घरफिचर्ससारांशआयआयटीयन्सच्या फॅक्टरीची स्टोरी...

आयआयटीयन्सच्या फॅक्टरीची स्टोरी…

Subscribe

कोटा फॅक्टरीचा पहिला सिझन 2019 साली युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरश: या सीरिजला डोक्यावर घेतले. युट्युबवर मोफत उपलब्ध असलेली ही सिरीज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रदर्शित झालेली पहिली भारतीय वेबसिरीज होती. एचडी आणि थ्रीडीच्या युगात अशी कृष्णधवल सिरीज किती लोकांना आवडेल, असा प्रश्न होताच, त्यातल्या त्यात या वेबसिरीजचा टीजी हा तरुणवर्ग होता जो आधीच टेक्नोसॅव्ही बनला होता, म्हणजे फोर केच्या जमान्यात हा ब्लॅक अँड व्हाईटचा प्रयोग फसेल असंच अनेकांना वाटलं, परंतु घडलं ते याउलट कोटा फॅक्टरीचा कंटेंट तरुणवर्गाला प्रचंड आवडला आणि ही सिरीज सुपरहिट ठरली. दहावी पास झाल्यानंतर सध्या सुरू असणारी आयआयटीची जीवघेणी स्पर्धा, दरवर्षी बहुतांश आयआयटीयन देणारे कोटा शहर आणि त्यातील अतिश्रीमंत कोचिंग क्लासेस याचे वास्तव दाखविणारी ही वेबसिरीज आहे.

टीव्हीएफ भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक अशी कंपनी आहे, जी सुरुवातीपासूनच काहीतरी हटके करत आलीये, भारतीय प्रेक्षकांची नस ओळखून भावना आणि नाते या दोन गोष्टींना केंद्रस्थानी ठेवत आशय निर्माण करणे हीच टीव्हीएफची खासियत आहे. पर्मनंट रूममेट्स, पिचर्स, गुल्लक, ट्रीपलिंगपासून ते काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऍस्पिरंट्स आणि कोटा फॅक्टरी सिझन 2 पर्यंत यांच्या प्रत्येक सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या सगळ्या वेब सिरीजची खासियत म्हणजे यात भारतीय व्यक्तींचं आणि त्यांच्या वागणुकीचं केलेलं डिटेलिंग आणि त्यातून निर्माण केलेला ह्युमर, सुरुवातीपासूनच सामान्य भारतीय नागरिकाच्या आवडीचे विषय हाताळत त्यातून केलेली निखळ विनोद निर्मिती हेच टीव्हीएफच्या यशामागचे कारण आहे.

कोटा फॅक्टरीचा पहिला सिझन 2019 साली युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरश: या सीरिजला डोक्यावर घेतले. युट्युबवर मोफत उपलब्ध असलेली ही सिरीज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रदर्शित झालेली पहिली भारतीय वेबसिरीज होती. एचडी आणि थ्रीडीच्या युगात अशी कृष्णधवल सिरीज किती लोकांना आवडेल, असा प्रश्न होताच, त्यातल्या त्यात या वेबसिरीजचा टीजी हा तरुणवर्ग होता जो आधीच टेक्नोसॅव्ही बनला होता, म्हणजे फोर केच्या जमान्यात हा ब्लॅक अँड व्हाईटचा प्रयोग फसेल असंच अनेकांना वाटलं, परंतु घडलं ते याउलट कोटा फॅक्टरीचा कंटेंट तरुणवर्गाला प्रचंड आवडला आणि ही सिरीज सुपरहिट ठरली. दहावी पास झाल्यानंतर सध्या सुरू असणारी आयआयटीची जीवघेणी स्पर्धा, दरवर्षी बहुतांश आयआयटीयन देणारे कोटा शहर आणि त्यातील अतिश्रीमंत कोचिंग क्लासेस याचे वास्तव दाखविणारी ही वेबसिरीज आहे.

- Advertisement -

कोटा फॅक्टरी हे नावच प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे ठरले आहे, सीरिजच्या इंट्रोमध्ये कोटा शहरातील कारखाने आणि त्यातून निघणारा धूर, घरांचे बनलेले पीजी, क्लासेसच्या बाहेर रोज जमणारी अलोट गर्दी, अनेक स्वप्नं उराशी बाळगून त्या गर्दीचा भाग बनलेली मुलंमुली, असं सगळं या सिरीजमध्ये पाहायला मिळालं. सीरिजच्या पहिल्या सीझनचे प्रत्येक पात्र सुपरहिट ठरले, जितू भैय्या, वैभव, मीनापासून ते वार्तिका, उदय आणि शिवांगीपर्यंत प्रत्येक जण प्रेक्षकांना आवडले होते. बाहेरच्या शहरातून कोट्यात शिकायला गेलेला वैभव, नंबर वन क्लासमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून नंबर 2 च्या क्लासमध्ये शिकायला गेलेला वैभव हा कथेच्या केंद्रस्थानी होता. सिझन 2 मध्ये हीच कथा पुढे सरकते. वैभव पांडे प्रॉडिजी क्लास सोडून आता ज्या कोचिंग इन्स्टिट्यूटने त्याच्या वडिलांचा अपमान करून त्याला प्रवेश नाकारला होता त्या कोटाच्या नंबर वन क्लासचा अर्थात माहेश्वरी क्लासेसचा भाग बनला आहे. वैभवचे इतर मित्र मीना, उदय, वर्तिका हे मात्र अजूनही प्रॉडिजीमध्ये शिक्षण घेत आहेत.

एकीकडे वैभवचा वेगळा संघर्ष सुरू झालाय तर दुसरीकडे सर्वांचे फेव्हरेट जितू भैय्यादेखील प्रॉडिजी सोडून दुसरी वाट शोधत आहे. माहेश्वरी क्लासेसला टक्कर देणारा स्वतःचा कोचिंग क्लास सुरू करण्याचं स्वप्न बाळगणारा जितू भैय्या आणि आयआयटीच्या तयारीत मोठ्या मैदानात उतरलेला वैभव या दोघांची कथा म्हणजे कोटा फॅक्टरीचे दुसरे सिझन आहे, ज्यात सुश्रुत, माहेश्वरी, गगन रस्तोगी यांसारखे काही नवीन पात्रंदेखील अ‍ॅड झालीत. कोटा शहरात आयआयटीयन निर्माण करणार्‍या सर्वात मोठ्या फॅक्टरीचा भाग बनलेला वैभव, दुसर्‍या क्रमांकाच्या फॅक्टरीचे भाग असलेले मीना, वर्तिका, उदय आणि कोटा फॅक्टरीमध्ये स्वतःची नवीन फॅक्टरी निर्माण करण्याचं स्वप्न बाळगणारा जितू भैय्या अशा औद्योगिक वसाहतीत राहणार्‍या या कामगार आणि मालकांची कथा जितकी रंजक आहे, तितकीच सद्य:स्थितीवर भाष्यही करते.

- Advertisement -

एखादा भारतीय सिनेमा असो अथवा वेब सिरीज पहिला भाग हा आपल्याकडे नेहमीच दुसर्‍या भागाला वरचढ ठरलेला दिसतो, याला कारण म्हणजे आपल्याला दुसर्‍या भागाकडून असलेल्या अपेक्षा ज्यातील काही अपेक्षा या अवास्तवदेखील असतात. तरीदेखील आपल्याकडे बर्‍याच सिनेमा आणि सीरिजचे दुसरे भाग हे पहिल्या भागाच्या तुलनेत कमकुवत दिसतात, मग ती सेक्रेड गेम्स असो किंवा फॅमिली मॅन कोटा फॅक्टरीच्या बाबतीतदेखील असंच काही घडल्याचं मला वाटलं, हे वाटण्यामागे मुख्य कारण आहे या दुसर्‍या भागाचे लेखन पहिला सिझन आठवला की त्यात दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे जीवघेणी स्पर्धा आणि दुसरी म्हणजे त्या स्थितीत असणारा ह्युमर, पहिल्या भागात ज्या कोटा शहराची ओळख आपल्याला करून दिली जाते, ज्या कोचिंग क्लास संस्कृतीची ओळख आपल्याला होते, त्या दुसर्‍या भागात तितक्या जाणवत नाहीत.

दुसर्‍या भागात सीरिजमध्ये बराच वैयक्तिक कंटेंट टाकण्याच्या प्रयत्नात मुख्य मुद्दा भटकल्यासारखा वाटतो. उदाहरणार्थ पहिल्या सीझनमध्ये वैभवच्या ऑरगॅनिक केमिस्ट्रीपर्यंत डीटेलींग केलेल्या सीरिजमध्ये यावेळी त्याच्या नोट्सबद्दलदेखील जास्त बोलण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. याउलट सेक्स एज्युकेशनपासून प्रेरणा घेत मुलींच्या मासिक पाळीपासून ते मुलांच्या हस्तमैथुनापर्यंत विषयांना हात या सीरिजमध्ये घातला आहे. तो वाईट किंवा चुकीचा आहे असं मला वाटतं नाही, परंतु ते सांगण्याच्या नादात मुख्य मुद्दा काहीवेळ बाजूला पडलेला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे यातील ह्युमर तितका शिल्लक राहिलेला दिसत नाही, आलम खानने साकारलेला उदय बिनधास्त कमी आणि मूर्ख जास्त वाटतो, पहिल्या सिझनमध्ये मिनाचं तुम अमीर लोग कभी भी केक खाते हो क्या? म्हणणं जितकं अपील होत होतं, तितकं दुसर्‍या सीझनमध्ये होत नाही. जितू भैय्या उत्तम आहेच, पण एखाद दोन सीनमध्ये त्याचं लेक्चरदेखील अनावश्यक आणि बोअर लेक्चर वाटायला लागतं.

राघव सुब्बु याच दिग्दर्शकाने कोटा फॅक्ट्रीचा दुसरा भाग दिग्दर्शित केलाय. सौरभ खन्ना आणि सहलेखकांनी मिळून ही कथा लिहिली आहे, ज्यात वर पाहता कुठेही लूप होल्स दिसत नसले तरी, पहिल्या भागाच्या तुलनेत ही कथा थोडी साधारण वाटते. मात्र याचा अर्थ मुळीच असा नाही की ही संपूर्ण सिरीज फालतू किंवा टाईमपास आहे, फक्त पहिल्या भागाच्या तुलनेत आढळणार्‍या उणिवा मी अधोरेखित केल्या आहेत, बाकी सिरीज उत्तम आहेच. कॅमेर्‍याबद्दल एक गोष्ट नक्की सांगेल, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असलेल्या या सीरिजमध्ये कलर नसतानाही काही दृश्ये उत्तम जमून आलीत, उदा. वैभवची आई जेव्हा त्याला भेटायला कोट्याला येते, तेव्हा आईच्या कुशीत झोपणार वैभव आणि खिडकीत प्रकाशाच्या येजा होण्याने होणारी रात्र सकाळ ते दृश्य अत्यंत उत्तम जमून आले आहे. शेवटच्या भागातील रिजल्टचा दिवस आणि त्या दिवशीचा कोटा शहरातील माहोल दिग्दर्शकाने उत्तम हेरला आहे.

पात्रांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास जितू भैय्या आणि वैभव दोन्ही पात्रांनी आपलं काम चांगलं केलंय, पण या सीझनमध्ये सरप्राइज आहे ते माहेश्वरी क्लासेसच्या संचालकाच्या भूमिकेत असलेले समीर सक्सेना, पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत त्यांचा अभिनय लक्षात राहतो. सुरुवातीलाच नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या भाषणापासून जी नकारात्मक प्रतिमा उभी राहते, तीच पुढेही कायम होते, हीच त्यांच्या पात्राची खासियत आहे. गगन रस्तोगी, वैभवची आई, सारिका मॅडम असे आणखी काही नवीन पात्रंदेखील सिनेमात आहेत ज्यांनी आपलं काम उत्तम केलंय. सिरीजच्या 5 भागात शेवटचा भाग मला अधिक आवडला, रिझल्टच्या दिवशी कोटा शहरातील उत्सव, टॉपर्स आणि काही गुणांनी टॉप करण्याचं स्वप्न हुकलेले विद्यार्थी, माहेश्वरी क्लासेसच्या मधोमध उभी असणारी बीएमडब्ल्यू , काही क्षणात बदलणारे पोस्टर्स, नेट कॅफेवर होणारी गर्दी हे सगळं अगदी उत्तम जमून आलंय. सिरीजचा क्लायमॅक्स पाहून पुढचा सिझन येणार हे तर नक्की झालंच आहे, फक्त डीटेलींगची जी खासियत टीव्हीएफची आहे ती जपली तर नक्कीच पुन्हा एकदा एक उत्तम वेबसिरिज पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -