी, आयकर विभाग यांच्या धाडी महाराष्ट्रात सत्ताधारी नेत्यांवर आणि विशेषत: शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाइकांवर पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, तसेच मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर त्या नुकत्याच पडल्या. कोरोना काळात मुंबईचा सगळा कारभार महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेकडे होता. या काळात मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोप त्यावेळीही भाजप करत होता आणि आजही करत आहे. आता तर मुंबईतील कोरोना ज्यांनी आपल्या उत्तम कामगिरी आणि निर्णय क्षमतेमुळे नियंत्रणात आणला त्या आयुक्त इकबालसिंह चहल यांनाही आयकर विभागाची नोटीस गेल्याची चर्चा आहे. त्यांचीही चौकशी करण्याची मागणी भाजपकडून होत आहे.

मागच्या वेळी मुंबईतील पालिकेची थोड्या फरकामुळे गेलेली सत्ता भाजपला मिळवायची आहे. गेल्या वेळी भाजपने शिवसेनेचा महापौर होण्यासाठी सहाय्य केले. पालिका तुमची, राज्य सरकार आमचे अशी विभागणी करण्यात आली, असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात शिवसेनेने पालिकाही आपल्या ताब्यात ठेवली आणि राज्याची सत्ताही मिळवली. त्यामुळे भाजपची अवस्था तेलही गेले, तूपही गेले, अशी झाली. त्यामुळेच भाजपचा शिवसेनेवर जास्त रोष आहे. त्यांची ही झालेली फसवणूक आणि आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेले यश यामुळे भाजप नव्या दमाने कामाला लागला आहे. एका बाजूला केंद्रीय तपास यंत्रणांच्या शिवसेना नेत्यांवरील धाडींचा धडाका वाढला आहे. त्या धाडी अगदी मुला, मुलीपासून, जावई, मेहुणे इथपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत, पण सरकार काही पडत नाही.

त्याचबरोबर रशिया युक्रेनसारख्या छोट्या देशावर क्षेपणास्त्रांचा अक्षरश: पाऊस पाडत आहे, पण इतके दिवस झाले तरी युक्रेन काही पडताना दिसत नाही. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी दिल्लीतील पुतीन आमच्यावर सातत्याने क्षेपणास्त्रांचे हल्ले करत आहेत, तरीही आम्ही झेलेन्स्की यांच्या जिद्दीप्रमाणे लढत राहू, आम्ही हटणार नाही, असे ठणकावून सांगत आहेत, पण केंद्र आणि राज्य यांच्या या सत्तेच्या युद्धात महाराष्ट्राचे मात्र नुकसान होत आहे, हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -