घरफिचर्ससारांशसाहित्यसखी : एक ऊर्जास्त्रोत

साहित्यसखी : एक ऊर्जास्त्रोत

Subscribe

दोन महिला एकत्र आल्या म्हणजे साड्या, दागदागिने, सासू-सुना, जावा-भावा अशा एक नाही अनेक विषयांवर किती बोलू नी किती नाही असे त्यांना होत असते. निसर्गाने स्त्रीला अनेक सद्गुणांबरोबरच काही दुर्गुणही दिले आहेत ते म्हणजे इर्षा, मत्सर आदी. वेळ प्रसंगानुरूप ते उफाळून येतच असतात, परंतु ‘साहित्यसखी’ हा साहित्यिक महिलांचा असा मंच आहे की राग, द्वेष, मत्सर यांना त्याजून सामाजिक हित समोर ठेवून साहित्याची सेवा करण्याचा प्रयत्न साहित्यसखी करीत असतात.

-आरती डिंगोरे

तसं बघितलं तर मैत्रिणी खूप असतात, पण सखीचे स्थान हे काही निराळेच असते. जी सहृदय असून मनाची खिन्नता दूर करते ती सखी. सखी आपल्या भावनांना वाट करून देते. तिच्या प्रेमळ स्पर्शात आश्वासकता जाणवत असते. योग्य-अयोग्याची जाणीव करून देणारे तिचे बोल काळजाला भिडतात. तिचा सहवास हवाहवासा वाटतो. उन्हातील वार्‍याची झुळूक असते सखी. दाह निवारणारे चंदन असते सखी.

- Advertisement -

अशीच एक नाही तर अनेक सख्यांची मिळून असणारी ती साहित्यसखी! दोन महिला एकत्र आल्या म्हणजे साड्या, दागदागिने, सासू-सुना, जावा-भावा अशा एक नाही अनेक विषयांवर किती बोलू नी किती नाही असे त्यांना होत असते. निसर्गाने स्त्रीला अनेक सद्गुणांबरोबरच काही दुर्गुणही दिले आहेत ते म्हणजे इर्षा, मत्सर आदी. वेळ प्रसंगानुरूप ते उफाळून येतच असतात, परंतु साहित्यसखी हा साहित्यिक महिलांचा असा मंच आहे की राग, द्वेष, मत्सर यांना त्याजून सामाजिक हित समोर ठेवून साहित्याची सेवा करण्याचा प्रयत्न साहित्यसखी करीत असतात.

विविध उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिलांपासून ते गृहिणीपर्यंत सर्व स्तरातील साहित्यिक महिला एकत्र येऊन संमेलन यशस्वी करण्याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात, व्यक्त होत असतात. आनंदाची देवाण-घेवाण करीत असतात. यामधून सकारात्मक ऊर्जेची देवाण-घेवाण होते. सर्व सखींना ही ऊर्जा वर्षभर पुरते. हा मंच म्हणजे साहित्यसखींकरिता ऊर्जेचा स्त्रोतच आहे. यामध्ये सखीच्या घरची मंडळी सखींच्या पाठीशी नव्हे सखींच्या सोबत असतात हेही तितकेच खरे. कुणीतरी संधी देईल यापेक्षाही आपण संधी निर्माण करावी असे मंचच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जाधव यांचे सांगणे असते. या मंचचा हेतूच वैचारिक देवाण-घेवाण हा आहे.

- Advertisement -

कोरोना काळातदेखील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचाने ‘विचार पेरत जाऊ’ या ऑनलाईन वैचारिक व्याख्यानमालेचे उत्कृष्ट असे आयोजन केले होते. महाराष्ट्रभरातील नामवंत उत्तम अशा वक्त्यांच्या मार्गदर्शनातून वैचारिक आदानप्रदान घडवून आणले होते. तसेच ‘सावित्री उत्सवा’च्या निमित्ताने महिलांकरिता काव्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करून पारितोषिक वितरणही केले होते. संमेलनादरम्यान ‘मी अरुणा बोलतेय’ हा अत्याचारित अरुणा शानबाग यांची व्यथा मांडणारा एकपात्री प्रयोग मंचच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जाधव सादर करतात, तेव्हा महिलांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही.

साहजिकच साहित्यसखी साहित्यिक महिला मंचशी मी योगायोगाने जोडले गेले. डॉ. प्रतिभा जाधव या मंचच्या प्रमुख आहेत. मंचच्या सचिव सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री अलका कुलकर्णी यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, पहिल्या साहित्य संमेलनापासून ते आतापर्यंत सखी रंजना बोरा यांच्याबरोबर सूत्रसंचालन करण्याचा आगळावेगळा अनुभव, सर्व साहित्य सखींची भेट सारं काही आनंददायी असतं.

डॉ. प्रतिभा जाधव या नावाप्रमाणेच प्रतिभावंत असून सर्व सखींना एका सूत्रात गोवण्याचे काम त्या अतिशय कुशलतेने करीत असतात. ज्या सखीकडे जे कौशल्य आहे त्यानुसार ती सखी या मंचामध्ये आपले योगदान देत असते. महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेला मंच म्हणजे साहित्यसखी महिला साहित्यिक मंच होय. स्त्री जाणिवेच्या वेदनांना खुले व्यासपीठ म्हणजे साहित्यसखी महिला साहित्यिक मंच. महिलांना मोकळा श्वास घेता येईल असं हे खुलं आकाश म्हणजे साहित्यसखी महिला साहित्यिक मंच. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने हा मंच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित करीत आहे.

राज्यभरातून अनेक महिला साहित्यिक या संमेलनात सहभागी होत असतात. यावर्षीचे हे पाचवे साहित्य संमेलन आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज आणि कर्तृत्ववान महिला प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष म्हणून या मंचाला लाभलेल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वेदश्री थिगळे, कविता बोंडे, शमिभा पाटील, सुनंदाताई जरांडे, दिशा पिंकी शेख, प्रा. सुमती पवार, प्रा. छाया लोखंडे, डॉ. सीमा गोसावी आदी तर यावर्षीच्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार व कविसंमेलन अध्यक्ष साहित्यिक प्रा. सुमती पवार ह्या आहेत, ज्यांना आम्ही सर्व सखी प्रेमाने ‘माऊली’ असे म्हणतो.

आतापर्यंत अनेक मोठी साहित्य संमेलने होऊन गेलीत, परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद महिला साहित्यिकांना मिळाले आहे. कुठल्याही साहित्य संमेलनात मंचावर एखादीच महिला दिसते. साहित्य क्षेत्रात दर्जेदार लिखाण करणार्‍या अनेक महिला साहित्यिक असूनही महिलांना का डावलले जाते? याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. आपण कितीही म्हटले की, स्त्री-पुरुष समानता आहे पण तरीदेखील अजूनही पुरुषप्रधान संस्कृती ही बघावयास मिळतेच, अनुभवास येतेच. ‘अहो रुपम! अहो ध्वनी!’ या न्यायाप्रमाणे तू मला चांगलं म्हण, मी तुला चांगलं म्हणेन या प्रवृत्तीमुळे कंपूशाही करून ‘माझा माईक आणि माझंच ऐक’ ही वृत्ती निर्माण झाल्याने गुणवत्ता असूनही महिलांना डावलले जाते. महिलांना संमेलनात स्थान दिले जाते ते फक्त सन्मानचिन्ह हार-बुके देणेघेणे, रांगोळी काढणे इ. हे कितपत योग्य आहे? याचा विचार व्हायलाच हवा.

काही साहित्यिक संस्था आहेत की ज्या खरोखर महिलांना उत्तम मंच उपलब्ध करून देऊन समान संधी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशा संस्था अत्यल्प आहेत आणि म्हणूनच साहित्यसखी महिला साहित्यिक मंच महिलांना सन्मानाने स्वतंत्र हक्काचा मंच उपलब्ध करून देते. ठसठसणारी जखम लिहिण्याच्या प्रयत्नातून वैयक्तिक आणि सामाजिक व्यथा मांडत साहित्यसखी मोकळा श्वास घेत आत्मनिर्भर होत आहेत हेच या मंचाचे आतापर्यंतचे यश आहे, असे म्हणायला हरकत नाही.

-( लेखिका साहित्यिक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -