घरCORONA UPDATEBlog: कोरोना आपलं मन पोखरतोय

Blog: कोरोना आपलं मन पोखरतोय

Subscribe

आपली जवळची माणसं कोरोनामुळे जात असताना कोरोना आपलं मनातून खच्चीकरण करत आहे.

सकाळी मुलाबरोबर मेडिकलमध्ये गेले होते. सोशल डिस्टन्सिंग सांभाळत सहा सातजण रांगेत उभे होते. आमच्या पुढे एक सत्तरीतील आजोबाही उभे होते. ज्येष्ठ नागरिक असल्याने मेडीकलवाल्यासह इतरांनी त्यांना रांग न लावता औषध घेण्यास सांगितले. पण आजोबांनी सगळ्यांना नम्रपणे थँक्स बोलत आपण फिट असल्याचे खणखणीत आवाजात सांगितले. सगळ्यांना नियम सारखाच असावा, असेही म्हटले. यादरम्यान, आजोबा त्यांच्या पुढे उभ्या असलेल्या व्यक्तीबरोबर कोरोना व लॉकडाऊन बदद्ल इकडच्या तिकडच्या गप्पाही मारत होते. आजोबांचा आवाज कडक तर होताच पण खणखणीत असल्याने ते जे काही बोलत आणि सांगत होते, ते सगळ्यांच्याच कानावर पडत होते. एकूण आजोबांच व्यक्तिमत्व छाप पाडणारं होतं.

तेवढ्यात आजोबांच्या हातातला मोबाईल खणखणला समोरील व्यक्तीने त्यांना काय सांगितले माहित नाही पण ‘Oh My God’ म्हणत ते मट्कन खालीच बसले. लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडू लागले. रडताना त्यांचा मास्कही खाली पडला. पण त्याचे त्याकडेही लक्ष नव्हते. क्षणभर कोणालाच कळलं नाही काय झालं ते. आम्ही सगळ्यांनी त्यांना विचारालं काय झालं? पण ते कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते फक्त रडत मोबाईल चाचपडत होते. एकाने विचारले अंकल किसीको फोन करना है क्या? नंबर बोलो मैं करता हू… तेवढ्यात मेडिकलवाला धावतच पाण्याचा ग्लास घेऊन आला. अंकल पाणी पिजिए. शांत हो जाईए. क्या हुआ बताईए… डू यू नीड एनी हेल्प… यादरम्यान, काहीजण मात्र सोशल डिस्टन्सिंग सांभाळून आजोबांची लांबूनच विचारपूस करत होते.

- Advertisement -

पाणी पिऊन आजोबा थोडे शांत झाले. My cousin is no more.. corona killed him असे सांगत ते पुन्हा रडू लागले. हे ऐकताच आजोबांच्या जवळ जेवढे जण गोळा झालेले ते क्षणात दोन पावले मागे सरले. कोरोनाच्या नावाने व संसर्गाच्या भीतीने सगळेच घाबरले. त्यानंतर आजोबा एवढेच म्हणाले He is staying in France ते पुन्हा रडू लागले. मृत व्यक्ती फ्रान्समध्ये गेल्याचे ऐकताच लांब जाऊन उभे राहीलेले पुन्हा आजोबांच्या जवळ येऊन त्यांना धीर देऊ लागले.

एव्हाना आजोबांनी स्वत:ला थोडफार सावरलं होतं. त्यांना उभं राहण्यासाठी माझ्या मुलासह एकाने हात दिला. पण Thanks म्हणत त्यांनी दोघांना नकार दिला व ते लडखडतच उभे राहीले. सोशल डिस्टन्सिंग सांभाळा सांगत God bless you म्हणत ते रांगेतून बाहेर पडले व औषधं न घेताच जाऊ लागले. पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल वाजला I am at Medical असे सांगत ते तिथेच थांबले. काही सेकंदातच एक तरुण त्यांच्या दिशेने धावत आला. त्याला बघताच ते पुन्हा रडू लागले. तरुणाने त्यांना मिठीच मारली व धीर देत तो त्यांच्या सोबत चालू लागला. आम्ही सगळेजण हा प्रसंग बघत होतो. काळी वेळापूर्वी खणखणीत आवाजात बोलणारे आजोबा एक क्षणात उन्मळून पडले होते. तरुणाने एक हात त्यांच्या खांद्यावर टाकला होता. तो त्यांना सावरत होता. काही वेळापूर्वी मुलांची मदत नम्रपणे नाकारणाऱ्या आजोबांनी यावेळी मात्र त्या तरुणाचा हात घट्ट पकडला होता. कोरोनाने एका कडक स्वभावाच्या व्यक्तीला आतून पार हलवून टाकलं होतं.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -