विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन, इतरांना विराट शुभेच्छा!

आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सांगता झाली ती यजमान गुजरात टायटन्सच्या विजेतेपदाने. कमालीच्या एकतर्फी लढतीत माजी (पहिल्यावहिल्या ) विजेत्या राजस्थान रॉयल्सवर तब्बल ७ विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय मिळवून गुजरातने पदार्पणातच जेतेपद पटकावण्याची किमया केली. विजेत्या गुजरातचं हार्दिक अभिनंदन आणि इतरांना विराट शुभेच्छा! दोन महिने रखरखीत उन्हाळ्यात खेळल्या गेलेल्या यंदाच्या आयपीएलमधील ७४ सामन्यात २४३९५ धावा फटकावल्या गेल्या, त्या चौकार (२०१७) आणि षटकारांच्या (१०६२)आतषबाजीने! आठ शतकं (त्यापैकी ४ तर एकट्या जोस बटलरचीच ) आणि ११८ अर्धशतकं तडकावली गेली आणि ९११ विकेटस पडल्या, असा हा यंदाच्या निर्धोकपणे पार पडलेल्या आयपीएलचा संख्यात्मक लेखाजोखा.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याची छाप केवळ अंतिम सामन्यातच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेवरच पडली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. गॅरी कस्टर्न आशिष नेहरा ही प्रशिक्षक मार्गदर्शक जोडगोळी, हार्दिकचं कुशल नेतृत्व, रशीद खानच्या फिरकीची कमाल, दक्षिण आफ्रिकन मिलरची तोडफोड फलंदाजी तसेच सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना त्याने पकडलेले अफलातून अप्रतिम झेल हे सारे गुजरातच्या यशस्वी पदार्पणाच्या मोसमातील महत्वाचे घटक. राजस्थान रॉयल्सने १४ वर्षानंतर आयपीएलची अंतिम फेरी गाठली, त्यामुळे सर्वांना प्रकर्षाने शेन वॉर्नची आठवण झाली.

यंदाची आयपीएल सुरू होण्याआधी वॉर्नचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सार्‍या क्रिकेटजगताला धक्का बसला होता, यंदा आयपीएल जिंकून वॉर्नला आदरांजली वाहायची असा संजू सॅमसन आणि त्याचे राजस्थान संघातील सहकारी यांचा संकल्प होता त्यांनी यंदाच्या मोसमात आपला खेळ उंचावत अंतिम फेरी गाठताना बहारदार खेळ केला, पण जेतेपदाने त्यांना हुलकावणीच दिली. सलामीवीर जोस बटलरने तडाखेबंद फलंदाजी करून ८६३ धावा केल्या त्या ४५ षटकारानिशी कोहलीच्या ६ वर्षांपूर्वीच्या एका मोसमात ४ शतके फटकावण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी करताना एका मोसमात सर्वाधिक ९७३ धावा काढणार्‍या कोहलीपाठोपाठ त्याने दुसरा क्रमांक मिळवला! कोहलीला मात्र यंदा सूर गवसलाच नाही!

यजुरवेंद्र चहलने यंदा सर्वाधिक २७ मोहरे टिपले आणि पर्पल कॅप पटकावली, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे साखळी स्पर्धेत २६ विकेट काढणार्‍या चहलला प्लेऑफच्या तीन सामन्यात केवळ एकच विकेट मिळाली ती गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याची! साखळीत कमालीची प्रभावी कामगिरी करणारा चहलसारखा अनुभवी फिरकीपटू स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात फारसे यश मिळवू शकला नाही. कर्णधार संजू सॅमसनने यष्टीरक्षणाची चुणूक दाखवताना १६ बळी (१४ झेल आणि २ यष्टीचीत) केले. फलंदाज म्हूणनदेखील संजूने छाप पाडलीच.

गुजरातप्रमाणेच यंदा लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये पदार्पणातच छाप पाडली. कर्णधार लोकेश राहुलच्या सातत्यपूर्ण खेळामुळे त्यांनी स्पर्धेत आगेकूच केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने दोन शतकं करताना ६१६ धावा फटकावल्या, पण अंतिम फेरी काही त्यांना गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या डीकॉकने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना बर्‍यापैकी बॅट चालवली. कोलकाताविरुद्ध त्याने नाबाद १४० धावांची धुँवाधार खेळी केली. दीपक हुडानेदेखील वेळप्रसंगी बॅट चालवत धावा केल्या. मोहसीन खानसारखा उदयोन्मुख तेज गोलंदाज त्यांना लाभलाय, अवेश खानकडूनही अपेक्षा आहेत. श्रीलंकेच्या चमीराने ब्रेकथ्रू मिळवून देताना छाप पाडली.

विराट कोहलीकडून रॉयल चलेंजर्स बंगलोरचं नेतृत्व सोपवण्यात आलं ते फॅफ डूप्लेसीकडे आणि सुदैवाने बंगलोरने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला तो अखेरच्या साखळी लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला हरवल्यामुळे! रिषभ पंतला सूर गवसला नाही आणि त्याचा फाटका दिल्लीला बसला. त्यांचा पराभव बंगलोरच्या पथ्यावर पडला. विराट कोहलीला संघर्ष करावा लागला तीन भोपळे त्याच्या पदरात पडले, पण बंगलोरची बाजू सावरली ती ग्लेन मॅक्सवेल आणि फिनिशरची भूमिका चोखपणे पार पाडणार्‍या ३६ वर्षीय छोट्या चणीच्या दिनेश कार्तिकने. मधल्या फळीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत दिनेश कार्तिकने बेडरपणे फलंदाजी करत १८० चेंडूत ३३० धावा तडकावल्या त्या १८३ च्या स्ट्राइक रेटने! त्याच्या या कामगिरीची दखल चेतन शर्मा यांच्या राष्टी्रय निवड समितीने घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली असून अशीच कामगिरी करत राहिला तर दिनेश कार्तिक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी -२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात त्याची वर्णी लागू शकेल!

महंमद सिराज, हेझलवूड, हर्षल पटेल तसेच श्रीलंकन स्पिनर हसरंगा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे बंगलोरने प्रतिस्पर्धी संघांना झटपट गुंडाळून किंवा कमीत कमी धावसंख्येवर रोखून विजय मिळवले. माजी विजेते मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायटर्स यांनी मात्र पुरती निराशा केली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (मुंबई इंडियन्स ) साफ निराशा केली. ना नेतृत्वात त्याची चमक दिसली ना फलंदाजीत त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या, शतक दूरच राहिलं. १४ सामन्यात अर्धशतकानेही त्याला हुलकावणी दिली! तेज गोलंदाजापुढं त्याने शरणागती पत्करली तसेच फिरकीच्या जाळ्यातही रोहित अडकला… यंदा आयपीएलमध्ये रोहित तसेच विराट यांच्या बॅटनी संपच पुकारला होता.

चेन्नईची पण यंदा कामगिरी अगदी ढिसाळ झाली. स्पर्धेला सुरूवात होण्याआधी त्यांनी कर्णधार बदलला. रवी जडेजाला कर्णधारपदी बढती दिली, पण कामगिरी ढासळत गेली.. दीपक चहरसारखा हुकमी एक्का त्यांनी स्पर्धा सुरू होण्याआधीच गमावला तो दुखापतीमुळे. मुख्य अस्त्रच निकामी झाल्यामुळे त्यांना धक्का बसला. गतमोसमात धावांच्या राशी उभारणार्‍या ऋतूराज गायकवाडवर बॅट रुसली. अगदी अखेरीस त्याने धावा केल्या, पण तेव्हा फारच उशीर झाला होता. विजेत्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार ही बाब स्पष्ट झाली होती. दुखापतग्रस्त जडेजाने कर्णधारपद सोडल्यावर पुन्हा धोनीचीच कर्णधारपदी निवड करण्यात आली, पण परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.

यंदाच्या आयपीएलची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे नव्या तेज गोलंदाजांचा उदय. उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद), अर्शदीपसिंग (पंजाब किंग्ज) यांनी चांगली गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतानाच भारतीय चमूत जागा पटकावली. उमरान दीडशेच्या वेगाने गोलंदाजी करतो. गुजरातचा निम्मा संघ २५ धावात गारद करण्याची किमया त्याने केली. पंजाबी युवक अर्शदीप उमरानप्रमाणे वेगवान नसला तरीदेखील डावाच्या अखेरीच्या हाणामारीच्या १६-२० षटकादरम्यान अचूक आणि चेंडू खोलवर टप्पा टाकून फलंदाजाना जखडून ठेवतो. त्यामुळे फटकेबाजी दूरच राहून फलंदाज विकेट जाणार नाही, याची दक्षता घेतात! फलंदाजाना गुंगारा देत आपल्या जाळ्यात अडकवण्याची कला तो अवगत करतोय.

आणखी एक जमेची बाजू म्हणजे मोहसिन खान (लखनौ), मुकेश चौधरी (चेन्नई), यश दयाल (गुजरात ) या डावखुर्‍या तेज गोलंदाजांनी सातत्याने चांगली गोलंदाजी करून आपला अर्ज निवड समितीला पेश केला आहे. टी -२० वर्ल्ड कप स्पर्धा ५ महिन्यांवर आली असताना निवड समितीसमोर बरेच पर्याय उपलब्ध आहेत ही उत्साहवर्धक घटना! भारताचा तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये १५.२५ कोटीची सर्वात मोठी बोली लागलेला मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनला मुकेशने रोहित शर्मासहित एकाच षटकात बाद करून मुंबई इंडियन्सला दणका दिला. त्यानंतर त्याने डेव्हिड ब्रेवीसलादेखील डगआऊटमध्ये पाठवलं. १९ धावात ३ मोहोरे टिपल्यामुळे त्याच्याबाबत कुतूहल निर्माण झालं. राजस्थानचा कुलदीप सेनने आयपीएल पदार्पणातच लखनौ संघाला विजयापासून रोखण्याची किमया केली.

अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी १६ धावा हव्या असताना कुलदीप सेनने स्टॉईनससारख्या अनुभवी फालंदाजाला रोखलं. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा धरता येईल. कार्तिक त्यागी, कमलेश नागरकोटी यांच्या कामगिरीवर निवड समिती सदस्य लक्ष ठेवून असतील.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या वेग महत्वाचा ठरत असल्याची प्रचिती आपल्याला परदेशी दौर्‍यात आली. ऑस्ट्रेलियात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवून बोर्डर-गावस्कर करंडक पटकवला तो महंमद सिराज, शार्दूल ठाकूर यांच्या भेदक आक्रमणामुळे. इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत भुमरा, महमद शमी असा तेज गोलंदाजाचा ताफा आपल्याकडे असताना इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये आपण कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून बर्मिंगहॅम, एजबॅस्टन येथे १ जुलैपासून होणार्‍या पाचव्या आणि निर्णायक कसोटीकडे भारतीय क्रिकेटशौकीनांचे लक्ष लागले आहे. तूर्तास आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सचं हार्दिक अभिनंदन करताना इतरांनादेखील विराट शुभेच्छा देऊया.