वड्याचं तेल वांग्यावर नको!

संपादकीय

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन गुवाहाटीला तळ ठोकून असलेल्या ४० हून अधिक आमदारांमुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अस्थिर झालंय. शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचे संख्याबळ जवळ असल्याने शिवसेना आमचीच असा छातीठोक दावा आता शिंदे गटाकडून करण्यात येऊ लागलाय. यातील तांत्रिक वा कायदेशीर बाबी निकाली लागल्यानंतरच शिवसेना नेमकी कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची हे स्पष्ट होईल. या सार्‍या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाची खरी ताकद असलेले पदाधिकारी आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. एका बाजूला विधिमंडळात सत्तेपेक्षाही अस्तित्व टिकवून ठेवण्याचं आव्हान पेलताना शिवसैनिकांचं पाठबळ तरी आपल्या मागे कायम रहावं याचा आटोकाट प्रयत्न आता ठाकरे कुटुंबाकडून करण्यात येतोय. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडं बघावं लागेल.

उद्धव ठाकरे एका बाजूला भाषण करत असतानाच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी दाद न देणारे बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून भावनिक साद घालायला सुरुवात केली. आतापर्यंत आपण एक कुटुंब म्हणून एकत्र होतो. इथून पुढंही राहू, असं आश्वासन त्यांना त्या देत आहेत. यावरून ही लढाई विधिमंडळासोबतच कार्यकर्त्याच्या माध्यमातून गरज पडलीच तर रस्त्यावर उतरून आणि किचन कॅबिनेटमधूनही लढण्याचा चंग ठाकरे कुटुंबाने बांधलाय. जसजशी परिस्थिती वळणं घेत राहील, तसतशी ही रणनीती प्रभावी ठरतेय की नाही, हे दिसून येईल, मात्र ठाकरे कुटुंब अशा अवघड स्थितीत लवकर हार मानणार नाही, हे मात्र अगदी स्पष्ट दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी मुख्यमंत्री या भूमिकेतून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला होता. या संवादावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचे दाखले जनतेला दिले होते.

कोरोना संकटात त्यांनी याचप्रकारे सातत्याने जनतेशी संवाद साधत एक कनेक्ट तयार केला होता. प्रत्येकाच्या घरातील सदस्य या वाक्यावर भर देत त्यांनी वर्षा बंगला सोडण्याआधी याच संवाद तारेला छेडून लोकांच्या मनात आपुलकीची भावना तयार करण्याचा प्रयत्न केला. सोबतच बंडखोर आमदारांना उद्देशून समोरासमोर येऊन मागणी केल्यास मुख्यमंत्रिपद सोडायची तयारीदेखील दाखवली होती. दुसर्‍या दिवशी आणखी एक पाऊल मागं घेत मविआतून बाहेर पडण्याचीही तयारी असल्याचं सांगितलं होतं, परंतु शिंदे गटाने या आवाहनाला दाद न दिल्याने उद्धव ठाकरेंनी पक्षाचा कणा असलेल्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेण्याच्या रणनीतीवर काम सुरू केलंय. हे करतानाच त्यांनी बंडखोर आमदारांवर कडक शब्दांत टीका करून त्यांच्या परतीचे दोरही कापले.

शिवसेनेची पाळेमुळे जनमानसात रुजवणारे निष्ठावंत शिवसैनिक अजूनही आपल्यासोबतच आहेत. हेच त्यांना आता आपल्या कृतीतून शिंदे गटाला दाखवून द्यायचंय. या प्रगोयाची सुरुवात त्यांनी वर्षा बंगला सोडतानाच केली होती. शिवसैनिकांकडून या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता त्यांच्याकडून पुढचं पाऊल टाकलं जातंय. राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक हे त्याचच पुढचं पाऊल आहे. या बैठकीत शिवसेना नावाच्या कल्पवृक्षाला लागलेली फुलं, फळं नगरसेवकापासून ते आमदार, खासदारापर्यंत सर्वच सत्तापदांवरील व्यक्तींनी चाखली, परंतु या कल्पवृक्षाची मूळं अजूनही आपल्यासोबतच आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकच शिवसेनेची खरी ताकद असल्याचं सांगितलं. आमदारांचा जो गट शिवसेनेतून बाहेर पडलाय, त्याने ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता लोकांमध्ये फिरून दाखवावं.

हेही वाचा – तेलही गेले… तूपही गेले…!

तुम्हाला जी काही सत्तापदं उपभोगायला मिळालीत, ती शिवसेनेमुळंच. त्याशिवाय तुम्हाला कुणीही विचारलं नसतं, असं म्हणत त्यांनी या बंडखोरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतानाच अप्रत्यक्षरित्या शिवसैनिकांना हळूच चिथावणीही दिलीय. त्याचे परिणाम कदाचित पुढच्या काही दिवसांत दिसू शकतील. चिडलेले काही शिवसैनिक एव्हाना बंडखोर आमदारांच्या कार्यालयांबाहेर जमायला सुरुवातही झालीय. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले, त्यानंतरही त्यांना सांभाळलं, असा लेखाजोखाही त्यांनी वाचून दाखवत कठीण काळातही नेत्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचं दाखवलं. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमागं भाजपचाच डाव असल्याचं म्हणत यापुढचं आपलं लक्ष्य कोण आहे याकडंही अंगुलीनिर्देश केला. या सर्व गोष्टीचा वीट आला असला, तरी हीच वीट आता डोक्यात हाणणार असं म्हणत त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करण्याचे संकेतही पदाधिकार्‍यांना दिले.

स्वायत्तता, अस्मितेसोबतच फुटीरता हेदेखील प्रादेशिक पक्षाचं सत्यच आहे. सध्या शिवसेनादेखील याच स्थित्यंतरातून जातेय. शिवसेनेत झालेलं बंड हे काही पहिलं बंड नाही. याआधीही शिवसेनेला वेळोवेळी अनेक हादरे बसलेत. शिवसेनेच्या इतिहासातलं पहिलं बंड केलं होतं, ते अ‍ॅड. बळवंत मंत्री यांनी. त्यानंतर छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे अगदी राज ठाकरेंपर्यंत अनेकांच्या बंडाळ्या पक्षाने झेलल्या, परंतु शिवसेनेत एकाच व्यक्तीचं चाललं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं. अनेक बंडखोर्‍या झेलूनही पक्षाला नव्हे, तर शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनाच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडावं लागलंय, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या सत्तेची नाही, तर अस्मितेची लढाई सुरू झाली आहे. त्यात शिवसैनिकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि ठाकरे कुटुंब हे चांगलंच जाणून आहे.

हेही वाचा – बंड हिंदुत्वासाठी की महत्वाकांक्षेसाठी ..?

जसा शिवसेना हा पक्ष प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर उभा राहिला, फोफावला, सत्तेत आला. त्याच अस्मितेची नवसंजीवनी घेऊन शिवसेनेला राखेतून झेप घ्यावी लागणार आहे. नेते येतात तसे जातात, पण पक्ष कधीही संपत नाही. भलेही विधिमंडळात अवघ्या काही दिवसांसाठी वा फारतर अडीच वर्षांसाठी शिवसेनेची सूत्रं शिंदे गटाकडं जातील, पण मुख्य पक्षाचं अस्तित्व अबाधित राहणार आहे. त्या पक्षाचं नेतृत्व ठाकरेंच्याच हाती असणार आहे. आव्हान फक्त जिल्ह्या जिल्ह्यात नवं नेतृत्व तयार करण्याचं असेल. त्याला खतपाणी घालण्याचं काम ठाकरेंकडून सुरू झालंय. शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागलेत, पण त्याच वेळी आता शिवसेनेत असलेले शिवसैनिक आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार आणि त्यांचे अनुयायी यांच्यातील संघर्ष आगामी काळात जोर धरण्याची दाट शक्यता आहे, त्याचा फटका जनसामान्यांच्या जीवनाला बसता कामा नये, हीच आता सामान्य लोकांची अपेक्षा आहे. कारण वड्याचं तेल वांग्यावर निघण्याची शक्यताही नाकारता येत नाही.