घरफिचर्ससारांशमहाराष्ट्राचे दुसरे वेड...

महाराष्ट्राचे दुसरे वेड…

Subscribe

नाटकाचे सादरीकरण हे नाटकाचे खास वैशिष्ठ्य असल्याने अनेक कलांचा समन्वय नाट्यकलेत होतो. त्यामुळे मनोरंजनाच्या दृष्टीने नाटकास महत्त्व आहे. प्राचीन काळात नाटकास खेळ असे म्हटले जात असे. त्यामुळे या खेळाने अनेकांना भुलविले. संतांपासून आधुनिक साहित्यापर्यंत नाटकाने आपल्या अस्तित्वाचा पैस व्यापला. अनेक स्थित्यंतरांचा सामना करीत ते आपल्यापर्यंत पोहचले. अगदी स्वातंत्र्य चळवळीतही नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. एवढेच नाही तर अनेक मान्यवर लेखकांनाही नाट्यलेखनाचा मोह आवरता आला नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे दुसरे वेड म्हणजे नाटक, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले होते.

-डॉ. अशोक लिंबेकर

५ नोव्हेंबर १८४३ साली सांगली येथे विष्णुदास भावे यांनी मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर सादर केले आणि तेव्हापासून मराठी रंगभूमीची घोडदौड सुरू झाली. सुरुवातीची नाटके ही पौराणिक स्वरूपाची होती. संगीत नाटक आणि पौराणिक संविधानक असे त्याचे स्वरूप होते. वास्तविक पाहता नाटक ही कला भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून प्रचलित आणि प्रसिद्ध होती. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ याची साक्ष देतो. मराठीतही लोकनाट्य, विधिनाट्य या स्वरूपात ते होते. नाटकाचे सादरीकरण हे नाटकाचे खास वैशिष्ठ्य असल्याने अनेक कलांचा समन्वय नाट्यकलेत होतो. त्यामुळे मनोरंजनाच्या दृष्टीने नाटकास महत्त्व आहे. प्राचीन काळात नाटकास खेळ असे म्हटले जात असे. त्यामुळे या खेळाने अनेकांना भुलविले.

- Advertisement -

संतांपासून आधुनिक साहित्यापर्यंत नाटकाने आपल्या अस्तित्वाचा पैस व्यापला. अनेक स्थित्यंतरांचा सामना करीत ते आपल्यापर्यंत पोहचले. अगदी स्वातंत्र्य चळवळीतही नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन केले गेले. एवढेच नाही तर अनेक मान्यवर लेखकांनाही नाट्यलेखनाचा मोह आवरता आला नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे दुसरे वेड म्हणजे नाटक, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले होते. किर्लोस्कर, देवल यांच्या संगीत नाटकांनी मराठी नाटकाचा पाया मजबूत केला. पुढे गडकरी, रांगणेकर, वरेरकर, अत्रे यांनी या नाटकाला अवघड काळात समर्थपणे पुढे नेले. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्हीही नाटकांनी मराठीचा नाट्यसंसार फुलवला, पण खर्‍या अर्थाने नाटक बहरले ते साठनंतरच.

१९६० नंतरचा कालखंड हा सर्वार्थाने मराठी नाटकाच्या उत्कर्षाचा कालखंड आहे. वाड्मयीन आणि प्रायोगिक या दोन्ही अंगांनी मराठी नाटक या काळात समृद्ध होत गेले. आशय, विषय आणि तंत्रादीबाबतही मूलभूत परिवर्तन रंगभूमीवर या काळातच घडले. नाट्यगत घटकामध्ये झालेल्या या परिवर्तनाचा परिणाम नाटकातील स्त्रीचित्रणावरही पडणे स्वाभाविक होते. नवनाट्य आणि नवनाटककार यांचा उदय रंगभूमीवर झाला. नाटकाकडून ज्या अपेक्षा यापूर्वीचे प्रेक्षक करीत होते त्यातही बदल होत गेले. प्रेक्षकांची नाटकाकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली. अर्थात असे नव्याचे स्वागत करणार्‍या आणि हे नवतेचे भान आलेल्या प्रेक्षकांची संख्या मर्यादितच होती तरीही हा बदल महत्त्वाचा होता. एकीकडे पारंपरिक धाटणी आणि त्या स्वरूपाच्या नाटकालाही मोठी मागणी होती आणि असे पारंपरिक नाटककार या काळात आघाडीवर होते.

- Advertisement -

त्यात अत्रे, कालेलकर, कोल्हटकर, शिरवाडकर, विद्याधर गोखले, दारव्हेकर आदींचा समावेश होता, तर या सांकेतिकतेला विरोध करून नवे विषय चोखाळणारे नाटककार म्हणून विजय तेंडुलकर, खानोलकर, जयवंत दळवी, सुरेश खरे, अच्युत वझे, श्याम फडके, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार नवनाटककारही रंगभूमीवर प्रवेशित झाले. असा व्यावसायिक व प्रायोगिक या दोन्ही प्रवाहांचा विकास या काळात घडून आला. त्याचबरोबर नव्या नाट्यसंस्था, नवे नाट्य दिग्दर्शक, नवे नाट्यकलावंतही या काळात मराठी रंगभूमीवर उदयास आले. हा अनोखा व अपूर्व मेळ आणि नव्याची ओढ असणारा सर्जनशील कलावंतांचा संच या काळात रंगभूमीला लाभल्याने रंगभूमीच्या विकासाला तो उपयुक्तच ठरला. मराठी कथा, कादंबरीच्या क्षेत्रात हा बदल १९४५ नंतर दिसून आला होता. ते चित्र नाट्यसृष्टीत निर्माण व्हायला या काळाची वाट पाहावी लागली. याची विविध कारणे आहेत. त्याची चर्चा येथे प्रस्तुत नाही. साठोत्तरी नाटकांनी मात्र प्रस्थापित नाट्य संकेतांना झुगारून नवतेचा मार्ग धरला.

रूढ मार्ग सोडून प्रायोगिक मार्ग अनुसरणार्‍या रूपवेध, आविष्कार, अनिकेत, रंगायन या संस्थांचा उल्लेख यासंदर्भात विशेषत्वाने करावा लागतो. प्रायोगिक नाटकांनी मराठी रंगभूमीच्या कक्षा विस्तारित करून तिला आशयघन तर बनवलेच, परंतु मराठी नाटकाचा जागतिक प्रवासही याच काळात घडला. घाशीराम कोतवाल जागतिक स्तरावर गेलेले मराठीतील पहिले नाटक ठरले. या नाटकाने मराठी नाटकाला जागतिक परिमाण प्राप्त करून दिले. ‘१९६० नंतरच्या मराठी नाट्यसृष्टीमध्ये विविधांगी विषय हाताळले, तोलले आहेत. त्याचप्रमाणे १९६० पूर्वीचे नाटककार नि या काळातल्या आघाडीच्या नाटककारांनी रंगभूमीचा हा काळ गाजविला आहे.’ अशा प्रकारे दोन्ही प्रवाहांतील नाटकांच्या उत्कर्षाचा हा काळ होता. या काळातील प्रायोगिक नाटकाने तर मराठी परिनिरीक्षण मंडळालाही जबरदस्त हादरा दिला. काही नाट्यकृतींवर तर न्यायालयातही खटले दाखल झाले. अशा सर्वच बाबतीत हा काळ बहुचर्चित ठरला.

१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्राची अस्मिता, भाषा, साहित्य, कला, लोकसंस्कृती, लोककला इत्यादींची जोपासना व विकास करण्याचा शासकीय पातळीवरून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात झाली. त्यातच नाटक आणि इतर ललित कलांना अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला. या घटनांचा परिणाम म्हणजेच मराठी नाट्यसृष्टीत नवी नाट्यचळवळ जोमाने सुरू झाली. १९५४ पासूनच नाट्यस्पर्धेसारखे उपक्रम राबवून शासकीय पातळीवर नाट्यकलेला उत्तेजन मिळाले.

नाटकावरील करमाफी, विविध पुरस्कार, शिष्यवृत्त्या, मुंबई व पुण्याबाहेर झालेली नाट्यगृहांची निर्मिती, नाट्य शिबिरांचे आयोजन इत्यादी अनेक प्रयत्नांमुळे नाट्यक्षेत्रात उत्साहाचे वारे वाहू लागले. मागे उल्लेखिल्याप्रमाणे रंगभूमीशी निगडित नवा वर्ग निर्माण झाला. या सर्व नवघटकांमुळे मराठी नाटकाला नवतेचे परिमाण लाभले. साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश मंडळ इत्यादी संस्थांची निर्मिती झाली आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावर चैतन्याचे वारे वाहू लागले.

मराठी नाटक या काळात वास्तववादी बनत होते. मानवी अस्तित्वाचे प्रश्नही ते मांडत होते. रंगभूमीवरील काही नाटकांच्या आविष्काराने नाट्यविषयक जाणिवा व संकल्पनाच बदलून टाकल्या. नाट्यविषय, आकृतिबंध, पात्ररचना, सवांद, भाषा इत्यादी नाट्यगत घटकात मोठा बदल घडून आला. परिणामी नाटकातील स्त्री पात्रांच्या आविष्कारावरही याचा प्रभाव पडला. स्त्रीकडे व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून पाहण्याचे भान या काळातील नाटककारांना येत होते. पाश्चात्य नाटककार इब्सेनने युरोमधील सुसंस्कृत, नीतिमान दांभिक मध्यमवर्गाचा बुरखा फाडून त्यांच्या स्वार्थीपणाचे, तथाकथित आदर्शांचे उघडे-नागडे दर्शन घडवून प्रस्थपित समाजाला धक्का दिला.

प्रस्थापित आदर्शांच्या दडपणामुळे माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होते हे त्याने दाखवून दिले. स्त्रीच्या मानसिक व्यथेचे आणि तिच्या कुचंबनेचे यथार्थ दर्शन घडवून स्त्रीच्या मनात आत्मसन्मानाची प्रतिष्ठापना केली. याच प्रेरणा प्रभावातून मराठी नाटकही स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्रीमुक्तीचा जयघोष करू लागले. १९६० नंतर आणि पुढे १९७५ नंतर हा स्वर तीव्र बनला. प्रायोगिक नाटकातून स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न, तिच्या अंतरंगातील विचार-विकार, क्रौर्य, हिंस्रता, स्त्रीमनातील लैंगिक प्रेरणा, मनोव्यापार इत्यादींचे दर्शन अत्यंत धाडसाने प्रायोगिक नाटकांनी घडवले. या सर्व नव्या घटकांनी नाटकातील स्त्रीचित्रणाला वेगळी गती मिळाली. जीवनातील सत्य, शिव,

सुंदरतेबरोबरच त्यातील भ्रष्टता, कुरूपता ही दुसरी बाजू प्रभावीपणे पुढे येऊ लागली. या पिढीने सार्‍या लेखनविषयक संकेतांना मूठमाती देण्याचे काम हिरिरीने केले. जीवनाच्या भ्रष्टतेची चित्रणे व्हायला लागली. सुंदर, गोंडस, हवेसे वाटणार्‍या सांकेतिक जीवनदर्शनाचा काळ संपुष्टात आला. माणसाच्या मनातील व जीवनातील अज्ञात दालने प्रकाशात यायला लागली. माणसाच्या अस्तित्वाचा वेध घेणे, त्याचा अर्थ लावणे, त्याच्या आदिम प्रेरणांचा शोध घेणे अशा गोष्टी कलेद्वारे होऊ लागल्या. माणसात वसलेली आदिम कामप्रेरणा, हिंस्रता, दांभिकपणा, त्याची एकाग्रता, असुरक्षितता याविषयीची चिंतने नानाविध आकृतीबंधांना जन्म देऊ लागली. साठोत्तरी नाटकातही याच आशयाचे प्रतिबिंब उमटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -