घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमूर्ख बनवण्याचा यांचा धंदा!

मूर्ख बनवण्याचा यांचा धंदा!

Subscribe

नुकताच खासदारांच्या संसदीय समितीचा दौरा लेह लडाख या भागात झाला. या दौर्‍यावर जे खासदार गेले होते, त्यांच्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचाही समावेश होता. नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा हेसुद्धा होते. राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय घमासान सुरू आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

राजकीय नेते मग ते कुठल्याही पक्षाचे असोत आपल्या सोयीचे राजकारण करून लोकांना मूर्खात काढतात हे अनेक वेळा दिसून येते, पण जो नागरिक निवडणुकांच्या कालावधीत मतदारराजा असतो, तो मात्र अशा वेळी बिचारा झालेला असतो. त्याच्या हातात काहीही नसते, तो केवळ हतबल असतो. कारण निवडणूक संपल्यावर त्या मतदारराजाचा उपयोगही संपलेला असतो. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही जरी लोकशाहीची आदर्श व्याख्या असली तरी त्याला साजेसे वर्तन लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात का, असा प्रश्न लोकांना नेहमीच पडतो. राजकीय नेतेमंडळी जे झपाट्याने रंग बदलतात, ते पाहिल्यावर लोकांनाही असा प्रश्न पडतो की, काल जे नेते एकमेकांचा शेलक्या विशेषणांंनी जाहीरपणे उद्धार करीत होते, जी विशेषणे ऐकल्यावर ऐकणार्‍यांनाही वीट येत असतो.

एकामेकांवर जे टोकाचे आरोप करतात, भ्रष्टाचार केल्याचे एकमेकांविरुद्ध कागदोपत्री पुरावे देतात, पाहणार्‍यांना असे वाटते की जणू काही दोन राष्ट्रांचे एकमेकांविरुद्ध युद्ध सुरू आहे, पण अल्पावधीतच ही मंडळी असे काही रंग बदलतात की तो मी नव्हेच असा त्यांचा पवित्रा असतो. नुकताच खासदारांच्या संसदीय समितीचा दौरा लेह लडाख या भागात झाला. या दौर्‍यावर जे खासदार गेले होते, त्यांच्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचाही समावेश होता. नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा हेसुद्धा होते. राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय घमासान सुरू आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उलट त्यांचे जे दररोजचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहिल्यावर यांना कुणी तरी आवर घालण्याची गरज आहे असे लोकांना वाटते. त्यामुळे लोकांना दरदिवशी त्यांचे आरोप-प्रत्यारोप वृत्तवाहिन्यांवर इच्छा नसतानासुद्धा पाहावे लागतात.

- Advertisement -

मुळात नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. मध्यंतरी त्या खासदार म्हणून त्यांच्या मतदारसंघातील कामे पाहत होत्या. त्यासाठी आंदोलने करीत होत्या, पण अलीकडच्या काळात भाजपला पोषक ठरणारी भूमिका त्या कशा काय घेऊ लागल्या हे एक कोडे आहे. मुळात अपक्ष म्हणून निवडून येणारा उमेदवार हा असा प्रकार असतो की तो आपण अपक्ष आहोत असे सगळ्या गावाला सांगत असतो, पण त्यांच्या सोयीनुसार ते कुठल्याही पक्षाशी छुपी किंवा जाहीर हातमिळवणी करीत असतात. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी अचानक काही आसभास नसताना हनुमान चालीसा पठणाचा संकल्प सोडला आणि त्यासाठी जणू मोहीमच सुरू केली. हनुमान चालीसा म्हणण्याचे स्थळ त्यांना शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेले मातोश्री हेच हवे होते. खरे तर त्यांना अन्यत्रही हनुमान चालीसा म्हणता आली असती, पण त्यांनी तसे न करता मातोश्रीवर जाण्याचा अट्टाहास केला. त्यांना अडवण्यासाठी मग शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन पुकारण्यात आले. शिवसैनिकांनी मातोश्रीभोवती रात्रंदिवस कडे केले आणि नवनीत राणा यांना आतमध्ये शिरता येणार नाही अशी तटबंदी उभी केली.

इतकेच नव्हे तर नवनीत राणा या खारमध्ये जिथे राहतात, तिथे शिवसैनिकांनी जाऊन त्या घराबाहेर पडणार नाही अशी व्यवस्था केली. चोहोबाजूंनी आपली कोंडी होत आहे हे पाहिल्यावर नवनीत राणांनी मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात मुक्ताफळे उधळायला सुरुवात केली. त्याची परिणती नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात झाला. त्यातून मग त्या दोघांची 15 दिवस तुरुंगात रवानगी झाली. एका खासदार आणि आमदाराला तुरुंगात डांबल्याचा भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मोठा हलकल्लोळ केला. नवनीत आणि रवी राणा यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या त्यांच्या भेटीला गेले. त्यावेळी त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यावेळी किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्त आले, पण दुसर्‍या दिवशी जखम दिसली नाही. याबाबत पत्रकारांनीही त्यांना विचारले. त्यावेळी ते म्हणाले की, मला जखम झाली की नाही ते उपरवाल्याला माहीत आहे. त्यांच्या हनुवटीतून रक्त आले पण जखम झाली नाही याविषयी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. शिवसेनेचे नेते आणि सध्याचे त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी संजय राऊत यांनी तर सोमय्या यांनी हनुवटीला टोमॅटो सॉस लावून रक्त आल्याचा दावा केला.

- Advertisement -

भाजपने नवनीत राणा यांची बाजू अशी काही लावून धरली की नवनीत या जणूकाही भाजपच्या महिला अध्यक्षा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्यासमोर भाजपची महिला आघाडी फिकी पडते की काय असे वाटू लागले. सध्या राणा दाम्पत्य जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्याचा त्यांनी भंग केला, असा आरोप होत आहे. जामिनावर बाहेर असलेल्या नवनीत राणा आपल्या कुटुंबीयांसोबत नुकत्याच खासदारांच्या समितीच्या लेह दौर्‍यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांचे कडवे प्रतिस्पर्धी असलेल्या संजय राऊत यांच्यासोबत फोटो सेशन केले. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या कुटुंबीयांसोबत फेरफटका मारला. त्यांच्यासोबत सेल्फी काढली, एकत्र जेवणही केले.

महाराष्ट्रात एकमेकांचा दररोज जाहीर उद्धार करणारी राणा आणि राऊत ही मंडळी थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्यात ३६० अंशांचा फरक कसा काय पडला, असे हे सगळे वृत्तवाहिन्यांवर पाहणार्‍या या दोघांच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल. कारण या दोघांमधील भांडणासाठी या कार्यकर्त्यांनी जीवावर उदार होऊन अटीतटीची झुंज लढलेली असते. प्रसंगी एकमेकांची डोकी फोडलेली असतात. त्यातही पुन्हा मोठा कहर म्हणजे लेहमधून ही मंडळी परत आल्यावर हे अगदी मोठेपणाने सांगणार की, एकमेकांशी खेळीमेळीने वागणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण मुद्दा असा आहे की मग एकमेकांची उणीदुणी काढून जनतेला वीट आणणारी कृत्ये करताना ही खेळीमेळीची महाराष्ट्रीय संस्कृती जाते कुठे? कारण या नेत्यांच्या श्रेयवादाच्या झुंजीमुळे लोकहिताच्या अनेक गोष्टींचा आणि प्रकल्पांचा बट्ट्याबोळ होत असतो. याचा जाब राजकीय नेत्यांना लोकांनी विचारण्याची गरज आहे. नाहीतर लोकांना मूर्ख बनवण्याचा यांचा धंदा सुरूच राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -