घरफिचर्ससारांशदिल का हाल लिखे दिलवाला...

दिल का हाल लिखे दिलवाला…

Subscribe

भावना कुठलीही असो प्रेम, विरह असो किंवा विद्रोह प्रत्येक भावनेला शब्दाच्या रूपातून मांडणारा गीतकार म्हणजे शैलेंद्र. जो एकीकडे ‘ये रात भिगी भिगी, प्यार हुआ इकरार हुआ’ लिहितो, तर दुसरीकडं ‘जोर जुलुम के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं’, लिहितो. शैलेंद्र हा भारतीय सिनेमातील पहिला असा गीतकार आहे, ज्यांनी लिहिलेल्या गाण्यांना जागातिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्यातला एक किस्सा त्यांच्या मुलीनेच सांगितला होता. तो असा, नोबेल पारितोषिक विजेते रशियन साहित्यिक अलेक्झांडर सोलनेस्टीयन यांनीदेखील शैलेंद्र यांच्या आवारा हूँ, या गाण्याचा उल्लेख केला होता.

लेखकांसाठी जगातलं सर्वात अवघड काम असतं, सामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत लिहिणं. भारतीय सिनेमाच्या आजवरच्या प्रवासात मोजकी अशी मंडळी होती, ज्यांनी लिहिलेली गाणी अजूनही सामान्यांच्या ओठावर असतात. ६० वर्षांआधी लिहिलेली गाणी आजच्या पोरांना पाठ होतात, याचं कारण म्हणजे त्यात असलेल्या शब्दातील साधेपणा आणि त्याच साधेपणातून साधलेला अपेक्षित परिणाम. एक किस्सा आहे, राज कपूर एकदा एका सडपातळ व्यक्तीला सोबत घेऊन लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या घरी गेले. तिथं ख्वाजासाहेब त्यांना एका सिनेमाची कथा ऐकवणार होते. ख्वाजा साहेबांनी राज कपूर यांचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत आलेली व्यक्ती अगदीच सामान्य होती. ख्वाजा साहेबांना वाटलं की राजसाहेबांचा कुणी असिस्टंट असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष करीत आपली कथा ऐकवायला सुरुवात केली.

अडीच तास ख्वाजासाहेब कथा ऐकवत होते. कथा संपल्यावर ख्वाजा यांनी राज कपूरला विचारलं की, कशी वाटली कथा? राज कपूर यांनी आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीकडे बघितलं आणि म्हणाले, कविराज कशी वाटली कहाणी? तो व्यक्ती उत्तरला, कथा छान आहे. यावर सिनेमा बनवायलाच हवा. राज कपूर म्हणाले, मी कथेबद्दल विचारत नाहीये, तुम्हाला कथा ऐकून काय वाटलं. तो व्यक्ती म्हणाला, गर्दिश में था, आसमान का तारा था, आवारा था, हे शब्द ऐकले आणि लेखक ख्वाजा अब्बास जागेवरून उभे राहिले. त्यांनी राज कपूरला विचारले की कोण आहे हा माणूस? याने माझी अडीच तासांची कथा केवळ दोन ओळीत सांगितली. राज कपूर यांनी त्या व्यक्तीची ओळख करून दिली, कविराज शैलेंद्र…जीवनाचं सार सामान्यांच्या भाषेत साध्या शब्दांत लिहिणारा गीतकार म्हणून शैलेंद्र सर्वांना परिचित आहेत.

- Advertisement -

आवारा सिनेमाच्या दरम्यानचा हा किस्सा आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेलं, आवारा हुँ हे टायटल साँग कुणी विसरेल असं कधीच वाटत नाही. कारण म्हणजे शैलेंद्र यांचे शब्द. खूप कमी असे गीतकार आहेत ज्यांना सोप्या शब्दांत लिहिता येतं किंवा असं म्हणा की खूप कमी असे गीतकार आहेत, जे सामान्य माणसाची भाषा लिहून वाहवा घेतात. शैलेंद्र हे अशाच गीतकारांसाठी आदर्श आहेत, ज्यांनी विविध मानवी भावनांना सोप्या शब्दांत लिहून ठेवलं. हा असा गीतकार आहे ज्याने साठ-सत्तरच्या दशकात जागतिकीकरण अनुभवलं. मेरा जुता हैं जपानी, म्हणत ज्यांचं गाणं चीन, रशिया, अमेरिकेत पोहोचलं. त्या गीतकाराला कधी गीतकार व्हायचं नव्हतं. रेल्वेच्या नोकरीत आनंदी असताना अचानक असं काहीतरी घडलं की हा माणूस सिनेमात आला आणि इथलाच झाला. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील असा गीतकार ज्याने सोप्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आणि अजरामर झाला.

टायटल गीत हे आज सिनेमाची ओळख बनलीय, पण अनेकांना माहिती नसेल की टायटल गीत लिहिण्याची सुरुवात केली ती शैलेंद्र यांनीच. तेही गीतकार म्हणून आपल्या पहिल्याच सिनेमात. अडचणीत असताना राज कपूर यांच्याकडून शैलेंद्रने ५०० रुपये उसने घेतले होते. ते परत करायला गेले तेव्हा राज कपूर यांनी सांगितलं की, मी काही सावकार नाही की तुझे पैसे परत घेईल, पण मग शैलेंद्र यांना पैसे द्यायचेच होते. तेव्हा राज कपूर यांनी गळ घातली की माझ्या सिनेमासाठी दोन गाणी तुम्ही लिहून द्या. आता अडचणीच्या काळात मदत केल्याने शैलेंद्र नाही म्हणू शकत नव्हते आणि त्यांनी गाणी लिहिली. पहिलं गीत ‘बरसात में हमसे मिलें’ टायटल साँग बनलं, तर दुसरं गीत ‘पतली कमर हैं’ देखील चांगलंच गाजलं. त्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासाला ब्रेक लागला तो १९६६ साली. या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक सुपरहिट गाणी लिहिली. भावना कुठलीही असो प्रेम, विरह असो किंवा विद्रोह प्रत्येक भावनेला शब्दाच्या रूपातून मांडणारा गीतकार म्हणजे शैलेंद्र, जो एकीकडे ‘ये रात भिगी भिगी, प्यार हुआ इकरार हुआ’ लिहितो, तर दुसरीकडं ‘जोर जुलुम के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं’, लिहितो.

- Advertisement -

शैलेंद्र हा भारतीय सिनेमातील पहिला असा गीतकार आहे, ज्यांनी लिहिलेल्या गाण्यांना जागातिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्यातला एक किस्सा त्यांच्या मुलीनेच सांगितला होता की नोबेल पारितोषिक विजेते रशियन साहित्यिक अलेक्झांडर सोलनेस्टीयन यांनीदेखील शैलेंद्र यांच्या आवारा हूँ, या गाण्याचा उल्लेख केला होता. रशिया, युरोप असो किंवा चीन अनेक देशात हे गाणं आणि जुता है जपानी नावाचं याच सिनेमातील दुसरं गाणं सुपरहिट झालं होतं. चीनच्या अध्यक्षांनी १९६२ ला भारत दौर्‍यावर आल्यानंतर हे गाणं ऐकवण्याची फर्माईश केली होती. शैलेंद्र यांनी लिहिलेली अनेक गाणी खास होती, पण त्यांची काही गाणी आजही ऐकली जातात, ज्यांना एक वेगळं महत्त्व आहे. मुलांसाठी लिहिलेलं नानी तेरी मोरनी को मोर ले गये, बाकी जो बचा था, काले चोर ले गये, हे गाणं असू द्यात किंवा बहीण-भावाच्या नात्यावर लिहिलेलं, भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना, हे गाणं असो, त्यांनी प्रत्येक वर्गासाठी गाणी लिहिली आणि ती तितकीच गाजली.

शैलेंद्रसारखा गीतकार हिंदी सिनेमाला मिळाला याला कारण म्हणजे राज कपूर. त्यांनी बरंचसं काम शंकर- जयकिशन, हसरत जयपुरी, राज कपूर यांच्यासोबतच केलं, पण याशिवाय त्यांनी एस. डी. बर्मन यांच्यासोबतही काम केलं होतं. नुकताच ‘भोला’ नावाचा सिनेमा रिलीज झाला, ज्यात गाईड सिनेमातील एक जुनं गीत आज फिर जिने कि तमन्ना है, वापरण्यात आलं आहे. या गाण्याच्या जन्माची पण एक कथा आहे. एस. डी. बर्मन यांनी एकदा शैलेंद्र यांना कॉल केला आणि सांगितलं की, भेटायला या देवानंद आलेत. शैलेंद्र यांना कळलं की काहीतरी गाणी लिहिण्याचं काम असणार. म्हणून त्यांनी आधी नकार दिला, पण नंतर बर्मनसाहेब म्हणाले की, मी बोलावतोय म्हणून या, तर ते भेटायला गेले.

तिथं बर्मन साहेबांनी सांगितलं की, देवानंद ‘गाईड’ नावाचा सिनेमा बनवताय, ज्यासाठी त्यांना एक गीतकार हवाय. त्यांनी तुमच्या आधी एकाकडून गाणी लिहून घेतली होती, पण त्यांना ती आवडली नाहीत. शैलेंद्रला आपण सेकंड चॉईस आहोत हे कळलं आणि म्हणून त्यांनी थेट नकार कळवण्याऐवजी त्यांना सांगितलं की, सध्या मी फीस जास्त घेतो. देवानंद यांनी विचारलं की किती? तर शैलेंद्र यांनी असा एक आकडा सांगितला जो मेन लीडच्या फीसपेक्षा जास्त होता, पण देवानंद यांनी निश्चय केला होता आणि त्यांनी होकार दिला, ज्यामुळे शैलेंद्र काम टाळू शकले नाहीत आणि त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहिली. गाता रहे मेरा दिल, आज फिर जिने की तमन्ना है, दिन ढल जाये, पिया तोसे नैना लागे रे, अशी सर्वच गाणी सुपरहिट झाली.

शैलेंद्र यांनी ‘तिसरी कसम’ सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती, पण तो सिनेमा तितका चालला नाही. याच सिनेमामुळे त्यांच्यात आणि राज कपूरमध्येदेखील थोडा वाद झाला होता. अशातच १९६६ साली त्यांचं निधन झालं. ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी शैलेंद्र राज कपूर यांच्या सिनेमासाठी गाणं लिहित होते, ते गाणं अपूर्ण राहिलं. ज्याला नंतर त्यांच्या मुलाने पूर्ण केलं आणि ते गाणं सदाबहार बनलं. तो सिनेमा होता मेरा नाम जोकर आणि गाणं होतं जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा, जी चाहे जब मुझको आवाज दो, हम है यहीं हम है यहाँ… शैलेंद्र हा सामान्य माणसाचा आवाज होता. असा आवाज ज्याला भावना मांडण्यासाठी कुठल्याही ललित शब्दांची, अतिरंजक रूपकांची गरज नव्हती. तो केवळ सामान्यांच्या मनातलं लिहायचा. शेवटी त्यांचं लिखाण म्हणजे त्यांच्याच गाण्यात थोडासा बदल करून दिल का हाल लिखे दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहके रहेगा कहनेवाला, दिल का हाल लिखे दिलवाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -