घरफिचर्ससारांशझिम्मा २:मनाच्या खोल तळाशी नितळ झरा

झिम्मा २:मनाच्या खोल तळाशी नितळ झरा

Subscribe

आपल्या आयुष्यात जीवन प्रवासात अशी काही माणसं जोडली जातात, ज्यांच्याशी रक्ताच्या नात्यापलीकडचं नातं निर्माण होतं. ते नातं असतं मैत्रीचं. मैत्रीचं नातं हे दीर्घकाळ टिकणारं असतं. असंच मैत्रीचं नातं ‘झिम्मा २’मध्ये फुललं आहे. म्हणूनच ‘झिम्मा २’ याबाबत दर्जेदार सिनेमा ठरला आहे.

– आशिष निनगुरकर

काही दिवसांपूर्वीच एक वाक्य वाचलं होतं जे मला प्रचंड आवडलं. ते वाक्य असं होतं की, एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं त्या उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजेच ‘झिम्मा २’ हा सिनेमा. सहजता ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू. एखादा सिनेमा सुपरहिट ठरला म्हणजे त्याच्या यशाचा फ़ॉर्म्युला सेट झाला असं अजिबात म्हणता येत नाही. किंबहुना तो प्रयोग पुन्हा करायला जातो तेव्हा त्यात अपयशाचीच शक्यता जास्त असते, परंतु ‘झिम्मा २’ हा सिनेमा आपल्याला खूप काही देऊन जातो. जे काही दिसतं, जे काही घडतं ते अगदी सहज. आम्ही काहीतरी सांगत आहोत असा आव अजिबात न आणता तरीही खूप काही सांगून जाणारी ही गोष्ट आपल्या प्रत्येकानेच अनुभवायला हवी.

- Advertisement -

आपल्या आयुष्यात जीवन प्रवासात अशी काही माणसं जोडली जातात, ज्यांच्याशी रक्ताच्या नात्यापलीकडचं नातं निर्माण होतं. ते नातं असतं मैत्रीचं. मैत्रीचं नातं हे दीर्घकाळ टिकणारं असतं. असंच मैत्रीचं नातं ‘झिम्मा २’मध्ये फुललं आहे. ‘वय’ आणि ‘लिंग’ यांच्या पल्याड असलेली ही मैत्री पटकथाकार-लेखिका इरावती कर्णिक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी खुबीनं पडद्यावर मांडली आहे. दिग्दर्शक आपल्याला आरसा दाखवू पाहतोय; ज्या आरशात आपण स्वतःपासून पळत असलेलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. आपल्या कानांवर आपल्याच आवाजातली हाक पडते आणि त्याला आपण ‘ओ’देखील देतो. हेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि कथानकात असलेली बहुरंगी-बहुढंगी पात्रं प्रेक्षकांना जे काही कळत-नकळत सुचवू पाहत आहेत, ते दृश्य माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचवण्याचं काम हा चित्रपट करतो. प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो, ही शिकवण देत ‘झिम्मा’मधील नायिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक नवी ऊर्जा आणि नवा उत्साह आणला. प्रत्येक बाईची तर्‍हा वेगळी पण जेव्हा त्या सगळ्या एकत्र येतात, तेव्हा त्या वेगळेपणातही नाविन्य, आपुलकीची भावना पाहायला मिळते. ‘झिम्मा’मधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं विशेष स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

- Advertisement -

इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच एक नवीन उमेद मनात निर्माण करतो. पहिल्या भागातीत नायिकांची एकमेकांशी फारशी ओळख नव्हती, पण आता त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही मैत्री निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नात्यात आणि कथेत काय नाविन्य पाहायला मिळेल याची उत्सुकता ‘झिम्मा २’ टिकवून ठेवतो. या चित्रपटात दिसणारे हे गूड फिलिंग वरवरचं नाही. समजून उमजून तावून सुलाखून आलेलं शहाणपण आहे. प्रश्न आहेत, समस्या आहेत, एकटेपण आहे, आजारपण आहे, न दिसणारं भविष्य आहे प्रत्येक पात्र काही ना काही संघर्ष करीतच आहे, पण जेव्हा प्रत्येक जण व्यक्त होतो, आपलं साचलेपण रितं करतो तेव्हा घडणारी जादू हा सिनेमा आपल्यासमोर मांडतो.

आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसते आणि त्यामागे आपली काहीतरी कारणं असतात आणि जेव्हा कोणीतरी आपल्यासोबत नेमकी तीच गोष्ट करतं तेव्हा आपण प्रचंड चिडतो. त्या चिडण्यामागचं कारण आपल्याला माहीत असतं, मात्र समोरचा अनभिज्ञ असतो आणि नेमकं हेच आपण विसरतो. ‘हे त्याला कुठं माहीत होतं’ असं एका सीनमध्ये क्षिती जेव्हा बोलते तेव्हा आपणही विचारात पडतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या अगदी सहजपणे या सिनेमात येतात.

मुळात लिखाणाच्या पातळीवर हा सिनेमा खूप सशक्तपणे लिहिला गेलाय. खासकरून पटकथा आणि संवाद. कथेला कसलीच चौकट नसताना आणि सात जणींची परदेशातील सहल असा प्रचंड मोठा कॅनव्हास असतानाही सिनेमा नेमका झालाय. इरावती कर्णिक आणि हेमंत ढोमे यांचं लिखाणासाठी कौतुक करायलाच हवं.

अर्थात एका उत्तम गोष्टीला कॅमेर्‍यासमोर तितक्याच उत्तमपणे सादर करणारी यातली कलाकारांची टीम कमाल आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आणि सिद्धार्थ चांदेकर या सार्‍यांनीच अफ़लातून कामं केली आहेत. मुळात भूमिका कलाकारांकडे पाहूनच लिहिल्यामुळं ती सहजता दिसते. निर्मिती सावंत आणि रिंकूची केमिस्ट्री भाव खाऊन जाते. सत्यजीत शोभा श्रीरामची सिनेमॅटोग्राफी कथेला पूरक आहे.

परदेशातलं निसर्ग सौंदर्य दाखवण्याच्या प्रेमात तो पडलेला नाही. फैसल महाडिकने केलेलं संकलन गोष्टीतला प्रत्येक पदर आपल्यापर्यंत तितक्याच सहजतेनं पोहचवतं. जो नेमकेपणा या सिनेमाचा आत्मा आहे, तो देण्यात संकलन आणि पटकथेचा मोठा वाटा आहे. क्षितिज पटवर्धनचे शब्द आणि अमितराजचं संगीत गोष्टीला पुढं घेऊन जातं. अशा सगळ्या उत्तम गोष्टी असताना खटकणारं फार काही उरत नाही. अगदी सांगायचंच झालं तर उत्तरार्धात सिनेमा काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. कारण काही सीन्स आपण पुन्हा पुन्हा पाहतोय असं वाटत राहतं.

दिग्दर्शक हेमंत ढोमेनं ‘झिम्मा २’ अधिक मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींसाठी हा चित्रपट दोन घडीचा विरंगुळा असेल, मनोरंजन असेल वा काहींसाठी स्वत:चा शोध असेल. चित्रपटाच्या पहिल्या भागातला टूर प्लॅनर कबीर (सिद्धार्थ चांदेकर) आता पुन्हा एकदा मैत्रिणींना घेऊन ‘रियुनियन टूर’ला निघाला आहे. त्याच्यासोबत ७५ वर्षांची; पण मनानं तरुण असलेली इंदू (सुहास जोशी) आणि निर्मला (निर्मिती सावंत), वैशाली (सुचित्रा बांदेकर), मीता (क्षिती जोग), कृतिका (सायली संजीव) आहेत, तर दुसर्‍या भागात सहभागी झालेल्या तान्या (रिंकू राजगुरू) आणि मनाली (शिवानी सुर्वे) या दोघीही आहेत. या प्रत्येकीच्या तर्‍हा वेगळ्या आहेत.

या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कबीर करतो. या प्रत्येकीचा स्वतःचा एक प्रवास आहे. या आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या-त्यांच्या काही अडचणी आहेत. याच अडचणींचा शोध घेत त्यांना स्वीकारण्याची मनशक्ती देण्याचं काम हा त्यांचा एकत्रित प्रवास करतो. काही प्रसंग ताणण्यात आले आहेत किंवा अवाजवी वाढवल्यासारखे वाटतात, मात्र तरीही प्रेक्षक कथानकात गुंततात. परदेशी चित्रीकरण केलेल्या चित्रपटांच्या शृंखलेतला हाही एक मराठी चित्रपट आहे, परंतु चित्रपटातील चित्रीकरणस्थळांबाबत तोच तोपणा दिसत नाही. चित्रपटातली काही गिमिक्स पुढील भागाचा अर्थात ‘झिम्मा ३’चा मार्गदेखील खुला करतात. कथानकातल्या प्रत्येक पात्रानं अभिनयाच्या दृष्टीनं अव्वल काम केलं आहे. निर्मिती सावंत यांची ऊर्जा लक्ष वेधून घेते. सायली संजीवचा पडद्यावरचा मोकळा वावर सुखावणारा आहे. सुचित्रा बांदेकर यांनी त्यांचं पात्र संयमानं साकारलं आहे.

वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी तरुण कलाकारांना लाजवेल अशी मेहनत या भूमिकेसाठी घेतली आहे. त्यांचा अनुभव त्यांच्या अभिनयात प्रतिबिंबित होतो. सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग हे दोघंही अभिनयाच्या पातळीवर एकमेकांच्या तोडीस तोड आहेत. या दोघांच्या व्यक्तिरेखांचं कथा पुढं सरकण्यात जास्त योगदान आहे. कथानकाशी नव्यानं जोडल्या गेलेल्या रिंकू आणि शिवानी यांच्या व्यक्तिरेखा जाणीवपूर्वक कथानकाच्या केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेल्या आहेत, ज्या चित्रपटात नव्यानं जीव ओततात. रिंकू आणि शिवानी यांच्या अभिनयाचा बाज व त्यांची तालीम उत्तम घडून आली आहे. क्षितिज पटवर्धनची सगळी गाणी आणि अमितराजचं संगीत चित्रपटाला आकार देतं. मानवी भावभावना हाताळण्याचं दिग्दर्शक हेमंतचं कसब कौतुकास्पद आहे. काही चित्रपट असे असतात जे एकदा पाहिल्यानंतर आयुष्यभर आपली सोबत करतात. मनाच्या खोल तळाशी झरा बनून वाहत राहतात. ‘झिम्मा २’ तसाच आहे.

चित्रपटात सात नायिका आणि एक नायक आहे म्हटल्यावर कथेत समतोल साधण्याचं मोठं आव्हान लेखकासमोर असतं, मात्र हे काम इरावती कर्णिक यांनी पुन्हा एकदा तितक्याच सहजतेनं पार पाडलं आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणाचीच कथा रटाळवाणी वाटत नाही. छोटे छोटे तुकडे एकत्र जोडावेत आणि त्याचे एक मोठे आणि सुंदर चित्र तयार व्हावे असा हा लेखिकेचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी ठरतो. संपूर्ण चित्रपटात लेक डिस्ट्रिकमधील नयनरम्य दृश्ये पाहून त्या ठिकाणी एकदा तरी भेट नक्की द्यावी अशी इच्छा मनात निर्माण होते. याचं संपूर्ण श्रेय कॅमेरामन आणि सिनेमॅटोग्राफरला जातं.

फक्त चित्रपटाची कथाच उत्तम असून चालत नाही, तर त्या कथेला योग्य न्याय देणारा दिग्दर्शकही तितकाच महत्त्वाचा असतो. हेमंत ढोमेनं या सात जणींच्या सात तर्‍हा उत्तमरित्या हाताळण्याची किमया साधली आहे. झिम्माच्या पहिल्या भागात सिद्धार्थ चांदेकरने या सात जणींना एकत्र बांधून ठेवलं होतं. आता दुसर्‍या भागात सातही जणींचं आपापलं स्वातंत्र्य असतानाही सिद्धार्थने त्याचं स्वातंत्र्य जपत स्वत:ची भूमिका एकदम परफेक्ट साकारली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा भागसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -