घरफिचर्समायमहानगर ब्लॉग'यदाकदाचित रिटर्न्स' हास्यकल्लोळ करत समाजातील विविध घडामोडींवर भाष्य करणारं नाटक

‘यदाकदाचित रिटर्न्स’ हास्यकल्लोळ करत समाजातील विविध घडामोडींवर भाष्य करणारं नाटक

Subscribe

नशीब जोरावर असणे म्हणजे काय सांगतो. काही दिवसांपूर्वी मी हा अनुभव घेतला. अनुभव ऐकलात (वाचलात) की, कोणताही नाट्यवेडा मराठी रसिक माझ्याशी सहमत होईल. नाट्यवेडा मराठी रसीक म्हटले की, नाटक आलेच, आणि नाटक आले म्हणजे, नमन ही आलंच पाहिजे. त्यामुळे माझ्या कडून नमनाला घडा भर तेल घालून झालंय, आता जोरावर असणाऱ्या नशिबाची कथा…

तर झाले असे, काही दिवसांपूर्वी नाट्यवेड्या ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात, यदाकदाचित रिटर्न्सचा प्रयोग दुपारी साडे चार वाजता होता. “सात मजली हास्यकल्लोळ”, “पैसा वसूल, मनोरंजन हमखास”, “दहा दिशांनी दहा तोंडांनी गौरवलेली कॉमेडी”, अशा आकर्षक कॅच लाईन असलेल्या जाहिराती या नाटकासाठी केलेल्या आहेत. संतोष पवार या अत्यंत जाणत्या आणि अनुभवी दिग्दर्शकाची ही कलाकृती. या सर्व कॅच लाईनला शब्दशः खऱ्या ठरवतात. प्रत्येक कलाकाराचे काम आणि टायमिंग लाजवाब आहे. जबरदस्त कलाकारांची टीम जीव ओतून काम करताना प्रेक्षकांना क्षणोक्षणी जाणवत राहते आणि प्रत्येक फ्रेममध्ये आपल्याला संतोष पवार टच जाणवतो. संतोष वडके आणि तेजस घाडीगांवकर या दोघांनी तर वेगवेगळ्या चार/पाच भुमिका या अंकात केल्या आहेत. प्रत्येक कॅरेक्टरचे बेअरिंग वेगळे, पण या दोन्ही गुणी कलाकारांनी त्यांना मिळालेले प्रत्येक कॅरेक्टर एका पेक्षा एक सरस वठवले आहे.

- Advertisement -

…आणि आता माझ्या जोरावर असणाऱ्या नशिबाचा किस्सा.. या दिवशीच्या प्रयोगाला काही कारणास्तव कटप्पाची भूमिका करणारा कलाकार येऊ शकला नाही.. पण “शो मस्ट गो ऑन”, या नखशिखांत भिनलेल्या उक्तीला सार्थ ठरवत, संतोष पवार यांनी स्वतः चेहऱ्यावर मेकअप लावून कटप्पाची वेशभूषा अंगावर चढवली. प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच होता आणि माझ्यासाठी जोरदार नशिबाचा भाग, कारण त्याच्या दिग्दर्शनाचा जेवढा मी चाहता आहे, तेवढाच मी त्याच्या अभिनयाचा पण पंखा आहे. इतर कलाकारांच्या बरोबर या कटप्पाने त्या दिवशी रंगमंचावर जो काय धुमाकूळ घातला, तो म्हणजे फक्त अनुभवायचाच सोहळा. सात मजली हास्यकल्लोळ म्हणजे काय, ते हे नाटक बघताना अडीच पावणे तीन तास जाणवत राहते.

हे नाटक प्रेक्षकांना पोटदुखेपर्यंत फक्त हसवतच नाही, पैसा वसूल, मनोरंजन हमखास, या कॅच लाईन मधील हमखास मनोरंजन प्रेक्षकांना संपूर्ण नाटकभर अनुभवता येते, त्यामुळे पैसा ही वसूल झाल्याची भावना रसिकांमध्ये येते. पण शेवटच्या दहा पंधरा मिनिटांसाठी हे नाटक असे काही ट्विस्ट घेते की, क्या बात है, असा गौरवोद्गार रसिकांच्या तोंडून बाहेर पडतोच…आणि दहा दिशांनी दहा तोंडांनी गौरवलेली कॉमेडी, याच्या बरोबरच, हा शेवटचा ट्विस्ट देखील या जबरदस्त तुफ्फान नाटकाचा खराखुरा यू एस पी आहे, हे चोखंदळ रसिकांच्या लक्षात येते.

- Advertisement -

जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरून हसवणारी ही कलाकृती, या शेवटच्या ट्विस्टमुळे संवेदनशील रसिकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावते. समाजात घडत असलेल्या विविध घडामोडींवर हे नाटक भाष्य करते. त्यामुळे हे नाटक कधीही आणि कितीही वेळा बघितले तरी ते आपल्याला नेहमीच फ्रेश वाटते.

संतोष पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा….

अजय निक्ते
पत्रकार, अभिनेते आणि ब्लॉगर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -