घरफिचर्सप्रतिभावान कवी हरिवंशराय बच्चन

प्रतिभावान कवी हरिवंशराय बच्चन

Subscribe

हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी अलाहाबाद येथे एका कायस्थ कुटुंबात झाला. हरिवंशराय यांना लहानपणी कौतुकाने सर्वजण बच्चन म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले. त्यांच्या वडिलांचे नाव प्रतापनारायण. हरिवंशराय यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले. घरची गरिबी त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे आले. १९२९ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात बी.ए. झाले. १९३८ मध्ये एम.ए. व १९३९ मध्ये बनारस येथून ते बी.टी झाले. १९४२ पासून अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले. डब्ल्यू. बी.येट्स (१८६५-१९३९) या प्रसिद्ध आयरिश कवीवर डब्ल्यू. बी. येट्स अँड ऑकल्टिझम ( १९६५-ग्रंथरूपाने प्रसिद्ध) हा प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मिळविली (१९४५). १९५५ मध्ये अलाहाबाद आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांनी काही काळ काम केले.

हरिवंशराय यांचे ‘मधुशाला’ (१९३५), ‘मधुबाला’ (१९३६) ‘मधुकलश’ (१९३७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आणि हिंदी काव्यातील ‘हालावादा’चा प्रवाह सुरू झाला. ते हालावादी बनण्याचे मुख्य कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सापडते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी लहानपणापासून करावा लागलेला झगडा, पहिल्या पत्नीचा क्षयाने झालेला मृत्यू यांसारखी कारणे त्यामागे आहेत. या व्यथित अवस्थेत असतानाच एडवर्ड फिट्सजेरल्ड (१७६३-९८) यांनी अनुवादिलेल्या ‘उमर खय्याम’ यांच्या रूबायांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.

- Advertisement -

हालावाद हा भौतिक सुखवादाचा, मदिरा, व मदिराक्षी यांच्या कैफात प्राप्तकाल जगण्याचा, निदर्शक आहे. मध्यमवर्गीय सुशिक्षितांच्या मनातील ‘ध्येय की सुख?’, ‘कर्ममय जीवन की निष्क्रीय सुखासीन जीवन?’, भौतिकता की आध्यात्मिकता ही सारी द्वंद्वे त्यांच्या काव्यात व्यक्त झाली. पुढे त्यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय कार्याचा प्रभावही पडला. ‘निशा निमंत्रण’ (९१३८) आणि ‘एकांत संगीत’ (१९३९) यांसारख्या त्यांच्या काव्यसंग्रहांतील विषादमयता जाऊन सतरंगिनी (१९४५) व ‘मिलन यामिनी’ (१९५०) यांत उल्हासित मनोवृत्ती प्रकट झाली आणि ‘खादी के फूल’ (१९४८), ‘सूत की माला’ (१९४८) या काव्यसंग्रहांतून ती सामाजिकतेत परिणत झाली.

दुर्बोध, अतिअंतर्मुख व अमूर्त ठरलेल्या छायावादी हिंदी कवितेला कंटाळलेल्या वाचकांना व श्रोत्यांना आपल्या सरळ, सुबोध, परंतु सरस काव्यरचनेने आणि विशेषतः व्यासपीठावरून आकर्षकपणे केलेल्या काव्यगायनाने त्यांनी हजारो रसिकांना मोहून टाकले. काव्याची गोडी कायम राखली व वाढविलीही. संस्कृतप्रचुर तसेच प्रतीकांच्या व प्रतिमांच्या बाहुल्याने नटलेल्या शैलीचा त्याग करून व्यावहारिक भाषेशी काव्याची पुन्हा जुळणी करून देण्याचे महत्वाचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. उर्दू शब्दकळा व लकबी यांचा खुबीदार उपयोग आपल्या हिंदी कवितेत त्यांनी करून घेतला. अशा या प्रतिभावान कवीचे 18 जानेवारी 2003 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -