घरफिचर्समायमहानगर ब्लॉगठाकरे-मोदी मैत्रीची खिडकी खुली!

ठाकरे-मोदी मैत्रीची खिडकी खुली!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. ही भेट फक्त मराठा आरक्षण आणि राज्याच्या काही प्रलंबित प्रश्नांपुरती दाखवली जात असली तरी ती त्यापुरती मर्यादित नव्हती. कारण तिला एक राजकीय खिडकी आहे. या खिडकीतून डोकावत शिवसेना पक्षप्रमुखही असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासोबत असलेली मैत्री अजून साफ मोडीत निघालेली नाही, हे दाखवून दिले. या दोस्तीचा हात पुढे जाऊन कदाचित पूर्वीसारखा गाढ युतीच्या मैत्रीचा होऊ शकतो, हा या भेटीचा खरा राजकीय अन्वयार्थ म्हणायला हवा. दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक एकत्र लढवून नंतर मुख्यमंत्रीपदावरून युती बिनसली आणि मीच पुन्हा येणार… मीच मुख्यमंत्री होणार… या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांना सुरुंग लावत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. युती म्हणून निवडणुकांना सामोरे जाताना अडीच-अडीच वर्षे भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्री अशा आणाभाका मातोश्रीवर अमित शहा यांच्या साक्षीने झाल्याचा दावा, शिवसेनेने केेला.

पण भाजपने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेत तो फेटाळला. त्यामुळे आधीच तापलेल्या शिवसेनाने युतीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एक दार बंद करताना ठाकरे यांनी मोदींसोबतच्या मैत्रीची खिडकी उघडी ठेवली होती. भाजपसोबत टोकाचे संबंध बिघडूनही उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्याविरोधात कधी जोरदार टीका केली नव्हती की, मोदी यांनी मातोश्रीकडे कायमची पाठ फिरवली नव्हती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का बसत असताना आपला जुना मित्र पुढे मदतीला येऊ शकतो, याचा सारासार विचार करून मोदी स्वतंत्रपणे ठाकरे यांना भेटले. मोदी यांचा गेल्या सात वर्षांतील सत्ता चालवतानाचा अनुभव लक्षात घेता ते विरोधी पक्ष सोडाच आपल्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना किंमत देत नाही. मात्र पश्चिम बंगालच्या निकालाने आता पुढची गणिते बिघडू शकतात, याचा अंदाज घेत मोदींनी उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र भेट दिली.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये मोदींनी भाजपच्या ‘बुद्धिमान’ नेत्यांना पाठवले होते. तर काही बुद्धिमान मंडळींना भाजपने निवडणुकीत उभे केले होते. ते पराभूत झाले. युक्तिवादाच्या जीवावर पक्षाला सांभाळून घेणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने स्तुती करणे एवढेच या नेत्यांचे काम असते. पण त्यांचा पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग झाला नाही. तिथला भाजपचा पराभव हा मोदींच्या नेतृत्वाची हार होती, असे भाजपचे विरोधक म्हणतात. पश्चिम बंगालमधील मुस्लीम मतदारांनी तृणमूल काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे भाजप पराभूत झाल्याचे सांगितले जात असले तरी, तिथल्या 70 टक्के हिंदूंनीही भाजपला अव्हेरले. त्यांनी गुरुवर्य रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘प्रतिमे’तील मोदींना मत दिले नाही. पश्चिम बंगालने मोदींचे नेतृत्व नाकारले, तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने मोदींच्या नेतृत्व क्षमतेवरही प्रश्नचिन्ह केले. या दोन्ही धक्क्यांतून सावरत मोदींनी लोककल्याणकारी अशी स्वत:ची प्रतिमा उभी करण्याचे प्रयत्न नव्याने सुरू केले आहेत. ठाकरे यांच्यासोबतची मैत्री फुलवण्यामागे हा एक भाग असू शकतो.

हा एक भाग तर मोदी-ठाकरे मैत्रीचा दुसरा भाग आहे तो उद्धव ठाकरे यांच्या काही अडचणींचा. राजकारणात कोणी धुतल्या तांदळासारखे नसतात. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि नेते आज अडचणीत आले आहेत. त्यांच्या मागे सीबीआय, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. विशेष म्हणजे सध्या ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत असलेले अनिल परब अडचणीत असल्याचे बोलले जाते. वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर परब यांची मंत्रिपदावरून उचलबांगडी होऊ शकते, अशी चर्चा आहे. भाजपचे जणू गुप्तहेर असलेले खोदकाम नेते किरीट सोमय्या हे सध्या परब यांच्या कथित भ्रष्टाचाराची कागदपत्रे गोळा करत असल्यामुळे मातोश्री अस्वस्थ असल्याची वंदता आहे. मुख्य म्हणजे मलईदार बदल्यांच्या प्रकरणात परब यांची बदनामी होणे, ठाकरे यांना अडचणीचे वाटत असावे. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांना बाजूला सारून अचानक अनिल परब यांचे शिवसेना सत्तेच्या वर्तुळात वाढलेले वजन हा गेले अनेक महिने पक्षातच कुजबुजीचा विषय राहिला आहे.

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणेने पाळेमुळे खोदायला घेतली तर होत्याचे नव्हते व्हायचे, त्यापेक्षा थेट मोदी यांच्याशी जुळवून घेतल्यास पुढे जाऊन त्रास नको, हासुद्धा ठाकरेंच्या मोदी भेटीचा एक कोन असू शकतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 6 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान पुण्यात आले होते. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री पुणे विमानतळावर गेले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. मात्र या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2020 रोजी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली होती.

यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत होते. यावेळी सीएए, एनपीआर आणि जीएसटीच्या मुद्यावर चर्चा झाली होती. या दोन भेटीनंतर 8 जून 2021 ला झालेली तिसरी आणि स्वतंत्र भेट पुढच्या राजकारणाची दिशा पाहता महत्वाची आहे. म्हणूनच ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ठ्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केली असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकार्‍यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, या मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाला खूप महत्व आहे.

पक्ष चालवणे आणि राज्यशकट हाकणे या दोन वेगळ्या गोष्टी असून उद्धव ठाकरे यात कमी पडतात, अशी एकूण त्यांची प्रतिमा तयार झाली होती. पण आता दीड एक वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर ते आता तयार राजकारणी म्हणून एक पाऊल पुढे टाकताना दिसत असून मोदींसोबतच्या भेटीने त्याची एक झलक दाखवून दिली आहे. मुख्य म्हणजे ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी महाविकास आघाडीचे सत्ताकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याभोवती फिरत होते. हे सरकार पवार यांच्यामुळे चालले आहे, हा समज रूढ होत असताना ठाकरे यांनी मोदींच्या मैत्रीची आधी अर्धी उघडी असलेली खिडकी आता पूर्ण उघडत आपल्या मित्रपक्षांना एक नकळत संदेश दिला आहे.

सत्ता चालवण्यासाठी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा दृश्य-अदृश्य दबाव पुढे चालेलच असे नाही. पुढे जाऊन भाजपसोबत मैत्री होऊ शकते. शरद पवार यांनी जाऊन भाजपसोबत हात मिळवण्यापेक्षा आपणच आपल्या जुन्या युतीच्या मैत्रीची खिडकी उघडलेली बरी हा त्यामागचा पुढचा विचार आहे. यामुळे रात्रीच्या अंधारात महाविकास आघाडी सरकार पाडायला निघालेल्या सत्तापिपासू देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या यांनाही चाप बसणार आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सरकार पडणार याचे पंचाग उघडून बसलेल्यांना भाजप नेत्यांना ही एक चपराक आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांची शांत, संयमी प्रतिमा मुरब्बी राजकारणी म्हणून पुढे आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -