घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलसींच्या प्रभावापुढे कोरोना झुकला !

लसींच्या प्रभावापुढे कोरोना झुकला !

Subscribe

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने 31 मार्च 2021 पासून साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत घातलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे. केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. खरे तर याआधीच देशातील बहुतेक राज्यांनी कोरोना निर्बंधांत बर्‍यापैकी शिथिलता आणल्याने उद्योगधंद्यांना गती येत आहे. तरीही तांत्रिकदृष्ट्या का होईना, परंतु सर्वसामान्य नागरिकांची तब्बल 2 वर्षांनंतर कोरोना निर्बंधांच्या जाचातून सुटका होणार आहे. आपल्या सर्वांनाच या साथीच्या आजाराला मागे टाकून एक ना एक दिवस पुढे जायचे आहे. सध्याच्या घडीला कितीही दूर जाण्याची आपली इच्छा असली तरी, ही महामारी पूर्णपणे संपलेली नाही. निर्बंध हटवण्यात येत असले, तरी कोरोनाचे अस्तित्व अजूनही कायम आहे. जोपर्यंत भारतासह इतर देशांमध्ये मोठ्या स्तरावर लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगभरात कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका कायम असेल आणि त्यातून नवनवीन व्हेरिएंट्सना तोंड द्यावे लागेल.

या लाटा सरत्या वेळेनुसार कमजोर होतील, पण एकामागोमाग एक करत थडकतच राहतील. कदाचित दुसर्‍या रूपाने. देशात कोरोना संसर्गाला सुरूवात झाल्यानंतर मार्च २०२०पासून केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत अनेक निर्बंध लादले होते. चीनमधून एक एक देश करत कोरोना प्रसाराला अगदी छुप्या पावलांनी सुरूवात झाली, तोपर्यंत या महामारीचे गांभीर्य कुणालाही जाणवले नव्हते. पण जसजसे रुग्ण वाढू लागले, तसतशी सर्वच देशातील यंत्रणांची धांदल उडाली. अनेक देशांत बघता बघता महामारीने उसळी मारली. कोरोना म्हणजे काय? तो हवेतून पसरतो की स्पर्शातून, एक कोरोनाबाधित रुग्ण कितीजणांपर्यंत या संसर्ग पसरवू शकतो. हा आजार कसा आटोक्यात येईल? त्यावर औषधे कोणती? असे एक ना अनेक प्रश्न त्यावेळी सर्वसामान्य जनतेसोबतच आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांसमोर उभे राहिले.

- Advertisement -

इटली, जर्मनी, फ्रान्स, चीन, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाने कहर केल्याच्या बातम्या आपण टीव्हीवरून बघत हादरून जात होतो. असंख्य अनुभव ऐकून, पाहून आपण आतल्या आत थरथरत होतो. रुग्णालये ओसंडून वाहत होती. ऑक्सिजनच्या नळकांड्या नाकातोंडात गेलेले रुग्ण तडतफत होते. डोळ्यादेखत आपल्या माणसांचा अंत होत होता. मृतदेहांचा खच पडत होता. अंत्यविधी करायलाही जागा अपुरी पडत होती. जागोजागी कोविड सेंटर्स उभारले जात होते. मिनिटागणिक कोरोना रुग्ण दुप्पट, चौपट अशा वेगाने वाढत असल्याने कित्येक देशांतली आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. त्यावेळी कोरोनाचा उद्रेक झाला होता.

कोरोनाबाधित रुग्णांवर वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग केले जात असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीसाठी सरकारी पातळीवर मंजुरी देण्यात आली. कित्येक देशांनी लस निर्मिती, संशोधनासाठी कोट्यवधी डॉलर्स ओतले. लस येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत संसर्गाला आवर कसा घालायचा? या दहशतीने ग्रासलेल्या देशांपुढे सक्त लॉकडाऊन लावण्यावाचून पर्यायच नव्हता. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच इतर देशांचे अनुकरण करत लॉकडाऊनचे कठोर निर्बंध लादण्यात आले. कलम 144 लागू करत गर्दीला पूर्णपणे अटकाव करण्यात आला. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली. कधीकाळी वाहतूकोंडीने त्रस्त असलेले रस्ते ओसाड झाले. शाळा-कॉलेज, बाजारपेठा, कार्यालयाच्या इमारती निर्मनुष्य झाल्या.

- Advertisement -

उद्योगधंदे ठप्प पडले. उगीच भटकणार्‍यांना दांडक्याचा चोपही मिळाला. या काळात सगळ्याच राज्यांच्या पोलिसांनी मात्र कायदा-सुव्यवस्था चांगल्या रितीने हाताळली. कोरोना वेगवेगळ्या व्हेरियंटच्या रुपात आणखी मजबूतीने तांडव करू लागला. पहिल्या लाटेच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंटने आणलेल्या दुसर्‍या लाटेत भारतात खूप हाहा:कार माजला. देशात रोज एक लाखांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागल्याने रुग्णालयातील खाटाही कमी पडू लागल्या. ऑक्सिजनची टंचाई भासू लागली. लाखो लोक कोरोनाने हिरावून नेले. मात्र हा संकटकाळही सरू लागला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे आगमन झाले. देशात लसीकरणाला सुरूवात होताच संसर्गाचे प्रमाणही घटू लागले, तसेच गंभीर परिस्थितीत जाऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच कमी झाले.

ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केल्यावर तिसरी लाटही तेवढीच विघातक ठरेल का? या धास्तीने हळुहळू शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले होते. परंतु सुदैवाने देशपातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची कवचकुंडले अनेकांच्या अंगावर चढलेली असल्याने तिसर्‍या लाटेच्या प्रकोपापासून अनेकजण सुरक्षित राहिले. दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही लाट सौम्यच राहिली. कोरोनाने आरोग्य व्यवस्थेला तडाखा देण्यासोबतच अर्थव्यवस्थेलाही गाळात ढकलण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल करून आधी केंद्र आणि नंतर राज्याराज्यांतील उद्योगधंद्यांना पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यासोबच, मनोरंजन वा इतर सर्वच सोईसुविधांचा लाभ घेण्याची मुभा देण्यात आली.

सध्याच्या घडीला कुणालाही नाक्यावरच्या पानीपुरीवाल्याकडे जाउन चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेता येण्याइतपत दैनंदिन व्यवहार अत्यंत मोकळेपणानेच सुरू झाले आहेत. तोंडावरील मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास याआधी लावण्यात येणारी दंडवसुलीही अनेक राज्यांत मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्राने निर्बंध हटवण्याची केलेली ही घोषणा तांत्रिक असली, तरी सर्वसामान्यांच्या मनाला मोठी उभारी देणारी आहे. केंद्रीय मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 25 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशाचा कालावधी संपल्यानंतर कोरोनासंदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे.

एखाद्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित राज्य आपल्या पातळीवर निर्णय घेऊ शकते, असा सल्लाही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. सध्या देशात दिवसाला सरासरी 23 हजार कोरोनाबाधित आहेत. ही संख्या तुलनेने खूपच कमी आहे. तर आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 181.56 कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली होती, परंतु लसीकरणामुळे चौथी लाट आलीच तरी ती सौम्य असेल. कोरोनाबाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचे प्रमाण खूप कमी असेल, असे तज्ज्ञांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -