Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश वासनेच्या बाजारात कायद्याचा बोजवारा!

वासनेच्या बाजारात कायद्याचा बोजवारा!

Subscribe

आपल्या देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. शिक्षेची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण शिक्षा कठोर नाहीत. गुन्हेगाराला एखाद्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली की तिची अंमलबजावणी होत नाही. त्याला वरच्या न्यायालयात बाजू मांडण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे यात बराच वेळ जातो. मला वाटते जो काही कसून तपास व सत्यता पडताळणी करायची आहे ती खालच्या स्तरावरच व्हावी. त्यामुळे कायदा एक खेळणे बनून जातो. मुळात आपल्याकडे न्यायप्रविष्ट प्रकरणे सुनावणीसाठीच लवकर येत नाहीत. त्याची अनेक कारणे आहेत. आपल्याकडे गुन्हा सिद्ध व्हायला व प्रत्यक्ष शिक्षा द्यायला प्रचंड उशीर होतो हे सत्य आहे. तपास पारदर्शक होत नाही. शिक्षा झाली तरी ती कठोर होत नाही. परिणामी गुन्हेगारांवर वचक राहत नाही.

जेव्हा एखादी मुलगी प्रेमात फसवणूक झाल्याने किंवा कोणी ब्लॅकमेल केल्यामुळे स्वतःच आयुष्य संपवते तेव्हा एकीकडे मुलगी गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे बदनामी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे पालक मी पाहिले आहेत. रस्त्यात त्रास देणार्‍या रोडरोमियोंमुळे जेव्हा एखाद्या मुलीचे कॉलेजला जाणे बंद होते तेव्हा माझी काय चूक आहे, या तिच्या प्रश्नाचे एकच उत्तर असते. बेटा तुझी मुलीची जात आहे.

रक्षाबंधन किती उत्साहात साजरा झाला हे आमच्या बंधू भगिनींनी ठेवलेल्या तुम्ही काय म्हणता त्याला हा! डीपीवरून लक्षात आले. फेसबुक आणि त्या व्हॉट्सअ‍ॅपवर भावा-बहिणीचं प्रेम भरभरून उतू गेलं, पण त्याच व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला एक मेसेज मनात घर करून गेला. जर तुम्हाला तुमच्या भावाने विचारले की, काय गिफ्ट हवं, तर त्याला इतकंच सांगा की माझा जेवढा आदर करतो तेवढाच इतर मुलींचाही कर. खरंच जर प्रत्येकाने रस्त्यावरून एकट्या जाणार्‍या मुलीला संधी नाही तर जबाबदारी म्हणून पाहिलं तर नक्कीच अशा घटना थांबवता येतील.

- Advertisement -

मित्रांनो, अलिकडच्या काळात मुली-महिलांवरील वाढते बलात्कार व हत्या यामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाची नाचक्की होत आहे. आदर्श संस्कृती व समृद्ध परंपरा लाभलेल्या या देशात स्त्रीयांना अत्यंत पवित्र नजरेने पाहिले जात आले आहे, मात्र आता कठुआ, उन्नाव, इंदोर येथील बलात्कार प्रकरणांनंतर असे वाटायला लागले आहे की देशातील मानवता संपुष्टात आली आहे की काय? कारण बलात्कार अगदी कोवळ्या जिवांवरही होत आहेत व वृद्धांवरही. तसेच ते अगदी किशोरवयीन शाळकरी मुलांकडूनही होत आहेत, तरुणांकडूनही होत आहेत व वृद्धांकडूनही. अडाणी असोत अथवा सुशिक्षित कोणीच अपवाद नाहीत. तसेच ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत हा घाणेरडा व चीड निर्माण करणारा प्रकार घडताना दिसत आहे. असे प्रकार अलिकडे जवळजवळ दररोज घडत आहेत. काही उघड होतात तर काही उघड होत नाहीत. तपास यंत्रणांनी त्यांच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना तत्काळ कठोर शिक्षा करायला हवी व यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा सर्व स्तरातून आवाज उठत आहे.

वासनेच्या बाजारात स्त्रियांच्या चारित्र्याचा सौदा होत आहे. या व्यवस्थेत ५ वर्षांच्या चिमुरडीवरसुद्धा बलात्कार होत आहे. ही व्यवस्था कौरवांची भरसभा झाली आणि या व्यवस्थेने द्रौपदीला विवस्त्र केले. द्रौपदीचे वस्त्रहरण उघड्या डोळ्याने बघणारे डोळे धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले. स्त्रियांवर हात टाकणारे हात कलम करणारे शासन इतिहासजमा झाले. म्हणूनच निर्भया, आसिफा, प्रियंकाचा ही व्यवस्था गळा दाबत आहे आणि द्रौपदीचे वस्त्रहरण करणारा नराधम बिनधास्तपणे फिरत आहे. या व्यवस्थेत ५ वर्षांच्या चिमुरडीवरसुद्धा बलात्कार होत आहे आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारा येथे देशद्रोही ठरत आहे.

- Advertisement -

आपल्या देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. शिक्षेची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण शिक्षा कठोर नाहीत. गुन्हेगाराला एखाद्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली की तिची अंमलबजावणी होत नाही. त्याला वरच्या न्यायालयात बाजू मांडण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे यातच बराच वेळ जातो. मला वाटते जो काही कसून तपास व सत्यता पडताळणी करायची आहे ती खालच्या स्तरावरच व्हावी. त्यामुळे कायदा एक खेळणे बनून जातो. मुळात तर आपल्याकडे न्यायप्रविष्ट प्रकरणे सुनावणीसाठीच लवकर येत नाहीत. त्याची अनेक कारणे आहेत. मी त्यात जात नाही, पण आपल्याकडे गुन्हा सिद्ध व्हायला व प्रत्यक्ष शिक्षा द्यायला प्रचंड उशीर होतो हे सत्य आहे. तपास काळात तो पारदर्शक होत नाही. शिक्षा झाली तरी ती कठोर होत नाही. परिणामी गुन्हेगारांवर वचक राहत नाही.

मित्रांनो, स्वराज्यात रांझ्याच्या बाबाजी पाटलाने एका स्त्रीसोबत गैरवर्तन केल्यावर महाराजांनी त्याचा चौरंग केला होता! (दोन्ही हात व दोन्ही पाय छाटणे) त्याला तर शिक्षा झालीच सोबतच इतरांनाही जरब बसली. आता स्वराज्यातील कायदे व शिक्षापद्धतीचा आदर्श घेऊन सरकारनेही कायद्यात बदल करून बलात्कार्‍यांना अशीच जबर शिक्षा करायला हवी, जेणेकरून पुन्हा कोणी असे दुष्कृत्य करायला धजावणार नाही. तुम्ही म्हणाल फाशीपेक्षा कोणती मोठी शिक्षा आहे? तर मला वाटत नाही फाशी कठोर शिक्षा आहे. शिक्षा अशी असावी की गुन्हेगार मरूही नये व जगू शकू नये. आयुष्यभर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटावा व त्याने स्वतः लोकांना असा गुन्हा तुम्ही करू नका, असा उपदेश करावा. इतर लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतील तेव्हा त्याला पाहाताक्षणीच त्याने काय गुन्हा केला आहे हे त्यांच्या लक्षात यावे. त्यांच्या मनात अशा गुन्ह्यांबाबत भीती निर्माण व्हावी. दुसरे असे की गुन्हा केला आहे की नाही हे शोधायला वर्षानुवर्षे कशाला लागतात? थातूरमातूर कैद व विलंब अशाने गुन्हे कमी होणार नाहीत आणि असेच होत राहिले तर लोक आरोपींना पोलिसांत देण्याऐवजी स्वतःच शिक्षा देतील. फैसला on the spot! परिणामी अराजकता माजेल.

आज समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रत्येक जण अशा घटनांमुळे अस्वस्थ पण हतबल आहे. जेव्हा घटना घडते तेव्हा प्रसारमाध्यमांतून टीका होते, चर्चा होते. आपण सामाजिक माध्यमातून निषेध नोंदवतो आणि शांत बसतो. मी तर या सर्व प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ आहे. मीच काय आपण सर्वच अस्वस्थ आहोत. कारण सर्वांनाच आई, बहीण, बायको, मुलगी, भाची, पुतनी, नात आहे. आपल्या देशात स्त्री चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य देशात बलात्काराकडे एक अपघात म्हणून पाहिले जाते, मात्र आपल्याकडे तसे नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे बलात्काराला स्त्रीला जबाबदार समजले जाते. तिचे राहणीमान, तिचे स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान यामुळेच असे घडले असावे असा तुघलकी तर्क काढला जातो. बलात्कारात महिलेची चूक असण्याचा प्रश्नच कसा काय येऊ शकतो हेच मला कळत नाही? पुरुष आपल्या पाशवी शक्तीचा वापर करून आपली अतिरेकी कामवासना शमविण्यासाठी अत्याचार करतो. हा एक कठोर गुन्हा आहे. यात महिलेचा कसलाही दोष नसतो, मात्र तरीही बलात्कारानंतर पीडितेचे अवघे जीवनच नष्ट होते.

जर पीडिता विवाहित असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होतो. पतीकडून, सासरकडून तिला वाळीत टाकले जाते. तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. परिणामी बिचारी वाममार्गाला लागते अथवा आत्महत्या करते. हेच अविवाहित मुलीच्या बाबतीत घडले तर तिच्यावर याचा एवढा प्रचंड मानसिक व शारीरिक परिणाम होतो की त्यातून ती सावरतच नाही. तिचा मित्रपरिवार, कुटुंबातील सदस्य तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. तिचे लग्न जमत नाही. जरी जमले व झाले तरी कोणीतरी तिला ब्लॅकमेल करून तिचे पुन्हा पुन्हा शोषण करतो. जेव्हा भूतकाळ समोर येतो तेव्हा तिचा सासरकडून छळ होतो व तिला मारून टाकले जाते अथवा घटस्फोट दिला जातो. बदनामीच्या भीतीने व पुढच्या त्रासाच्या भीतीने बहुतांश वेळा बलात्कार उजेडातच आणले जात नाहीत. परिणामी गुन्हेगार सोकावतात. बलात्कारामुळे मुली, महिलांचे अवघे आयुष्य उद्ध्वस्त होते. आत्महत्या, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी याकडे वळलेल्या मुली, महिला या सर्वसाधारणपणे बलात्काराने पीडित असतात. याचे कारण म्हणजे समाज. समाज बलात्कारानंतर महिलेकडेच आरोपीच्या नजरेने पाहतो. हे चुकीचे आहे. ज्यात स्त्रीचा कसलाही दोष नसतो, ज्यात तिच्यावरच अन्याय होतो, त्यात तिला दोषी कसे काय समजले जाऊ शकते?

वाट चुकली अन् ती जाळ्यात सापडली,
नराधमांनी तिला तशीच फरफटत ओढून नेली..

तिच्याच ओढणीने तिचे हात-पाय बांधले,
तोंडात बोळा कोंबून निमित्त त्यांनी साधले..

अंगावरचे कपडे तिचे लक्तरासारखे फाडले,
संपूर्ण शरीरावर तिच्या नराधमांनी बोचकले..

दारूच्या बाटल्या फोडून अवयवांवर घाव केला,
सिगारेटच्या धुरक्यांनी श्वास तीचा गुदमरला..

निष्प्राण देह होऊन अखेर श्वास तिचा थांबला,
अश्रू थांबले नि तिचा चेहरा कोमेजला..

नराधमांना मोकाट सोडले, शिक्षा नाही दिली,
क्रूर पुरुषी वासनेसमोर, शक्ती कमी पडली..

कंठ दाटला, शब्द आटला,
धीर खचला, भाव विझला..

काळ थबकला, माणसे हिसमुसली,
गुपचूप मुक्या निर्भया शेजारी जाऊन ती आज बसली..

मित्रांनो, मी जेव्हा एकांतात विचार करत बसतो तेव्हा मला असे वाटते की ही अशी कृत्ये केवळ वासनांधतेमुळे होत नसावीत. कारण अनेक प्रकरणांत अगदी बालके, वृद्ध, विकलांग ते तृतीयपंथीयदेखील असे कृत्य करताना समोर आले आहेत. हे सगळे पाहून माझे मन सुन्न होते व यावर कायमस्वरूपी पर्याय काय असू शकतो? या दृष्टीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला काही उपाय सुचतात जे मी आपल्यासमोर मांडतो. पहिले म्हणजे बलात्काराकडे पाहण्याची दृष्टी. यात पीडितेकडे पाहताना निर्दोष दृष्टीने पाहिले पाहिजे. तिला समजून घेऊन तिला पुन्हा जीवन जगण्यासाठी उभे केले पाहिजे. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला पाहिजे व तिच्याकडे सन्मानजनक नजरेने पाहिले पाहिजे. ना तिरस्कार, ना सहानुभूती दाखवता काही घडलेच नाही या अविर्भावामध्ये की हे कोणाशीही घडू शकते हे समजून घेऊन वागले पाहिजे. दुसरे म्हणजे बलात्कार दडवून नाही ठेवले पाहिजे आणि बलात्कार झाला म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने आभाळ फाटल्यासारखे पाहता कामा नये.

हा एक अपघात होता असे समजून गुन्हेगाराला सर्वांसमक्ष आणणे व त्याला कायद्याच्या कचाट्यात आणणे याला महत्त्व दिले पाहिजे. यात कुटुंबाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मुली, स्त्रियांना शारीरिक व मानसिकदृष्ठ्या सशक्त व मजबूत बनविले पाहिजे. संकटसमयी ती स्वतःचा बचाव कसा करू शकेल याचे कुटुंबातून व शासनाकडून प्रशिक्षण तिला मिळाले पाहिजे. अत्याचार होत असताना अथवा झाल्यावर स्त्रीनेच आरोपीला स्वसंरक्षणार्थ अद्दल घडवावी यासाठी तिला कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी व चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. स्वसंरक्षणार्थ तिच्याकडून झालेल्या कृतीला अपराध समजले जाऊ नये. (अर्थात तपासाअंती) हे झाले महिलांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत अशा गुन्ह्याला माफी नसावी. जलद व पारदर्शक तपासणी व तत्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी. (फाशी कठोर शिक्षा नाही) जेणेकरून असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. शिक्षेची भीती निश्चितपणे गुन्ह्याचे प्रमाण कमी करू शकते, मात्र मला वाटते हा प्रकार केवळ शिक्षेने समूळ नष्ट होईल असे अजिबात वाटत नाही. कारण ज्या देशांमध्ये कठोर शिक्षा आहेत, उदाहरणार्थ अरब देश, तेथेही गुन्हे घडतातच. त्यामुळे केवळ शिक्षा हा बलात्कार संपविण्यामागील पर्याय ठरू शकत नाही.

शालेय शिक्षणात मूल्यशिक्षण व लैंगिक शिक्षण दोन्ही प्रकारचे शिक्षण प्रभावीपणे दिले गेले पाहिजे. कुटुंबात संस्कार केले गेले पाहिजेत. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांचे व्यस्त जीवनमान, टीव्ही-मोबाईलचा अतिरेक व घरातील एकंदरीत उदासीन व असंतुलित वातावरण यामुळे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. मुलाचे कुटुंबात व शाळेत फाजील लाड होता कामा नये. घरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण ठेवले तर मन प्रसन्न राहून घाणेरडे विचार मनात येत नाहीत. मित्रांनो, अगदी साधूसंत व पुरोहितही चुकीचे वागताना सापडले आहेत, मात्र आपण हे समजून घ्या की ते खरे साधूसंत अथवा पुरोहित नव्हतेच. ते एक व्यावसायिक होते. खरे अध्यात्म विचारांवर व वर्तनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते, मग धर्म कोणताही असो. आध्यात्मिक व नैतिक शिक्षण व्यक्तीच्या मनावर निश्चित चांगला परिणाम करते. त्यामुळे बलात्काराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, गुन्हेगाराला कठोर व जलद शिक्षा केली, बलात्कार होणार नाहीत यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या, तरच हा लांच्छनास्पद व मानवतेला काळीमा फासणारा अमानवीय प्रकार समूळ नष्ट होईल. प्रत्येकाने जर मुलीला आपली बहीण समजून तिचा आदर केला, तर नक्कीच कोणालाही स्वतःच्या बहिणीच्या सुरक्षेची काळजी करावी लागणार नाही. आपल्या बहिणींप्रमाणे दुसर्‍यांच्या बहिणींचाही आदर करा.

–संकेत शिंदे 

- Advertisment -