घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअसले कसले सिलिब्रिटी?

असले कसले सिलिब्रिटी?

Subscribe

सेलिब्रिटी असलेले अक्षयकुमार, अजय देवगण, करण जोहर, सचिन तेंडूलकर, विराट कोहली आणि लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनाचा जागतिक स्तरावर चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप करत देशवासीयांना एक होण्याची हाक दिली आहे. ज्यांनी ही हाक दिली आहे, त्यांच्या व्यक्तीगत जीवनात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण भारताप्रति त्यांनी केलेल्या ‘महान’ कार्याची जाणीव देशवासीयांना आहे. ज्या सचिन तेंडूलकर याने भारताच्या बदनामीचा प्रचाराचा डंका पिटला त्या सचिनला सत्तर दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत, याची जाणीव नव्हती? परदेशातील मान्यवरांना भारतातीतल शेतकर्‍यांची कणव आहे, आणि सचिनला ती असू नये, हे अजबच म्हटलं पाहिजे.

देशातील शेतकरी प्राणाची बाजी लावून एकीकडे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असताना हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या कारवायांचा जगभर निषेध होतो आहे. तर भारतातील काही सिलिब्रिटींनी आपल्या सरकारची तळी उचलण्याचा उद्योग अविरत सुरू ठेवला आहे. ज्यांना जगाने डोक्यावर घेतलं त्याच जगातले मान्यवर ‘त्यांना कोणी विकत घेतलं?’, असा सवाल करत आहेत. मोदी सराकारने बळजबरीने पारीत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 70 दिवसांपासून भारतातील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकर्‍यांचं हे आंदोलन केवळ शेतकर्‍यांच्या न्यायाचं नव्हे तर तमाम भारतवासीयांच्या हिताचं आहे. हे उघड असताना ते नजरेआड करण्याचा आगाऊपणा देशातल्या काही कलाकारांनी केला आहे. कोणत्याही आंदोलनाला लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व असतं. देशाला स्वातंत्र्य घरात बसून नाही मिळालं. ते मिळवण्यासाठीही आंदोलनाचाच मार्ग चोखाळावा लागला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवर झालेल्या आंदोलनांची दखल त्या त्या काळात इतिहासाने घेतली. यामुळे न्यायाची बूज राखली गेली. पण केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आल्यापासून आंदोलनांकडे पाहण्याचा मध्यवर्ती सरकारचा दृष्टीकोन बदलला. कोणत्याही आंदोलनाला थारा द्यायचा नाही, असा पण केलेल्या या सरकारने नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन चर्चेशिवाय दडपलं.

काश्मीरमधून 370 हटवल्याविरोधातील आंदोलन चर्चेविना चिरडलं. देशात घडलेल्या मॉबलिंचिंगविरोधातील आंदोलनं तर हातोहाथ संपली. या आंदोलनांचा टिकाव न लागल्याने आता शेतकरी आंदोलनही चिरडण्याचा उद्योग सरकारने हाती घेतला आहे. सरकारच्या या कृतीविरोधात जो कोणी बोलेल त्यांच्या मुसक्या आवळण्याचा पध्दतशीर प्रयत्न झाला. याचा फटका शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍या ज्येष्ठ पत्रकारांना बसला. सरकारची ही नीती भारतासारख्या लोकशाही प्रधान देशावर प्रेम करणार्‍या कोणाही बाह्य व्यक्तीला पसंत पडणं अशक्य. अशावेळी त्यांचा आंदोलनांना पाठिंबा मिळणं स्वाभाविक आहे. लालकिल्ल्यावरील वादग्रस्त घटनेचा गैरफायदा घेत मोदींच्या सरकारने आंदोलक शेतकर्‍यांची अशी कोंडी करण्याचा प्रयत्न केला की हे शेतकरी म्हणजे देशाचे शत्रूच जणू. पाकिस्तान आणि चीनहूनही शेतकरी देशाचे दुष्मन असल्यासारखी वर्तणूक सरकार आंदोलक शेतकर्‍यांबरोबर करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या सीमांवरील रस्त्यांवर निर्माण केलेला अडथळा पाहाता आणि आंदोलन ठिकाणी इंटरनेट आणि समाज माध्यमांची केलेली कोंडी पाहाता कोणीही त्यावर प्रतिक्रिया देईल.

- Advertisement -

सरकारच्या या कृतीचा निषेध होणार नसेल तर शेतकर्‍यांच्या घामाला किंमत नाही. भारतातल्या सिलिब्रिटींच्या लेखी शेतकरीच काय पण कोणाही भारतीयाला सरकारविरोधी दाद मागण्याचा जणू अधिकारच राहिलेला नाही. यामुळेच हे सिलिब्रिटी शेतकर्‍यांच्या आंदोलनाची बाजू घेणार्‍या आंतरराष्ट्रीय कलाकारांनाही शहाणपणा शिकवू लागले आहेत. जागतिक पॉपस्टार रिहाना यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत दिलेल्या पाठिब्याचं जगभर समर्थन दिलं जात असताना पर्यावरणासाठी बहुमोल योगदान देणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिने रिहानाचं ट्विट रीट्विट केलं. ग्रेटानंतर अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नी आणि मिया खलिफा या विख्यात कलाकारांनी शेतकर्‍यांच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. जागतिक दर्जाच्या या तीन मान्यवर महिलांच्या समर्थनानंतर जगभर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. खरं तर या तिघींनी देशाच्या सरकारवर कोणतीही टीका केली नव्हती की मोदींना ते हेकेखोर वा हिटलर म्हणूनही डिवचलं नव्हतं. शेतकर्‍यांवर अशी रस्त्यावर बसण्याची वेळ येऊ नये, असं या तिघींचं म्हणणं होतं. असं असताना स्वत:ला सिलिब्रिटी समजणार्‍या अक्षयकुमार, अजय देवगण, करण जोहर, सचिन तेंडूलकर, विराट कोहली आणि लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनाचा जागतिक स्तरावर चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप करत देशवासीयांना एक होण्याची हाक दिली आहे.

ज्यांनी ही हाक दिली आहे, त्यांच्या व्यक्तीगत जीवनात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण भारताप्रति त्यांनी केलेल्या ‘महान’ कार्याची जाणीव देशवासीयांना आहे. ज्या सचिन तेंडूलकर याने भारताच्या बदनामीचा प्रचाराचा डंका पिटला त्या सचिनला सत्तर दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत, याची जाणीव नव्हती? परदेशातील मान्यवरांना भारतातीतल शेतकर्‍यांची कणव आहे, आणि सचिनला ती असू नये, हे अजबच म्हटलं पाहिजे. शेतकर्‍यांना रस्त्यावर का उतरावं लागतं हे खासदार असताना एकदाही सांगण्याची हिंमत सचिन दाखवू शकला नाही. खासदार असून देशाप्रति एकदाही जो तोंड उघडू शकत नाही, असला सिलिब्रिटी असून काय फायदा? याच सचिनला सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांची बरोबरी केल्यानिमित्ताने फियाट कंपनीने त्याला ‘फेरारी-360’ भेट दिली होती. ही गाडी भारतात आणताना त्याने एक कोटी तीन लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरली नव्हती. अखेर गाजावाजा होऊ लागल्यावर ते पैसे भरावे लागले. पुढे ही फरारी त्याने जयेश देसाई या सुरतच्या व्यापार्‍याला विकली. बीएमडब्ल्यू एम 5 या अलिशान कारवरील एक लाख रुपयांचा सेस बुडवल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेने 2010 मध्ये त्याचा समावेश करबुडव्यांच्या यादीत केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या पाण्याचं बीलही तो भरू शकत नव्हता, इतकी गरीबी या सिलिब्रिटीवर आली होती.

- Advertisement -

आपलं भांडण आपण सोडवू, अशी हाक देणार्‍या लता मंगेशकर या देशातल्या प्रत्येकासाठी गानकोकिळा आहेत, यात वाद नाही. त्यांच्या कामाचा त्यांना कायम मोबदला मिळाला आहे. पण देशाच्या घडणीत त्या आपल्या घरासमोरून एक पूल उभारू देत नाहीत. स्वत:ला नको असलेला पूल उभारला तर मुंबई सोडून जाण्याची भाषा त्या करतात, हे लक्षात घेता मंगेशकरांविषयी कोणी किती प्रेम व्यक्त करावं?

असल्या सिलिब्रिटींना कोणी विकत घेतलं, असा काळजाला झोंबणारा सवाल अमांडा सर्नीने केल्यावर त्यांना मिरच्या झोंबल्या. हीच माणसं भारत तोडत आहेत, असं नमूद करत सर्नीने काही जाणिवेचा विचार करा, अशी हाक दिली आहे. सहा जानेवारीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या शपथग्रहणावेळी कॅपिटॉल हाऊसवर उजव्या आणि श्वेतवर्णियांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध ही मोदींना त्या देशाची अंतर्गत बाब का नाही वाटली? या हल्ल्यावेळी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी शांततेच्या आणि प्रचलित मार्गाने निषेध नोंदवता येतो, असं म्हटलं होतं. तिथे एक न्याय आणि भारतात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना एक न्याय, हे अयोग्यच होय. सरकार चुकीच्या पध्दतीने वागतं तेव्हा त्या सरकारचे कान पकडण्याची ताकद आपल्या सिलिब्रिटींमध्ये जरूर आहे. पण आपले हे सिलिब्रिटी कायम भुकेले आहेत. त्यांना लाचारीची भूक आहे. भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे सरकारला विरोध असला बालीश समज त्यांचा झाला आहे. साक्षात प्रभू रामचंद्र जरी पृथ्वीवर अवतरले तरी कायदा मागे घेणार नाही, या वक्तव्याचा तेंडूलकर, मंगेशकर यांनी याआधी का निषेध केला नाही? तेव्हा ही अंतर्गत बाब नव्हती? कारण तो निषेध सोयीचा नव्हता. सत्तेच्या विरोधात बोललो तर ईडीची पिडा मागे लागायची ही या सिलिब्रिटींना धास्ती असावी.

शेतकर्‍यांचं आंदोलनाला चिरडण्याच्या कृतीने सरकारने आपली लाज जगभर घालवली आहेच. पण सरकारच्या पोलिसांनीही आपल्या कृतीने आपण किती उसनं जगणं जगतो हे दाखवून दिलं आहे. जगातील मान्यवर पर्यावरणवादी म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाच्या केलेल्या समर्थनाची दखल घेत दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारीचा कट, धर्माधारावर वैरभाव असे गुन्हे लावून तक्रार गुदरली आहे. ग्रेटा यांच्या विरोधातील पोलिसांची ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या अकलेचं दिवाळंच म्हटलं पाहिजे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं कळल्यावरही ग्रेटा यांनी मी शेतकर्‍यांची समर्थक आहे, त्यांच्याच सोबत असेन, कोणाच्या द्वेषामुळे, धमकीने आणि एफआयआरमुळे त्यात बदल होणार नाही, असं सुनावलं आहे. आता तर ग्रेटा यांच्या समर्थनार्थ भारतीय वंशाच्या अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्या लेखक असलेल्या भाची मीना हॅरीस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. हटवादी सरकारसाठी आणि लोकशाहीची जपणूक करणार्‍या भारतासाठी शेतकर्‍यांना मिळणारा जागतिक पाठिंबा हे चांगलं लक्षण नाही.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -