Eco friendly bappa Competition

डेटा…

Subscribe

माणसं गोळा झाली की गोळा झालेल्या माणसांचा डेटा तो गोळा करतो.

आपल्या एका इशार्‍यावर माणसं गोळा करू शकणार्‍यांपासून त्याने आपल्या ह्या महान कार्याची सुरूवात केली. पुढे डेटा गोळा करण्यासाठी त्याला प्रत्येक दिवशी नवा विषय सापडू लागला. एके दिवशी तर कामातून गेलेल्या केसेस्चा डेटा गोळा करायला त्याने सुरूवात केली. खूप कामात असलेल्या खूप लोकांनी त्यांच्या नकळत त्याच्या ह्या डेटामध्ये स्थान मिळवलं होतं. खूप कामात असलेली माणसं खूप कामातून गेलेली असतात असा निष्कर्ष सरतेशेवटी त्याला काढावा लागला. ह्या निष्कर्षाप्रत येताना आपल्याच कोषात हरवून गेलेल्या त्याच्यासारख्या विनोदाचं वावडं असलेल्या माणसालाही खूप हसू आलं. मग विनोदाचं वावडं असणार्‍या माणसांचाही डेटा गोळा करण्याचं काम तो हाती घेणार होता. पण तो विषय त्याने सुचल्या सुचल्याच स्थगित केला. कदाचित त्या डेटामध्ये आपलाही नंबर लागण्याची त्याला भीती असावी.

- Advertisement -

नंतर नंतर तर डेटा गोळा करणं हा त्याचा छंद राहिला नाही. एखाद्याच्या एखादीशी असलेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हाव तसं त्याच्या ह्या छंदाचं रूपांतर व्यवसायात झालं. निरनिराळ्या रंगांच्या रेशनकार्डंधारकांचा डेटा तर त्याच्या कॉम्प्युटरवर सहज मिळू लागलाच, पण चक्क रेशनकार्ड घेऊन रेशनिंगच्या दुकानात जाणार्‍या माणसातल्या दुर्मिळ प्रजातीचाही डेटा क्षणात त्याच्याकडे उपलब्ध होऊ लागला.

अशा दुर्मिळ गोष्टींचाच डेटा आता त्याच्याकडे सापडू लागला. जे न देखे रवी ते देखे कवी म्हणतात त्याप्रमाणे, कोणत्याही विषयाचा नाही तोटा, असा त्याचा डेटा असं त्याचं वर्णन पंचक्रोशीत होऊ लागलं.
कमांडो न घेता फिरणार्‍या नव्हे तर कमांडो न मिरवणार्‍या हेवीवेट राजकारण्यांचा डेटा त्याच्याकडे एका क्लिकवर मिळू लागला.

- Advertisement -

स्वत:च्या कारमध्ये बसताना आणि उतरताना स्वत:च्या कारचा दरवाजा स्वत:च उघडणारी दुर्मीळ हाय प्रोफाइल्स त्याच्या कॉम्प्युटरवर सहज कळू लागली.

भ्रष्टाचाराचं आरोपपत्र दाखल झाल्यावर हॉस्पिटलात सलाइन लावण्यासाठी दाखल न झालेल्यांची यादी मिळू लागली.

दुसर्‍या पक्षात आनंदाने गेलेल्या आणि तिथे न घुसमटता समाधानाने, गुण्यागोविंदाने नांदणार्‍या मंडळींची नावं लक्षात आली.

आजपर्यंत नेमलेल्या चौकशी आयोगात तो शेवटपर्यंत तडीस नेऊन शिक्षा झालेले आरोपी कळले.

अध्यात्माच्या पवित्रपावन वाटेवरून चालताना सर्वसंगपरित्याग करून खर्‍या अर्थाने सज्जनांचं कल्याण आणि दुष्टांचं निर्दालन करत राहणार्‍या संतसज्जनांची अ‍ॅफिडेव्डिट केलेल्यांची सूची डोळ्यांखालून गेली.

अनधिकृत इमारतीत गटारी करायला गेलेल्या वॉर्ड ऑफिसातले अधिकारी माहीत झाले.

उजव्यांच्या कळपात नजर चुकवत घुसलेले डावे कळले आणि पुरोगाम्यांमधले मनातून धाकधुकत असणारे प्रतिगामी स्पष्ट दिसले.

रस्त्यावरची लढाई टाळून ट्विटरच्या चोरमार्गाने प्रकाशझोतात राहणार्‍या टोळक्यांची जंत्री मिळाली.

स्वत:चं फेशियल वाचवण्यासाठी झालेले माफीचे साक्षीदारही कळले आणि स्वत:ची शिक्षा टाळण्यासाठी पापभिरूंचे झालेले साथीदारही कळले.

वय लपवत राहून खेळत राहणारे खेळाडूही कळले आणि मांडीचा स्नायू दुखावलेला असतानाही पॅड पायावर बांधणारेही कळले.

इतिहासांचं पुनर्लेखन करणारे आयटी सेलमधले पगारी कर्मचारीही दिसले आणि वर्तमानातलं सत्य लपवणारे वर्तमानपत्रवालेही दिसले.

शापित गंधर्व तर दिसलेच, पण त्याचबरोबर प्रायोजित यक्षांचीही लिस्ट दृष्टीला दिसली.

अस्मानी, सुलतानी संकटांशी झुंजत झिजणारे शेतकरी दिसले आणि एनआरआय भुमिपुत्रही कळले.

कुंपणावरचे सुप्रसिध्दही कळले आणि भावी कुप्रसिध्दही कळले.

त्याच्या ह्या डेटाचा डेटा पाहून मस्तक चक्रावून जायची वेळ आली. आजच्या काळातला एखादा टेक्नोमॅन असाही डेटा जमवतो हे प्रश्नचिन्हं फारच सतावू लागलं. त्याला ते कळलं असावं म्हणूनच तो जवळ आला.

एखाद्या चित्रकाराने, कसं वाटलं आपलं चित्र? असा प्रश्न करावा तसं त्यानेही त्याच्या खोल गपगार डोळ्यांतून कसा वाटला हा डेटा? असा प्रश्न केला.

दोन निवडणुकांच्या मध्ये खालच्या माणसाच्या खोलीत डोकावून गेलेल्या उंच व्यासपीठावरच्या नेत्यांचा एक डेटा एकदा देशील का?

त्याच्या प्रश्नाला हा प्रतिप्रश्न काफी होता.

- Advertisment -