फलज्योतिषाची बोलती बंद

ज्योतिषीबुवांच्या घराच्या दारातून पती आत येताना तिला दिसला. महिलेचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काय बोलावे, हेही तिला सुचेना. तरी ज्योतिषांकडे पाहून ती म्हणाली, ‘गुरुजी हे माझे पती आहेत. तुम्ही तर म्हणालात की, ते आज रात्री उशिरापर्यंत येतील. ते तर आताच आपल्यासमोर हजर आहेत. असं कसं काय घडलं? यावर काय बोलावं हे ज्योतिषीबुवांना अजिबात उमजेना. त्यांची तर बोबडीच वळली. त्यांची बोलतीच एकदम बंद झाली. आता त्यांची नजर जुन्या ग्रंथाच्या पानावरही ठरेना आणि वहीच्या पानावर त्यांनीच मांडलेल्या प्रश्नकुंडलीवरही स्थिर होईना !! महिलेच्या नजरेला नजर तर ते भिडवूच शकत नव्हते. महिला संतापाने बोलू शकत नव्हती. कारण, तिची अस्वस्थता आणि अगतिकता तिला ज्योतिषीबुवांकडे घेऊन आली होती.

मागील दोन वर्षांत, कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगालाच कवेत ओढले आहे. आता कुठे परिस्थिती थोडीशी सैल होते आहे. पण हे जीवघेणे संकट पूर्णपणे टळले आहे, असे अजूनही कुणीच खात्रीने म्हणू शकणार नाही.

या काळात जवळजवळ प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला तरी कोरोनाने बाधित केले होते. बाधित व्यक्तीच्या उपचारासाठी त्या त्या कुटुंबाला प्रचंड खर्च करावा लागला. तरीही अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले. या काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. रोजगार बुडाला. त्यामुळे अनेक कुटुबियांची उपासमार झाली. प्रचंड गैरसोय, पराकोटीच्या हालअपेष्टा झाल्या. प्रचंड आर्थिक चिंतेने अनेकांना ग्रासले. कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू पाहून, अनेकांना मानसिक भीतीने घेरले. त्यामुळे संपूर्ण जनजीवनच अस्वस्थ झाले होते. मेटाकुटीला आले होते. अशा मोठ्या जीवघेण्या संकटात उपचारा सोबतच लोकांना किमान जगण्याची हमी देणारे आर्थिक आणि मानसिक बळ मिळणे अत्यंत आवश्यक होते.

पण ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध झाल्या नाहीत आणि कमी वेळेत त्या सर्व सुविधा उपलब्ध करणे, तसे कुणालाही अवघडच होते. कारण ह्या रोगाची व्याप्ती आणि एका अर्थाने दहशत जबरदस्त होती. या सर्व परिस्थितीतून निर्माण झालेली वैयक्तिक आणि सामूहिक निराशा आणि वैफल्य यांचा एकूणच दुष्परिणाम समाजाच्या स्वास्थ्यावर अजूनही पुढे काही काळ तरी टिकून राहील, असे दिसते आहे. मागील काही महिन्यांपूर्वी प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. अगोदरच आर्थिक, मानसिक विवंचनेत असलेल्या समाजाला या संकटाने आणखी जबरदस्त तडाखा दिला. अशा सर्व संकटातून सावरण्यासाठी समाज आज आटोकाट प्रयत्न करतो आहे. ही माणसाच्या मनातील जगण्याबाबतची, जीवनाबाबतची दुर्दम्य आशा आणि इच्छाशक्ती आहे, असेच म्हणता येईल.

असे संकट पुन्हा कुणावरही यायला नको, असेच संपूर्ण मनुष्यप्राण्याला वाटते आहे. यासाठी काय करायला हवे? असा प्रश्न यानिमित्ताने प्रत्येकाला पडतो आणि काही वेळ तरी तो छळतो. याचे झटपट, ठोस असे उत्तर आजतरी कुणाकडेही नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा बिकट जीवघेण्या संकटावर, भविष्यात मात करण्यासाठी निसर्गाशी साधर्म्य साधणारी समाजव्यवस्था टप्प्याटप्प्याने का होईना, तयार करून, विकसित करावी लागेल. भविष्यात अशा अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारावर आधुनिक उपचारांच्या सोयीसुविधा मुबलक प्रमाणात ठिकठिकाणी उपलब्ध करण्याबरोबरच, निरामय आरोग्याबद्दल जनसामान्यात सजगता निर्माण करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात जनजागरण करावे लागणार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाला डावलून, विशेष गरजेची तसेच तातडीची नसलेली अनेक कामे मोठ्या प्रमाणावर आजही चालू आहेत. ती पूर्ण करण्यासाठी केली जाणारी राष्ट्रीय साधनसंपत्तीची उधळपट्टी आता परवडणारी नाही. अन्यथा याची देशातील, समाजातील गरीब आणि सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांनाच अधिक झळ बसण्याची दाट शक्यता आहे.

संकटात योग्य मार्गदर्शन करणारे, मदतीचा हात पुढे करणारे, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने जवळ घेणारे अशी फार कमी माणसं समाजात असतात. शिवाय ती प्रत्येक संकटकाळी वेळेत उपलब्ध होतीलच, त्यांचा सहवास लाभेलच अशीही शक्यता कमीच असते. कोरोनासारख्या अचानक उद्भवलेल्या संकटात बिकट समस्या, चिंता, भीती अधिकच वाढत जातात. अशा वेळी सामान्य माणूस कोलमडून पडतो. सुरक्षिततेच्या भावनेतून तो या सर्वांवर मात करण्यासाठी परंपरेने चालत आलेल्या अवैज्ञानिक, दैवी उपाय, उपचार, तोडगे करण्याच्या पाठीमागे धावतो. कारण त्याच्या मनात अगतिकतेची आणि असुरक्षिततेची भावना ठाण मांडून बसलेली असते. याचेच उदाहरण म्हणून मागील काही दिवसांपूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेला हा प्रसंग !!!

एका शहरात एका लहानशा कंपनीत मागील वीस-बावीस वर्षांपासून नोकरीत असलेल्या एका कुशल कारागीर माणसाला कोरोनाच्या संकटामुळे घरी बसण्याची वेळ आली. घरामध्ये त्याच्यासह आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे एकूण पाच जण होते. मधून मधून येणारे आईचे आजारपण, मुलांची शिक्षणं आणि कुटुंबाच्या महिन्याभराचा खर्च, यातून काटकसर करून, दरमहा थोडी बचत व्हायची. ती करावीच लागायची. कारण भविष्यात कुटुंबात कोणतेही संकट येऊ शकते. कुटुंबात कुणालाही अपघात घडू शकतो. मुलांच्या शिक्षणासाठी जास्त खर्च लागू शकतो. शिवाय पुढील पाच सहा वर्षांत मुलीचे लग्न परंपरेनुसार आणि जवळच्या नातेवाईकांच्या हट्टापायी ते म्हणतील तसं, करावे लागणार होते. या सर्व विवंचनेतून कुटुंबाचा गाडा हळूहळू पुढे जात होता. परंतु कोरोनामुळे कंपनी अचानक बंद पडली. मालकाने घरी बसून सर्व कामगारांना एका महिनाभराचा पगार कसाबसा दिला. पण पुढे मात्र हात वर केले.

आठ-दहा महिने कसेतरी बचत केलेल्या पैशावर त्या कुटुंबाने खर्च भागवला. आता पुढे काय, असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला. कंपनीला परवडत नाही म्हणून कंपनी मालकाने कंपनी सुरू करायला सपशेल नकार दिला. सदर कुटुंबातील पती-पत्नीच्या पुढे, मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. जगण्याचे दुसरे काहीच साधन नव्हते. बाहेर सर्वच बंद असल्याने, घराबाहेर पडता येत नव्हते. इतर नोकरी, व्यवसायाचा काही अनुभव नव्हता. यापूर्वी कंपनी नियमित चालू असल्याने, इतर पर्यायांचा तसा फारसा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली नव्हती. पण आता पर्यायच खुंटला. काहीतरी हालचाल करावीच लागणार होती. कंपनीमध्ये अतिशय कौशल्यपूर्ण काम करणारा हा मनुष्य, आज आर्थिक आणि मानसिक चिंतेने ढासळला होता. अशाच प्रकारचे काम दुसर्‍या शहरात मिळते का, म्हणून शोध घेण्याचे दोघा पती-पत्नीने ठरवले.

एका मोठ्या शहरात अशीच कंपनी आता सुरू झाल्याचे त्याला कळाले. कुटुंब प्रमुखाने पत्नीशी सल्लामसलत करून तेथे नोकरीचा शोध घेण्यासाठी जाण्याचे ठरवले. एका भल्या सकाळी ते गृहस्थ त्या मोठ्या शहराकडे जाण्यास निघाले. सहा तासांचा लांबचा प्रवास करून, चौकशी करून, पुन्हा रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचू, असा विचार करून ते सकाळी सकाळी बसमध्ये बसले. दुपारनंतर ते कंपनी असलेल्या मोठ्या शहरात पोचले. कंपनीजवळ सुखरूप पोहचल्याचे त्याने घरी कळवले. कंपनीत प्रवेश केल्यानंतर, कंपनी मालकाने त्याला काम जमते की नाही, हे पाहण्यासाठी लगेच मशीनवर काम करण्यास पाचारण केले. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचेही नियमित कामगार मोठ्या संख्येने अनुपस्थित होते.

हे गृहस्थ कौशल्यपूर्ण कामगार असल्याचे मालकाच्या लगेच लक्षात आले त्यांनी सदर कामगाराला त्या दिवसाच्या रात्री उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले. कामगार मन लावून रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत काम करीत राहिला. आता घरी सर्व झोपले असतील, म्हणून संपर्क करण्याचे त्यांनी टाळले. सकाळी लवकर उठून त्याने मालकाची भेट घेतली. मालकाने त्याला, ‘नोकरीसाठी तुम्ही रूजू होऊ शकता,’ म्हणून सांगितले. मात्र, ‘मी घरी जाऊन येतो, आणि मग कामावर रुजू होतो,’ असे सांगून कामगार घाईघाईने आपल्या गावी निघाला. मात्र या ना त्या कारणाने घरी संपर्क करण्याचे तो विसरला. शिवाय घाई गडबडीत परतीच्या प्रवासात बसमध्ये बसल्यावर, मोबाईल कंपनीतच राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. कुणातरी सहप्रवाशी व्यक्तीकडून फोन घेऊन, घरी कळवावे असे ही त्याला क्षणभर वाटले. परंतु आणखी काही तासातच घरी पोहोचणारच आहोत, असा विचार करून तो शांतपणे नव्या नोकरीबाबत विचार करण्यात गढून गेला.

इकडे आई, पत्नी, मुलं हे सर्वजण काळजीत पडले होते. काल गेलेला माणूस, रात्रभर आला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात चिंतेने घर केले. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंतसुद्धा त्यांचा काही ठावठिकाणा लागेना, म्हणून आई आणि पत्नी दोघीही अतिशय अस्वस्थ झाल्या. शेवटी, काय अडचण आहे, काही संकट तर आले नसावे, परगावी नोकरीचे काम झाले की नाही अशा विविध शंका-कुशंकानी, प्रश्नांनी त्यांना घेरले. दोघींचे कशातच लक्ष लागेना. नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी फलज्योतिषाचा सल्ला घ्यावा, असा परंपरेने चालत आलेला विचार आईच्या मनात आला. यासाठी परिसरात नावाजलेल्या फलज्योतिषाकडे जावे, असे कुटुंब प्रमुखाच्या आईने त्याच्या पत्नीला सुचवले. बिचारी पत्नीही चिंतेतच होती. ‘चला, हेही करून बघूया,’ असा विचार करून ती परिसरात जवळच राहणार्‍या फलज्योतिषाच्या घरी पोहोचली. सकाळपासून लोकांचे भविष्य कथन करून ज्योतिषीबुवा नुकतेच दुपारच्या भोजनाला बसले होते. त्यांनी या महिलेस थांबण्यास सांगितले. शांतपणे जेवण झाल्यावर ज्योतिषीबुवांनी महिलेला येण्याचे कारण विचारले. महिलेने सर्व हकीकत त्यांना सांगितली. पती कधी घरी येईल आणि नोकरीचे काय झाले हे मुख्य प्रश्न महिलेने फलज्योतिषांना विचारले.

ज्योतिषीबुवांच्या घरात एका लहानशा चौरंगावर काही देवदेवतांच्या तसबिरी, जुनेपुराणे ग्रंथ, पूजेचे साहित्य, एक कलश असे काही साहित्य ठेवलेले होते. त्याच्या बाजूला ज्योतिषीबुवांचे आसन होते. त्यावर ते आसनस्थ झाले. त्यांच्या समोर बसलेल्या महिलेला त्यांनी सगळ्या तसबिरींना नमस्कार करण्यास सांगितले. महिलेने नमस्कार करून पन्नास रुपयांची एक नोट व सुट्टा एक रुपया सोबत आणलाच होता तो असे एक्कावन्न रूपये चौरंगावरील देवतांच्या तसबिरींसमोर ठेवले. त्यानंतर ज्योतिषीबुवांनी वही, पेन घेतले. त्यांनी महिलेच्या पतीचे नाव विचारले, जन्म तारीख विचारली, महिलेला जन्मतारीख सांगता येईना, मग तिने अंदाजे वय सांगितले. ज्योतिषीबुवांनी, सदर गृहस्थाने कोणत्या वेळी प्रवास सुरू केला, ती वेळ विचारली. कोणत्या दिशेला तोंड करून प्रवासासाठी ते घरातून बाहेर पडले, तेही विचारले. जाताना ‘येतो’ म्हणाले की, ‘जातो ’म्हणाले , सोबत काय काय नेले, असं बरंच काहीबाही विचारलं. महिलेने जेवढे आठवत होते तेवढे सांगण्याचा प्रयत्न केला.

मग ज्योतिषीबुवांनी वहीच्या एका पानावर उभ्या-तिरक्या चौकटी आखल्या. प्रश्न कुंडली तयार केली. त्यानंतर चौरंगावरील एक जुना ग्रंथ चाळायला सुरुवात केली. आखलेल्या चौकटींमध्ये काही आकडे आणि अक्षरे लिहिली. घराच्या छताकडे ज्योतिषीबुवा पुन्हा पुन्हा पाहात आणि आकडेमोड केल्यासारखे करीत. महिलेला येऊन आता तास दीड तास होत आला होता. तिची चुळबूळ वाढली होती. ती अतिशय अस्वस्थ झाल्याचे दिसू लागले होते. मग ज्योतिषीबुवा तिला म्हणाले , ‘तुमचे पती अजूनही त्या शहरातच आहेत. रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचतील. प्रवासात ते मोठ्या संकटात सापडले होते, पण बालंबाल बचावले. आता ते सुखरूप आहेत. पण नोकरी मात्र त्यांना मिळालेली नाही.

हे सर्व त्यांच्या सध्याच्या प्रश्न कुंडलीवरून स्पष्ट दिसत आहे.’ हे सर्व ऐकल्यावर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची चिंता अधिकच वाढली. पण तेथे ती काही बोलू शकली नाही. तिने ज्योतिषीबुवांना नमस्कार केला आणि ती ज्योतिषीबुवांच्या घराबाहेर पडण्यासाठी वळली. आणि बघते तर काय ? तिचे पती ज्योतिषीबुवांच्या घराच्या दारातून आत येताना तिला दिसले. महिलेचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. काय बोलावे, हेही तिला सुचेना. तरी ज्योतिषांकडे पाहून ती म्हणाली, ‘गुरुजी हे माझे पती आहेत. तुम्ही तर म्हणालात की, ते आज रात्री उशिरापर्यंत येतील. ते तर आत्ताच आपल्या समोर हजर आहेत. असं कसं काय घडलं?

यावर काय बोलावं हे ज्योतिषीबुवांना अजिबात उमजेना. त्यांची तर बोबडीच वळली. त्यांची बोलतीच एकदम बंद झाली. आता त्यांची नजर जुन्या ग्रंथाच्या पानावरही ठरेना आणि वहीच्या पानावर, त्यांनीच मांडलेल्या प्रश्नकुंडलीवरही स्थिर होईना !!

महिलेच्या नजरेला नजर तर ते भिडवूच शकत नव्हते. महिला संतापाने बोलू शकत नव्हती. कारण, तिची अस्वस्थता आणि अगतिकता तिला ज्योतिषीबुवांकडे घेऊन आली होती. येथे काय घडले ते महिलेच्या पतीला काहीच माहीत नव्हते. नोकरी मिळाल्याची गोड बातमी पत्नीला केव्हा एकदा सांगेन, ह्या उत्साहात घरी पोहोचण्याची घाई पतीला काही सुचू देत नव्हती. म्हणून दोघे पतीपत्नी ज्योतिषीबुवांच्या घराच्या दरवाजातून बाहेर पडले. तर दरवाजाबाहेर आणखी दोन ओळखीचे गृहस्थ ज्योतिषीबुवांच्या घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांना दिसले. ते दोन गृहस्थ या पती-पत्नीच्या नात्यातीलच होते. म्हणून थोडे औपचारिक बोलणे करणे भागच होते.

‘इकडे कुणीकडे?’, असा प्रश्न महिलेने त्यांना विचारला. या प्रश्नाला त्यातील एका पुरुषाने उत्तर दिले की, त्या दोघांपैकी एकाच्या मुलीचे लग्न करायचे आहे. मुलाची आणि मुलीची पसंती झालेली आहे. दोघांचे स्वभाव एकमेकाला आवडलेले आहेत. शिवाय दोघेही कमावते आहेत. मात्र त्यांची कुंडली, लग्नपत्रिका जुळते की नाही, गुणमिलन होते की नाही, विवाहनंतर, पुढे त्यांच्या भविष्यात चांगले-वाईट काय घडणार आहे, हे समजून घेण्यासाठी ते ज्योतिषबुवांकडे आले आहेत. आणि समजा ज्योतिषीबुवांच्या सल्ल्यानुसार हे सर्व जमले तर ज्योतिषीबुवांकडून लगेच लग्नाचा मुहूर्तही काढून घेणार होते. हे सर्व ऐकून, त्या महिलेला हसावे की रडावे, हेच कळेना!

त्यांना ओरडून तिला सांगावेसे वाटत होते की, बाबांनो प्रवासाला गेलेला माझा नवरा ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार, आज रात्री उशिरा घरी परतणार होता. पण तो आत्ताच तुमच्या समोर उभा आहे. पुढील काही तासाचे भविष्य ज्याला सांगता येत नाही, तो, ह्या मुला-मुलींच्या आयुष्याचे भविष्य काय सांगणार? आणि कशाचा मुहूर्त सांगणार? त्याचा सल्ला घेऊन का फसताय? पण तिचा पती जास्त बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याला घरी पोहोचण्याची घाई झाली होती. म्हणून ते घाईघाईने घराकडे निघाले. ते दोन पुरुष बिचारे त्यांच्या मुला-मुलींचे भविष्य कथन करणार्‍या ज्योतिषाचा सल्ला घेण्यासाठी, ज्योतिषांच्या घराचा उंबरा ओलांडून आत शिरले.

इकडे पती-पत्नी त्यांच्या घरी पोहोचले. बिचारी आई त्या दोघांची वाट पाहत होती. तिचा चेहरा फुललेला होता. कारण, जेव्हा पत्नी फलज्योतिषाचा सल्ला विचारायला गेली होती, त्यानंतर काही वेळातच तिचा प्रवासाला गेलेला पती घरी परतला होता. त्याने आईला घडलेली सर्व हकीकत घरी आल्या आल्या सांगितली होती. ज्या नोकरीच्या शोधात तो परगावी गेला होता, तिथे त्याला यापेक्षा अधिक जास्त पगाराची नोकरी मिळाली होती. त्या कंपनीत तो एक दिवस कामही करून आला होता. हे ऐकून आईला खूप समाधान वाटले होते. त्यामुळे तिचा चेहरा फुलला होता. हे सांगत असताना पत्नी घरात नाही हे पाहून त्याने आईकडे पत्नीबाबत चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, मागील दोन दिवसात त्याच्या बाबतीत काय भूतभविष्य घडले, ते जाणून घेण्यासाठी त्याची पत्नी फलज्योतिषाकडे गेलेली आहे.

घरी परत निघताना, कंपनीतच मोबाईल विसरल्यामुळे आणि या ना त्या कारणाने घरी लवकर संपर्क करू न शकल्याने, कुटुंबात हा सर्व गोंधळ उडाला होता, हे त्याच्या लगेच लक्षात आले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच चिंतेत होते. ही चिंता दूर करण्यासाठी त्यांनी फलज्योतिषाचा आधार घेतल्याचे त्याला समजले. आईने सांगितले म्हणून नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी पत्नीला सांगण्यासाठी धावत पळत तो फलज्योतिषाच्या घरी पत्नीजवळ पोहोचला होता. मात्र तिथे फलज्योतिषाने पत्नीला पतीबाबत भलतेच भूतभविष्य सांगितले होते. हे मात्र त्याला लगेच तिथे कळाले नव्हते. फलज्योतिषांनी काय काय भविष्य कथन केले, काय काय ठोकताळे सांगितले ह्या सर्व गोष्टींची चर्चा माहिती महिलेने कुटुंबाला दिली. पतीनेही सांगितले की, त्याचा दोन्ही बाजूंचा प्रवास अगदी आरामात आणि सुखदायी झाला. कोणत्याही संकटाचा सामना त्याला करावा लागला नव्हता. उलट कोरोनामुळे प्रवासाठी मर्यादित प्रवाशी संख्येलाच परवानगी होती. त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि धोकाही नव्हता.

त्यावर फलज्योतिषांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीवर ते सर्वजण खळखळून हसले. कारण फलज्योतिषांनी ठासून सांगितलेल्या भविष्यकथनाचा भंपकपणा त्यांना कळून चुकला होता. शिवाय नोकरी मिळाल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी मोठा होता. म्हणून फलज्योतिषाने कथन केलेली भविष्यवाणी सर्वजण विसरून गेले. खरं तर, घडलेला हा प्रसंग अतिशय सामान्य होता. कोणत्याही कारणाने असे प्रसंग कोणच्याही आयुष्यात घडू शकतात. हे प्रथम आपल्या मनावर आपण बिंबविले पाहिजे. त्यातून स्वतःसह इतरांची फजिती, फरफट होणार नाही याची सदैव काळजी घेतली पाहिजे.

आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा आपली समस्या नेमकी काय आहे, ती कशामुळे उद्भवली, ती उद्भवण्याची मूळ कारणं कोणकोणती आहेत, ती शोधून त्यावर ठोस, वस्तुनिष्ठ उपाययोजना करण्याचे काय काय पर्याय असू शकतात आणि त्यापैकी आपल्याला कोणकोणते पर्याय जास्त सोयीस्कर ठरू शकतात, याचा चिकित्सक पद्धतीने, प्रत्येकाने शोध घ्यायला हवा. प्रत्येक वेळी असा विचार करण्याचा आणि कृतीशील होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. ती सवयच अंगी बाळगायला हवी. पण असा वस्तुनिष्ठ विचार करण्याचे आणि त्याची चिकित्सा करण्याचे कष्ट अनेक वेळा अनेकजण घेत नाहीत. तो आपला मानसिक कंटाळा असतो. कारण तो आपल्या मनाला कष्ट देऊन, समस्यांचा तळ गाठण्याचा अवघड प्रकार वाटतो.

खरं तर लहानपणीच्या संस्कारक्षम वयातच तो संस्कार कुटुंबाकडून आणि प्रचलित शिक्षण पद्धतीतून जाणिवपूर्वक बालकांवर होणे अपेक्षित असते. मात्र याला फाटा देऊन परंपरेच्या पगड्याखाली वावरत असलेला आपला समाज अनेक वेळा अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी, अजूनही मोठ्या प्रमाणात अवैज्ञानिक पद्धतीने, दैववादीपणातून उपाय, उपचार, तोडगे करून घेण्यासाठी धावाधाव करताना दिसतो. त्यातून अधिकच फसगत होते. उलट नवीन, बिकट समस्या निर्माण होतात. कधी कधी ती जीवावरही बेतू शकते. म्हणून कोणतेही संकट आले तरी, अजिबात विचलित न होता, घाबरून न जाता, शांतपणे विचार करून, अनुभवी, तज्ज्ञ अशा माणसांचा सल्ला, मार्गदर्शन मिळवणे, शास्त्रीय उपाय, उपचार करून घेणे, अतिशय महत्वाचे ठरते आणि असतेही…