घरफिचर्ससारांशअमानवी मूल्यांना प्रतिरोध

अमानवी मूल्यांना प्रतिरोध

Subscribe

कुणाच्या संकल्पनेतून काय विचार निर्माण होईल याचा कधीही अंदाज बांधता येणार नाही. असं म्हणतात की, ‘जे न देखे रवी ते देखे कवी.’ वास्तविक पाहता पृथ्वीवर सर्वदूर सूर्याचा प्रकाश पोहचतो, सूर्याला सर्वच दिसतं. तरीही कल्पना केली जाते की सूर्यापेक्षा जास्त कवीला सुचतं. अंधारलेले कोपरे आणि वाईट प्रवृत्ती कवीच्या नजरेतून सुटू शकत नाही. कवी आपल्या शब्दांच्या रूपाने त्याची मांडणी करीत असतो. कवी सुनील ओवाळ काव्यक्षेत्रातील एकदम नवीन नाव. त्यांना या गढूळ वातावरणामध्ये व्हायरस दिसला. त्यावरील उपाय म्हणून त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाला अँटीव्हायरस नाव दिलं.

–प्रदीप जाधव

व्हायरस आणि अँटीव्हायरस हे दोन्ही शब्द संगणकाशी अत्यंत निगडित आहेत. संगणकात व्हायरस आला म्हणजे एखादी फाईल करप्ट होते किंवा संगणकातील कामावर हल्ला होतो. हा हल्ला परतवून लावण्यासाठी अँटीव्हायरसचा वापर केला जातो. अशी साधारण ओळख व्हायरस आणि अँटीव्हायरस या शब्दांशी सर्वसामान्यांची आहे. सामान्यपणे आपल्या असं लक्षात येतं की व्हायरस पसरत असताना धोका वाढत असतो आणि त्याला प्रतिरोध करण्यासाठी अँटीव्हायरसचा वापर केला जातो. अधिक सोप्या भाषेत आपण असंही म्हणू शकतो की, व्हायरस म्हणजे आजार पसरवतो. त्याच्यावरचा उपाय औषध म्हणून अँटीव्हायरसचा वापर केला जातो किंवा अँटीबायोटिक म्हणजेच अँटीव्हायरस.

- Advertisement -

व्हायरस आणि अँटीव्हायरस हे दोन्ही परस्पर शब्द जरी असले तरी मानवी मूल्यांसंदर्भात त्यांचा तसा वेगळ्या अर्थाने संदर्भ घेता येतो. कारण मानवी जीवन मूल्यांवर हल्ला करणारा एक विचार प्रवाह म्हणजे व्हायरस तर मानवी मूल्य जोपासणारी, ती वृद्धिंगत करणारी, त्यावर उपाय सुचवणारी दुसरी विचारसरणी म्हणजे अँटीव्हायरस असं आपण म्हणू शकतो. शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, विचार करण्याची शैली वेगवेगळी असू शकते. कुणाच्या दृष्टीला काय दिसेल, कसं दिसेल, त्याची प्रतिभा काय असू शकते हे प्रत्येकाचं वेगवेगळं अनुमान असू शकतं. कवी केशवसुतांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘विश्वाचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ कुणाच्या दृष्टीला सृष्टी कशी दिसेल याचा अंदाज बांधता येत नाही.

साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणि एकंदर मानवी जीवनामध्ये निर्माण झालेले वादळ शमवण्याकरिता पुन्हा अँटीव्हायरससारख्या विचारांची गरज आपल्याला जाणवते. एका बाजूला रोग पसरला की दुसर्‍या बाजूला रोग प्रतिकार करणारी संशोधनं करून औषध शोधलं जातं. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना व्हायरस निर्माण झालेला अख्ख्या जगाने अनुभवला आणि तेव्हापासून खर्‍या अर्थाने व्हायरस हा शब्द जास्त प्रचलित झाला. कोरोना व्हायरस निर्माण झाल्यानंतर त्याला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध करण्यात आली म्हणजे त्याला प्रतिरोध करण्यात आला. तसाच आज मानवी मूल्यांवर आघात करणार्‍या व्यक्ती, संस्था, संघटनांचा अमानवी विषारी विचार प्रवाह जास्त प्रमाणात पसरला जातो. त्याला रोखण्यासाठी काही उपाय आहे का? तर तो उपाय म्हणजे प्रतिरोध अर्थात अँटीव्हायरस असं म्हणावं लागेल. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक, वैचारिक सर्व क्षेत्रांमध्ये आज वैचारिक गोंधळ निर्माण झाला असून माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही.

- Advertisement -

त्यामुळे हल्ले आणि प्रतिहल्ले हे सतत व्यक्ती-व्यक्तीत, राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सुरू आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन एक वर्ष उलटलं. अजूनही ते थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. याला मानवी ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंपणा, सत्ता आणि मला या जगावर राज्य करायचं आहे या आविर्भावाने अंतर्मनात निर्माण झालेली वरचढपणाची भावना कारणीभूत आहे. म्हणजेच इर्षा, द्वेष भावना यांना आपण व्हायरस म्हणू, तर सद्भावनेला अँटीव्हायरस संबोधू शकतो. मानवी जनसमुदायांमध्ये द्वेष पसरवणारी, मन कलुषित करणारी व्हायरस ही संकल्पना आधुनिक आजची आहे का? तर नाही. अँटीव्हायरस हा प्रतिशब्द नव्याने वापरल्याने आपणास तो नवा आहे असं वाटत असलं तरी गेल्या अनेक शतकांपासून ही लढाई सुरू आहे. अनेक शतकांपासून मानवी आणि अमानवी या दोन तत्त्वप्रणालींमध्ये संघर्ष, लढाई सुरू आहे. हा लढा व्यक्ती-व्यक्तीत, राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये सुरू आहे.

कुणाच्या संकल्पनेतून काय विचार निर्माण होईल याचा कधीही अंदाज बांधता येणार नाही. असं म्हणतात की, ‘जे न देखे रवी ते देखे कवी.’ वास्तविक पाहता पृथ्वीवर सर्वदूर सूर्याचा प्रकाश पोहचतो, सूर्याला सर्वच दिसतं. तरीही कल्पना केली जाते की सूर्यापेक्षा जास्त कवीला सुचतं. अंधारलेले कोपरे आणि वाईट प्रवृत्ती कवीच्या नजरेतून सुटू शकत नाही. कवी आपल्या शब्दांच्या रूपाने त्याची मांडणी करीत असतो. कवी सुनील ओवाळ काव्य क्षेत्रातील एकदम नवीन नाव. त्यांना या गढूळ वातावरणामध्ये व्हायरस दिसला. त्यावरील उपाय म्हणून त्यांनी आपल्या काव्यसंग्रहाला अँटीव्हायरस नाव दिलं.

कवी सुनील ओवाळ यांनी अँटीव्हायरस या काव्यसंग्रहाच्या रूपाने समाजविघातक कृत्यांवर प्रतिहल्ला करणार्‍या औषधांची पेरणी कवितेच्या माध्यमातून केली आहे, ज्यामधून सुदृढ समाज निर्माण व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. काव्यसंग्रहात मांडणी केलेल्या कविता वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. या संग्रहाचं शीर्षक जरी नवीन असलं तरी समकालाशी अत्यंत निगडित आहे. परिवर्तनवादी विचार हा प्रत्येक कालखंडात आलेला आहे. तो नवीन विचार नाही, पण तरीही वेगळ्या स्वरूपात कवी सुनील ओवाळ यांनी कवितेचा आधार घेत जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. संगणकामुळे सगळं जग जवळ आलं, असं म्हटलं जातं, परंतु संगणकाने अनेक चांगल्या कामांना खीळ घालण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण केलं आहे. व्हायरसच्या रूपाने दहशतीने जबरदस्तीने रेटून विचार प्रवाह लादणार्‍यांचा एक वर्ग आणि विचाराला प्रतिरोध करणारा दुसरा वर्ग हा प्रत्येक कालखंडात निर्माण झाला आहे.

समाजामध्ये अनेक प्रकारचे व्हायरस निर्माण झाले आहेत किंवा शिरले आहेत. या व्हायरसने संपूर्ण समाजव्यवस्था पोखरून उद्ध्वस्त केली आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. एका अर्थाने समाज आजारी पडला आहे. म्हणून या आजारी पडलेल्या समाजाला पुन्हा नव्याने एकत्र करण्यासाठी जी प्रक्रिया लागते, त्याला कवीने अँटीव्हायरस असं संबोधलं आहे. अँटीव्हायरस या काव्यसंग्रहात एकूण ६५ वेगवेगळ्या विषयांच्या कविता आहेत. काही कविता मानवी मूल्य सांगणार्‍या, तर काही सामाजिक वेदना अधोरेखित करणार्‍या, वैचारिक, प्रेम कविता, निसर्ग कवितांनी हा काव्यसंग्रह समृद्ध आहे. सर्वच कविता अर्थपूर्ण असून वाचनीय आहेत. त्यात प्रकर्षाने जाणवणारी अत्यंत महत्त्वाची कविता म्हणजे अँटीव्हायरस. या कवितेत कवीने अगदी मोजक्या शब्दांत समाज व्यवस्थेचं वर्णन केलं आहे. ते लिहितात…

विकारांच्या पेन ड्राईव्हवर
कॉपी करून पेस्ट केले जाताहेत
ईर्षा, अहंकारांचे घातक प्रोग्राम्स

एकीकडे मानवी विकासासाठी संपूर्ण जग नवनवीन संशोधन करीत आहेत, तर दुसरीकडे काही देश, काही व्यक्ती या विनाश करणार्‍या विषाणूंची निर्मिती करीत आहेत. काही संस्था, संघटना केवळ जातीय, धार्मिक द्वेशापायी मानवी जीवितास धोका उद्भवणार्‍या विध्वंसक घटकांचे अंधानुकरण करीत आहेत. ग्लोबलायझेशनच्या युगात मनाच्या संगणकावर रोज द्वेषादी विषाणूंचे हल्ले होत आहेत नि झटपट नष्ट होऊ लागले आहेत. मानवतेच्या सॉफ्टवेअर मेमरीत जतन केलेल्या हळव्या प्रेमाच्या कसदार फाईल्स मार्केटिंगच्या व्यवहारात दुर्लक्षित होत चालल्या आहेत. दया, क्षमा, शांती, मैत्री, प्रेम, करुणा, प्रज्ञा, शील, सदाचार, स्वतः आनंदी जगा आणि इतरांना आनंदी जगू द्या हे जीवनाचं सूत्र आहे. आपण स्वच्छंदीपणे वावरताना इतरांना इजा होऊन घायाळ होणार नाहीत याची काळजी घ्यायची असते. मनाच्या संगणकावर सतत विषाणूंचे हल्ले झाल्याने मानवतेच्या सॉफ्टवेअर मेमरीत जतन केलेल्या माणुसकीच्या फाईल्स करप्ट झाल्या आहेत. महापुरुषांचे मौलिक विचार म्हणजे अँटीव्हायरस, असं कवी तळमळीने सांगत आहे.

याच संग्रहातील अत्यंत महत्त्वपूर्ण ‘युद्ध सुरू होतंय’ या कवितेत कवीने अचूक शब्दांत सद्यस्थितीचं कथन केलं आहे. ते या कवितेत म्हणतात…

सामंजस्य करार झुगारून
आता युद्ध सुरू होतंय…
विकारांचं सैन्य तैनात झालंय,
नि काबीज केलीय त्यांनी
माझी सम्यक दृष्टीने विकसित झालेली मनोभूमी.

आपापसातील बंधुभाव नष्ट होऊन आता सर्वांमध्ये एक नैराश्य आलं आहे. त्यातून माणुसकी नष्ट झाली आहे. जे जे चांगलं ते मलाच हवं आहे यासाठी स्पर्धा सुरू आहे. माणुसकी आणि माणूस यात युद्ध सुरू असून माणुसकी हरली आहे व माणूस जिंकला आहे. माणूस जीवनात अपयशी ठरला की मग स्वत:ला संपवण्याकडे वळतो. ही सृष्टी माणसाला जगायला शिकवते. त्यामुळे अपयशात खचून न जाता आत्मविश्वासाने नव्याने उंच भरारी घ्यायची असते.

या संग्रहातील प्रत्येक कवितेच्या शेवटी कवीने मोलाचा संदेश दिला आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला तपासून काही चाचण्या करून मग त्यावर औषध सांगतो, त्याप्रमाणे अँटीव्हायरसच्या माध्यमातून कवीने उपाय सुचवले आहेत. माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी निरामय जीवन जगण्याकरिता सर्वात मोठा उपाय म्हणजे बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे. सर्व विकार जर नष्ट करायचे असतील तर त्यावर बुद्धाचं तत्त्वज्ञान, बुद्ध विचार प्रणाली हे औषध आहे. कवी म्हणतो की,

तथागता! मनाचं संगणक संपूर्णत: करप्ट होण्याआधी कळू दे सार्‍या जगाला तुझ्या कल्याणकारी तत्त्वज्ञानाच्या अँटीव्हायरसचं महत्त्व.

–(लेखक साहित्याचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -