घरफिचर्ससारांशभावभावनांचा ओलावा...

भावभावनांचा ओलावा…

Subscribe

कविता म्हणजे अंतरंगातील भावभावनाचा शब्दांचा ओलावा असतो. मनात दाटलेल्या भावनाचे दर्शन म्हणजे कविता. कविता ही जीवन तत्वज्ञानाचे दर्शन असते. कविता ही अंतरिक संवाद असते. तो संवाद कधी कधी बाह्य असतो. आपल्या सूक्ष्मतेचे निरीक्षण नोंदविताना अंतरगांतील भावभावनांचे दर्शन ‘शब्दकस्तुरीचा चांदणचुरा’ या कविता संग्रहात रसिकांना वाचायला मिळते. कस्तुरी देवरूखकर यांचा हा कविता संग्रह असून विविध भावभावनांनी सजलेल्या कविता वाचकांना वाचन अनुभव देऊन जातात.

कवितेत भक्ती आहे, प्रेम आहे आणि भोवतालमध्ये असलेल्या समस्यांचे दर्शन आहे. त्यामुळे कविता संग्रहात विविध भावभावना अनुभवायला मिळतात. कवयित्री शब्दांच्या प्रेमात असल्याचा कविता वाचताना सातत्याने अनुभव येतो. शब्दांच्या सामर्थ्यांचा अनुभव त्यांना आहे. शब्दाची शक्ती आणि भक्ती याबद्दलचा विश्वास मनात ठासून भरलेला आहे. त्या आपल्याला जीवन अनुभवात येणार्‍या वेदना कवयित्रीच्या आयुष्यालादेखील आहे, पण त्या वेदनाच्या परिस्थितीत कवयित्री लिहिते..

हमसून बरसले ऋतू वेदनांचे
शब्दास मिळतो रे आधार चांदण्याचा

- Advertisement -

जग वेगाने बदलते आहे. खासगीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरणाच्या नंतर माणसं आणि व्यवस्था वेगाने बदलली. नात्यातील वीणही सैल होते आहे. माणसं बदलली त्याप्रमाणे गावही बदलत आहेत. पण गावांचे शहरीकरण होताना आपण बरेच काही गमवले आहे. गाव म्हणजे मनाच्या श्रीमंत असलेल्या माणसांची गर्दी होती. तेथे माणसामाणसांत प्रेमाचा ओलावा होता आणि त्यामुळे गावपण टिकून होते. प्रेमाचा जागरही होता. शहर मात्र त्या उलट दिशेने विकसित होताना दिसत आहेत. त्यातील आंतरिक भेदाच्या संदर्भाने गाव कवितेत त्या लिहितात..

मनाची श्रींमती
प्रेमाचा जागर
गावाच्या वेशी
घुटमळे शहर

- Advertisement -

जीवनात एक तरी हात हातात हवा आहे म्हणून आधाराचा शोध सुरू असतो. प्रत्येकाच्या जीवनात त्या आधाराची ओढ असते.त्या ओढीने जीवन फुलणार आहे ही अंतरिक जाणीव अनेकदा असते. त्याच्या अस्तित्वाशिवाय जीवनात भावनेच्या विजांचा कडकडाट अनुभवायला येत असतो. त्या अनुषंगाने भावनाचे प्रतिबिंब कवितत पडते. त्या संदर्भाने कवयित्री सांग कधी या कवितेत लिहितात..

सांग कधी येणार तू जीवनी माझ्या
कुठवर तोलणार मी, गतजन्मची सजा
सांग कधी देणार तू हात हाती माझ्या
कुठवर झेलणार मी, भावनेच्या वीजा

जीवनात कष्टकरी बापाच्या वेदना सातत्याने असतात. त्या जाणून घेत. त्या वेदनाचे ओझे बापाला वाटत नाही, त्याचा प्रवास सुरू असतो. त्यामागील कारण नेमकेपणाने नोंदवत त्या सांगू पाहत आहेत. बापाचा प्रवास केवळ आशेच्या किरणावर सुरू आहे. आज नाही तर उद्या परीस्थिती बदलेल म्हणून बाप प्रवास सुरू ठेवतो. परिस्थितीत मात्र कधीच बदलत नाही. त्या जुनाट खुंटीवर उद्याचे स्वप्न टांगले जाते आणि सारा जीवन प्रवास त्याच भाकरी आणि कोरड्यासावरती सुरू राहतो. त्याच्या वाट्याला फारसे वेगळे काही येत नाही हे बापाचे वास्तव टिपताना कवयित्री बाप कवितेत म्हणतात..

आशेच्या जुनाट खुंटीवर
स्वप्न उद्याचं टांगलं
कोरड्यास भाकरीवर
सारण जन्माच रांगलं

कविता वाचताना जाणवते..कवितेत वेगवेगळे भाव आहेत, वेगवेगळ्या प्रकारात लिहिल्या गेल्या आहेत. मात्र कवयित्रीची ताकद भक्तीचे दर्शन घडविणार्‍या ओवी आणि अभंगाच्या रचना प्रकारात अधोरेखित होते. खरेतर जीवन अनुभवाने जे वाट्याला येते ते शब्दात अधोरेखित होत असते. मात्र दत्तनाम कवितेत संताना जे सापडले आहे तेच कवयित्री मांडू पाहते आहे. या संसारात आपले जीवन झीजत जाते, मात्र तरी ते झीजणे थांबत नाही. त्याचे कारण विषयाची वासना संपत नाही. ते वास्तव लिहिताना कवयित्री लिहितात..

इह संसारात / काया ही झीजली
हौस ना फीटली / विषयांची

त्याचबरोबर महाराष्ट्राची पंरपरा असलेल्या संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे वैशिष्ठ्य पुन्हा वेगळी आहेत. वारकरी संप्रदाय हा माणूसपणाचा धर्म जाणणारा आहे. त्याला धर्माच्या द्वेषाचे रंग नाहीत. माणूसपण ठासून भरलेला त्याचा रंग आहे. यारे यारे सान थोर…अवघ्या जातीचे नारीनर असं म्हणत त्यांनी जातीभेदही नाकारला आहे.भक्ती हाच त्यांचा धर्म प्रवास आहे. कर्म करत भक्तीमार्गाने चालत राहणे ही त्यांची परंपरा..त्यांच्या भक्तीला सोंग आणि ढोंग नाही हे भक्ती कवितेत सांगताना त्या लिहितात..

वारकरी जीव / जाणूनी धर्मासी
मानूनी कर्मासी / भक्तीकरी

स्त्रीच्या आयुष्याच्या वेदना अजूनही कायम आहेत. तिला जीवनात वेगवेगळ्या नात्याच्या भूमिका कराव्या लागतात. त्या भूमिका नेहमी सुखद अनुभवाच्या असतील असे नाही तर त्या पलिकडे तिला वेदनांचा प्रवास करावा लागतो. तिच्या वाट्याला संघर्षाची कहाणी येते, पण तरी ती पराभूत होत नाही. तिच्या त्या सार्‍या वेदनांना शब्दात पकडताना तिचा प्रवास अधोरेखित केला आहे. त्याबद्दल त्या लिहितात,

आयुष्याची संध्याकाळ झाली
संघर्षाची पानं उलगडताना
अंगणातला आम्रवृक्ष मात्र
हळहळत होता,
भूमिका तिची पाहताना

स्त्रीच्या आस्तित्वात तिचे आईपण आणि बाईपण या दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत. तिच्या या दोन्ही भूमिका पेलताना तिला मोठा संघर्ष करावा लागतो. त्या भूमिका पेलताना तिच्या जीवाची घालमेल होते. ती घालमेल नेमकेपणाने पकडत त्या भावना शब्दात व्यक्त करताना लिहितात..

आक्रोशाच्या हुंदक्यामधून
अव्यक्त त्या निमिषामधून
ती घुटमळत पेलतेय
आईपण बाईपण..

जीवनातील वास्तवाचे भान सातत्याने कवितेत प्रतिबिबींत होते. कवयित्रीचे निरीक्षण आणि जीवनानुभव त्यांनी अनेक कवितेत शब्दबद्ध केले आहेत. जीवनात संघर्षाला पर्याय नाही. त्या संघर्षाची होळी पेटविताना त्या मनात उमटलेल्या वेगवेगळ्या भावनांचे रंग आहेत, त्याची धुळवड खेळू पाहत आहेत. ते सांगताना त्या लिहितात..

मी पाहिले जीवनाला
संघर्ष होळी पेटवताना
भावनांच्या नवरंगात
धुळवड साजरी करताना

शाळेचे प्रत्येकाच्या जीवनाशी घट्ट नाते असते. शाळेत आपण काय काय अनुभवतो याचे प्रतिबिंब शब्दातून व्यक्त होते. शाळा सुटली..आणि जीवन प्रवास सुरू झाला तरी तिच्या कडू गोड आठवणी होत राहतात. त्यापैकी काही आठवणी अचानक आठवत जातात..आणि पुन्हा भूतकाळात जाणे घडते. कवयित्रीच्या जीवनात शाळा दिसते, मात्र त्याचवेळी ती आठवणींची पाठशाळा जेव्हा आठवते, तेव्हा मात्र फक्त छडीची छमछम आठवते. ते सांगताना त्या लिहितात..

कधी घरी अचानक
शाळा मजला दिसते
आठवणींच्या पाठशाळेत
छडी छमछम् वाजते

सध्याचे राजकारण हे संशयाच्या भोवर्‍यात आहे. राजकारणाचा इतिहास म्हणजे समृध्दीची परंपरा होती. ती माणसं देव नव्हती पण ती देवापेक्षा कमी नव्हती. लोक त्यांच्यावरती विश्वास ठेऊन मागे चालत होते. त्याग आणि समर्पण हा त्यांचा भाव होता. स्वतःच्या पलिकडे राष्ट्र आणि समाज त्यांच्या अंत:करणात होता. वर्तमानात राजकारण हा जणू व्यवसाय झाला आहे. त्या संदर्भातील त्यांचे निरीक्षण त्या राजकारण या विडंबनात्मक कवितेत नोंदविताना त्या लिहितात..

राजकारण खरेच काय असते
गरजवंताची माय असते
चारा खाणारी गाय असते
वरकमाईची साय असते
डगमगणार्‍या खुर्चीचा पाय असते

आपले घर कसे असावे याचा आराखडा प्रत्येक माणूस घर बांधताना करीत असतो. त्या घराच्या भिंती मुक्या असतात. पण कवयित्री जे घर बांधू पाहते आहे. त्या घराच्या भिंती केवळ माती दगडाच्या नाहीत तिला राष्ट्राचे घर उभारताना ती समानतेच्या भिंतीने घर बांधू पाहते आहे. त्या समानतेच्या भिंतीवरती आपुलकीचे छप्परही असावे, अशी अपेक्षा करताना दिसते आहे. असे घर असणार असेल तर त्या घरातील माणसांची नाती अधिक घट्ट असतील आणि त्याचवेळी त्या नात्याला एक प्रकारची उबही असणार आहे. ही घराची अपेक्षा फारच सुंदर कल्पना आहे..असे वास्तवात आले तर जगाचे चित्र बदलू शकेल, पण त्या अपेक्षा व्यक्त करताना कवयित्री लिहितात..

घर माझ्या मनातलं
समानतेच्या भिंती
आपुलकीचे छप्पर
उबदार सारी नाती

कविता संग्रहातील कविता म्हणजे अनेक भावभावनांचे प्रतिबिंब आहे. एकाचवेळी अनेक विषयांची पेरणी कवितासंग्रहात आहे. कविता वाचताना वाचकांना आनंद मिळेलच..त्यातील भाषेतही कधी बोलीचे शब्द आहेत तर कधी कधी प्रमाण भाषेतील शब्दांचा प्रभाव आहे. कवयित्री या भावभावनांचे प्रतिबिंब दर्शित करताना रसिकांना अनेकदा भूतकाळाच्या पटलावर घेऊन जाण्याबरोबर भविष्यातील वाटाचालीचा प्रवास घडविते. कविता संग्रहात एकूण 52 कवितांचा समावेश आहे. हनुमंत चांदगुडे यांची प्रस्तावना आणि समर्पक मुखपृष्ठ आहे.

-कविता संग्रहाचे नाव- शब्दकस्तुरीचा चांदणचुरा
-कवयित्री- कस्तुरी देवरूखकर
-प्रकाशन- परिस प्रकाशन
-किंमत-100/- रू.
-पाने-72.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -