डिजिटलमध्ये यशाची गुरुकिल्ली तुमच्यापाशीच!

नेवल नावाच्या एका ट्विटर हँडलवर एक छान ट्विट आहे. त्या ट्विटमध्ये म्हंटलंय की,

कोणताही डॉक्टर तुम्हाला निरोगी ठेवू शकणार नाही
कोणताही आहारतज्ज्ञ तुमचे वजन कमी करू शकणार नाही
कोणताही शिक्षक तुम्हाला स्मार्ट करू शकणार नाही
कोणताही गुरू तुमचं मन शांत करू शकणार नाही
कोणताही प्रशिक्षक तुम्हाला फिट ठेवू शकणार नाही
शेवटी तुम्हालाच तुमची जबाबदारी स्वीकारावी लागेल

सहज आजूबाजूला नजर टाकली तर या वाक्यांमागे दडलेला अर्थ लक्षात येईल. हल्ली एक नवीनच फॅड सुरू झाले आहे. स्वयंघोषित गुरू होण्याचे!

अनेक जण दुसर्‍याला ज्ञान देण्यात कायम पुढे असतात. गरज नसताना, कुणी मागितलेले नसताना, कोणी एक पै देत नसताना उगाच आजूबाजूच्या लोकांना ज्ञानांमृत पाजत बसायचे. पूर्वी असे ज्ञान वितरित करण्यासाठी व्यासपीठ नव्हते. पण सोशल मीडियामुळे ते उपलब्ध झाले. सकाळी सूर्य उगवायच्या आधीच काहीजण दुसर्‍याची झोप मोडून त्याला शुभेच्छा संदेश पाठवून त्याद्वारे जगाचे ज्ञान देतात. यापैकीच काही रात्री समोरचा झोपला असेल याचा किंचितही विचार न करता उगाच कसले कसले मोटिव्हेशनल व्हिडिओ पाठवतात.

एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे लखपती कसे व्हायचे यावरची पुस्तके वाचून कोणीही लखपती होऊ शकत नाही. असले व्हिडिओ आणि असली पुस्तके केवळ काही वेळापुरती प्रेरणा देण्याचे काम करतात. पण त्यातून फार काही साध्य होत नाही. कारण तसे असते तर आतापर्यंत हजारो लोकांनी फेसबुकसारखी कंपनी तयार केली असती, शेकडोंनी अ‍ॅमेझॉनसारखा आपल्या कंपनीचा विस्तार केला असता. पण तसे झाल्याचे दिसत नाही. हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक ज्याला यशस्वी म्हणता येईल तसे होतात आणि त्या यशापर्यंत न पोहोचलेले काहीजण उगाच इतरांना यशस्वी होण्याचे धडे देत फिरतात. ज्याचा काडीमात्र उपयोग नसतो.

डिजिटल माध्यमांमध्येही तसेच आहे. इथे फार तयारी करून उतरला तर तुम्ही अपयशी ठरणार हे ठरलेलेच आहे. अनेकजण मला भेटायला आल्यावर किंवा त्यांना भेटल्यावर ते त्यांच्या तयारीबद्दल भरभरून बोलतात. पण यापैकी कोणीच फार यशस्वी झाल्याचे मला तरी दिसलेले नाही. त्यापेक्षा सहज म्हणून ज्यांनी नवमाध्यमात काम करायला सुरुवात केली ते जास्त पुढे गेले आहेत. त्यांच्याकडे चांगले फॅन फॉलोईंग आहे. ते या माध्यमातून चांगले पैसेही कमावत आहेत. यश ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट नाही. त्याची ठरलेली रेसिपीही नाही. काहींना सहजपणे यश मिळते, काहींना खूप कष्ट केल्यावर यश मिळते तर काहींना अपार कष्ट करूनही काहीच मिळत नाही. त्यामुळे फारसे मनाला लावून न घेता पुढे चालत राहणे एवढेच आपल्या हातात आहे.

सोशल मीडियात व्हायरल होण्यासाठी काय करायला हवे, कोणते की वर्ड वापरले पाहिजेत, टॅग्ज कसे असले पाहिजेत यावर फार डोकं लढविण्यापेक्षा मुळात आपल्या समाजाची नस आपल्याला समजली आहे का, याचा आधी विचार केला पाहिजे. जोपर्यंत समाजात मिसळत नाही, लोकांच्या भाव-भावना जाणून घेत नाही, लोकं कधी आणि कसे प्रतिसाद देतात याचा अंदाज आपल्याला येत नाही. तोपर्यंत की-वर्ड्स, टॅग्ज काहीच मदत करू शकणार नाहीत. होते असे की तांत्रिक बाबींकडेच जास्त लक्ष दिले जाते आणि लोकांना भावू शकेल, असा आशय निर्माण करण्यावर भर दिलाच जात नाही. त्यातून पुढे जे व्हायचे तेच होते.

4 अधिक 4 याचे उत्तर काय, हे शोधायचे असेल तर हातातील मोबाईलपासून गुगलपर्यंत सगळेच तुमच्या मदतीला धावून येतील. पण प्रत्येकवेळी प्रश्न इतके सरळसाधे नसतात आणि जेव्हा प्रश्न जटिल असतात त्यावेळी यश मिळणेही सोप्पे नसते. अशावेळी मोटिव्हेशन देणारी पुस्तके किंवा व्हिडिओ तुमच्या फार उपयोगी पडत नाही. तुमचा वैयक्तिक अनुभवच मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरतो. आधी म्हटल्याप्रमाणे यशस्वी होण्याची पूर्वनिश्चित रेसिपी नाही. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळी तुमच्या वाटचालीवर प्रभाव टाकत असतात. प्रभाव टाकणार्‍या घटकांना त्यावेळी तुम्ही कसा प्रतिसाद देता हेसुद्धा महत्वाचे असते. लखपती कसे व्हायचे वगैरे धाटणीच्या पुस्तकात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नसते. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत हे मान्य केलेच पाहिजे आणि त्यामागे किती वाहावत जायचे हेसुद्धा ठरवले पाहिजे.

अलीकडे नोकरी करणे म्हणजे वेडपटपणा वगैरे टाइपची मांडणीही काही जणांकडून केली जाते. व्यवसाय केला पाहिजे, उद्योग उभारला पाहिजे, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. पण तेसुद्धा एकतर्फीच आहे. समोरच्याने एखादा व्यवसाय सुरू केला म्हणून आपणही तसे करून काहीच साध्य होणार नाही. खरंतर कोणी सांगतो म्हणून काही करायचे नाही, हे ठरवूनच घ्यायला हवे. आपल्याला काय वाटते, आपल्यावर जबाबदारी काय आहे, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, हे समजून घेऊन आपण आपल्यापुरता निर्णय घेतला पाहिजे. सगळे कसे छान आहेत अशा स्वरुपाच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये दिसत असल्या तरी वास्तव नक्कीच तसे नसते. आपल्या अडचणी, दुःख लपवून अनेकजण केवळ सोशल मीडियापुरते आनंदी असल्याचे दाखवत असतात. त्यामुळे या आभासी जगाला किती महत्व द्यायचे हेसुद्धा ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. नाहीतर अपयशासोबतच भलीमोठी निराशाही हाती येणार हे निश्चित…