Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग अफगाणिस्तानात सांस्कृतिक संहार, भारतासाठी धोक्याची घंटा !

अफगाणिस्तानात सांस्कृतिक संहार, भारतासाठी धोक्याची घंटा !

Subscribe

तालिबानशासित अफगाणिस्तानात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गुरुद्वारा शिल्लक आहेत. त्यातील काही गुरुद्वारांवर दहशतवादी हल्ले झाले असून, त्याची जबाबदारी आयएस खोरासानने स्वीकारली आहे. २०२० मध्ये याच जिहादी संघटनेने काबूलमधील आणखी एका गुरुद्वारावर हल्ला केला आणि २५ निरपराध लोकांची हत्या केली, ज्यात बहुतेक शीख होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तालिबानच्या एका गटाने गैर-मुस्लीम विशेषत: हिंदू-शिखांना इस्लाम स्वीकारणे किंवा अफगाणिस्तान सोडणे यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले. इतकंच नाही तर हमीद करझाईचं सरकार असो की अश्रफ घनीचं सरकार, त्या काळातही हिंदू आणि शिखांना लक्ष्य करून अनेक हल्ले झाले.

काही दिवसांपूर्वी काबूलमधील एका गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर भारत सरकारने १११ हिंदू-शिखांना आपत्कालीन ई-व्हिसा जारी केला. काबूलमधील गुरुद्वारामध्ये झालेल्या हल्ल्याचा भारताकडूनही निषेध करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांनी द्वेषाविरोधात आवाज उठवावा, असं आवाहनही भारताकडून करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील काबूल येथील शीख गुरुद्वारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. भ्याड आणि घृणास्पद हल्ल्याचा निषेध करत भारताने संयुक्त राष्ट्रांना यावेळी बौद्ध, हिंदू आणि शीख धर्मासह इतर धर्मांवरील हिंसाचाराचा निषेध करण्यास सांगितले. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी कठोर स्वरात सांगितले की, धर्माबद्दल कट्टरवादी बनणे थांबवा. काबूलच्या बाग-ए-बाला भागातील गुरुद्वारामध्ये शनिवारी झालेल्या अनेक बॉम्बस्फोटात एका शीखसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर या हल्ल्याचा जागतिक स्तरावरूनही निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच भारतानं तिथल्या हिंदू-शीख-बौद्धांना तात्काळ भारतात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत.

भारतात परतल्यावर हिंदू-शीख-बौद्ध असा धर्म सांगणारे लोक अफगाणिस्तानात क्वचितच शिल्लक राहिले असतील. अफगाणिस्तानची ओळख सध्या दहशतवाद आणि तालिबानने केली जाते, पण एक काळ असा होता की अफगाणिस्तानची ओळख हिंदू राष्ट्र म्हणून केली जात होती. सातव्या शतकापर्यंत हा देश अखंड भारताचा भाग होता. एक काळ असा होता की बौद्ध धर्माची भरभराट झाली आणि नंतर इस्लामचा प्रसार झाला. आक्रमक गझनीने तिथली संस्कृती उद्ध्वस्त करून तलवारीच्या बळावर धर्मपरिवर्तन करून घेतले. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांनी १६व्या शतकाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचा प्रवास केला आणि येथे शीख धर्माचा प्रसार केला. शिखांचे सातवे गुरू हरि राय यांनीही शीख धर्मोपदेशकांना काबूलला पाठवले.

- Advertisement -

१९९२ मध्ये येथे हिंदू आणि शिखांची दोन लाख २० हजार कुटुंबे होती, पण आता त्यांची संख्या नगण्य आहे. आता अफगाणिस्तानात शिखांची संख्या केवळ ४-५ हजार आहे. इस्लामिक दहशतवाद वाढल्यानंतर शिखांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्या काळात मुस्लीम राज्यकर्त्यांनी दिल्लीही ताब्यात घेतली आणि नंतर ब्रिटिश भारताने भारतावर कब्जा केला. १८ ऑगस्ट १९१९ रोजी अफगाणिस्तानला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. हा देश एकेकाळी अमेरिकेच्या आणि रशियाच्या निशाण्यावर होता. हा देश एकेकाळी गृहयुद्धाचा बळी होता आणि अखेरीस अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तिथली सत्ता तालिबानच्या ताब्यात गेली.

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील गुरुद्वारावर इस्लामिक स्टेट खोरासानच्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हल्ला करून तिघांची हत्या केली, ते अत्यंत दुर्दैवी आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादी म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या शोधात आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी अमेरिका आणि त्याच्या सहयोगी सैन्याने हल्ले केले. यूएस-समर्थित सरकारच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अल्पसंख्याकांची, विशेषत: शीख आणि हिंदूंची स्थिती सरकार आणि तालिबानी लढवय्ये यांच्या लढाईत वाईट होत गेली. देशातील सततच्या गृहयुद्धामुळे अल्पसंख्याक अत्यंत असुरक्षित झाले. त्यात ख्रिश्चन आणि शिया मुस्लिमांचाही समावेश आहे. आता गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अशरफ घनी यांचे सरकार उलथवून तालिबानने तेथे सत्ता मिळवली.

- Advertisement -

यावेळी जे दृश्य दिसले ते संपूर्ण जगाने पाहिले. अफगाणिस्तानात राहणारे शीख आणि हिंदू कुटुंबे मोठ्या कष्टाने आपला जीव वाचवत भारतात आले. तिथे राहणार्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. तालिबानी दहशतवाद्यांकडून शिखांचे धर्मांतर करण्याच्या किंवा देश सोडून जाण्याच्या धमक्या येत होत्या, त्यामुळे अनेक कुटुंबे भारत किंवा इतर देशांमध्ये गेली. अफगाणिस्तानमध्ये शीख गुरुद्वारांवर हल्ले सुरूच आहेत. २०१८ मध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जलालाबादच्या गुरुद्वारांवर हल्ला करून त्यांची नासधूस केली होती. मार्च २०२० मध्ये हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी काबूलमधील गुरुद्वारा हरि राय साहिबवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सुमारे २०० भाविक उपस्थित होते, त्यापैकी २५ शीख मारले गेले आणि डझनहून अधिक जखमी झाले. इस्लामिक स्टेटनेही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जगातील हा प्रदेश एकेकाळी हिंदू-बौद्ध परंपरेचे प्रमुख केंद्र होता. पण मागील एक हजार वर्षांत या प्रदेशात विध्वंसक बदल झालाय. या सांस्कृतिक हत्याकांडाची आता उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. ज्या तत्त्वामुळे हे सर्व अफगाणिस्तानात घडले, त्याची बीजं नेमकी कुठली आहे. सध्याच्या पाकिस्तान, बांगलादेशात तशी काहीशी परिस्थिती आहे.

तालिबानशासित अफगाणिस्तानात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गुरुद्वारा शिल्लक आहेत. त्यातील काही गुरुद्वारांवर दहशतवादी हल्ले झाले असून, त्याची जबाबदारी आयएस खोरासानने स्वीकारली आहे. २०२० मध्ये याच जिहादी संघटनेने काबूलमधील आणखी एका गुरुद्वारावर हल्ला केला आणि २५ निरपराध लोकांची हत्या केली, ज्यात बहुतेक शीख होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी तालिबानच्या एका गटाने गैर-मुस्लीम विशेषत: हिंदू-शिखांना इस्लाम स्वीकारणे किंवा अफगाणिस्तान सोडणे यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले. इतकंच नाही तर हमीद करझाईचं सरकार असो की अश्रफ घनीचं सरकार, त्या काळातही हिंदू आणि शिखांना लक्ष्य करून अनेक हल्ले झाले. गेल्या शतकाच्या आठव्या दशकात अफगाणिस्तानात हिंदू आणि शिखांची संख्या सुमारे सात लाख होती. गृहयुद्ध, धार्मिक राजवट आणि तालिबानी जिहादनंतर आज त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच झाली आहे. जर नुकताच झालेला हल्ला पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी असेल तर पूर्वी दहशतवाद्यांनी हिंदू आणि शिखांना कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली.

अफगाणिस्तानात हिंदू-शिखांनी जे अनुभवले, तेच अनुभव त्यांनी इस्लामिक पाकिस्तान आणि बांगलादेशात अनुभवले आहेत. या सर्व देशांमध्ये गैरमुस्लिमांची संख्या कमालीची घटली आहे. याचे कारण त्या घटनाक्रमात आहे, ज्यात त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे किंवा धार्मिक छळापासून वाचण्यासाठी भारतासह इतर देशांमध्ये स्थलांतरित करण्यास सांगितले जात आहे. ज्यांनी तसे केले नाही त्यांना मृत्युदंड देण्यात आला. आजही काश्मीरमधील हिंदूंना विशेषतः काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष केले जात आहे. उर्वरित भारतात इस्लामच्या नावाखाली या मध्ययुगीन कारवाया उघडपणे करणे शक्य नाही हे खरे आहे, परंतु आजही अनेक मार्गांनी अशा कुप्रथा सुरू आहेत. गेल्या वर्षीच उत्तर प्रदेश पोलिसांनी एका मोठ्या इस्लामिक धर्मांतर करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला होता. चिंतेची बाब म्हणजे अशा कारवायांना हिंदूविरोधी विचारसरणींकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहानुभूती मिळत राहते.

काबूल येथील गुरुद्वारावरील हल्ल्याबाबत वृत्तमाध्यमांनी अफगाणिस्तानातील हिंदू आणि शिखांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे वृत्त दिले होते, मात्र याला जबाबदार असलेल्या विचारसरणीवर चर्चा करण्याचे धाडस दाखवले जात नाही. अफगाणिस्तान आज जसा दिसतो तसा तो शतकांपूर्वी नव्हता. तेव्हाही अफगाणिस्तान नावाचा देश नव्हता. पुरातत्व उत्खननाने हे स्पष्ट केले आहे की सध्याचा अफगाणिस्तान हा भारतीय सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. १२ व्या शतकापर्यंत सध्याचे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि काश्मीर हे हिंदू-बौद्ध आणि शैव धर्माचे मुख्य केंद्र होते. वैदिक काळात गांधार हे पौराणिक भारतातील १६ महाजनपदांपैकी एक होते, ज्यांचे वर्णन महाभारत, ऋग्वेद इत्यादींमध्ये आढळते. हा मौर्य काळ आणि कुशाण साम्राज्याचा एक भाग होता, जिथे बौद्ध धर्माची भरभराट झाली.

चौथ्या शतकातील कुशाणांच्या पाठोपाठ सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदू-बौद्धबहुल काबूलशाही घराणे आले, जे नवव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकले. यानंतर हिंदूशाही राजवंशाची स्थापना कल्लार, राजा लगर्टुमनचा मंत्री याने केली, ज्याच्या शासकांचा नंतर गझनवीच्या महमूदशी सामना झाला. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी खलिफा झालेल्या गझनवीने दरवर्षी भारताविरुद्ध जिहाद पुकारण्याची शपथ घेतली. आपल्या ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने भारतावर डझनाहून अधिक वेळा आक्रमण केले. ‘काफिर-कुफ्र’ या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन त्यांनी तलवारीच्या बळावर हिंदू आणि बौद्धांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. गझनवीच्या हातून हिंदुशाही राज्यकर्त्यांचा पराभव झाला तेव्हा या प्रदेशाचे धार्मिक स्वरूप आणि स्वभाव बदलू लागला. मार्च २००१ मध्ये तालिबानने गझनवी मानसिकतेने प्रेरित होऊन बामियानमधील भगवान बुद्धांच्या महाकाय मूर्ती गोळ्यांच्या फैरी झाडून त्यांची हानी केली, तेव्हा सारे जण केवळ बघत राहिले.

काबूलमधील गुरुद्वारावरील दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात तालिबानने आयएस खोरासानच्या जिहादींना बदला म्हणून ठार केल्याचा दावा केला असताना तालिबानचे गृहमंत्री आणि घोषित दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी यांनी शिखांची भेट घेतली. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान आणि आयएस खोरासान यांच्यात वर्चस्वाचे युद्ध सुरू आहे. हे दोघे जुळ्या भावांसारखे आहेत, जे एकाच विषारी नाळेतून जन्माला आले आहेत. ते एकमेकांना सहकार्यही करतात आणि एकमेकांकडे संशयाने पाहतात. दोघांनीही गझनवी मानसिकता अंगीकारली आहे. दोघांमध्ये फक्त एकच धोरणात्मक फरक आहे. इस्लामिक स्टेटसाठी मुस्लिमांमधील राष्ट्रीयत्व, वांशिक आणि भौगोलिक ओळख यांना काही अर्थ नाही, तर तालिबान अफगाण ओळखीला चिकटून आहेत. तालिबानला जिथे अफगाणिस्तानपुरते मर्यादित राहायचे आहे, तोच आयएस स्वतःचे जागतिकीकरण करायला तयार आहे.

जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात आज दिसत आहे, ते भविष्यात भारतातही दिसेल का? हीच भीती अनेकांना सतावतेय. भारतातही एक वर्ग असा आहे, जो आजही गझनवी, घोरी, बाबर, औरंगजेब, अब्दाली आणि टिपू सुलतान यांसारख्या आक्रमकांना आपले नायक मानतो. त्यांच्या कारवायांमुळे भारतीय उपखंडातील एक तृतीयांशहून अधिक हिंदू, बौद्ध, शीख, जैन विखुरले गेले आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -