घरफिचर्ससारांशजगज्जेतेपदाची जंग!

जगज्जेतेपदाची जंग!

Subscribe

येत्या शुक्रवारपासून रोझ बाउल, साऊदम्पटन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदाची) अंतिम झुंज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगेल. कसोटी क्रिकेटला आलेली मरगळ झटकण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील असून दोन वर्षात कोरोनाला सामोरे जात या फायनलचा मार्ग मोकळा झाला आहे. किवीजचे दर्जेदार तेज आक्रमण तसेच इंग्लंडमधील घरच्यासारखं वातावरण केन विल्यम्सनच्या संघ सहकार्‍यांच्या पथ्यावर पडेल असा जाणकारांचा होरा असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहली काही कच्च्या गुरूचा (रवी शास्त्री मास्तर ) चेला नाही. त्याने इंग्लंडला प्रयाण करण्याआधीच सांगितलं की, न्यूझीलंडमधील पराभवातून आम्ही धडा घेतला असून चांगलं क्रिकेट खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू.

वातावरण आणि परिस्थिती दोन्ही संघासाठी सारखीच असते. ऑस्ट्रेलियात यजमान संघासाठी वातावरण अनुकूल होतं तरी देखील बाजी मारली भारतानेच! परिस्थितीकडे कसं पाहता यावर सारं काही अवलंबून असतं. न्यूझीलंड वरचढ आहे असं वाटून आम्ही इंग्लंडच्या प्रवासाला निघालो तर त्याला काहीच अर्थ नाही. न्यूझीलंडप्रमाणेच आमचा भारतीय संघदेखील तुल्यबळ आहे त्याच भावनेने ईर्षाने आम्ही मैदानात उतरून त्यांचा मुकाबला करू. जो संघ प्रत्येक सत्रगणिक (सेशन ), तासागणिक चांगली कामगिरी करेल तोच संघ अजिंक्य ठरेल असे हे जोशपूर्ण विराट कोहलीचे उद्गार निश्चितच दखल घेण्याजोगे आहेत. घोडामैदान तर जवळच आहे बघूया विजयश्री कोणाच्या हातात अजिंक्यपदाचा करंडक सोपवते!

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात अवघड, कठीण प्रकार. सातत्याने खेळाचे पारडे बदलत राहतं कधी या बाजूला तर कधी त्याबाजूला.. पाच दिवसाच्या कसोटीत प्रत्येक सेशनला खेळ बदलत राहतो. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेला संघ एवढंच कशाला फॉलोऑनची आपत्ती ओढवलेल्या संघानेही सामना जिंकल्याची उदाहरणं आहेतच की! ओव्हल 1971 मध्ये अजित वाडेकरचा भारतीय संघ 71 धावानी मागे पडूनही कसोटी तर जिंकलाच, पण इंग्लंडला इंग्लंडमध्येच हरवून ‘रबर’ पटकावण्याची किमया वाडेकर आणि त्याच्या तडफदार साथीदारांनी करून दाखवली त्या विजयाचा ‘सुवर्ण महोत्सव’ आता जवळ आलाय.. सौरभ गांगुलीच्या संघाने स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाचा विजयी अश्वमेध रोखण्याची कामगिरी पार पाडली ती कोलकाताच्या इडन गार्डन्सवर. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दोन मित्रांच्या द्राविडी त्रिशतकी भागीदारीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिलंच नाही. भज्जीच्या फिरकीच्या मोहजलात कांगारुंचे फालंदाज अडकत गेले. त्याने हॅट्ट्रिक नोंदवली आणि भारताने संस्मरणीय विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटची रंजकता वृंद्धिगत होते ती अशाच अशक्यप्राय वाटणार्‍या घटनांमुळे.

- Advertisement -

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर दृष्टीक्षेप टाकताना नजरेत भरणारी ठळक वैशिष्ठ्ये अर्थात भारत, न्यूझीलंडचा विचार करता, मायदेशी खेळताना न्यूझीलंडने एकही सामना गमावला नाही परदेशी म्हणजे सख्खे शेजारी ऑस्ट्रेलियाने त्यांना चारी मुंड्या चीत केलं. ट्रान्सटास्मन मालिकेत कांगारूनी किवीजचा 3-0 असा धुव्वा उडवला. तीनही कसोटीत कांगारूनी 200 हुन अधिक धावांनी विजय मिळवताना किवी फलंदाजाच्या मर्यादा स्पष्ट केल्या, त्यांची डाळ काही शिजली नाही, पण एका किवी गोलंदाजाने मात्र आपली छाप पाडताना तब्बल 17 विकेट्स काढल्या! या मानहानीकारक पराभवानंतर मात्र मायदेशी खेळणार्‍या न्यूझीलंडच्या संघाला नवसंजीवनी मिळाली. विराट कोहलीच्या भारतीय संघाविरुद्ध त्यांनी 2-0 असं निर्भेळ यश मिळवलं त्यांचा विजयी सिलसिला कायम राहिला. उत्तम दर्जेदार स्विंग गोलंदाजी ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली.. ट्रेन्ट बोल्ट, टिम साऊथी, नील वॅगनर आणि जेमिसन ही त्यांची यशवंत तेज चौकडी! चेंडू स्विंग करण्यात हे सगळे तरबेज. शिवाय सीमर्स, कटर्सचे बेमालूम मिश्रण करण्यातही हे सारे वाकबगार. साऊथीचा स्लोअर वनही विकेट काढून जातो. सततचा सराव आणि विजिगुषी वृत्ती अखंड मेहनत यात किवीजचा हातखंडा.

भारतापाठोपाठ किवीजनी पाकिस्तानचाही फडशा पाडला. त्यांच्या तेजतर्रार गोलंदाजीला साथ लाभली केन विल्यमसनच्या बॅटची. त्याची द्विशतकी खेळी आनंद द्विगुणित करणारी. त्याच्या बॅटला परिसस्पर्श लाभला या दरम्यान दिमतीला बोल्ट, साऊथी, वॅगनर किंवा जेमिसन हे त्रिशूलधारी त्रिकुट सदैव मौजुद! प्रतिस्पर्धी संघाची गाळण उडायची. किवीजचा सर्वकालिक महान गोलंदाज रिचर्ड हेडलीचा वारसा चालवण्याची जिगर खूप जणांनी दाखवली, पण टीम साऊथीत ती धमक निश्चितच आहे, अप्रतिम स्विंग त्याच्याकडे आहेत. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला त्याने चांगलेच पेचात पकडून यष्टीरक्षकाकरवी त्याला अखेर झेलबाद केलेच, त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला पण त्याने असंच गंडवून त्याला बेमालुमपणे इनस्विंगरवर चकवण्याची किमया केली होती. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत साऊथीने लॉर्डस कसोटीत कमालच केली त्याने स्वस्तात यजमान इंग्लंडचे सहा मोहरे टिपले आणि लॉर्डसच्या सन्माननीय खेळाडूच्या यादीत आपल्या नावाची पाटी दुसर्‍यांदा झळकावण्याची करामत केली!

- Advertisement -

साऊथी, बोल्ट, वॅगनर समोर विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सपशेल अपेशी ठरला होता. चार डावात मिळून त्याला अर्धशतकी मजल मारता आली नव्हती, पण तोच कोहली आता विराट पराक्रमासाठी सज्ज झालाय पेटून उठलाय. इंग्लंड दौरा खडतर असल्याची पुरेपूर कल्पना त्याला आहे. महत्वाच्या अजिंक्यपद लढतीआधी सराव सामना खेळायला नाही मिळाला तरी त्याची काहीच तक्रार नाहीय. गेल्या दौर्‍याआधी त्याने वेगळाच सूर लावला होता, पण आता तो अधिक समजदार झालाय असं वाटतं.

18-22 जून दरम्यान होणार्‍या अंतिम फेरीसाठी भारताची प्रमुख समस्या म्हणजे भरवशाची बिनीची जोडी! रोहित शर्माला कसोटीसाठी (मारून मुटकुन) सलामीवीर बनवलं आहे. भारतातील पाटा खेळपट्ट्यावर रोहित धावांच्या राशी उभारतो, पण परदेशी खेळपट्ट्यावर स्विंग, सीम गोलंदाजीसमोर अजून तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा कस लागलेला नाही. वनडे, टी 20 मध्ये तो पोत्याने धावा करतो. त्याला सलामीला कोण साथ देणार हा यक्षप्रश्न आहेच. शुभमन गिल आणि मयंक अगरवाल यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आढळतो. चेतेश्वर पुजारा,अजिंक्य रहाणे, विराट कोहली ही त्रिमूर्ती अनुभवसमृद्ध असून भक्कम पायाभरणीनंतर कळस चढवण्याची कामगिरी ते नक्कीच करू शकतात. पण पायाच नीट रचला गेला नाही तर बुरूज ढसळू शकतो. रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया दौर्‍यात आपल्या डावखुर्‍या बॅटची कमाल वारंवार दाखवली. रवींद्र जाडेजा उपयुक्त अष्टपैलू म्हणून नाव लौकिक कमावून आहे.

इशांत शर्मा, महमद शमी, महमद सिराज आणि जसप्रीत बुमराह ही तेज चौकडी भारतासाठी फलदायी ठरली आहे. अलीकडे परदेश दौर्‍यावर भारतीय संघाने जे यश संपादलं आहे, त्यात या तेज चौकडीप्रमाणेच भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर यांचाही खारीचा का होईना वाटा आहेच ना! कसोटीत विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करावं लागते अलीकडील 4-5 वर्षात कोहली-शास्त्री यांच्या हातात भारतीय संघ सोपवल्यावर भारताकडेही तेज गोलंदाजाचे भरघोस पीक येऊ लागलंय. ताशी 140-145 किमी वेगाने गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज वेगवेगळ्या राज्यातून पुढं येताहेत हे भारतीय क्रिकेटसाठी शुभवर्तमान! त्यांची संख्या निश्चितच वाढत जाणार असून निरनिराळ्या अकादमीतून आता युवा तेज गोलंदाज मोठ्या प्रमाणात तयार होताहेत. भारती अरुण या युवा गोलंदाजाना योग्य मार्गदर्शन करत असून त्यांना बीसीसीआय आर्थिक, सल्लागार स्वरूपात मदत करते.

केन विल्यम्सन, रॉस टेलर यांच्यासारख्या बुजुर्ग खेळाडूंना युवा खेळाडूंची साथ लाभली तर न्यूझीलंड भारताला तंगवू शकतात, पण भारताची तेज चौकडी काही कमी नाही. घोडामैदान तर जवळच आहे बघूया काय होतं ते? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या जेतेपदासाठी तुल्यबळ संघामध्ये मुकाबला आहे. विजयश्री कोहली की विल्यमसनच्या हातात झळाळता करंडक सोपावते ते बघणं उत्सुकतेचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -