पैल तो गे काऊ कोकताहे

‘आतला आवाज’ ही नक्की काय भानगड आहे याचा विचार करताना मनात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक गोष्ट काही आपण मापून जोखून पाहिली नसते. ती जशी समोर येते तसा आपला त्याबद्दलचा विचार आणि त्याबद्दलचे ठोकताळे आपण मांडत जातो. जगातल्या अनेक संकल्पना अशाच प्रकारे मांडल्या गेल्या आहेत. अनेक प्रयोग, अनेक सिद्धता तशाच मांडल्या गेल्या आहेत. मानवी स्वभावाच्या बाबतीत तरी त्या वेगळ्या कशा ठरतील?. कावळा हा पक्षी मानवाच्या भावजीवनाशी अधिक जवळीक साधणारा आहे, ती जवळीक संत ज्ञानेश्वरांनाही जाणवली असावी. म्हणूनच ते आपल्या एका रचनेत पैल तो गे काऊ कोकताहे, असे म्हणतात.

सकाळच्या वेळी आई किचनमध्ये जेवण बनवत असताना तिथल्या खिडकीच्या बाहेर कोण कावळा नेहमी येतो आणि काव काव करत बसतो. किचनमध्ये शिजत असलेल्या अन्नाचा एखादा तुकडा त्याच्या दिशेने टाकला की, तेवढा तुकडा घेऊन कावळा उडून जातो. कधीतरी कावळा तो तुकडा तोंडात न घेता निघून जातो, तेव्हा आई मनात हळहळते. तिला हा कावळा कोणीतरी पूर्वज तिच्या हातचा घास खायला आला असं वाटतं. कावळ्याचा आणि आपला हा ऋणानुबंध माझ्या कधीच लक्षात आला नाही, पण आईने मात्र त्याला शुभशकून केव्हाच मानले होते. दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आजुबाजूला घडत असतात, पण सगळ्याच गोष्टींकडे ह्या अर्थाने आपण दुर्लक्ष करत असतो. आपल्या जगण्यात एवढ्या गोष्टी दिवसेंदिवस घडत असतात, पण प्रत्येक गोष्टीचा असा शकून-अपशकुनाशी कसा संबंध लावता येईल. कुठेतरी पलीकडे कावळा काव काव करतो तेव्हा कोणी पाहुणा येणार असा संकेत मानण्याची आपली नेहमीची पद्धत. त्याचप्रमाणे ती कित्येक वर्षे आजही चालू आहे. ह्या गोष्टीचा शकुनाशी कसा संबंध असू शकतो?

सकाळी कॉलेजला निघताना कधी वेळेवर बस किवा गाडी मिळाली नाही तर पहिल्यांदा तोंडातून आज दिवस काही नीट जाणार नाही याची आपण मनोमन कल्पना करतो. हे नक्की काय असते?. माणूस दिवसभरात जसा वागतो ते कशाचे प्रतिबिंब असते?. एखाद्या प्रसंगी आपण जेवढा सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करतो त्याचेच प्रतिबिंब एखाद्या दिवशी घडणार्‍या गोष्टीत होत असते. मला चांगले आठवते चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर आमची मॅच चालू होती. विद्यापीठ स्थरावरची क्रिकेटची मॅच. दोन्ही बाजूचे म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि सयाजीराव गायकवाड विद्यापीठ यांच्यातील खेळाडू पुढच्या स्थरावर खेळण्यासाठी उत्सुक होते, त्यामुळे दोन्ही संघात सकाळपासून गरमा गरमीचे वातावरण होते. शाब्दिक चकमकी तर भरपूर झाल्या.

पहिल्या दिवशी आमच्या संघाने फलंदाजी केली. दुसर्‍या दिवशी सकाळी आमचा डाव संपला आणि विरुध्द संघाशी फलंदाजी सुरु झाली. दह-बारा षटकांचा खेळ झाला. नील दफ्तरी आमचा यष्टीरक्षक होता. पहिल्या स्लीपमध्ये आनंद कर्णिक होता, दुसर्‍या स्लीपमध्ये मी उभा होतो. निखील जाधव आमचा कर्णधार होता. दोन षटकांच्या मधल्यावेळेत मला काय झालं ठाऊक नाही, पण एका बाजूने दुसर्‍या बाजूला जात असताना आता कन्नन चेंडू टाकेल त्यांचा फलंदाज तो तडकवेल आणि मी तो चेंडू झेलणार असा विचार करत होतो. ह्या बाबतीत माझा माझ्या आतल्या आवाजावर नको तेवढा विश्वास आहे. कदाचित तो फाजील आत्मविश्वास असतो. पण खूप वेळा माझा आतला आवाज ह्या बाबतीत खरा ठरतो.

मी लगेच निखिलला विनंती केली, मला स्लीपमधून हलव आणि गल्लीत ठेव. निखील माझ्याकडे बघून वैभ्या, पहिला स्लेप होऊ दे मग तिकडे जा, तरी मी मात्र नको आताच तिकडे जातो बघ मी कॅच ऑफ मॅच काढतो. निखील ऐकला. मी गल्लीत गेलो. तीन चेंडू गेले आणि श्रीरामने चेंडू टाकण्यासाठी धाव घेतली. चेंडू हाल्फ पीच आपटला. फलंदाजाने जोरदार टोलवला. माझ्यापासून जवळपास मीटर लांब झेल आला, मी डाव्याबाजूला झेपावत उडी मारली आणि झेल घेतला. अगदी मघाशी विचार करताना घडली तशीच ही घटना. चेंडूवर झेपावताना शरीर दुखावलं म्हणून मी आत तंबूत आलो आणि विचार करत होतो असं होऊ शकतं का?. माझ्या बाबतीत हे झालं होतो. आपली विचारशक्ती एवढी प्रभावी असू शकते. इतरांच्या बाबतीत माहीत नाही, पण माझा स्वभाव खूप विचार करणारा आहे, एखादी गोष्ट मी चार बाजूने विचार करून बघतो, पण एखादी बाजू जास्त तोलून धरतो. कधीतरी आतला आवाज ह्या गुणावर भारी होतो, तेव्हा निर्णय प्रक्रिया खूप सोपी होऊन जाते. एखादा निर्णय तडकाफडकी घेतल्यावर त्यात यश मिळालं की आपण जगावेगळी अशी कोणती गोष्ट केली? हा विचार येतो तेव्हा शकून-अपशकून याच्यापलीकडे आतला आवाज आपण ऐकला याची जाणीव होते.

‘आतला आवाज’ ही नक्की काय भानगड आहे याचा विचार करताना मनात अनेक गोष्टी येतात. प्रत्येक गोष्ट काही आपण मापून जोखून पाहिली नसते. ती जशी समोर येते तसा आपला त्याबद्दलचा विचार आणि त्याबद्दलचे ठोकताळे आपण मांडत जातो. जगातल्या अनेक संकल्पना अशाच प्रकारे मांडल्या गेल्या आहेत. अनेक प्रयोग, अनेक सिद्धता तशाच मांडल्या गेल्या आहेत. मानवी स्वभावाच्या बाबतीत तरी त्या वेगळ्या कशा ठरतील?. गावी लहानपणापासून पावसाळ्याच्या सुरुवातीला गरमीने उच्चांक गाठला की थोरली काकी म्हणायची पावस येतलो हा आता….गरम्यान जीव जाता हा माणसाचो. निसर्गात घडणारे हे नेहमीचे बदल, पण शकुनाच्या किती जवळ जायचे. घरात बेडकी दिसली किंवा पिंगानी दिव्यावर दिसली तरी पावसाची चाहूल लागायची. इतके नैसर्गिक बदल तुम्हाला होणार्‍या घटना अधोरेखित करत असतात.

माणसाला आपल्या मृत्यूची जाणीव होत असते. त्या अपशकुनाची त्याला जाणीव झालेली असते. आबा आजोबा त्यांच्या शेवटच्या आजारपणात हॉस्पिटलमध्ये होते. ज्यादिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यादिवशी सकाळी ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना हॉस्पिटलमधून घरी यायचे वेध लागले होते. जे होईल ते माझ्या मठीत होऊ दे, अशाच अर्थाचे काही बोलत होते. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यादिवशी त्यांच्या आजूबाजुला असणार्‍या तरूण मुलांनादेखील ते आवरत नव्हते. त्यांना अंतकाळ जवळ आलाय याची सूक्ष्म जाणीव बहुतेक झाली होती. त्यांना घरी आणलं. घरातल्या सदरेत त्यांचा तोळामोळा झालेला जीव ठेवला आणि आबाआजोबांनी प्राण सोडला. आजोबांना त्यांचा अंतकाळ निदान दिसला तरी. भास्करकाका, नंदाकाकी ही माणसं तर चालता बोलता गेली. त्यांना पुढच्या अशुभाची जाणीव झाली तरी असेल का? त्यांना कुठल्या आतल्या आवाजाने पुढच्या गोष्टी सांगितल्या असतील तरी माणूस आपल्या आयुष्याचे ठोकताळे असे मांडत असतो. क्षणोक्षणी घडत असणार्‍या घटनांना आतल्या आवाजात कसे बांधता येईल.

स्वप्नात पाऊस, नदी, समुद्र दिसणे हे शुभसंकेत समजतात, पण प्रत्यक्षात हा पाऊस शुभसंकेत असतोच असे नाही. स्वप्नात घडणार्‍या घटनांचा प्रत्यक्षात काही संबंध असतो. स्वप्न ही माणसाच्या कल्पनेचा झालेला विस्तारच असतो ना !. चार वर्षापूर्वी मी नव्याने घेतलेल्या रूममुळे मला मनस्ताप सहन करण्याची पाळी आली. रूमसाठी हाउसिंग लोन मिळण्यासाठी तब्बल सात महिने लागले. माझा रूमचा ऐजंट मला म्हणाला, साटम साहेब, ही वास्तू काय तुम्हाला लाभत नाही. मूळ मालकाचे फोनवर फोन येऊ लागले, इथून तिथे फाईल फिरत राहिली, पण काही कळेना, लोनचे काम काही होईना. सात महिने रखडल्यावर लोनचे काम झाले. मूळ मालकाने लोन मिळवण्यासाठी उशीर झाला म्हणून जास्तीची रक्कम मागितली. ती रक्कम दिल्यावर रजिस्ट्रेशन करतो म्हणून सांगितले. शेवटी वर्षभराने रजिस्ट्रेशन झालं. त्यात पुन्हा एक कायदेशीर बाब निर्माण झाली. ऐजंट म्हणत होता तसेच झाले. शेवटी वैतागून मी ती रूम विकायचा निर्णय घेतला. रूम विकल्यावर बँकेचे लोन देऊन जी रक्कम बाकी रहाणार होती त्यातून सात आठ लाख कुठेतरी खर्ची पडणार असं का कोणास ठाऊक पण मला सतत वाटायचे.

श्रद्धालादेखील मी असं का म्हणतो याची कल्पना येत नव्हती. कुठल्यातरी अशुभाची नांदी लागत होती. त्याच वर्षी मी आजारी पडलो. पहिला तर दुर्धर आजार. बरा होऊन हिंडू फिरू लागेन की नाही अशी अवस्था. डॉक्टरांनी सगळे उपाय केले. कोणाच्या हाताला यश आलं. तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाने पुन्हा हिंडू फिरू लागलो. खोलीतल्या रकमेतील सात-आठ लाखांचा हिशोब तिथे बरोबर झाला. ह्या अशुभाची जाणीव केव्हातरी आतल्या आवाजाने करून दिली होती. त्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाणीव आपल्या मनात कोरली जात असते. शकुनाची कल्पना निसर्गातील प्राणी, पक्षी, कृमी-कीटक कोणतरी देत असतेच म्हणून ज्ञानेश्वरांना कावळ्याचे काव काव करणे हेदेखील शुभशकून वाटत असावे.