घरफिचर्समायमहानगर ब्लॉगतिसर्‍या आघाडीला मोदीविरोधाचे इंधन!

तिसर्‍या आघाडीला मोदीविरोधाचे इंधन!

Subscribe

भाजप वा मोदी विरोधाची डरकाळी फोडून राजकारण केलेल्या अशा नेत्यांना एकदा तरी सलग दहाबारा वर्षे एका पक्षात वा एकदिलाने काम करता आले आहे काय? ही एका जनता गटाची स्थिती आहे. बाकी डझनावारी पुरोगामी पक्ष आहेत आणि प्रत्येक नेत्याचे वेगवेगळे अहंकार त्यांच्या देहयष्टीपेक्षाही अगडबंब आहेत. असे सगळे अहंकार व रागलोभ विसरून एकत्र येण्यासाठी त्यांना मोदींचा द्वेष उपयुक्त ठरतो. पण त्या द्वेष वा धोक्याची तीव्रता किंचित कमी झाली, तरी आपसातले वैर उफाळून बाहेर यायला वेळ लागत नाही ना?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिसर्‍या आघाडीची मोट बांधायला घेतली आहे. मंगळवारी दिल्लीत शरद पवार यांनी देशातील १५ विविध पक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीला काँग्रेसचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. किंबहुना काँग्रेसला बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे भाजप, काँग्रेसविरहित अशी ही तिसरी आघाडी असणार, यात कोणतीही शंका नाही. आता या राष्ट्रवादी काँग्रेससह १५ विविध पक्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येते की, यातले बहुतेक पक्ष भाजपप्रमाणेच आपापल्या कार्यक्षेत्रात व प्रभावक्षेत्रात काँग्रेस विरोधक म्हणून उदयास आलेले आहेत. पण त्यांना त्या भूमिकेवर कायम टिकून राहता आलेले नाही.

परिणामी त्यांना आपला प्रभावही कायम टिकवता आलेला नाही. जिथे जिथे म्हणून अशा पक्षांनी आपला काँग्रेस विरोध क्षीण होऊ दिला; तिथे तिथे त्यांनी आपला पाया गमावला आणि त्यांना पांगळे व्हावे लागलेले आहे. दोनतीन दशकांपूर्वी त्यांच्या इतकाच दुबळा असलेला भाजप, आज केंद्रातील सत्ताधारी पक्ष झाला. त्याचे श्रेय याच पक्षांच्या धरसोडवृत्तीला व भाजपच्या काँग्रेस विरोधावर ठाम रहाण्याला आहे. मागल्या तीनचार दशकात भारतातला मतदार नागरिक काँग्रेसला पर्याय शोधत असताना, त्याने ज्या ज्या राजकीय पक्षांना संधी दिली त्यांनी सत्तेसाठी किंवा पोरकट कारणास्तव कधीतरी काँग्रेसची सोबत केली. मग स्थानिक पातळीवर त्याचा दांभिकपणा उघडा पडला आणि त्याची जागा दुसरा पक्ष व्यापत गेलेला आहे. अन्यथा अशाच भागात भाजपने आपले बस्तान बसवलेले आहे.

- Advertisement -

आम आदमी पक्षाच्या यशाने अनेकजण भारावले होते आणि तेव्हाच त्यांनी केजरीवाल मोदींचा विजयरथ रोखण्याची भाकिते केलेली होती. ती फसली. ती फसणारच होती. कारण दिल्लीतल्या तेव्हाच्या निकालांचे योग्य विश्लेषण झाले नव्हते आणि आज देखील दिल्लीतील त्या पक्षाच्या अपूर्व यशाने भारावलेल्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. पहिली गोष्ट म्हणजे २०१३ च्या अखेरीस केजरीवाल यांनी दिल्लीतही भाजपाला पराभूत केले नव्हते. तर काँग्रेस पक्षाला दणका दिलेला होता. पण तो धक्का देताना त्यांनी तिसरी शक्ती वा आघाडी मानले जाणार्‍या पक्षांची दिल्लीतली जागा व्यापलेली होती. त्यात प्रामुख्याने त्यांनी तिथे तिसरी शक्ती म्हणून उदयास आलेल्या मायवतींच्या बहुजन समाज पक्षाची मते पूर्णत: खाल्लेली होती. तोपर्यंत मायावतींनी दोन आमदार व दहापंधरा टक्के मते तिथे मिळवलेली होती. पण केजरीवाल जिंकत असताना मायवतींच्या पक्षाचा दिल्लीत साफ अस्त होऊन गेला.

शरद पवार, लालूंपासून मुलायम, मायावती, मुलायम, नितीश वा डावे इत्यादी सेक्युलर म्हणवणार्‍या पक्षांचे विविध राज्यात वा तिथल्या नागरी भागात काही किरकोळ समर्थक असतात. पण पक्ष म्हणून त्यांचे कुठलेही संघटन तिथे नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात पूर्वाश्रमीचे समाजवादी, जनता दलीय विस्कळीत गट अनेक तालुक्यात शहरात विखुरलेले आहेत. त्यांना कोणी नेताच नसल्याने अनाथ असल्याप्रमाणे ते भरकटलेले आहेत. अण्णा आंदोलन व पुढे आम आदमी पक्षाच्या रुपाने त्यांच्या नव्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत लढलेले व उत्साहाने बोलणारे चेहरे तपासले, तर त्यात जुन्या समाजवादी वारशातील लोकांचा भरणा दिसेल. आताही भाजपच्या या पराभवाचे चित्र बघायला आसूसलेल्या अनेक सेक्युलर संघटना, गट यांना म्हणूनच तिसर्‍या आघाडीचा शोध घ्यावा लागत आहे. शरद पवार, मुलायम, मायावती, जयललिता, ममता, करूणानिधी, लालू, नितीश, पासवान, देवेगौडा इत्यादी नेत्यांनी आतापर्यंत आपल्या पाठीराख्यांना भाजप व काँग्रेसच्या विरोधात उभे राहण्याचे गाजर जरूर दाखवले. पण प्रसंगोपात त्यांनी आपापले अहंकार व स्वार्थासाठी पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास केलेला आहे. कारण स्वार्थ असेल, त्यानुसार आघाड्या केल्या, मोडल्या वा बदलल्या आहेत.

- Advertisement -

पूर्वी इंदिराजींना वा आज मोदींना पराभूत करू बघणारे पक्ष वा नेते, खरोखरच विचारांनी एकत्र येत असतात का? असते तर त्यांच्या वागण्यात वा कृतीमध्ये एकवाक्यता दिसली असती. पण तसे सहसा घडलेले नाही. ठराविक काळापर्यंत त्यांची एकजुट मोठी अभेद्य वाटते. पण त्यात थोडेफार जरी यश मिळताना दिसू लागले, की मुळचा हेतू बाजूला पडून हे लोक एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. हे प्रत्येक वेळी झालेले आहे. १९७७ सालात म्हणूनच जनता पक्षाचा प्रयोग फसला आणि १९८९ सालातला जनता दलाचाही प्रयोग फसला. पुढे त्याचीच पुनरावृत्ती १९९६ सालात भाजपाला सत्तेपासून अलिप्त राखण्याच्या फसव्या प्रयोगातून झाली. असे प्रत्येकवेळी कशाला व्हावे? आपला समान शत्रू वा प्रतिस्पर्धी संपला नसताना, हे लोक असे हेतूला हरताळ फासून एकमेकांचेच पाय कशाला ओढू लागतात? त्याचे विश्लेषण त्यांच्या मनातील कडव्या द्वेषभावनेत सामावलेले असते. त्यांना एकमेकांविषयी काडीचेही प्रेम नसते की आपुलकी नसते. त्यापेक्षा कुणाचा तरी समान द्वेष करण्याच्या भावनेने त्यांना एकत्र आणलेले असते. ते द्वेषाचे लक्ष्य किंचीत जरी दुबळे पडल्यासारखे वाटले, की या एकजुट झालेल्यांच्या द्वेषाची दिशा तात्काळ जवळ उभ्या असलेल्या सहकार्‍याकडे वळत असते. शत्रू दुबळा होत असताना आपला सहकारी शिरजोर होण्याची उपजत भीती व भयगंड त्याचे कारण असतो. असे एकत्र येणारे मुळातच माथेफिरू स्वभावाचे असतात आणि स्थैर्याने जगण्यात त्यांना अजिबात रस नसतो. स्थिरता येऊ लागली की ते विचलीत होतात आणि जमलेल्या समीकरणाचा विचका सुरू करतात.

गेल्या अर्धशतकात अनेकदा केलेला हा विरोधी आघाडी वा तिसर्‍याआघाडीचा प्रयोग फसला आहे. आताही त्यापेक्षा काहीही वेगळे होण्याची अजिबात शक्यता नाही. दिल्लीतील रामलिला मैदानावर अण्णा हजारे यांनी आरंभलेले उपोषण संपले. सात वर्षांपूर्वी तशाच उपोषणाने लोकपाल आंदोलन पेटलेले होते आणि त्याने समाज ढवळून निघाला होता. त्यात एकत्र आलेल्या विविध व्यक्तीमत्वांचे त्यानंतर काय झाले? हिंदी चित्रपटातले ठाकूर चौधरी जितकी कडवी दुष्मनी दाखवू शकत नाहीत, त्यापेक्षा या उच्चशिक्षित लोकांनी आपल्या द्वेष तिरस्काराची नाटके रंगवली ना? पूर्वीचा समाजवादी पक्ष वा नंतरच्या जनता परिवाराची कथा कितीशी वेगळी आहे? वाजपेयी वा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकजुट झालेल्या पक्षांनी पंतप्रधानपद जनता गटाला दिलेले होते. तर त्याला सुरूंग कोणी लावला होता? शरद पवार, लालू, मुलायम, देवेगौडा, शरद यादव हे सगळे कोण आहेत? वेळोवेळी भाजप वा मोदी विरोधाची डरकाळी फोडून राजकारण केलेल्या अशा नेत्यांना एकदा तरी सलग दहाबारा वर्षे एका पक्षात वा एकदिलाने काम करता आले आहे काय? ही एका जनता गटाची स्थिती आहे. बाकी डझनावारी पुरोगामी पक्ष आहेत आणि प्रत्येक नेत्याचे वेगवेगळे अहंकार त्यांच्या देहयष्टीपेक्षाही अगडबंब आहेत. असे सगळे अहंकार व रागलोभ विसरून एकत्र येण्यासाठी त्यांना मोदींचा द्वेष उपयुक्त ठरतो. पण त्या द्वेष वा धोक्याची तीव्रता किंचीत कमी झाली, तरी आपसातले वैर उफाळून बाहेर यायला वेळ लागत नाही ना?

१९७७ सालात जनता पक्षाचे यश इंदिराजींनी नव्हेतर समाजवादी माथेफ़िरूंनी मातीमोल केले होते. नसलेला द्विसदस्यत्वाचा मुद्दा उकरून काढण्यातून जनता पक्षात दुफळी माजली होती. तर १९९० सालात पुरोगामीत्वाचे भूत स्वार झालेल्या समाजवादी गटानेच जनता दलाचे तुकडे पाडलेले होते. त्यांच्या राजकारणाला आधी इंदिराजी वा नंतर राजीव गांधींना कुठलाही सुरूंग लावण्याची गरज भासलेली नव्हती. इंदिरा हटाव किंवा बोफोर्सने एकत्र आलेल्या असंतुष्टांना आपसात भांडणे करायला जराही वेळ लागला नाही आणि आघाडीत बिघाडी होऊन गेलेली होती. मोदी नावाचे भूत मानगुटीवर त्यांनीच चढवून घेतलेले आहे, तोपर्यंत आघाडी जोमात चालणार आहे. पण जेव्हा मोदींपेक्षा आपलाच कोणी सहकारी पक्ष वा नेता शिरजोर होताना दिसेल, तेव्हा फाटाफुटीला इतकाच आवेश चढलेला दिसेल. २०१८ साली बिहारमधला महागठबंधनाचा प्रयोग यशस्वी झालेला होता.

पण भाजपाला पराभूत केल्यावर नितीशना सतत कोंडीत पकडून लालूंनी कोणते राजकारण यशस्वी केले? एकमेकांच्या प्रेमापायी किंवा आपुलकीने जवळ येण्याचा कुठलाही विषय नव्हता. किंबहुना नाहीच. या सर्वांना मोदींच्या यशाने पछाडलेले आहे आणि त्यातून आपले अस्तित्व टिकवण्याचा हा लढा सुरू झालेला आहे. त्यात आपण भाजपापेक्षा बलशाली होऊन त्याला पराभूत करावे, अशी कुठलीही इर्षा नाही. मोदी-शहा जोडीसमोर आपण कमकुवत असल्याची भावना त्यांना एकत्र यायला भाग पाडते आहे. त्यातच आघाडीचे विस्कटणे अपरिहार्य झालेले आहे. कारण या पक्षातले वा एकूण आघाडीचे समीकरण मांडणारे राजकीय विचार करीत नसून द्वेषाने प्रवृत्त झालेले आहेत. समविचारी म्हणून एकत्र येत नसून भयगंडाने त्यांना एकत्र बांधलेले आहे. तो भयगंडाचा धागा जरासा सैल पडला, तरी त्यांचे विखुरणे सक्तीचे आहे आणि कुठलेही स्थैर्य त्यांच्या स्वभावातच नाही.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -