घरफिचर्ससारांशकोरोनानंतरचे पर्यटन !

कोरोनानंतरचे पर्यटन !

Subscribe

कोरोनाने सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम केला. पण सर्वात आधी परिणाम केला तो पर्यटन व्यवसायावर. माणसाच्या प्राधान्यक्रमात शेवटची गरज म्हणून पर्यटनाकडे बघितले जात असल्याने तो सावरायलाही वेळ लागेल. पण एकदा तो सावरला की, मग त्यासारखा दुसरा चांगला व्यवसाय नसेल. जागतिक पर्यटन दिन सोमवारी २७ सप्टेंबरला साजरा होत आहे. त्यानिमित्त..

गेल्या मार्च महिन्यात अचानक आलेल्या कोरोना महामारीचा परिणाम जवळपास सर्वच व्यवसायांवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे झाला. यातील काही व्यवसाय हळूहळू सावरले. काही सावरत आहेत तर काही व्यवसायांना सावरायला बराच वेळ लागेल. परंतु हे सर्व व्यवसाय लवकरच सावरतील व जगाची गाडी रुळावर येईल हे नक्की. पर्यटन व्यवसाय हा पूर्णत: प्रवासावर अवलंबून असल्याने दुर्दैवाने असे काही झाले की सर्वप्रथम परिणाम करणारा व सगळ्यात उशिरा सावरणारा हा व्यवसाय ठरतो. पण या इंडस्ट्रीतली माणसं जगभर फिरत असल्याने ते इतके तयार झालेले असतात की, अशा लाटांची त्यांना आपोआप सवय होत जाते. त्यामुळे कोरोनाचे चटके सर्वाधिक पर्यटन व्यवसायास बसले असले तरी संधी मिळताच ही इंडस्ट्री कात टाकून पुन्हा पूर्वपदावर येईल यात शंका नाही.

टुरीझम हे फक्त ब्रेक घेऊ शकते ते कायम स्वरुपी कदापीही बंद होणार नाही हे नक्की. साधरणत: मार्च 2020 च्या सुरुवातीलाच कोरोनाची काव-काव सुरू झाली होती. परंतु आपल्याकडे सर्वांनीच कोरोनाला हलक्यात घेतले. होय सर्वांनीच….कारण नंतरच्या आकडेवारीने ते सिद्ध झाले. पर्यटन व्यवसायासाठी हा कालावधी फारच महत्वाचा असतो. कारण आपल्याकडे सर्वाधिक पर्यटक हे उन्हाळ्याच्या सुट्यांमधे मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात व अस्सल पर्यटक याचे बुकींग साधारण जानेवारी, फेब्रुवारीत करायला सुुरुवात करतात. त्याप्रमाणे छान बुकींग झाले होते व सर्व सुरळीत चालू होते. पण अचानक उद्भवलेल्या या कोरोनाने सर्व बाबींवर पाणी फिरवले.

- Advertisement -

बहुतेकांना फिरायला जायचे होते ते उन्हाळी सुट्यांमधे. पण त्याचे रेल्वे/विमान तिकीटे, हॉटेल बुकींग, वाहन व्यवस्था, स्थळदर्शनाचे बुकींग, सफारीज अशा अनेक बाबींचे आरक्षण हे आगावू करावे लागते व तरच पर्यटकाची सहल चांगली पार पडते. पण हे सर्व करण्यासाठी पर्यटकांकडून घेतलेला अ‍ॅडव्हान्स व सहल कंपनीला काही आगावू भांडवल लावावे लागते. सर्व सुरळीत झाले तर यात काही अडचणी येत नाही. हे सर्व मांडायचा मुद्दा म्हणजे, वर्षभरातील सर्वात मोठ्या आगामी सिझनची जवळपास सर्व तयारी झाली होती आणि अचानक अनिष्ट आले. 22 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनने चक्र अचानक थांबले. हे सर्व काय आहे, किती दिवस चालेल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. अनेक लोक जगभर सहलीवर होते. त्यांच्या ‘घरवापसी’ साठी काय-काय करावे लागले ते एक पर्यटन व्यावसायिकच जाणू शकतो. यात प्रचंड मनस्ताप, नुकसान, आदळआपट झाली. पायाला भिंगरी लावून फिरणार्‍या पर्यटन व्यावसायिकांना ऐन सिझनमधे घरात बसून रहावे लागले.

यात भर म्हणजे आगावू आरक्षण केलेल्या पर्यटकांचे फोन सुरू झाले. आपली सहल जाईल का ? नाही गेले तर परतावा मिळेल का? मिळाला तर तो जास्तीत जास्त कसा मिळेल या एक ना अनेक बाबींनी भंडावून सोडले. मुळात अचानक आलेल्या संकटाने सगळेच भांबावलेले होते. यापैकी बर्‍याच प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नव्हती. मात्र पहिले लॉकडाऊनचे नियम शिथील होताच हळूहळू पर्यटन व्यवसायाने उभारी घ्यायला सुरवात केली. परत एकदा जानेवारी-फेब्रुवारी 2021 मधे व्यवसाय स्थिरस्थावर होत आहेत असे वाटत असतानाच दुसर्‍या लाटेचा शिरकाव झाला. मात्र या लाटेने घराघरात कोरोना पोहचला व जवळपास प्रत्येकाला याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे फटका बसला. सर्वांना कल्पना आहेच या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जिवीत हानी जोरदार केल्याने पर्यटकांमधे प्रचंड दहशत पसरवली. परत बुकींग व कँन्सलेशनच्या खेळात पर्यटन व्यावसायिक अक्षरश: भरडला गेला.

- Advertisement -

अशा प्रकारे उच्छाद मांडून कोरोनाने पर्यटन व्यवसायाचा कणा मोडण्याचा चंग बांधला असताना कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. तशी पर्यटनाने उभारी धरली. मात्र कोरोनाने काही गोष्टी चांगल्याही केल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे परदेशातील सहली जवळपास बंद असल्याने देशांतर्गत पर्यटनाने जोरदार मुसंडी मारली. अजूनही परदेशातील सहलींबाबत पूर्वीचे दिवस येण्यास बराच कालावधी लागणार असल्याने खरंतर डोमेस्टीक टुरीझमला प्रचंड संधी आहे. पण आपल्या देशातील केंद्र व राज्य सरकारचा सुरवातीपासून तर आजपर्यंतचा पर्यटन व्यवसायाबाबतचा दृष्टीकोन बघता आलेल्या संधीचा फार काही उपयोग होईल अशी आशा वाटत नाही. आपल्या देशाला निर्सगाने व इतिहासाने दिलेले झुकतं माप आपण अजूनही कॅश करु शकलो नाही हे दुर्दैव आहे. कारण पर्यटन व्यवसायाला येथे कुणी गांर्भियाने घेत नाही.

वास्तविक आपल्याच देशात मध्य प्रदेश, गुजरातसारखी राज्य अगदी आक्रमकतेने पर्यटन स्थळांचे मार्केटिंग करत असताना आपल्याकडे पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्राथमिक सुविधा तर सोडाच पण तेथपर्यंत जाणारे रस्तेसुद्धा चांगले नाही. भारतातील पर्यटन व्यवसाय हा केवळ या उद्योगातील प्रत्यक्ष काम करणार्‍या भारतीयांच्या मेहनतीवर टिकून आहे. जर या बाबींवर सखोल अभ्यास करुन नियोजनपूर्वक प्रयत्न झाले व त्यास राजकीय सपोर्ट मिळाला तर देशातील सर्वाधिक रोजगार पर्यटन व्यवसाय निर्माण करु शकतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशांतर्गत पर्यटन वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. कोरोना पश्चात विमान कंपन्यांकडे पैसे अडकलेल्या पर्यटकांना, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना, ट्रॅव्हल ऐजंट्स, वाहन धारक इ. टुरीझम संबधित काम करणार्‍या सर्वांना शासनाने अद्याप कुठलीही मदत तर केली नाहीच; परंतु वाहन, कर्ज, हप्ते व त्यांवरील व्याज, त्यांचे सरकारी कर, विमा याबाबतचे नियम अजिबात शिथील झाले नाही.

राज्यांतर्गत प्रवास व परवानग्या, क्वारंटाईनचे नियम, कोविड चाचणी याबाबत रोज नवनवीन नियम आणून हेतुपुरस्सर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण केली गेली. दुर्दैवाने आजही तेच चालू आहे. अनेक राज्यात दोन डोस झालेल्या पर्यटकांची परत-परत अ‍ॅन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी केल्याचे सर्टीफिकेट मागितले जात आहे. बाहेर 650 रुपयात होणार्‍या चाचण्यांसाठी विमान तळावर चार-साडेचार हजार रुपये वसूल केले जात आहेत. यात चाचणीसाठी जो नमुना घेतला जातो ते प्रकरण तर खूपच भयानक आहे. याबाबत सुसूत्रता नसल्याने पर्यटक सहलीस जाणे टाळत आहेत व याचा अनिष्ट परिणाम या क्षेत्रातील संबधित सर्वांनाच होत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा एक वेगळा परिणाम असाही झाला की, या लाटेत जीवित हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने लोकांचा जीवनाकडे बघण्याचा ऐकूणच दृष्टिकोन बदलला. आयुष्य खरोखर क्षणभंगुर आहे याचा खर्‍या अर्थाने अनुभव आल्याने आलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जगण्याचा आनंद घेण्याकडे कल वाढला. यामुळे पर्यटनात प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसतें. तसेच सारखे घरात बसूनही लोक कंटाळले आहेत. पर्यटनाने चांगला स्पीड पकडला असला तरी सध्याची अनिश्चितता टाळली तर यापेक्षा जास्त पर्यटक घराबाहेर पडतील. तसेच अनेक कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ चालू आहे. मुलांच्या शाळाही बंद आहेत. परिणामी छोट्या सहलींना चांगले दिवस आले आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा बराच तोटा भरुन निघाला आहे. पावसाळी सहली, क्वारंटाईन पॅकेजेस यांमुळे हॉटेल इंडस्ट्री सावरली. आता जर ‘बहुचर्चित’ तिसरी लाट आली नाही तर सर्व लवकरच सुरळीत होईल. कारण या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या बातम्या पर्यटनाचे बेत आखणार्‍यांना परत बॅकफूटवर ढकलतात असे निदर्शनास आले आहे.

पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. शासनाने आम्हाला भरभरुन द्यावे अशी आमची अपेक्षाही नाही. फक्त शासनाने टुरिझम इंडस्ट्रीचे योगदान बघून या इंडस्ट्रीलाही गांर्भियाने घ्यावे. योगायोगाने आलेल्या संधीचा लाभ उठवून त्यानुसार देशांतर्गत पर्यटनाचे त्वरीत नियोजन करावे इतकेच !

–दत्ता भालेराव

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -