शाबासकी हवी, उत्सव नको!

संपादकीय

भारत हा उत्सवांचा देश असून या उत्सवात आपला सहभाग असावा, असे येथे प्रत्येकाला वाटते. मग त्यामागची भावना, पावित्र्य आणि साधेपणा याला काही महत्व उरत नाही. हिडीस स्वरूप आणून मग तो बाजार होतो. हे आताच नाही, वर्षानुवर्षे सुरू आहे. मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी झाली की खेळाडू असो की, साहित्यिक, शास्त्रज्ञ असो की सामाजिक कार्यकर्ते त्यांचा गौरव राहिला बाजूला राजकीय नेते त्यांचे होर्डिंग लावून, सत्कार समारंभ आयोजित करून, विजेत्या बरोबर फोटो काढून स्वतःची प्रसिद्धी करतात. ती सोपी असते, कारण त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागलेले नसतात. फुकट चमकायला फार कष्ट लागत नाहीत आणि तेच होऊन मूळ विजेता राहतो बाजूला आणि नको ते लोक स्वतःचा ढोल वाजवून घेतात. सर्वात वाईट म्हणजे विजेत्यांचा सत्कार करताना अशा काही बाता मारल्या जातात की राजकीय नेत्यांना सर्व जग जिंकण्याची कला माहीत आहे. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंचे स्वागत आणि त्यांचा सत्कार करताना झालेला उत्सव.

सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, ब्राँझपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोकियावरून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सोमवारी नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु उत्साही अधिकारी आणि जमावाच्या गर्दीमुळे त्याला गोंधळाचे गालबोट लागले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतीय पथकाचे स्वागत केले. क्रीडापटूंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे विमानतळावर गोंधळ निर्माण झाला आणि सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. काही चाहत्यांनी ढोलताश्यांच्या तालावर ठेका धरला, तर अनेकांनी पदकविजेत्यांचे अभिनंदन करणारे फलक झळकावले. पदक विजेत्यांसह छायाचित्र काढण्याच्या चाहत्यांच्या अट्टाहासामुळे नीरजसह अनेक क्रीडापटूंची विमानतळावर दमछाक झाली. येथे भारतीय खेळाडूंचे स्वागत राहिले बाजूला. आपल्याला कॅमेर्‍यासमोर चमकायला मिळते म्हटल्यावर सर्वांना जणू चेव आल्यासारखा दिसला. हे खरे तर आेंगळवाणे दृश्य होते. कारण विजयाचा उत्साह समजू शकतो, पण त्याला काही शिस्त असण्याची गरज असते.

याचवेळी दुसर्‍या बाजूला ऑलिम्पिक विजेत्या भारतीय खेळाडूंचा सत्कार करताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पुढील ऑलिंपिकमध्ये भारताची पदकसंख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. हे सारे भाषणासाठी म्हणून सोपे आहे. खेळाडूंना प्रत्यक्ष पायाभूत सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार किती काम करते, हे महत्वाचे आहे. गुणवान खेळाडूंची निवड करून त्यातून जगातील विजेते खेळाडू घडवण्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) मॉडेल आता फेल झाले आहे. सरकारी बाबूंसारखे काम करून साई हे मोठे काम करू शकणार नाही. आता त्यात बदल हवे, तरच नवीन काही तरी जन्माला येईल. क्रीडा संस्कृती पुरेशी न रुजलेल्या भारतासारख्या देशात खेळाडूंसाठी एक फसवा कालखंड असतो. रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ते सुवर्णपदक जिंकणारा उमदा नीरज चोप्रा हे त्या फसव्या वाटेला गेले नाहीत. त्या वाटेला जाण्याचे टाळले पी. व्ही. सिंधूने, रवी दाहियाने, लवलिना बोर्गेहेनने, बजरंग पुनियाने आणि पुरुष व महिलांच्या हॉकी संघांनीही. अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकण्याची कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय.

शिवाय अ‍ॅथलेटिक्समध्ये स्वतंत्र भारताच्या खेळाडूने एखादे पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ. निव्वळ अभूतपूर्व असेच या कामगिरीचे वर्णन करावे लागेल. ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नाळ भारताच्या बाबतीत केवळ हॉकीशीच जोडली गेली होती. नवीन सहस्रकात २1 वर्षांमध्ये दोन सुवर्णपदके वैयक्तिक प्रकारात मिळणे ही नवलाई खरीच. पण छोटी उद्दिष्टे ठेवून त्यात समाधान मानणारी ही फसवी, निसरडी वाट. तिला बगल देणेच गरजेचे आहे. याचे कारण आजवर कधीही कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन आकडी पदके मिळवता आलेली नाहीत. 2012 मधील लंडन ऑलिम्पिक आणि नुकतेच संपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे सहा आणि सात पदके ही ‘आपली’ सर्वोत्तम कामगिरी. ती सर्वोत्कृष्ट तर नाहीच नाही, उत्कृष्टही नाही तर निव्वळ सुमार. आता यावर ही पदके मिळवणार्‍यांना फोन करकरून, समाजमाध्यमी ढोल वाजवून वा नंदीबैल समर्थकांना माना डोलावायला लावून ती महान असल्याचा देखावा कोणी कितीही केला गेला तरी हे वास्तव लपत नाही.

त्याआधी 1996, 2000, 2004 या स्पर्धामध्येच एकेकच पदक, 2008 मध्ये तीन आणि गेल्या खेपेला रिओ ऑलिम्पिकमध्ये अवघी दोन! गतशतकाचे संदर्भ वेगळे, तो ताळेबंद आता मांडणे समयोचित नाही. पण अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि प्रशिक्षण सुविधा अधिक सहजपणे उपलब्ध होऊ लागल्यानंतरही परिस्थिती पाच पदकांच्या पुढे कशीबशीच सरकते हे कोणासाठीही फार भूषणास्पद लक्षण नाही. नेमबाजीमध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक मिळाले, पण 2016 आणि 2020 स्पर्धेत नेमबाजांची पाटी कोरीच. कारण काय, तर नेमबाजी संघटना, नेमबाज आणि प्रशिक्षकांमध्ये विसंवाद. टोक्योतही नेमबाजांच्या फसलेल्या प्रयत्नांनंतर ते खेळाडू आणि संघटना यांच्यातील जो काही बेबनाव समोर आला तो देशास लाजिरवाणाच होता. आताही बॅडमिंटनमध्ये सायना-सिंधूनंतर कोण, याचे उत्तर शोधण्याची गरज आपणास नाही. कारण आपण सगळेच सात पदके साजरी करण्यात मश्गुल! महाराष्ट्र, गुजरातसारख्या उद्योगप्रधान राज्यांतून अधिक संख्येने क्रीडापटू का घडू शकत नाहीत, याची उत्तरे शोधली जात नाहीत.

आपल्याकडे खेळाडू व्यवस्थेमुळे नव्हे, तर व्यवस्थेबाहेर राहूनच प्रामुख्याने घडावेत हे आपले जुने दुखणे. त्यात फरक पडत आहे. हरियाणा, पंजाब, ओडिशा या मोजक्या राज्यांनी संस्थात्मक, संघटनात्मक सुविधांची उभारणी केलेली दिसते. पदकविजेत्या एक सोडून सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक परदेशी होते ही बाबही लक्षात घ्यावी अशी. देशांतर्गत आवर्जून कौतुक करायला हवे ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे. त्यांनी हॉकीत केलेल्या गुंतवणुकीची फळे आता दिसू लागली आहेत. पण त्यातही ते अधिक कौतुकास पात्र ठरतात, कारण हे सारे मिरवण्याचा ओंगळ प्रयत्न करणार्‍या राजकारण्यांपासून ते स्वत:स दूर ठेवू शकतात म्हणून. त्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे केलेले कौतुक हे अत्यंत सभ्य आणि संयत होते. पण इतरत्र आनंदच आहे. अर्थात काही सकारात्मक, आनंददायी असे टोक्योतून निश्चितच गवसले. मीराबाई चानू, लवलिना बोर्गोहेनने ईशान्य भारतातील प्रगत आणि चिवट महिला संस्कृती मेरी कोमपुरती सीमित नसल्याचे सिद्ध केले.

सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्येही कुस्तीगीर पदकविजेते ठरले. बॅडमिंटन, बॉक्सिंग हे हमखास पदक जिंकून देणारे खेळ ठरू लागले आहेत. नेमबाजी, तिरंदाजीमधील खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे की फाजील आत्मविश्वासाचा शिरकाव झाला आहे याचा शोध घ्यावा लागेल. चीन, अमेरिका, रशिया, जपान, इंग्लंड आदी विविध खेळांमध्ये ढीगभर पदके जिंकतात, ते अशा गुंतवणुकीनंतरच! तेथील सत्ताधीश ऑलिम्पिकला जाणार्‍या खेळाडूंना ‘मार्गदर्शन’ करत नाहीत, आणि शुभेच्छा देण्याच्या मिषाने संभाव्य श्रेयात मिरवण्याची नोंदणी करत नाहीत. कारण ते जाणतात-अंतिमत: हे खेळ आहेत. ते खेळासारखे असायला हवेत आणि खेळाच्या मैदानापुरतेच त्याचे महत्व हवे. ऑलिम्पिक खेळ संपले. आता आभारप्रदर्शनाचा ऑलिम्पिकचा उच्छाद सुरू होईल. तो टाळण्यात सुसंस्कृतता आणि अधिक पदकांची हमी आहे.