अंगाची काहिली… त्यांची आणि सर्वसामान्यांची!

पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असताना दुसरीकडे राजकारणाचाही समतोल बिघडला आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याऐवजी ते बाजूला ठेवून एकमेकांवर तुटून पडण्याची जी स्पर्धा चाललीय ती योग्य वाटत नाही. आपल्यावर आरोप झाले की प्रत्येक नेत्याच्या अंगाची काहिली होतेय आणि तो काही तरी बरळतोय, असे चालले आहे. कुणी उठावे आणि कुणावरही आरोप करायचे असे चालले आहे. वादग्रस्त वक्तव्ये करून राजकीय हवा तापविणार्‍यांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी चाप लावला पाहिजे, पण वरिष्ठही त्यातलेच! थंड हवेत बसून गरमागरमी कशी सुरू राहील याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पण यात सामान्य माणसांची होरपळ होत आहे.

विदर्भ जो उन्हाळा अनुभवायचा तो आता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होणे म्हणजे नेमके काय, ते आता सर्वांना समजू लागले आहे. विदर्भ वगळता ज्या ठिकाणी पारा ३५-३६ अंशापर्यंत असायचा तेथे आता हा पारा तब्बल ४४-४५ अंशापर्यंत जाऊन पोहचला आहे. सकाळी १० वाजल्यानंतर रस्त्यावरची ये-जा कमी होत आहे. हा असा उन्हाळा कधी अनुभवला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी आहे. निसर्गाचा असा प्रकोप सुरू असताना तिकडे राजकीय कलगीतुरे रंगू लागल्याने आरोप-प्रत्यारोप होताच कायम गारेगार हवेत असलेल्या नेत्यांच्याही अंगाची काहिली होत आहे. सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते उबग आणणारे आहे.

गेल्या काही वर्षांपासून जगभरातील हवामान तज्ज्ञ पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या अन्यथा त्याचे परिणाम भोगायला लागण्याचे दिवस दूर नाहीत, असे सांगत होते. जगात या इशार्‍याला काही देशांनी गंभीरपणे घेतले गेले. आपल्याकडे गळ्यापर्यंत आल्यानंतर उपाययोजना शोधल्या जात असतात. महाराष्ट्रात सध्या चौफेर विकास सुरू आहे. या विकासाला कुणाचा विरोध नाही, परंतु यातून भविष्यात काही दुष्परिणाम निर्माण होतील का, याकडे लक्ष दिले गेले नाही किंवा अजूनही दिले जात नाही. विकासाची कामे सुरू असताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी वड, पिंपळ, आंबा आणि इतर वृक्ष समूळ छाटण्यात आलेले आहेत. रस्त्यावर सावली देणारी झाडे आज दिसत नाहीत. ऑक्सिजनचा नैसर्गिकरित्या स्त्रोत असणारी झाडे तोडून त्याजागी शोभेची झाडे लावली जात आहेत. ही झाडे मानवासाठी किती उपयोगी आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे रखरखीतपणा आता सर्वत्र आला आहे. बिगर वातानुकूलित वाहनातून जाताना दिवसा येणारा वारा बाजूला ज्वाळा पेटल्याप्रमाणे उष्ण येत आहे. यातून अनेकांना आजार उद्भवत आहेत.

वृक्षतोडीप्रमाणेच सिमेंटची जंगले ही उष्णता वाढविण्यास हातभार लावत आहेत. ही ‘जंगले’ वसवतानाही बेछुटपणे झाडे तोडली गेली. पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे वृक्षारोपण कार्यक्रमाचा फार्स सुरू होतो. प्रसारमाध्यमात आपली छबी छापून यावी म्हणून अनेकजण कॅमेर्‍याकडे पाहत झाडाचे रोपटे लावत असतात. कधी तरी वृक्षारोपण कार्यक्रमानंतर भाषणबाजीही होते. वृक्षारोपण हे किती महान कार्य आहे, हे ऐकताना समोरील श्रोतेही धन्य होतात! पुढे लावलेल्या रोपट्याचे मोठ्या झाडात रुपांतर होते की नाही, हे पाहण्याची तसदी कुणी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात दुपारच्या जेवणानंतर थोड्यावेळच्या वामकुक्षीसाठी डेरेदार वृक्षाच्या सावलीचा आश्रय घेतला जात असे. आता असे वृक्षच जागेवर नसल्याची ग्रामीण भागाची व्यथा आहे. जंगलांचीही ‘हत्या’ केली जात आहे. उरले सुरले जंगल वणवे पेटवून नष्ट करण्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे होरपळवून काढणारा उन्हाळा जाणवणार नाही तर काय होणार?

काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी इशारा दिला की, आपल्याकडे तापमान ५० अंशापर्यंत जाण्याचा दिवस दूर नाही. तसे झाले तर मोठा बाका प्रसंग उद्भवणार आहे. जगातील सर्वोच्च उष्णतामान असणार्‍या ठिकाणांत विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश यापूर्वीच झाला आहे. यदाकदाचित तापमान ५० वर जाऊन पोहचले तर महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांची भर पडणार यात शंका नाही. अंग भाजून काढणारा उन्हाळा खरं तर अतिशय गंभीरपणे घेण्याची वेळ आलेली आहे. यासाठी वृक्षारोपणाचे फार्स न करता वृक्ष लागवड आणि संगोपनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. वन खात्याकडून वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबविला जातो म्हणजे नेमके काय, याचे उत्तर मिळाले पाहिजे. अलिकडे ५ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडण्यात आला होता. त्याचे फक्त नगारेच पिटण्यात आले. इमारतींच्या सरसकट बांधकामालाही चाप लावला गेला पाहिजे. इमारत बांधताना काही ठराविक वृक्ष लागवड आणि त्याचे काही ठराविक वर्षांपर्यंत संगोपन बिल्डर आणि गृहनिर्माण सोसायटीला बंधनकारक केले पाहिजे. आज जी झाडे लावली जात आहेत ती बिनकामाची आणि फार वर्षे न टिकणारी आहेत.

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबविला जाणारा वृक्षारोपण आणि संवर्धनाचा कार्यक्रम फार महत्वाचा आहे. कोणताही गाजावाजा न करता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधी महत्व असणारी झाडे लावली जात आहेत. प्रसिद्धीसाठी होणारे वृक्षारोपण आणि प्रतिष्ठानकडून होणारे वृक्षारोपण यात खूप अंतर आहे. सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि काही मोजक्याच संस्था वृक्षारोपणात रस दाखवत आहेत. शालेय स्तरावर आठवड्यातील फक्त एका वारी पर्यावरणावर घोकमपट्टी करण्यापेक्षा हा विषय रोजच्या तासिकेत घ्यावा, जेणेकरून लहानपणापासून विद्यार्थी आणि पर्यायाने भावी पिढी पर्यावरण स्नेही होईल. येत्या ५ जूनपासून तसा संकल्प महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने सोडला तर ते अधिक उचित ठरेल. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असताना तिकडे राजकारणाचाही समतोल बिघडला आहे. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याऐवजी ते बाजूला ठेवून एकमेकांवर तुटून पडण्याची जी स्पर्धा चाललेय ती योग्य वाटत नाही.

आपल्यावर आरोप झाले की प्रत्येक नेत्याच्या अंगाची काहिली होतेय आणि तो काही तरी बरळतोय, असे चालले आहे. राजकीय साठमारीत आज कोणताही प्रमुख राजकीय पक्ष मागे नाही. कुणी उठावे आणि कुणावरही आरोप करायचे असे चालले आहे. झेड सुरक्षेत रुबाबात वावरणारे भाजपचे वाचाळ नेते किरीट सोमय्या यांच्या हनुवटीवरील कथित जखमेचे जे काही राजकीय भांडवल सुरू झाले ते पाहिल्यानंतर कपाळाला हात लावावा लागतोय. भाजपच्या एका नेत्याने तर अकलेचे तारे तोडत झेड सुरक्षा नसती तर सोमय्या यांना मारून टाकण्यात आले असते असे वक्तव्य केले. असे वक्तव्य करून राजकीय हवा तापविणार्‍यांना त्यांच्या नेत्यांनी चाप लावला पाहिजे असे कुणालाही वाटेल. पण वरिष्ठही त्यातलेच! थंड हवेत बसून गरमागरमी कशी सुरू राहील याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.

सोमय्या यांच्यावरील तथाकथित हल्ल्यानंतर त्यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने नेहमीप्रमाणे राजभवनात धाव घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. हा प्रकार पाहिल्यानंतर शाळेची आठवण अनेकांना झाली असेल. मुलांमध्ये किरकोळ भांडणे झाली की गुरुजींकडे जाऊन कधी एकदा तक्रार करतो, असे त्यांना झालेले असते. तसा तो प्रकार होता. कोश्यारी आल्यापासून त्यांची भेट घेणार्‍यांमध्ये भाजपच्याच नेत्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही कारण घडले की ही मंडळी राजभवनाकडे धाव घेतात आणि राज्यपालही त्यांना भरपूर वेळ देतात. महाविकास आघाडीकडून काही महिन्यांपूर्वी पाठविण्यात आलेल्या आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब करायला राज्यपालांना वेळ नाही. त्यावरून राज्यात कमालीचे वातावरण तापले, इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबत आपली नाराजी वारंवार जाहीररित्या बोलून दाखविली आहे. राज्यपालांच्या भाजपधार्जिण्या वागण्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगाची काहिली झाली असेल तर त्यांना दोष देता येणार नाही.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेवरून भयंकर वादंग उठले. आता त्याच दिवशी महाविकास आघाडीने आणि भाजपने जाहीर सभा घेण्याचे कारण नव्हते. राजकीय वातावरण कमालीचे गढूळ झालेले असताना किंवा एक प्रकारचा राजकीय भडका उडालेला असताना राजकीय मंडळी आपापल्यापरीने आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत, हे राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानता येणार नाही. सण, उत्सव आले की पोलिसांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे डोस पाजणारे सत्ताधारी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या रिंगणात उडी घेताना सामाजिक भान का ठेवत नाहीत याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. कुठून तरी राजकीय वातावरण तप्त ठेवायचे आणि विरोधकांच्या अंगाची काहिली कशी होईल, याची काळजी घेतली जात आहे.

मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने याबाबतची आपली हतबलता एकप्रकारे स्पष्ट केली आहे. त्यामुळे मनसेच्या नेत्यांचा तिळपापड होणे स्वाभाविक आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ योगी यांच्या सरकारने भोंगे उतरविण्याचे काम केले आहे. राज ठाकरे यांनी योगी यांचे अपेक्षेप्रमाणे अभिनंदन केले. भोंगे उतरविण्यावरून राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राजकारण अधिकच तापणार आहे. महाराष्ट्रासारख्या उद्योग प्रधान राज्याला ही राजकीय साठमारी परवडणारी नाही. भोंगे असतील किंवा अन्य कुठले नाजूक प्रश्न असतील, ते सामंजस्यानेच सोडवावे लागतील. धार्मिक तेढ वाढवून राजकारणाचा तवा गरम करून ठेवायचा हे उद्योग थांबले पाहिजेत. आपल्याकडे दूरदर्शी, जाणता राजा, निधर्मी अशा वेगवेगळ्या उपाध्या लागलेल्या नेत्यांची बिलकूल वानवा नाही. अशा वेळी राजकारण तापतेच कसे, असा सवाल भोळ्याभाबड्या जनतेला पडतो.

हे सगळे कमी म्हणून की काय, कोरोनाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीच्या मुद्यावरून महाराष्ट्रासह केरळ, पश्चिम बंगालला झापले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पारा चढला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, इंधन भडक्याचा मुद्दा आणखी काही दिवस तापवत ठेवला जाईल, यांत शंका नाही. महागाई गगनाला भिडली असताना ती आटोक्यात कशी येईल, यावर कुठेही चर्चा नाही. सामान्य माणूस महागाईत होरपळून निघाला आहे. त्याच्या जमाखर्चाची तोंडमिळवणी होत नाही. सकाळचे जेवण मिळाले तर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत असलेली अनेक कुटुंबे आहेत. याची आरोप-प्रत्यारोपांत गुंतलेल्या नेत्यांना चिंता नाही. राजकारण तापवून आपली पोळी भाजून घेण्याची सवय लागलेल्या राजकारण्यांना सामान्यांची चिंता असेल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. येत्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यासाठी आपल्या विरोधकांच्या अंगाची काहिली कशी होईल, याची काळजी प्रत्येक पक्षाचा नेता घेणार आहे. भाजून काढणार्‍या उन्हाळ्यात सुरू असलेली राजकीय गरमागरमी तत्वहिन असल्याने कोणत्याही राजकीय पक्षासाठी भूषणावह म्हणता येणार नाही.