कमला हॅरिस आपल्या की त्यांच्या?

भारतीय वंशाच्या असल्याने कमला हॅरिस यांना भारतीय लोकांची मानसिकता, संस्कृती यांचेही उत्तम ज्ञान आहे. डोसा बनवायला व खायला त्यांना आवडतो यामुळे त्यांनी डोसा बनवतानाचे किचनमध्ये काम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे कमला येथील भारतीयांना आपल्यातीलच वाटू लागल्या आहेत. पण कमला या चाणाक्ष व चतुरही आहेत. एकीकडे भारतीय वंशाचे असल्याचे त्या जाहीरपणे सांगत असल्या तरी अमेरिकन नागरिक असल्याचा विशेष अभिमान असल्याचेही त्यांनी अनेकवेळा विधान केले आहे. कमला या वंशभेदाविरोधात आवाज उठवत असल्याने अमेरिकेतील गोर्‍यांपेक्षा कृष्णवर्णीयांना त्या जवळच्या वाटतात.

kamala harris

अमेरिकेत अध्यक्षपद निवडणुकीच्या निकालावरून अटीतटीचा सामना सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार की डेमोक्रेटीक पक्षाचे जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पण अमेरिकेतील भारतीयांचे लक्ष मात्र भारतीय वंशाच्या व उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याकडे आहे. कारण भारतीय वंशाची ही ५३ वर्षीय महिला अमेरिकन भारतीयांची नौका पार करणार अशी भाबडी समजूत येथील लोकांची आहे.

याच पार्श्वभूमीवर सध्या अमेरिकनच नाही तर भारतीय मीडिया कमला हॅरिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. पण खरंच कमला या अमेरिकन भारतीयांसाठी तारणहार ठरणार की त्यांचीच नाही तर भारताचीही डोकेदुखी वाढवणार हे येणारा काळच सांगणार आहे. कारण कमला यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता त्या मुरब्बी वकिलाबरोबरच महत्वाकांक्षी राजकीय महिलादेखील आहेत. चेन्नईच्या डॉक्टर श्यामला गोपालन या कमला यांच्या आई असून त्याअमेरिकेतील नामांकित ब्रेस्ट कॅन्सर तज्त्र आहेत. तर त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे मूळचे जमैकन नागरिक असून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. बहीण माया ही देखील बिझनेस वुमन असून राजकारणात सक्रिय आहे. कमला दोन वर्षांच्या असताना त्यांचे आईवडील विभक्त झाले. त्यानंतर कमला व माया यांचा सांभाळ एकट्या श्यामला यांनी केला. श्यामला यांना अमेरिकेत अनेकवेळा वंशभेदाचा सामना करावा लागला. त्यांच्या साध्या राहणीमानावरून त्यांना अनेकवेळा अपमानितही व्हावे लागले होते. पण तरीही हिंमत न हरता श्यामला अमेरिकेत पाय रोवून उभ्या राहिल्या. अशा कणखर महिलेच्या पोटी जन्माला आल्याने कमला यांनी अनेक उन्हाळे पावसाळे जवळून बघितले आहेत. आईचे मूळ चेन्नईत असल्याने कमला यांचे अनेकवेळा भारतात येणे जाणे होते. भारतीय वंशाच्या असल्याने त्यांना भारतीय लोकांची मानसिकता, संस्कृती यांचेही उत्तम ज्ञान आहे. डोसा बनवायला व खायला त्यांना आवडतो यामुळे त्यांनी डोसा बनवतानाचे किचनमध्ये काम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे कमला येथील भारतीयांना आपल्यातीलच वाटू लागल्या आहेत. यामुळे अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांना ट्रम्प आणि बायडेन यांच्यापेक्षा कमला अधिक जवळच्या वाटतात. पण कमला या चाणाक्ष व चतुरही आहेत. एकीकडे भारतीय वंशाचे असल्याचे त्या जाहीरपणे सांगत असल्या तरी अमेरिकन नागरिक असल्याचा विशेष अभिमान असल्याचेही त्यांनी अनेकवेळा विधान केले आहे.

कमला या वंशभेदाविरोधात आवाज उठवत असल्याने अमेरिकेतील गोर्‍यांपेक्षा कृष्णवर्णीयांना त्या जवळच्या वाटतात. यामुळे त्यांचे जनमताचे गणितही जुळून येत असल्याचे बायडेन यांच्या घौडदौडीवरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या या इमेज बिल्डींग फंड्यामुळे त्या अल्पावधीतच येथील भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. मात्र, असे असले तरी त्यांनी अनेकवेळा सभांमधून तर कधी ट्विटमधून काश्मीरविषयी भारताच्या धोरणांना विरोध दर्शवला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर अनेक पाकधार्जिण्यांनी गळा काढण्यास सुरुवात केली होती, त्यात कमला हॅरिस आणि बायडेन हे देखील होते. त्यांनी भारताचे हे धोरण योग्य नसल्याचा कांगावा केला होता. तसेच भारत सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायद्यासही (CAA) त्यांनी विरोध केला होता. आम्ही काश्मिरींबरोबर आहोत. हे त्यांना कळायला हवे. आमचे त्यांच्याकडे लक्ष आहे. असे वक्तव्य करत त्यांनी भारतामध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे विधान केले होते. तसेच भारतविरोधी आपली भूमिकाही मांडली होती.

ज्या ज्या वेळी भारताने पाकिस्तानच्या दहशतवादविरोधात धोरणे आखली त्यास कमला व त्यांच्या टीमने कायम विरोध केला. एवढेच नाही तर जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणार्‍या चीननेच चिनी व्हायरस जन्माला घातल्याचा आरोप जगभरातून होत असताना कमला यांनी मात्र चीनधार्जिणी भूमिका घेतली होती. मात्र, गेले कित्येक वर्ष दहशतवादाच्या झळा सोसणार्‍या भारत व इतर देशांप्रती कमला यांनी कधीही भूमिका मांडली नाही. यामुळे केवळ मतांचा आकडा वाढवण्यासाठी भारतीय वंशाचा आधार घेणार्‍या कमला किती आपल्या व किती परक्या आहेत हे ओळखण्यासाठी डोळेच नाही तर कानही उघडे ठेवण्याची गरज आहे. केवळ त्या भारतीय वंशाच्या प्रथम महिला आहेत ज्या सिनेटर पदापर्यंत पोहचल्या असून लवकरच अमेरिकेसारख्या बलाढ्य व शक्तीशाली देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने भाळून जायचे कारण नाही. त्याची दुसरी बाजूही डोळसपणे बघणे गरजेचे आहे.

कमला यांच्याप्रमाणेच बायडेन यांचेही पाकिस्तान प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. अनेकवेळा बायडेन यांनीही भारताने पाकिस्तान व चीनविरोधात आखलेल्या धोरणांवर टीका केली आहे. बायडेन व कमला हॅरिस यांनी अनेकवेळा भारतविरोधात खुलेआम विधाने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या या निवडणुकीतही बायडेन यांनी मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या निवडणूक वेबसाईटवर भारताच्या (CAA) व (NRC) ला आपला विरोध असल्याचे म्हटले आहे. भारताच्या निरपेक्ष धोरणाविरोधात हे कायदे लागू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बायडेन यांची ही खेळी अमेरिकेतील मुस्लीम मतदारांचे लक्ष वेधण्याबरोबरच मताचा आकडा वाढवण्यासाठी आहे. तर कमला आपले भारतीय वंशाचे नाणे वापरून अमेरिकन भारतीयांस आपलेसे करून घेण्याचा डाव खेळत आहेत. यामुळे मुस्लीम राष्ट्रही बायडेन व कमला यांच्या नावाचा जयजयकार करत आहेत. पाकिस्तानी मीडियावरही कमला यांच्या नावाचाच बोलबाला आहे. कमला अमेरिकाच नाही तर भारतातील विशेषत काश्मिरी मुस्लिमांचा आवाज बनतील अशा चर्चा पाकिस्तानी मीडिया दाखवत आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कमला यांनी काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याला विरोध केला होता. गरज असेल तर आम्ही नक्कीच यात हस्तक्षेप करू असा इशाराच कमला यांनी भारत सरकारला दिला होता. सप्टेंबर २०२० मध्ये प्रचारादरम्यानही कमला यांनी काश्मिरींना ते एकटे नसल्याचे सांगितले होते. कमला हॅरिस या अशा अमेरिकन सिनेटर्सच्या गटात होत्या ज्यांनी CAA विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला होता. तसेच १ डिसेंबर २०१९ ला त्यांनी त्याविरोधात प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतरच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सिनेटर प्रमिला जयपाल यांची भेट नाकारली होती. त्यावर कमला यांनी प्रमिला यांच्या समर्थनार्थ ट्विट करत जयशंकर यांना विरोध दर्शवला होता.

एकंदर पाहता कमला हॅरिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना त्यामागची त्यांची भारतविरोधी भूमिकाही विचारात घ्यायला हवी. फक्त त्या भारतीय वंशाच्या महिला आहेत म्हणून त्यांच्या धूर्तधोरणांकडे कानाडोळा न करता डोळे उघडे ठेवून त्यांच्यातल्या अमेरिकन राजकारणी महिलेचाही विचार करायला हवा. सध्या तरी बायडेन यांचा विजय निश्चित झाल्याचे चित्र असले तरी कमला याच पडद्यामागून राजकारण करणार असल्याची अमेरिकेत चर्चा आहे. बायडेन यांचे वय झाले असून कमला यांच्यावर त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्याच विश्वासाने त्यांनी कमला यांना आपले रनिंग मेट म्हणून जाहीर केले आहे. यामुळे बायडेन यांचा विजय हा कमला यांचाच विजय आहे. तसेच भविष्यात बायडेन यांच्यानंतर त्याच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळण्याचाही कयास राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे भारतीय म्हणून विचार करता कमला यांच्याबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा जगातील महासत्ता राष्ट्र असलेल्या अमेरिकेची सूत्र त्यांच्या हाती येतील तेव्हा कमला या भारतीयांचा नाही तर अमेरिकन पॉलीसीचाच विचार करतील यात तसूभरही शंका नाही. यामुळे पाकिस्तानला नक्कीच चेव येईल आणि चिनी ड्रॅगनच्या अंगावरही मूठभर मांस येईल व भारतावर गुरगुरण्याची त्यांची हिंमतही वाढेल. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.