घरफिचर्ससारांशकर्ज काढून सण...आर्थिक संकटाला निमंत्रण!

कर्ज काढून सण…आर्थिक संकटाला निमंत्रण!

Subscribe

आपल्या सगळ्यांना आता दिवाळीचे वेध लागलेले असून दिवाळीच्या तयारीचे, विविध सामान, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचे, फराळाचे पदार्थ बनवण्याचे अथवा विकत घेण्याचे, घर सजवण्याचे, फिरायला जाण्याचे जोरदार नियोजन घरोघरी सुरू आहे. दिवाळी वर्षातून एकदा येणारा मोठा सण, लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांचा आवडता सण!!! त्यामुळे तो धुमधडाक्यात साजरा झालाच पाहिजे ही आपली मानसिकता चुकीची नाही. पण मुळात दिवाळीत प्रचंड पैसा खर्च केला अथवा कोणत्याही सणाला खूप पैसा खर्च झाला, म्हणजेच तो सण यथोचित साजरा केला असा अर्थ होत नाही. आपल्या कुवतीबाहेर, आवाक्याबाहेर जावून, आर्थिक ओढाताण करुन सण-वार करणे म्हणजे भविष्यात आर्थिक तसेच मानसिक संकटाना आमंत्रण देणे होय.

वास्तविक आपल्या प्रत्येक सणा मागे, प्रत्येक पूजे मागे, व्रत वैकल्यामागे जे काही शास्त्रीय अथवा आध्यात्मिक कारण आहे, जी काही चालत आलेली परंपरा आहे, मूळ महत्वाचा हेतू आहे तो यथासांग सहकुटुंब आनंदी उल्हासी मनाने पार पाडणं, प्रत्येक सणा मागील रीती रिवाज नियम, त्याच महत्व समजावून घेऊन त्यानुसार योग्य पूजन, योग्य विधी पुरेसा वेळ देऊन, अचूक पद्धतीने, योग्य मार्गदर्शन घेऊन, संबंधित माहितीपर पुस्तकातील संदर्भ घेऊन, आपल्या घराण्यातील संबंधित गुरुजी यांचेकडून योग्य सल्ला घेऊन आपल्या हातून घडणं हे त्या त्या दिवसाचे महत्व आहे. आपल्या घरातील मुलांना खरेदीच नाही तर त्या त्या दिवसाचं महत्व, त्या मागील आध्यात्मिक कारण याच महत्व समजणं अपेक्षित आहे.

सण कोणताही असो त्यासाठी लागणारे पूजेचे साग्रसंगीत सामान, त्यासाठी लागणार वेळ, त्यासाठी करावयाची तयारी यासाठी खूप कमीतकमी पैसे आवश्यक असतात. पूर्ण कुटुंबाने मनापासून एकत्रित येऊन दिलेला वेळ आणि भक्ती भाव इतकंच खरंतर प्रत्येक सणात अपेक्षित असतं आणि प्रत्येक सणावाराला तसंच वातावरण असणं खरं महत्वाचं असतं.

- Advertisement -

कोणत्याही सणाच्या घरगुती, कौटुंबिक स्तरावर केलेल्या बिनचूक आणि व्यवस्थित पूजन विधीला मारेमाप पैसा अथवा अवडंबर अजिबात लागत नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे. फक्त कुटुंबातील सदस्य, कमीतकमी आटोपशीर नियोजन देखील पुरेसं असत. विनाकारण खूप खरेदी, खूप तयारी, खूप धावपळ यामुळे महिलांची दमणूकदेखील प्रचंड होते आणि सणाचा आनंद चेहर्‍यावर दिसण्यापेक्षा थकलेला, वैतागलेला भाव घरातील महिलांच्या चेहर्‍यावर कुठल्याही कार्यात पाहायला मिळतो. अनेक घरांमध्ये कोणताही सणवार म्हणजे फक्त अनेकांनी एकत्र येऊन गोंधळ घालणं हे समीकरण असते.

जास्तीजास्त लोकसंख्या जमवणं, मोठं डेकोरेशन, खूप लायटिंग, चंगळ, गंमत, मजा, मस्ती, सुट्टी, भरपूर खरेदी, भरपूर खाद्य पदार्थ, नटण मुरडणं, फोटो सेशन, सेल्फी, दिखाऊपणा, खोटा मोठेपणा, भरपूर पाहुणे, भरपूर गिफ्ट देणे घेणे, मिळेल ते विकत घेत सुटणे, कसलाही अंदाज अदमास न ठेवता घरात वाटेल तेवढं, वाटेल तितके पैसे खर्च करुनं आणून टाकणं ही नशाच जणू या कालावधीमध्ये चढलेली असते. सगळ्यांचं लक्ष फक्त समाधान आणि आनंद विकत घेण्यात असत, पण दुर्दैवाने या गोष्टी कुठेही विकत मिळत नाहीत याचा आपल्याला विसर पडत असतो. सामाजिक माध्यमातूनसुद्धा आपण कसा मारेमाप पैसा खर्च करुनं दिवाळी करतोय हे दाखवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतो.

- Advertisement -

आपली आवक किती, आपलं बजेट किती, आपला होणारा खर्च किती, अतिशय बडेजाव करण्याच्या नादात आपल्यावर होणारे कर्ज किती, त्या कर्जाची आवश्यकता किती यावर अजिबात लक्ष दिलेलं नसत. बेसुमार खर्च करताना त्याचा कोणीही हिशोब ठेवलेला नसतो, लिहिलेला नसतो. कुठे किती का आणि कसा खर्च करायचा याच काहीही नियोजन आधी केलेलं नसतं. आज कर्ज घेऊन सण केला, किंवा बचतीच्या पैशातून सण केला, किंवा चुकीच्या आर्थिक व्यवहारातून सणात पैसे घातले तर पुढे काय, व्यवहार उलटे पालटे फिरवून आज मजा केली, पैसे उडवले तर भविष्यात त्याची भरपाई कशी करणार यावर कोणताही विचार केलेला नसतो. प्रचंड पैसा खर्च करुनसुद्धा, कर्जबाजारी होऊनसुद्धा या सगळ्या गडबडीत त्या सणासाठी करावी लागणारी खरी पारंपरिक, आध्यात्मिक प्रक्रिया काय, पद्धत काय, ती कशी पार पाडायची, त्यासाठी कोणत्या जाणकाराचा सल्ला घ्यायचा, कोणत्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्यायची, त्यासाठी नेमक काय साहित्य आणायचं, काय करायचं कोणी करायचं, कधी करायचं, मुहूर्त काय हे सगळं अनेक घरात सर्रास फाट्यावर मारलेलं असतं.

मजा मस्तीला फक्त वेळ हवा म्हणून पूजन, विधी, शास्त्र यात शॉर्ट कट मारून, उरकायचं, करायचं म्हणून करायचं, हे करताना चूक काय बरोबर काय याचसुद्धा भान ठेवायचं नाही. चुकीच्या पद्धतीने सण साजरा केला जातोय, आपल्याकडून काय उलट पालटं घडतंय का, हे आपल्या संस्कृतीमध्ये बसणार नाही, याचे नकारात्मक परिणाम कौटुंबिक स्तरावर काय होतील याच्याशी कोणाला काहीही घेणंदेणं नसत. अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा सणाचा मूळ हेतू बाजूला ठेऊन भलत्याच गोष्टींवर वेळ, श्रम आणि पैसा खर्च होताना दिसतो.

मुळात माझ्या शेजारचा, माझ्या ऑफिसमधला, माझ्या नात्यातला, माझी मैत्रीण, माझे ओळखीचे काय घेणार, किती खर्च करणार, ते कसे दरवर्षी मोठी दिवाळी करतात, त्याने तर यावर्षी स्वतःच घरं घेतलं, याने फोर व्हीलर घेतली, तो परदेशात फिरायला गेला विथ फॅमिली, कसले जबरदस्त फटाके उडवले शेजारच्यानी, माझ्या मैत्रिणीने इतक्या रुपयाची नुसती एक साडी घेतली, अमुक बाईने एक नाही चार चार साड्या घेतल्या, यासारख्या अनेक बाबींवर आपण विचार करुन, जीव जाळून आपल्याला परवडणार्‍या बजेटमध्ये सण न बसवता दुसरा काय करतोय, मी पण मोठेपणा करू शकतो या मानसिकतेतून सण साजरे करत असतो. इतरांशी चढाओढ करायला इतरांना जळवायला, इतरांना कमी दाखवायला सण वार साजरे करायचे नसतात तर आपल्याला सुख, समाधान आणि मनःशांती, आध्यात्मिक शक्ती मिळावी देवी देवतांचे शुभ आशीर्वाद मिळावेत म्हणून ते करायचे असते यावर विचार होणे आवश्यक आहे.

सण कोणताही असो तो कमीतकमी खर्चात सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने करण्यात जी मजा आहे ती फक्त चढाओढ म्हणून, स्पर्धा म्हणून, दिखावा म्हणून करण्यात नक्कीच नाही. जास्तीजास्त लोकांशी तुलना करुन आपण स्वतःची आर्थिक पिळवणूक करुन घेऊन जर सण वार साजरे करू लागलो तर त्यातून आपल्याला पुण्य मिळण्यापेक्षा पाप लागण्याची शक्यता अधिक वाढते. कर्ज काढून, उधार उसनवार घेऊन, कोणाला खोटं बोलून, कोणत्याही वाईट मार्गाने, चुकीच्या युक्त्या वापरून आलेला पैसा देव धर्माच्या, सणा-वाराच्या कारणी लावणं म्हणजे पुण्य मिळवण्याच्या नावाखाली केलेला काळाबाजार असतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आपल्या आर्थिक कुवतीनुसार, आपल्या जमा खर्चाचा ताळमेळ घालून जर आपण स्वत:च्या हक्काचे, कष्टाचे पैसे मग ते मोजकेच का असेना अशा धार्मिक कार्यात वापरले तर नक्कीच आपल्याला त्यातून चांगलं सकारात्मक जीवन प्राप्त होईल, हातून खरंच शुभ कार्य घडेल. बाजारात प्रलोभनांना काहीच तोटा नाही. प्रत्येकजण स्वतःची वस्तू, स्वतःच उत्पादन आणि सेवा विकायला बसला आहे. रस्त्यावरील विक्रेता असो की ब्रँडेड शो रूम, विविध वस्तूंनी खच्चून भरलेले मोठे मोठे मॉल, सुपर मार्केट, ऑनलाईन शॉपिंगमधील अनेक पर्याय, कपड्यांची ओसंडून वाहणारी दुकानं, वेगवेगळे डिस्काउंट, विविध स्कीम, फ्री गिफ्ट, कुपन सिस्टिम, ऑफर, जाहिराती, रोज बदलणार्‍या फॅशन, यांना बळी पडून आपण अनेक अनावश्यक गोष्टी खरेदी करत असतो.

सणाच्या काळात केवळ बाजारात उपलब्ध आहे, सगळे घेत आहेत म्हणून वस्तू विकत घेणं आणि खरी गरज आहे निकडं आहे म्हणून घेणं यातील फरक अनेकांना कळतं नाही. अनेक गोष्टी नव्याची नवलाई संपल्यावर निरूपयोगी बनून राहतात, पडुन राहतात, त्यात पैसा अडकून राहतो. खाद्य पदार्थ्यांचे आकर्षक पाकीट, सजवलेल्या मिठाया ड्राय फ्रुट्सची रेलचेल पाहून त्या आणल्या जातात पण खरंच त्या पूर्णपणे संपतात का की, शिळ्या करुन फेकून दिल्या जातात? रोषणाई केलेली दुकान, किराणा दुकानात ओसंडून वाहणारे नाना प्रकारचे किराणा सामान आपल्याला नक्कीच भुरळ घालते. पण आपल्याला घरात यातील नेमक्या किती वस्तू लागणार आहेत, कितीवेळा लागणार आहेत याचा अंदाज आपण घेतोय का? फटाके खरेदी करतानासुद्धा जळून राख होणार्‍या या आयटमवर आपली मेहनतीची किती कमाई घालवणे योग्य राहील? हे सर्व करताना आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचं भान ठेवणंदेखील तितकंच महत्वाचं आहे.

कोणतीही वस्तू खरेदी करताना, कुठेही पैसा वाया घालवताना अथवा खर्च करताना त्यामागील उद्देश काय, त्या खर्चाची उपयोगिता काय? किती कालावधीसाठी टिकणारी आहे? त्यातून मनःशांती आणि खरा आनंद मिळणार आहे की, आर्थिक टेन्शन वाढणार आहे? घरातील कोणाकोणाला एखादी वस्तू गरजेची आहे, त्या वस्तू वाचून खरंच अडणार आहे का, तेवढंच घेऊन आपण समाधानी होणार आहोत का, आपण करत असलेल्या खर्चातून सर्व कुटुंबाला आनंद मिळणार आहे का, होत असलेल्या खर्चात इतर काही महत्वाची काम होऊ शकतील का, आपण कोणाचे देणे लागतोय का, आपल्याला हे परवडणार आहे का, याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचे आहे. आपल्या घरातील इतर आर्थिक प्राधान्याची कामे काय आहेत, इतर समस्या काय आहेत, कुटुंबातील इतर लोकांचा सणाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे, त्यांना कशा पद्धतीने सण साजरा करायला आवडणार आहे याबाबतदेखील विचार विनिमय होणे आवश्यक आहे.

सण हा कोणावर इंप्रेशन मारण्यासाठी, आपली श्रीमंती दाखवण्यासाठी, आपल्या आनंदाचा खोटा दिखावा करण्यासाठी नक्कीच नसतो. आपण कितीही हातपाय मारले, पैशाचं कितीही सोंग आणलं तरी आपल्यापेक्षा जोरात सेलेब्रेशन करणारा कोणीतरी असतोच, त्याच्या बरोबरीला आपण पोहचल्यावर पण त्याहीपेक्षा मोठा कोणीतरी असतोच. आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठवर धावू शकणार आहोत? आपल्या जवळील सगळं संपल्यावर कायमच थांबण्यापेक्षा आत्ताच वेळेत स्वतःला लगाम घालणे उचीत राहील. आपली आर्थिक कुवत किती तणायची, वाईट वेळ आल्यावर कोणापुढे कितीवेळा हात पसरायचे, त्यावेळी कोणाचे अपशब्द का ऐकून घ्यायचे याचा आधीच विचार झाला पाहिजे. आपल्या मनावर आणि खर्चावर ताबा कसा ठेवायचा हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.

दिवाळीत काहीही खरेदीला सुरवात करण्याच्या आधी सर्व कुटुंबाने एकत्र बसून आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. आपल्याला कोणाचे किती व्यवहार मिटवणे आवश्यक आहे, कोणते कर्ज आपल्यावर आधीच आहे यावर गांभीर्याने चर्चा व्हावी. परत नव्याने उधारी करुन, कोणाला थापा मारून, कोणाचे पैसे बुडवून त्याचे तळतळाट घेऊन आपला सण कधीच साजरा होऊ शकत नाही. आपल्या घरातील आजारी माणसे त्यांचे औषध उपचार, आपल्या मुलांना लागणारे शिक्षणाचे पैसे, त्यांच्या भविष्याची तजवीज, आपल्यावर अवलंबून असलेल्या कामगारांचे, नोकरांचे, लोकांचे पगार, आधीचे सर्व आर्थिक व्यवहार देणे घेणे पहिले पूर्ण करावेत.

त्यानंतर सगळ्यांचे मत, गरजा विचारात घेऊन अतिशय आवश्यक, मोजक्या पण चांगल्या दर्जाच्या उत्पादनाला प्राधान्य देऊन कायकाय खरेदी करायचे आहे याच्या वेगवेगळ्या याद्या बनवण्यात याव्यात. शक्यतो या गोष्टी होलसेलमध्ये, वाजवी दरात कुठे मिळतात, घरातील कोणती व्यक्ती कोणत्या वस्तू चांगल्या चॉईस करुन आणू शकते यावर विचार व्हावा. त्याप्रमाणे प्रत्येकावर खरेदीची जबाबदारी आणि बजेटनुसार पैसे देण्यात यावे. प्रत्येक खर्चाचा हिशोब प्रत्येकाने लिहून ठेवावा, बिल सांभाळून ठेवावीत जेणेकरून आपण कुठे किती खर्च केला आहे याची नोंदणी राहील. केवळ हट्ट, हौस, कोणाकडे पाहिलं, खूपच आवडलं म्हणून, दिसलं म्हणून, सगळेच घेतात म्हणून काहीही खरेदी करण्यावर आळा घालावा.

नवीन खरेदीची यादी करताना पहिले घरातील जुन्या वस्तू, आधी घेतलेल्या वस्तू तपासून घ्याव्यात. किराणा असो वा कपडे, शूज चप्पल असो वा डेकोरेशनचे सामान, पूजेचे सामान अथवा कॉस्मेटिक आधीचे काय किती शिल्लक आहे, किती उरलं आहे, वापरण्यायोग्य किती आहे हे पाहूनच नवीन वस्तू आणाव्यात. आधी घरात पडून असलेल्या वस्तूंची, कपड्यांची, भांड्यांची, खाद्य पदार्थांची आपल्या वापरण्या योग्य नसल्यास व्यवस्थित विल्हेवाट लावणे, गरजूना त्या देऊन टाकणे, सत्कारणी लावणे यावर देखील विचार होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे जास्तीतजास्त नियोजनबद्ध पद्धतीने सण साजरे केले तर भविष्यात आर्थिक अडचणीत फसण्याची वेळ येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -