घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहिमस्खलनामागे चिनी ड्रॅगन ?

हिमस्खलनामागे चिनी ड्रॅगन ?

Subscribe

देवभूमी उत्तराखंड पुन्हा एकदा नैसर्गिक प्रकोपाने हादरून गेली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात सकाळी १०.५५ वाजण्याच्या सुमारास धौलीगंगा नदीत मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. ऋषिगंगा विजनिर्मिती प्रकल्पाला त्याचा मोठा फटका बसला. तेथे काम करत असलेले सुमारे १५० जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या सुमारे १० हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हा प्रलय इतका भयंकर होता की, थेट हरिद्वारपर्यंत गंगा किनार्‍याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला. खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात आले. उत्तरांखडमध्ये शीघ्र कृती दलाच्या टीमने नदी शेजारी राहणार्‍या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही गावकर्‍यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

अजूनही काही ठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरे खाली करण्यात आली. तसेच किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला होता. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोक आणि घरे वाहून गेली. खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे. शीघ्र कृती दलाची टीम अजूनही काम करत आहे. ऋषिगंगा प्रोजेक्टजवळ हिमस्खलन झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ज्यामुळे पाणी नदीपात्रात शिरले आहे. या घटनेत ऋषिगंगा प्रोजेक्टवर काम करणारे १७० कर्मचारी अजूनही बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कर्मचार्‍यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

या पुराचे फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातून हिमकडा कोसळल्यामुळे आलेला नदीचा पूर किती भयंकर होता हे दिसून आले आहे. हिवाळ्यात हिमकडा कोसळत नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मग जोशीमठ येथील हिमकडा कसा कोसळला याचे आश्चर्य आता सर्वजण व्यक्त करत आहेत. यामागे चीनचा काही घातपात तर नाही ना, अशी शंका घ्यायला वावही आहे. कारण आज चीन भारताची सर्व बाजूंनी कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडे एकपक्षीय कम्युनिस्ट शासन आहे. त्यांना जाब विचारायला कुणी विरोधी पक्ष नाही. ते म्हणतील ती पूर्वदिशा अशी परिस्थिती आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर त्यांनी, तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली. कोरोनाचा उद्रेक चीनच्या वुहानमध्ये दीड वर्षापूर्वी झाला. तो जगभर पसरला. आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक कोरोना विषाणूचा उद्भव कसा आणि कुठून झाला हे पहायला नुकतेच चीनमध्ये गेले होते. पण तिथे त्यांना काहीही पुरावे सपडले नाहीत. कारण चीनने ते अगोदरच पुरुन टाकले आहेत. चीन आपल्या कृत्याचे कुठलेही पुरावे मागे ठेवत नाही. हीच त्यांची खासीयत आहे.

नेमके याच शंकेमुळे हिमकडा फुटी आणि त्यामुळे आलेल्या पुराच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी डीआरडीओच्या डिफेन्स जिओईनफॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डीजीआरई) चे एक पथक रवाना झाले आहे. हे पथक आयएएफच्या हेलिकॉप्टरने पाहणी करणार आहे. हिमनदीमध्ये झालेल्या उद्रेकामुळे आलेला पूर हा नदीमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे येतो. परंतु सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळाचे तापमान पाहता हे शक्य नाही. हा प्रदेश बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेला आहे आणि येथील तापमान हे उणे २० अंश सेल्सियस इतके आहे. हिवाळ्यात उणे तापमानामुळे बर्फ वितळत नाही. त्यामुळे त्याला नदीसारखा प्रवाह नसतो. या हंगामात नदी तयार होणे आणि ती फुटणे केवळ अशक्य गोष्ट आहे. गेल्या पन्नास वर्षात मी अशी घटना पाहिलेली नाही.

- Advertisement -

या घटनेचे नेमके काय कारण आहे ते उपग्रहावरून आलेल्या प्रतिमांचा अभ्यास केल्यानंतरच समजेल. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. शत्रूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी जगातील अनेक देश पर्वतीय संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर करतात. असे एक संरक्षण शास्त्रज्ञ सांगतो तेव्हा हिमकडा कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती नसून ती मानवी निर्मिती आपत्ती असल्याची शक्यता बळवते. उत्तराखंडमधील रैना गावाजवळील ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे खूप नुकसान झाले. तसेच तपोवन जवळील धौली गंगा नदीवरील एनटीपीसीच्या निर्माणाधीन प्रकल्पाचेही नुकसान झाले. संरक्षण शास्त्रज्ञांच्या मते हा हिमनदीमधील स्फोट जरी मुख्य ऊर्जा प्रकल्पापासून काही अंतरावर असला तरी याचा उद्देश मुख्य ऊर्जा प्रकल्पाला हानी पोचवण्याचा असू शकतो.

डीआरडीओची चंडीगढस्थित हिमवर्षाव आणि हिमस्खलन अभ्यास संस्था (एसएएसई) ही हिमस्खलनाचा अंदाज, कृत्रिम घटना आणि बर्फाच्छादित प्रदेशातील स्ट्रक्चरल कंट्रोल यासाठी काम करते. अलीकडील डीआरडीओच्या पुनर्रचनेनंतर डिफेन्स टेरिन रिसर्च लॅबोरेटरीमध्ये हे विलीन करण्यात आले आणि आता याला डिफेन्स जिओईनफॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंटचे म्हणणे आहे. अजून एक शक्यता विचारात घेतली तर या हिमकडा कोसळण्याचे नेमके कारण समजू शकते. चीनने अलिकडेच एका शस्त्राचे परीक्षण केले आहे. ते शस्त्र म्हणजे चीन कुठेही पाऊस पाडू शकतो. निसर्गात बदल करून त्याअनुषंगाने पाऊस पडण्याची क्रिया होऊ शकते. चीनच्या स्टेट काऊंसिलने हवामान बदल प्रणालीची व्यापकता वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही प्रणाली वापरून चीन ५.५ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रात कृत्रिमरित्या पाऊस पाडू शकतो. म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या १.५ टक्के इतके क्षेत्रफळ चीनच्या या हवामान प्रणालीत येऊ शकते. ही हवामान प्रणाली २०२५ साली पूर्णत: विकसित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हवामान बदल प्रणालीचा वापर चीन युद्ध क्षेत्रात करू शकतो.

चीनच्या हाती आलेले एक अत्याधुनिक शस्त्र असेल ज्याद्वारे आपल्या सैन्याच्या हालचालींसाठी योग्य भूमी तयार करतानाच शत्रूच्या सैन्याच्या हालाचालींवर चीनला नियंत्रण ठेवता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते या हवामान प्रणालीचा वापर करून शत्रूराष्ट्राच्या सीमेत दुष्काळ निर्माण करणे, हिमनग कोसळण्यासारख्या घटना घडवून आणणे, जंगलाला आगी लावणे चीनला सहज शक्य होणार आहे. जोशी मठ येथे कोसळलेला कडा हा किरणोत्सर्गाच्या माध्यमातून देखील घडवला जाऊ शकतो, असेही काही शास्त्रज्ञांचे मत आहे. लडाखमध्ये चीनला भारतीय लष्कराने खडे चारले असताना अशी आगळीक चीन करू शकतो. प्रत्यक्ष युद्धात आता भारताला मात देणे १९६२ इतके सोपे राहिलेले नाही, हे चीनला आता कळून चुकले आहे. मात्र त्याचवेळी आधुनिक युद्ध प्रणालीचा वापर करून भारताला जेरीस आणण्यासाठी चीनकडून अशा वेगवेगळ्या खेळी खेळल्या जाऊ शकतात. त्यामुळेच जोशीमठ येथे कोसळलेल्या हिमकड्यामागे चिनी ड्रॅगनच्या फुत्काराची काळी बाजू असू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -