घरफिचर्ससारांशन थांबलेल्या गोष्टी!

न थांबलेल्या गोष्टी!

Subscribe

गेलं एकदाचं ते वर्षं...गेलं म्हणजे ते तसं जाता न जाणार्‍या जातीसारखं जात नव्हतंच. पण परवा एकदाचं गेलं. त्या वर्षाने अख्ख्या जगाला दर दिवशी आकडा बघायची दीक्षा दिली. त्या वर्षात तेव्हा ते वाढणारे आकडे पाहिले की काही दिवसांत थर्मामीटरचा काळाबाजार होणार की काय, असं वाटून आपला उलटा हात आपल्याच गळ्याशी यायचा आणि आपल्यालाच चाचपू लागायचा. मध्यरात्री झोपेतून लघुशंकेला उठल्यावर श्वासांतले आरोह-अवरोह तालासुरांत आहेत की नाही, ह्याचा अंदाज घ्यावा लागायचा. तशीच काही अशुभ शंका अंगाखांद्यावर आढळून आल्यास, काल आपल्याला कुणाचा तसाच सात्विक सहवास लाभला ह्याची मनातल्या मनात उजळणी व्हायची आणि छाताड थाड थाड उडू लागायचं....काही म्हणा, फार भयंकर वर्ष होतं ते.

रस्ते सहसा मध्यरात्री सुनसान असतात. पण त्या वर्षात भर दुपारी रस्ते सुनसान पडू लागले. रस्त्यांबरोबर युगानुयुगे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या गल्ल्याही मुकाटपणे अत्याचार सोसणार्‍या पीडितांसारख्या दिवसभर कुचाळकीचा एक शब्द न बोलता चुपचाप राहू लागल्या. घरातल्या कपाटाच्या मागून एखादी चुकार पाल निघून ती भर्रकन बेसिनखालच्या कचरापेटीत दिसेनाशी व्हावी तशी एखादी कारमध्येच दिसता दिसताच गायब होऊ लागली. मध्येच एखादी अ‍ॅम्ब्युलन्स घोंगावत येऊ लागली तशी सोसायटीभर भीतीचं आणि चिंतेचं साम्राज्य पसरू लागलं. सुरूवाती सुरूवातीला कडक लॉकडाऊन साजरा होऊ लागला. अधिकृत दांडके हातात घेतलेल्या लोकांनी तो फारच जोरदारपणे साजरा केला. त्याच्या साजिर्‍यागोजिर्‍या खाकी खुणा काहींच्या अतिशय खाजगी ठिकाणी उमटू लागल्या. चुकून बंद करायचा राहून गेलेला नळ वहातच रहावा तसे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, गल्लीबोळ चॅनेल महामारीच्या बातम्यांनी बदाबदा वाहू लागले. सगळ्या वातावरणात, अखंड चराचरात बेबंद भीषणता तुडुंब भरून राहिली. जग थांबलं, जगणं स्तब्ध झालं…
…इतक्यात महाराष्ट्रीय नभांगणाच्या हद्दीतून तो आवाज आला – माझं अंगण, माझं रणांगण.

ढोलकीवर, डफावर मर्दानी थाप पडावी तसा तो क्षण होता. त्याच क्षणी तमाम महाराष्ट्राच्या लक्षात आलं की जग थांबलं आहे की नाही ते माहीत नाही, पण महाराष्ट्र थांबलेला नाही, महाराष्ट्राच्या रगरगातलं जगणं थांबलेलं नाही, कधी काळी हिमालयाच्या मदतीला धावून गेलेल्या आमच्या ह्या सह्याद्रीचं धावणंही थांबलेलं नाही. वर्षभर स्थिर राहण्याचा पराक्रम करून दाखवणार्‍या सरकारच्या अंगावर भरपूर वेळ असणार्‍यांचं वेळप्रसंगी धावून जाणं तर अजिबात थांबलेलं नाही. जनांचा प्रवाहो असतो तसा तो काही असंतुष्टांचा टाहो होता, तो टाहोही थांबला नाही.

- Advertisement -

दुसरीकडे, मटणमच्छी मिळायची थांबली म्हणून लोक थांबले नाहीत. त्यांनी साफ वरच्या फडताळात ऑप्शनला टाकलेली सुकी मच्छी बाहेर काढली. पण आपल्या मांसाहारी विचारप्रणालीचा त्याग थांबवला नाही. पुरवून पुरवून वापरलेली सुकी मच्छीही संपली तेव्हा दाल रोटी खाओ, प्रभु के गुन गाओ म्हणत ते वरणभातही मटणभातासारखा ओरपू लागले. पण त्यांनी ओरपणं थांबवलं नाही. ओरपता ओरपता, अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणवणं थांबवलं नाही.

त्या लोकांनी मटणभाताचं जेवण थांबवलं हे एव्हाना ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकूनही न्यूजच्याही पलिकडे गेलेल्या लोकांनी कशाकशाचं खासगीकरण थांबवलं नाही. थांबला तो संपला हे वाक्य ध्यानात ठेवून त्यांनी खासगीकरणाची बातमी खासगीतही कुणाला कळू न देण्याचं थांबवलं नाही.

- Advertisement -

तिथे एका अडगळीतल्याही कोपर्‍यात व्यवस्थेविरूध्द थेट, परखड, आक्रमक, जहाल वगैरे बोलणार्‍या पत्रकारांचा एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतका एक कळप उभा होता. हा कळपही एकेकटा उभा राहायचा थांबला नाही. खरंतर त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून तसं कधीच थांबवलेलं, पण त्यांनी आपल्या एकेका व्हिडिओची होडी मिळेल त्या प्रवाहात सोडून वाहत्या व्यवस्थेवर सपासप वार करणं थांबवलं नाही.

ज्यांना कोंडवाडे म्हणतात त्या चार भिंतीतल्या शाळा बंद झाल्या म्हणून मूठभरच शिक्षणतज्ज्ञांना एकीकडे आनंद झालेला असतानाच दुसरीकडे लस शोधण्यासाठी परीक्षानळ्या घेऊन प्रयोगशाळेत धावणारे शास्त्रज्ञ स्वत:च्या बहिर्गोल चष्म्यासह संशोधनात डुबायचे थांबले नाहीत. त्यांनी शोधलेल्या लशींच्या वाट्याला निरीश्वरवाद्यांसारखी वेगवेगळ्या प्रकारची निंदा आली. पण त्या मग्न शास्त्रज्ञांनी आपल्या परीक्षानळ्या वाळवल्या नाहीत की आपले सूक्ष्मदर्शक थांबवले नाहीत.

जरा बाहेर पडा, चार जणांमध्ये, विशेषत: चार जनांमध्ये मिसळा अशी पलिकडच्या बाकावरून एकामागोमाग एक हाकाटी पिटणं थांबलं नाही तसं ती हाकाटी ऐकून कार्यालयाबाहेर न पडण्याचं व्रतही थांबलं नाही. अख्खं जग वर्क फ्रॉम होमच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्यांनीही वर्क फ्रॉम होमचा अनलिमिटेड अवलंब थांबवला नाही.

करोनाला कुणी भांडवलशाहीचं बायप्रॉडक्ट म्हटलं नसलं तरी कुणा क्रांतिवाद्यांनी भांडवलशाहीच्या नावाने गळा काढायचं थांबवलं नाही, तसंच संधी मिळो किंवा न मिळो, धर्मवादी मेळ्याने सेक्युलॅरिझमची उणीदुणी काढायचं थांबवलं नाही.

असं कुणीच थांबत नाही हे बघून काही साठोत्तरी कवींनी आपल्या फेसबुकिश कविता सादर करण्याचा सपाटा लावणं अर्ध्या दिवसानेही थांबवलं नाही. आता ह्यानंतर कवितेच्या गावाला जायचं तेव्हा जाऊ, पण आपल्या कवितेला फेसबुकची इतकी मॅग्नेटिक सिटी मिळाल्यानंतर त्यांनीही त्या सिटीत आपला गाव वसवणं सोडलं नाही. त्यामुळे चांदणओल्या कवितांचा खच पडणं बंद झालं नाही.

…आणि मग काय, संगीतातल्या नवीन कराओके घराण्यातले गायकगायिका तर अजिबात थांबले नाहीत. ते चोवीस तास रात्री-अपरात्री धो धो वाहत राहिले. नळ बंद केला, मोबाईल बंद केला तरी वाहत राहिले. ह्या कराओकेमुळे घरादारातली बाथरूम्स सुनी सुनी झाली. फक्त ही बाथरूम्सच मुकी झाली, सपशेल थांबली. पूर्वी लोक लग्नाचे अल्बम्स दाखवून बोअर करायचे, आता कराओकेचे ऑडिओ पाठवून बोअर करायची नवीन फॅशन आली. ही नवीन फॅशन कोरोना थांबला तरी न थांबायचं लक्षण सगळ्यांनाच दिसलं इकॉनॉमी खाली जायची थांबेल, पण कराओके कायम थांबायचं नाय आता थांबायचं नाय म्हणू लागला…कराओके घराण्यातले हे लोक माइकला किंवा स्वत:च्या मुखाला मास्क लावून गातील, पण गात राहतील. संगीतात रागदारीला म्हणे एक प्रहर असतो. कराओकेचा प्रहर सांगायचा झाला तर कोणता सांगायचा?….लॉकडाउन?!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -