घरफिचर्ससारांशमाणसांची ‘फुले’ करणारा माणूस

माणसांची ‘फुले’ करणारा माणूस

Subscribe

वि. वा. शिरवाडकरांच्या कथांवर आधारित मालिकेत विश्वनाथ एक शिंपी कथेत शीर्षक व्यक्तिरेखा साकारणार्‍या निळू फुलेंनी जुनी शिलाई मशीन चालवली आहे. निळू फुलेंनी पडद्यावर साकारलेल्या सामान्य माणसांच्या हरेक व्यक्तिरेखांना गडद दुःखाची किनार आहे.

– संजय सोनवणे

आजा झालेल्या या शिंप्याचं आता वय झालंय. तरुण मुुलगा गमावलेला आहे. आता नातवाशिवाय याला कोणीच नाही. त्यामुळे सत्तरीतही त्याला शिलाई मशीनचं पायडल थरथरत्या पायांनी चालवावं लागतंय. दुसरीकडे वाढतं वय साथ देत नाही. सदरा, शर्ट, अंगरख्याची मापं चुकू लागलीत, पण शंभर शंभर घरांच्या गावात शिंपी एकच असल्यानं मशीनच्या रिळं संपता संपत नाही, पण आता बायको पोरगं असे सोबतीचे बरेच नात्यांचे धागे तुटून गेलेत. हा गुंता सोडवणं उतारवयात आलंय. विश्वनाथकडे असलेलं मशीन जुनंय, सदर्‍याच्या काचा, बटनं लावता येईनात. पाय थरथरताहेत. त्यातच गावातल्या दुसर्‍या तरण्या शिंपी गड्यानं तालुक्याच्या शहरातून नवं मशीन आणलंय. त्यामुळे विश्वनाथाचं दुकान बंद होतंय. विश्वनाथचा हात बसलेली जुन्या पद्धतीची शिलाई आता जुनीच झालीय.

- Advertisement -

जीवाला घोर लागलाय. त्याला दुकान बंद, मशीनीचं चाक बंद झाल्यावर बाप नसलेल्या नातवाला जगवायचं कसं, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण, बदलत्या बाजारमूल्यात माणसांच्या देहाचं जुनं तेच मशीन निरुपयोगी ठरल्यावर अडगळ बनतं. जुन्या आणि नव्या माणसांमध्येही असाच मशीनसारखा संघर्ष सुरू असतो. यातला बदलत्या काळासमोर हतबल असलेला विश्वनाथ शिंपी निळूभाऊंनी असा काही उभा केलाय की या माणसानं त्याचं उभं आडवं जगणं या मशीनच्या चाकाला गुुंडाळून घेतलंय. ही शिवण इतकी पक्की, वातड झालीय की त्यावर आता नव्यानं टाके घालायला जागाच नाही. जुनी, करपलेली, पिकलेली, भरलेली, मुरलेली, संपलेली अशी कित्येक माणसं निळूभाऊंनी पडद्यावर उभी केली आहेत.

अशोक कुमार, आशा पारेख, राज बब्बर अशा दिग्गजांसोबत सौ दिन सास के मध्ये निळू फुलेंनी लाला खूबचंद साकारलेला होता. पालीच्या शेपटीतलं जहर टाकून घरातल्या आशा पारेख या सहनशीलवान सुनेला मारण्याचा कट करणारा हा खूबचंद त्या घरातला जावई असावा आणि सासू असावी ललिता पवार. हा बेरकी खूबचंद हिंदी पडद्यावरच्याही कुठल्याही चरित्र अभिनेत्यानं इतक्या ताकदीनं साकारला नसता, जेवढा परफेक्ट निळूभाऊंनी केलाय, मात्र असं असतानाही निळूभाऊंनी मोजकेच हिंदी सिनेमे केले. हिंदी पडद्यासाठी माझं हिंदी बोलणं तेवढ्या ताकदीचं नाही.

- Advertisement -

जेवढा न्याय मराठीतल्या व्यक्तिरेखांना देऊ शकेन तेवढं हिंदीत देणं मला भाषेच्या अडचणीमुळे शक्य होणार नाही हे निळूभाऊंना पक्कं माहीत होतं. आपल्या अभिनयातील बलस्थानांपेक्षा आपलं कमकुवतपण माहीत असणं अभिनेत्याला खचितच जास्त महत्त्वाचं असतं. निळूभाऊंना ते केवळ माहीतच नव्हतं तर त्यामागची कारणंही त्यांच्यासाठी महत्त्वाची होती, म्हणूनच त्यांनी हिंदी पडद्यावर साकारलेलं हरेक कॅरेक्टर मेथड अभिनयाच्याही पलीकडे होतं. व्यक्तिरेखेतल्या मानवी जाणिवा जेवढ्या निळूभाऊंच्या ज्ञात होत्या तेवढ्या त्या काळी हिंदीत केवळ अशोक कुमार, बलराज साहनी, दिलीप कुमार अशा मोजक्या कलाकारांनाच माहीत असाव्यात.

ऐंशीच्या दशकातल्या प्रेम प्रतिज्ञामध्ये असंघटित कामगार झालेल्या निळू फुलेनं पडदाभर अशी काही हातगाडी ओढली आहे की मजूरजन्माचे धक्के खाल्लेल्या या हमालानं आयुष्यभर बोजाच उचलला आहे, हे सुरकुतलेल्या चेहर्‍याने स्पष्ट करावं. त्याआधीचा मनमोहन देसाईंचा कुली आठवावा.बोजा उचलताना छातीत पेटत्या बिडीच्या धुरासोबत जगण्याचा दम भरावा लागतो. त्यासाठी तोंड वासल्यावर कपाळावरच्या घामाचा पाट वाहणारी कपाळावरची रेघनिरेघ सुरकुती ठळक होत जाते.

या बोजाची हातगाडी नि अंगठा तर्जनीत धरलेली बिडी एकाच वेळेस ओढताना थकव्याला बेमालूम फसवलं जातं. उचललेला बोजा खांद्यावर घेताना निळू फुलेंनी दाखवलेला कामगाराचा अ‍ॅटीट्यूड त्यांच्या नजरेत इतका खतरनाक असतो की या हमालानं आयुष्यभर याच फलाटावर लोकांचा बोजा उचलायचंच काम केलंय हे नऊ सेकंदाच्या या सीनमध्ये पुरतं स्पष्ट व्हावं. सारी दुनिया का बोज हम उठाते है…या शब्बीर कुमारच्या आवाजातला शब्द आणि आशय अमिताभपेक्षा निळू फुलेनं आपल्या अभिनयानं कुलीच्या पडद्यावर कित्येक मैल खरा केलेला असतो.

महेश भट्टच्या कब्जामध्ये निळू फुले गोल्डन फ्रेमचा चष्मा घातलेला करप्ट आणि बेरकी राजकारणी मंदार भागवत झालेला असतो. जमिनीवर कब्जा करण्यासाठी गल्लीगुंड जेटलीभाईला (परेश रावल) सुपारी देण्यासाठी फूल सफारीतल्या निळू फुलेनं कॉन्टेसा कारमधून लाखोंची बंडलं आणलेली असतात. परेश येण्याआधी निळू काडीनं कान टोकरत असतो. कानातली काडी हळूवार नाकाजवळ नेऊन हुंगून बेफिकिरीनं टाकून देण्याचा अभिनय त्याला महेश भट्टनं सांगितला नव्हता. इथं निळू फुले आणि त्यांच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्या कमालीच्या बोलक्या असतात.

सारांशमध्ये गजानन चित्रे नावाचा राजकारणी निळू फुले शाळामास्तर अनुपम खेर आणि सोनी राजदानला घरातून हाकलून देतो. सोनी अर्थात सुजाताला निळू फुलेच्या मुलाकडून प्रेम प्रकरणात दिवस गेलेले असतात. पोराची जबाबदारी घ्यावी म्हणून अनुपम खेर म्हणजेच बी. व्ही. प्रधान निळू फुलेच्या दारात जातो. त्यावेळी निळूभाऊंचा मुलगा मी या पोरीला ओळखत नाही, असं बापाच्या दहशतीमुळे सांगतो. बापाची ही दहशत निळूभाऊंनी डोळ्यांतून आणि किंचित ताणलेल्या चेहर्‍याच्या सुरकुत्यांनी पडद्यावर साकारलेली असते. ओठ आणि गाल किंचित आत खेचून पडद्यावर राग, बेरकीपणा आणि वेदनेचा सुस्कारा सोडण्याच्या निळू फुलेंच्या अभिनयाची हिंदीत दहशत होती.

हिंदीतले उच्चार आणि कथानक कल्चरला आपण कितपत न्याय देऊ अशी शंका निळू फुले यांना होती. त्यामुळे त्यांनी बरेच हिंदी सिनेमे नाकारले आणि बरेचदा हिंदी सिनेमात मराठी माणूस साकारला. कुली, वो सात दिन, मशाल ही उदाहरणे झाली. निळू फुलेंसोबत स्क्रीन शेअर करताना आपण झाकोळले जाऊ याचं टेन्शन दिलीप कुमार, अनुपम खेर, परेश रावल यांनाही होतं. डॉ. श्रीराम लागू यांनी निळू फुले यांच्यासोबत पिंजरा आणि सामना करताना ही भीती असल्याचं स्पष्ट केलं होतं. निळू फुलेंच्या वाटेने जाणारे चंदू पारखी अशी ओळख पारखीसाठी मोलाची होती.

मशालमध्ये ट्रॅजेडी सीननंतर रस्त्यावर मेलेल्या सुधाचं (वहिदा रेहमान) मढं मांडीवर घेऊन (विनोद) दिलीप कुमार हताश बसलाय. सकाळी कमांडर जीपमधून उतरलेला विठ्ठलराव, निळू फुले आठवेल. दिलीप कुमारची हतबल वेदना निळू फुलेनं जीपमधून उतरताना चेहर्‍यावर पसरलेल्या रेषांमधून स्पष्ट केली होती. केशवराव आज तुम्हारे हात में जो गोल्डन घडी है वो भी विनोद कुमारकी वजह से है…फितूर होऊन वरधानला (अमरिश पुरी) जाऊन मिळालेल्या मोहन आगाशेला दम भरणारा मशालमधला विठ्ठलराव आठवावा.

सौ दिन सास केमध्ये लाला खूबचंद हा कमालखाष्ट सासू ललिता पवारचा टोपी धोतरातला पाताळयंत्री जावई निळू फुलेनंच साकारावा. आशा पारेख या सहनशील सुनेला कायमचं संपवण्यासाठी पालीचं विष देण्याचा कट करणं इतर कुठल्याही खलनायकानं केलेलं नाही. निळू फुलेंनी मराठी आणि हिंदी पडद्यावर लबाडी, सावकारी माज, लोचट हलकटपणा, कट कारस्थान, गरिबी, हताश हतबलता असलं सगळंच जे काही पडद्यावर केलेलं आहे तो केवळ मेथडीक अभिनय नाही. निळू फुले जाणिवा, संवेदना त्याही कित्येक पलीकडचं नाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -