घरफिचर्ससारांशमुस्लीम महिलांचा पडद्याबाहेरचा संघर्ष

मुस्लीम महिलांचा पडद्याबाहेरचा संघर्ष

Subscribe

प्रख्यात पत्रकार-लेखिका-वृत्तचित्र निर्मात्या-माध्यमकर्मी भाषा सिंह यांचं ‘शाहीन बाग : लोकतंत्र की नई करवट’ हे पुस्तक राजकमल प्रकाशनाच्या सार्थक या उपक्रमांतर्गत २०२२ मध्ये प्रकाशित झालं. दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती प्रस्तावित कायद्याच्या विरोधात मुस्लीम स्त्रियांनी केलेल्या आंदोलनाचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक. दिल्लीत सुरू झालेलं हे आंदोलन पुढे देशाच्या इतरही भागांमध्ये पोहचलं. अनेक अंगांनी हे आंदोलन ऐतिहासिक होतं. मुस्लीम मुली-महिलांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेला हा लढा विलक्षण होता.

–प्रवीण घोडेस्वार

शाहीन बाग आंदोलनाच्या निमित्ताने कदाचित प्रथमच अरुंद, चिंचोळ्या गल्ल्या आणि बंद दुकानांच्या मध्ये आपल्या गालांवर तिरंगा रेखाटून मोठ्या संख्येने मुस्लीमबहुल वस्त्यांमधल्या मुली नि स्त्रिया आंदोलनात सहभागी झाल्या. या पुस्तकातल्या पानांमधून मुस्लीम स्त्रियांच्या ताकदीचा आणि अनेक शतकांपासून न दिसलेल्या झुंजार वृत्तीचा प्रत्यय येतो. यातून त्यांची पराभव न स्वीकरण्याची विजीगिषु वृत्ती सबंध विश्वाला दिसली.

- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती प्रस्तावित कायदा आणि नागरिकांची नावं असलेली नोंदवहीच्या विरोधात तीन महिन्यांपेक्षाही अधिक काळ चाललेल्या या आंदोलनाने देशात असहमती प्रदर्शित करायला वेगळे आयाम मिळवून दिलेत. स्वतंत्र भारतातल्या जनआंदोलनांमध्ये शाहीन बाग आंदोलन निश्चितपणे एक वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी झालं. कारण याची व्याप्ती दिल्लीपर्यंतच मर्यादित न राहता देशामध्ये अनेक ठिकाणी ती पसरली. पुस्तकात राजधानी दिल्ली इथल्या शाहीन बागपासून ते देशातल्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या असंख्य शाहीन बागांच्या कहाण्या सांगितलेल्या आहेत. हाडे गोठवणार्‍या थंडीत देश नि देशाची एकात्मता कायम राहण्यासाठी या स्त्रियांनी रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष वाचकांना अंतर्मुख करतो.

एकाच जागेवर बसून उर्वरित ठिकाणांच्या घडामोडींचे हे संकलन नसून लेखिकेने संवेदनशील, सजग नि जागरूक पत्रकाराच्या नजरेतून प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेलं अनुभवकथन आहे. आंदोलनस्थळी बसलेल्या स्त्रिया, सत्ताधार्‍यांवर आसूड ओढणारे पेंटिंग्ज, हिजाब परिधान करून माईकवर स्वातंत्र्याच्या घोषणा देणार्‍या तरुणी, संविधानाची प्रस्ताविका, सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या नावाची छोटी वाचनालये, गांधीजी व डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा आणि चळवळीतल्या सार्‍या घोषणा, गाणी-म्हणी-गजल असा सारा माहोल लेखिकेने जिवंत केलाय. त्यांच्या लेखनातून या आंदोलनाची धग आपल्यापर्यंत पोहचत असल्याने आपणही कळत नकळतपणे याचा हिस्सा होतो.

- Advertisement -

पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. यातल्या प्रत्येक प्रकरणागणिक वाचकांची आंदोलनविषयक समज अधिकाधिक समृद्ध, सखोल नि उन्नत होत जाते. याशिवाय इथं आढळून येणारी अतुलनीय उदाहरणे, हुंकार, सृजनाच्या नव्या पद्धती विशद करून संविधान आत्मसात केलेल्या लोकांसमवेतचा संवादही घडवला आहे. आंदोलनाची बदनामी करण्यासाठी रचलेलं षड्यंत्र ते सत्ताधार्‍यांचा उद्देश आणि बहुतांशी माध्यमांनी निभावलेली एकांगी आणि पक्षपाती भूमिका यावरही झगझगीत प्रकाशझोत टाकलाय. शाहीन बाग आंदोलनाचं वास्तव चित्र जगासमोर आणण्याचा प्रयत्न लेखिकेने केलाय. समाजात शाहीन बागविषयी प्रचलित असलेली प्रतिमा किती निराळी आहे हे यातून स्पष्ट होतं. संविधानाच्या मूलभूत भावनेशी जोडणार्‍या ‘अमन का राग’ने पुस्तकाचा प्रारंभ होतो. इथं हिंदी साहित्यातले ख्यातनाम कवी शमशेर बहादुर सिंह यांची स्वातंत्र्याची कविता आठवते. सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांची रचना ‘हम देखेंगे…’ आपल्याला एका एकात्म परंपरेशी जोडते. यासाठी शाहीन बागेच्या आजींनी लढा उभारला.

‘नई करवट’ या पहिल्या प्रकरणापासून ते ‘आगे का रास्ता’ या शेवटच्या प्रकरणापर्यंत संघर्षाच्या कथा आणि त्यातली पात्रे यांची रेलचेल दिसते. पुस्तकातल्या ‘आवाजे और सूरज से सामना’ या प्रकरणात देशभर पसरलेल्या शाहीन बागेतल्या स्त्रियांनी आपलं म्हणणं लेखिकेला सांगितलं आहे. त्या म्हणतात की, या आंदोलनामुळे मुस्लीम स्त्रियांची भूमिका देशासमोर व्यक्त झाली. तसेच कुटुंबातही त्यांच्या नातेसंबंधात सकारात्मक बदल घडून आलेत. अनेक स्त्रिया यानिमित्ताने प्रथमच घराबाहेर पडल्या आणि रात्रभर आंदोलनात सहभागी झाल्या. यादरम्यान लखनऊ इथल्या एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने तिच्या समुदायाचं दु:ख व्यक्त केलं. ‘‘आमच्या किन्नर समूहाचं काहीच नसतं.. ना घर.. ना आई-वडील.. आता तुम्हीच विचार करा की, आमचे आजोबा-पणजोबा यांची कागदपत्रे कुठून दाखवायची? आम्ही काय दाखवणार आणि तुम्ही आम्हाला कुठले समजणार? आम्ही कधीपासून आमच्यासाठी रोजगार मागत आहोत, आत्मसन्मान मागत आहोत, सरकार हे तर देत नाहीये. उलट आमच्यासाठी अडचणी उभ्या करीत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मुस्लिमांसाठीच नव्हे तर गरिबांनाही अडचणीत आणणारे आहे. किन्नरांसाठी तर हे खूप कठीण आहे!

लेखिकेने या आंदोलनाची वैशिष्ठ्ये जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञ, जाणकारांशीही चर्चा केली. यात येल विद्यापीठाचे प्राध्यापक रोहित डे, सर्वोच्च न्यायालयातले अधिवक्ता वृंदा ग्रोवर, योजना आयोगाच्या माजी सदस्या सईदा हमीद, रेमन मेगसेसे पुरस्कारप्राप्त स्वच्छता कर्मचारी चळवळीचे नेते बेजवाडा विल्सन यांचा समावेश असून त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून केलेलं विश्लेषण महत्त्वपूर्ण आहे. आंदोलनाबाबतची एक विशेष बाब पुस्तकात नोंदवण्यात आलीय, ती म्हणजे इथं उदारमतवादी, गांधीवादी, डावे, समाजवादी, आंबेडकरवादी, परिवर्तनवादी अशा विविध विचारसरणीचे लोक यात सामील झाले होते.

ज्या गोष्टी किंवा वैशिष्ठ्यांना स्त्रियांमधल्या कमतरता, उणिवा समजलं जातं त्यांनाच या महिलांनी बलस्थाने बनवलं. तिरंगा, संविधान, संविधानाची प्रास्ताविका, प्रेम-सौहार्दाच्या गोष्टी ही या आंदोलनाची आयुधे होती. या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारपर्यंत आपलं म्हणणं कलात्मकतेने पोहचवलं. ह्या अभिनव पद्धती शाहीन बागच्या स्त्रियांनी शोधून काढल्या, असं म्हणता येईल. या आंदोलनासंदर्भात सत्ताधारी नेत्यांनी, काही माध्यमांनी केलेला अपप्रचारही लेखिकेने उघडकीस आणला आहे. या संघर्षाला पैसा आणि बिर्याणीशी जोडण्यात आलं. हे आंदोलन कोणीतरी प्रायोजित केलं असल्याचं भासवण्याचा प्रयत्न झाला. बदनामीचा हा भडिमार सहन करूनही संपूर्ण देशात हे आंदोलन पोहचवलं, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. १५ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० दरम्यान हे आंदोलन चाललं. या कालावधीत आंदोलनकर्त्यांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. रात्र-रात्रभर रस्त्यावर आंदोलन करणार्‍या स्त्रियांना कोणी त्रास दिल्याची, छेडखानी केल्याची घटना घडल्याची बातमी आली नाही. देशातल्या स्त्रियांमध्ये त्या जिवंत असल्याची जाणीव या आंदोलनाने निर्माण केली.

एकीकडे प्रचंड समर्थन, प्रेम, आदर तर दुसरीकडे कमालीचा मत्सर, द्वेष, हेटाळणीदेखील या आंदोलनाच्या वाट्याला आली. खोटे फोटो, असत्य दावे प्रसारित करून या स्त्रियांचं चारित्र्यहनन करण्यात आलं. अनेक मोठ्या पुढार्‍यांनी स्त्रियांविषयी अपशब्द काढले. तरीही या स्त्रियांचा आत्मविश्वास अढळ राहिला. त्या डगमगल्या नाहीत. टीव्हीवरच्या वाद-विवादात त्यांनी अत्यंत सडेतोड नि मुद्देसूद मांडणी केली. इतक्या मोठ्या संख्येने स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच मुस्लीम स्त्रिया आपल्या हक्क व अधिकारांसाठी रस्त्यावर उतरल्या. पुस्तकातल्या ‘सृजन की तिखी धार’ या प्रकरणात ज्यामुळे स्त्रियांचा संयम आणि धीर टिकून राहिला अशा क्रांतिकारी कविता-गजल-गाणी-घोषणा यांचा परामर्श घेतलाय. अनेक स्त्रियांनी नव्या रचना केल्या. सब का खून है शामिल… (राहत इंदोरी), हम कागज नही दिखायेंगे… (वरुण ग्रोवर), हम देखेंगे… (फैज), सब याद रखा जाएगा… (अमीर अजीज) ह्या रचनांनी आंदोलनकर्त्यांना साहस, प्रेरणा, उभारी, आत्मविश्वास दिला. स्त्रियांच्या ऐतिहासिक आंदोलनाचा संवेदनशीलतेने मांडलेला दस्तऐवज असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. पुस्तकात शेवटी देशभरातल्या शाहीन बागांची यादीही दिली आहे. लोकशाही व संविधानिक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रेरित करणारं हे पुस्तक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -