Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग सोशल मीडियावरच्या अदृश्य तलवारी!

सोशल मीडियावरच्या अदृश्य तलवारी!

सोशल मीडियावर होणारा ट्रोलिंगचा प्रकार आता जगासाठीही आणि भारतासाठीही काही नवीन राहिलेला नाही. इथे दिवसभर कट्ट्यावर बसून नुसता गप्पांचा पिट्ट्या पाडणारा एखादा टुकारदेखील भारतरत्नांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करू शकतो. आणि ज्याचा शेतीशी काहीही संबंध नाही, भुईमूग जमिनीच्या वर येतात की खाली हे देखील ज्याला माहीत नसेल असे अज्ञानी देखील बळीराजाच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ किंवा समाजकंटकांचे हस्तक म्हणून शकतो. आणि अशा ट्रोलधाडींना आजही जगाचं सोडा, पण लाखो भारतीयांचा वर्ग बळी पडतो.

Related Story

- Advertisement -

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे असं नेहमीच म्हटलं जातं. त्यासोबतच सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे, तिचा दोन्ही बाजूंनी वापर केला जाऊ शकतो, असं देखील म्हटलं जातं. व्यापक जनमत तयार करून त्याद्वारे सहज सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी घडवून आणल्या जाऊ शकतात, असं देखील म्हटलं जातं. अशा कितीतरी गोष्टी सोशल मीडियाच्या योग्य आणि अयोग्य वापराबाबत आजपर्यंत म्हटल्या जात आहेत. पण दुर्दैव हे आहे की या गोष्टी फक्त म्हटल्या जातात. त्या म्हणणार्‍या किंवा त्या म्हटलेल्या ऐकणार्‍या कुणावरही त्याचा फारसा परिणाम होत असेल का? असा मोठा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे.

कारण आपण अधिकाधित हिप्पोक्रिट होत चाललो आहोत. ज्या गोष्टी बोलायच्या, त्यांचं स्वत: मात्र पालन करायचं नाही, असा आपल्यातल्या अनेकांचा नव्हे, तर असंख्यांचा शिरस्ता झाला आहे. सोशल मीडियाचा सावध वापर, हा त्यातलाच एक भाग आहे. गेल्या आठवड्याभरात शेतकरी आंदोलन, सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया, ट्रोलर्सच्या ट्रोलधाडी आणि भारत सरकारने ट्वीटरकडे जवळपास दीड हजार ट्वीटर अकाऊंट्स बंद करण्याची केलेली मागणी, या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया, ट्रोलधाडी आणि त्याअनुषंगाने आपणच आपल्यामध्ये मतभेद निर्माण करण्याची करून ठेवत असलेली तजवीज, या गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे.

- Advertisement -

हे सगळे मुद्दे उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे शेतकरी आंदोलनावरून नुकतंच घडलेलं आंतरराष्ट्रीय विरुद्ध राष्ट्रीय सेलिब्रिटींचं ट्वीटर वॉर! ज्याची सुरुवात जरी रिहानाच्या ट्वीटपासून झालेली वाटत असली, तरी त्याची खरी सुरुवात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासूनच झाली होती. दिल्लीच्या सीमारेषांवर शेतकरी आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाल्यापासूनच या आंदोलनाच्या विरुद्ध ट्वीटरवर, फेसबुकवर आणि एकूणच सोशल मीडियावर वातावरण निर्मिती केली जाऊ लागली होती. अनेक नेतेमंडळींनी आंदोलकांना आधीच खलिस्तानी, दहशतवादी, सामाजिक सलोख्याला बिघडवणारे, चीनी कारवायांचे समर्थक अशा उपाध्या दिल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातली नेतेमंडळीही मागे नव्हते. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी इथे सर्वात आधी महाराष्ट्रात आंदोलकांना चीनी कारवायांचे हस्तक म्हणून गहजब उडवून दिला होता.

राजकीय आणि सामाजिक जीवनात आंदोलनाच्या विरोधात आणि त्याच्या समर्थनार्थ गट निर्माण झाल्यानंतर तसेच ते सोशल मीडियावर देखील तयार होणार हे काही वेगळं सांगण्याची गरज उरली नाही. तसे ते मोठ्या संख्येने तयार झालेदेखील. या दोन्ही गटांमध्ये मग एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होऊ लागले. तिथेच वाद होऊ लागले. या गटांमध्ये जसे भारतीय गट होते, तसेच आंतरराष्ट्रीय गट देखील होते. पण त्यावेळी याचा इतका गाजावाजा झाला नाही. किंबहुना सामान्य भारतीयांना सोशल मीडियावर अशा प्रकारे दोन्ही बाजू भांडत असल्याचंदेखील काही वाटलं नाही. पण जेव्हा मूळची बार्बाडोसची असलेल्या रिहाना या पॉप गायिकेनं शेतकरी आंदोलकांच्या समर्थनात ट्वीट केलं, तेव्हा सगळ्यांचा संताप होऊ लागला? इतक्या दिवसांपासून जगभरातले लोकं या आंदोलनावर आपली मतं सोशल मीडियावर व्यक्त करत असताना आपला आत्ताच संताप का होतोय? असा प्रश्न कुणालाही पडला नाही. आपली सोशल मीडिया साक्षरता कमी पडली होती! आणि ती जशी रिहानाला विरोध करणार्‍यांची कमी पडली, तशीच ती तिचं समर्थन करणार्‍यांचीही कमी पडली.

- Advertisement -

रिहानापाठोपाठ ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांचे शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारे ट्वीट पडले. शेतकरी आंदोलनाला देशात अशांतता पसरवणार्‍या गटांचं समर्थन असल्याचा कांगावा करणार्‍यांसाठी ही ‘सुवर्णसंधी’च होती. अनेक लोकांनी आणि गटांनी या तिघींसह आंदोलनाच्या समर्थनात ट्वीट करणार्‍यांवर टीका करायला सुरुवात केली. प्रसिद्धीसाठी, आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून किंवा भारतीय सार्वभौमत्वावर घाला म्हणून या ट्वीट्सकडे पाहिलं जाऊ लागलं. पण तिथेच आपण घोटाळा केला. या ट्वीट्सनंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, सायना नेहवाल, सुनिल शेट्टी अशा कितीतरी भारतीय सेलिब्रिटींनी त्याचा निषेध केला. थेट भारताचे परराष्ट्र सचिव आणि भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील त्यावर आक्षेप घेत ट्वीट केलं. आणि जर या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा प्रसिद्धी किंवा भारतात अशांतता निर्माण करण्याचा काही हेतू असलाच(?) तर त्याला हातभार लावला. त्यापाठोपाठ आपल्याकडच्या लाखो कथित ‘सोशल’ मंडळींनी तीच री ओढून या आंतरराष्ट्रीय व्यक्तींना ट्रोल करायला सुरुवात केली. आपली सोशल निरक्षरता उघडी पडली!

वास्तविक रिहाना काय किंवा ग्रेटा काय किंवा अगदी भारतीय सामाजिक जीवनात (नाईट लाईफमध्ये असेलही!) काडीचीही किंमत नसलेल्या मिया खलिफासारख्या पॉर्नस्टारने नेमक्या कोणत्या उद्देशाने ट्वीट केले, याविषयी भारतीय सेलिब्रिटींनी चर्चा घडवून आणण्याचं काहीही कारण नव्हतं. याआधीही अशा अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर भारतातूनही प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आणि जगभरातल्या अनेक देशांतल्या मंडळींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेतली ब्लॅक लाईव्हज मॅटर किंवा फ्रान्समध्ये शार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर झालेला हल्ला, अरब स्प्रिंगमध्ये आखाती देशांमध्ये झालेल्या क्रांत्या किंवा रशियामध्ये अगदी अलिकडेपर्यंत होत असलेल्या वर्णभेदाच्या घटना. या आणि अशा अनेक मुद्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटल्यामुळे त्यावर इतका आरडाओरडा करण्याचं काही कारण नव्हतं.

शिवाय रिहाना काय किंवा ग्रेटा काय, यांचं आंतरराष्ट्रीय वलय पाहाता त्यांना प्रसिद्धीची गरज असेल हे शक्य नाही. आणि मिया खलिफाने प्रसिद्धीसाठी ते केलं देखील असलं, तरी तिच्या भूमिकेवर आपल्या ‘भारतरत्नांनी’ व्यक्त होण्याची गरज नव्हती. पण ते घडलं. रिहाना, मिया खलिफा किंवा ग्रेटा यांनी कल्पनाही केली नसेल (जर काही केली असेल तर!) इतकी प्रसिद्धी आपण त्यांना मिळवून दिली. भारतातल्या ए पासून झेडपर्यंत सोशल मीडियावर, सामाजिक जीवनात, प्रसार माध्यमांमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे. देशाच्या राजधानीला हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी गराडा घातला आहे. (प्रत्यक्षात लाखोही असू शकतात. पण अधिक वास्तव वाटावा म्हणून एवढाच घेतला आहे) सध्याच्या ‘सोशल’ युगात इतक्या मोठ्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटणार नाही असं समजणं आपणच गैरसमजात राहण्यासारखं आहे.

आधी रिहाना, ग्रेटा, मिया किंवा इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना ट्रोल करून भारतीयांच्या एका नेटिझन्स गटाने जी चूक केली, काहीशी तशीच चूक आपल्या भारतरत्नांवर अपमानजनक शब्दांमध्ये टीका करून दुसर्‍या गटाने केली. याचा सर्वाधिक फटका बसला तो क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरला. कारण ज्याच्यावर प्रेम जास्त असतं, त्याच्यावर आक्षेपदेखील तितकाच तीव्र असतो, असं आपलं गणित आहे. पण सचिनने केलेल्या ट्वीटवर फक्त आक्षेप न घेता सचिन कसा भारतरत्नासाठी नालायक होता, भारतीयांच्या इतक्या प्रेमासाठी पात्र नव्हता, किंबहुना तो कसा देशभक्त म्हणवून घेण्याच्याही लायकीचा नाही यावर आपल्याकडची ट्वीटर मंडळी गप्पा झोडायला लागली. तोच प्रकार ज्यांना आपणच गानसम्राज्ञीची उपाधी दिली आणि आख्ख्या भारतानंच नव्हे, तर आख्ख्या जगानं ज्यांच्या आवाजाला दाद दिली, त्या लता मंगेशकरांच्या बाबतीत घडला. तसाच तो भारतातल्या इतर सेलिब्रिटींच्या बाबतही घडला. त्यामुळे मुद्यांवर चर्चा न करता भावनिक होऊन आरडाओरडा करण्याची आपली जुनी सवय पुन्हा जगजाहीर झाली. आणि भारतीय सार्वभौमत्वच काय, पण भारतीय आदर्शांच्या, भारतीय सन्मानांच्या देखील जगासमोर चिंधड्या झाल्या!

सोशल मीडियावर होणारा ट्रोलिंगचा प्रकार आता जगासाठीही आणि भारतासाठीही काही नवीन राहिलेला नाही. इथे दिवसभर कट्ट्यावर बसून नुसता गप्पांचा पिट्ट्या पाडणारा एखादा टुकारदेखील भारतरत्नांवर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करू शकतो. आणि ज्याचा शेतीशी काहीही संबंध नाही, भुईमूग जमिनीच्या वर येतात की खाली हे देखील ज्याला माहीत नसेल असे अज्ञानी देखील बळीराजाच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ किंवा समाजकंटकांचे हस्तक म्हणून शकतो. आणि अशा ट्रोलधाडींना आजही जगाचं सोडा, पण लाखो भारतीयांचा वर्ग बळी पडतो. मुद्दा हा आहे की आपण सजग आणि सतर्क होऊन आसपास घडणार्‍या घटनांचा तटस्थपणे कधी विचार करणार आहोत. की हातात आलेली सोशल मीडिया नावाची दुधारी तलवार बेधुंदपणे सपासप चालवत आपल्याच आदर्शांच्या, आपल्याच नीतीमूल्यांच्या, आपल्याच एकतेच्या आणि आपल्याच भारतीयत्वाच्या चिंधड्या करत राहणार आहोत?

- Advertisement -