तृष्णा…

Subscribe

तथागत गौतम बुद्धांचा एक उपदेश आहे. ते म्हणतात माणसाच्या दुःखाचं कारण तृष्णा आहे. हे शाश्वत सत्य बुद्धांनी मांडलं.. ही तृष्णा, इच्छा एकदा का माणसाच्या मनाला चिकटून बसली की, माणूस तिच्या हव्यासापोटी काहीही करू शकतो. अलीकडच्या काळात जात, धर्म, पंथ या गोष्टींच्या आहारी आपण इतके गेलो आहोत की माणूसपण विसरत चाललो आहोत. संन्याशाला सुद्धा आज-काल सत्तेची स्वप्न पडायला लागली. सत्तेच्या मोहापायी राजकारण आणि धर्मसंस्था एकत्र नांदायला लागल्या. पण जिथे धर्मसंस्था आणि राज्यसंस्था एकत्र काम करतात तिथे लोकशाहीचा अंत होण्यासाठी मार्ग मोकळा होतो. आपण नेमके याच दिशेने तर जात नाही ना..? कधी कधी हा प्रश्न मनाला भेडसावतो.

धर्मनिरपेक्ष देशात तरी किमान धर्म आणि राजकारण या बाबी स्वतंत्र असाव्यात. जिथे आम्ही भारताचे लोक ही संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आहे. तिथे तर किमान धर्मनिरपेक्षता जपायलाच हवी. संविधानातील धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. पण मग इतर धर्माचे दुस्साहस करणे हे योग्य नाही. यासाठी धर्मनिरपेक्षतेचा सर्वांगाने आणि पुरेपूर अभ्यास करणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. हा आठवडा तर एवढा असमंजसपणाने भरलेला होता की, समंजस माणसाला आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय याची लाज वाटावी. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा वेगळ्याच प्रकारे अन्वयार्थ लावला जातो जसे काही आपण इतिहासकार आहोत. एवढेच नाही तर काही घटना ज्या घडून गेलेल्या आहेत, तिथे आम्ही कसे सक्रिय होतो या श्रेयवादापायी आपण आपली नैतिकता हरवून बसलो आहोत. याची जाणीवसुद्धा होऊ नये याहून आणखी वेगळे काय सांगावे.

आपण एकदा का भक्त झालो की डोळे झाकून आहे ते स्वीकारण्याची सवय होऊन जाते. आजघडीला सगळीकडे नेमके हेच होत आहे. संमोहित केल्याप्रमाणे आपल्यावर नको असलेल्या गोष्टी इतक्या जास्त प्रमाणात बिंबवल्या जातात त्या खर्‍या वाटायला लागतात. आजच्या युवकांचे मूलभूत प्रश्न बाजूला सारून सपशेल आणि धांदात खोटेपणा सुरू आहे. आजच्या घडीला जे वातावरण वेगवेगळ्या अंगांनी तापवले जात आहे ते परवडणारे नाही. पण राजकीय पोळी भाजून घेण्यामध्ये आपण इतके तरबेज झालो आहोत की सर्वसामान्यांच्या समस्या दूर वर फेकून दिल्या आहेत.

- Advertisement -

आजच्या सर्वांग परिस्थितीवर औरंगाबादचे कवी मित्र सचिन वालतुरे यांची कविता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. जी सद्य:परिस्थितीवर चपखल भाष्य करते. मुद्दाम त्यांच्या काही कवितेच्या ओळी मी याठिकाणी देत आहे. ते म्हणतात,

ते भोंगा म्हणतील
तू भाकर म्हण …
ते मंदिर मस्जिद म्हणतील
तू माणूस म्हण …

- Advertisement -

ते दगड हातात घ्यायला लावतील
तू त्यांना दप्तर दाखव !
ते डोकं फोड म्हणतील
तू प्रेम करायला शिकव !

कुणी अजान नको म्हणेल
कुणी हनुमान नको सांगेल
तू मला माणूस हवा आहे बस एवढंच सांग !

कुणी भगवा हातात देईल
कुणी हिरवा देऊ पाहिल
कुणी निळं वादळ गाईल
तू बस तिरंग्याचं गाणं गात रहा !
तू बस तिरंग्याचं गाणं गात रहा !

इतकं साधं आपल्या सगळ्यांना मिळून जगायचं आहे. भेदभावाच्या भिंती पाडून आपल्याला फक्त माणुसकीच गीत गायचं आहे. हे जरी आपल्याला कळाले तरी आपण वैभवशाली आणि सामर्थ्यपूर्ण भारत घडवू शकतो. पण नेमकी आमची राजकीय मंडळी गोची करून ठेवतात. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी चाललेला हा खेळ एक दिवस आपल्याला सर्वनाशाकडे घेऊन जाईल हे देखील आजच्या युवकांना कळू नये. इतके आपण आहारी गेलो आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या काही पोस्ट जर आपले माथे भडकवत असतील तर आज गरज आहे शिवराय, फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांच्या विचारांची. ज्यांनी भेदभावाच्या भिंती पाडायला सांगितल्या, ज्यांनी माणुसकीचे बीज रोवायला सांगितलं, आणि ज्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांना महत्त्व दिलं. त्याच महापुरुषांच्या विचारांची आज आपल्याला पुन्हा गरज आहे.

जिथे राज्याचे किंवा लोकांचे चुकते, ज्या बाबी महत्वपूर्ण आहेत. जिथे न्यायव्यवस्था सक्रियपणे निर्णय देण्याचे काम करते. न्यायालयाच्या निर्णयांचे स्वागत करणे ही आपली जबाबदारीदेखील आहे. कारण कायदा व सुव्यवस्थेचे पालन जर आपण केले तर अराजकतेला खतपाणी मिळणार नाही. असे म्हणतात की सोबतच राज्यसंस्थेचे देखील काम आहे की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये. मुळात आधुनिक शास्त्रीय परिभाषेत राज्याला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. सर्व प्रकारचे जीवन सुरक्षितपणे सिद्ध होईल, अशी एकत्रित येऊन कार्य करणार्‍या मानवांची संघटना म्हणजे राज्य, असे समाजशास्त्रज्ञ मानतात. त्यामुळे राज्य समाजांच्या घटकांच्या परस्परसंबंधाचे सामाजिकदृष्ठ्या नियमन करणारी यंत्रणा ठरते. पण या यंत्रणेला जर खिळखिळी करण्याचे डाव आखले जात असतील तर लोकशाहीमध्ये जबाबदार शासन पद्धती निर्माण होऊ शकणार नाही. किंबहुना लोकशाहीचा डोलारा ज्या चार खांबांवर सुरक्षित आहे असे आपण म्हणतो. तो कोलमडून पडेल.

इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे आपल्या देशातील प्रेस फ्रीडमचे स्वातंत्र्य… आपण प्रत्येक वेळी या क्रमवारीत घसरत चाललो आहोत. प्रेस फ्रीडमचे स्वातंत्र्य आहे, पण सत्तेच्या बाजूनेच. इतरत्र जर आपण बोलू तर अंकुश लावला जातो. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार हा घटक ज्यामध्ये येतो त्यालाच जर मागे ओढण्याचे काम आजची यंत्रणा करत असेल तर हेदेखील परवडणारे नाही. एकूणच काय तर दुही पसरवणार्‍या यंत्रणेवर वेळीच अंकुश लावणे गरजेचे आहे. नाहीतर जगाचे नेतृत्व करणार्‍या भारतामध्ये जो सत्तेच्या हव्यासापोटीचा खेळ सुरू आहे तो अराजकतेकडे घेऊन जाईल.

जात, धर्म, पंथ, भाषा, वंश हे बाजूला ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितले होते की, आपल्या मनामध्ये हीच भावना असायला हवी की मी सर्वप्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आज गरज आहे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्वे जनसामान्यात रुजवून धर्मनिरपेक्ष राष्ट्राची उभारणी करण्याची…. कारण धर्म ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. उगाच धर्माच्या नावाखाली राजकारण करून आपली संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवणे योग्य नाही. नेमके सत्य आजच्या युवकांनी जाणले आणि त्या दिशेने आपली पावले उचलली तर जो सत्तेचा आणि धर्माचा बडेजाव असलेला ट्रेंड सुरू आहे, त्यापासून आपला बचाव होईल आणि भविष्य दुरुस्त होईल. अन्यथा पहिले पाढे पंचावन्नप्रमाणे अधोगती ठरलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -