घरफिचर्ससारांशअशक्य ते शक्य करतात ऑस्ट्रेलियन्स!

अशक्य ते शक्य करतात ऑस्ट्रेलियन्स!

Subscribe

ऑस्ट्रेलियन विजयाची त्रिसूत्री दडलीय ती खेळाडूंच्या भागीदारीत. फलंदाजीत भागीदारीमुळे डाव सावरला जातो किंवा टीमला सुस्थिती प्राप्त होते. गोलंदाजीतही खेळाडूंची जोडी प्रभावी आक्रमण करू शकते आणि क्षेत्ररक्षणातही याची चुणूक दिसून येते. अफगाणिस्तानविरुद्ध मॅक्सवेलने मोक्याच्या क्षणी कर्णधार कमिन्सच्या साथीने नाबाद द्विशतकी भागीदारी रचून कांगारूंना अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. अशक्य ते शक्य करण्याची किमया ऑस्ट्रेलियन्स करू शकतात याची प्रचिती वर्ल्डकप स्पर्धेत आली! साखळीत २ सामने ज्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध गमावले, त्या संघांनाच (दक्षिण आफ्रिका आणि भारत) उपांत्य आणि अंतिम फेरीत नमवून काहीही झाले तरी आम्ही जिंकणारच हे कांगारूंनी पुन्हा सिद्ध करून दाखवले.

-शरद कद्रेकर

दशकभराच्या कालावधीनंतरही आयसीसी स्पर्धेत भारताला जेतेपद हुलकावणीच देत आहे. १३व्या वर्ल्डकप स्पर्धेचे सूप वाजले ते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने! पण वर्ल्डकप पटकावण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला आणि गेल्या ३ वर्ल्डकप स्पर्धेत यजमान देशाचा संघ बाजी मारतो असं गुलाबी चित्र रंगवलं जात होतं ते पार विस्कटून टाकलं पॅट कमिन्सच्या जिगरबाज ऑस्ट्रेलियन संघाने.

- Advertisement -

एकतर्फी अंतिम झुंजीत त्यांनी अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर गर्दी करणार्‍या ९२,४५३ प्रेक्षकांच्या साक्षीने ६ विकेट्स आणि ७ ओव्हर्स राखून यजमान भारताचा पराभव केला आणि सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला. जवळपास ३ तपापूर्वी अ‍ॅलन बोर्डरच्या संघाने कोलकाताच्या ईडन गार्डनवर इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवून रिलायन्स वर्ल्डकप सर्वप्रथम जिंकला होता. त्याच्या आठवणी अहमदाबादमधील विजयामुळे पुन्हा चाळवल्या गेल्या, तर यजमान भारतीय संघाला मात्र सलग १० विजयानंतर विजय एकादशी साजरी करता आली नाही त्याची चर्चा अजूनही नाक्यानाक्यांवर रंगतेय, अगदी थेट अहमदाबादपासून मुंबईतही!

ग्लेन मॅक्सवेलच्या जिगरबाज द्विशतकी खेळीने ऑस्ट्रेलियन संघाला संजीवनी मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. फायनल फ्रंटीयर पार करण्यात रोहित शर्माचा भारतीय संघ कमी पडला अन् याचं श्रेय ऑस्ट्रेलियाचा संघनायक पॅट कमिन्सच्या कल्पक नेतृत्वाला तसेच डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडच्या झुंजार शतकी खेळीला तसेच त्याच्या अफलातून झेल पकडण्याच्या जिद्धीलाही द्यावं लागेल. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढवणार्‍या रोहित शर्माचा झेल हेडने पळत जाऊन पकडला तो जमिनीवर लोळण घेत! हाच सामन्याला कलाटणी देणारा क्षण! रोहित बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावगती (रनरेट) होती षटकामागे १० धावांची, पण कर्णधार माघारी परतल्यावर ही गती विलक्षण मंदावली. कारण चौकार, षटकार दुर्मीळ झाले आणि डावाच्या अखेरीस (५० षटकांत २४० धावा) धावगती ४.८० वर आली. ७ गोलंदाजांना छोट्या छोट्या हप्त्यात (स्पेल्स) गोलंदाजी देऊन फटकेबाजीला आळा घालण्याची भूमिका कमिन्ससह त्याच्या साथीदारांनी चोखपणे पार पाडली.

- Advertisement -

मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तेज जोडगोळीने ऑस्ट्रेलियन डावाला खिंडार पाडल्यावर ट्रॅव्हिस हेडने लाबुशेनच्या साथीने खिंड लढवत भारतीय संघाचे परतीचे दोर कापून टाकले. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाची नाकेबंदी करून टाकली आणि स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला. १३७ धावांची लाजवाब खेळी आणि रोहित शर्माचा यादगार झेल यामुळे अंतिम सामन्यात निर्विवादपणे सर्वोत्तम खेळाडूचा मान ट्रॅव्हिस हेडने पटकावला!

ऑस्ट्रेलियन विजयाची त्रिसूत्री दडलीय ती खेळाडूंच्या भागीदारीत. फलंदाजीत भागीदारीमुळे डाव सावरला जातो किंवा टीमला सुस्थिती प्राप्त होते. गोलंदाजीतही खेळाडूंची जोडी प्रभावी आक्रमण करू शकते आणि क्षेत्ररक्षणातही याची चुणूक दिसून येते. अफगाणिस्तानविरुद्ध मॅक्सवेलने मोक्याच्या क्षणी कर्णधार कमिन्सच्या साथीने नाबाद द्विशतकी भागीदारी रचून कांगारूंना अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. अशक्य ते शक्य करण्याची किमया ऑस्ट्रेलियन्स करू शकतात याची प्रचिती वर्ल्डकप स्पर्धेत आली! साखळीत २ सामने ज्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध गमावले, त्या संघांनाच (दक्षिण आफ्रिका आणि भारत) उपांत्य आणि अंतिम फेरीत नमवून काहीही झाले तरी आम्ही जिंकणारच हे कांगारूंनी पुन्हा सिद्ध करून दाखवले.

भारतीय संघाची वर्ल्डकप मोहीम यंदादेखील अपयशी ठरली याचं वैषम्य वाटतं. स्पर्धेतील सर्वाधिक ७६५ धावा तसेच सर्वाधिक ७१ चौकारही विराटचेच. सर्वाधिक २४ मोहरे टिपले ते मोहम्मद शमीने आणि सर्वाधिक ३१ षटकार खेचले ते भारतीय सलामीवीर तसेच संघनायक रोहित शर्माने. साखळीत सारेच्या सारे ९ सामने जिंकून वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीत न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत मुसंडी मारणारा यजमान भारतीय संघ अंतिम लढतीत शरणागती पत्करतो हे राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या भारतीय संघाचं सांघिक अपयश जिव्हारी लागणारं आहे.

६ आठवडे भारतीय संघाला पाठिंबा देणार्‍या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. कमिन्स आणि त्याच्या जिगरबाज ऑस्ट्रेलियन संघाने सलामीच्या दोन सामन्यांतील पराभवानंतर कामगिरीचा आलेख उंचावत नेला आणि मोदी स्टेडियममधील भारतीय पाठीराख्यांचा आवाज बंद करून टाकला. ऑस्ट्रेलियन्सच्या विजीगिषू वृत्तीला सलाम. रगेल आणि रंगेल ऑस्ट्रेलियन्स निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावून बाजी मारतात आणि प्रतिस्पर्धी संघाला गारद करतात. वर्ल्डकप स्पर्धेत ६ वेळा त्यांनी जेतेपदाची किमया केली आहे.

१३व्या वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीत प्रवेश केला. कर्णधार टेम्बा बवुमाची कामगिरी खास नव्हती, पण त्याचा सलामीचा साथीदार आणि यष्टीरक्षक क्विंन डीकॉकने यंदा वर्ल्डकप स्पर्धेत ४ शतके केली आणि व्हाईट बॉल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ५९४ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणार्‍यांच्या यादीत विराट, रोहितपाठोपाठ तिसरा क्रमांक मिळवला. क्रिकेट जगतात दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ असं संबोधलं जातं. चांगला खेळ करताना आयत्या वेळी गळपटणारा संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका! यंदा साखळी स्पर्धेत त्यांनी आपला ठसा उमटवला आणि अपेक्षा निर्माण केल्या होत्या, पण ऑस्ट्रेलियाने साखळीतील पराभवाची परतफेड उपांत्य लढतीत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आणि त्यांच्या ‘अधुरी कहाणी’चा सिलसिला कायम राहिला.

किवीजनी यंदा झोकदार सलामी देताना गतवेळच्या विजेत्या इंग्लंडला दणका दिला. भारतीय वंशाचा युवा खेळाडू रचीन रवींद्रने खणखणीत शतक झळकावलं आणि या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करताना ५७८ धावा फटकावल्या. त्याला सँटनरने यशस्वी साथ देत भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी केली अन् संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली, पण भारतीय संघापुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि वर्ल्डकप स्पर्धेत लागोपाठ तिसर्‍यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

वर्ल्डकप स्पर्धेत यंदा सर्वाधिक छाप पाडली ती अफगाणिस्तानने. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या माजी वर्ल्डकप विजेत्यांवर त्यांनी विजय मिळवून हलचल निर्माण केली आणि वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला ७ बाद ९१ असं कोंडीत पकडलं होतं, पण मॅक्सवेलने दुखापतीची पर्वा न करता द्विशतक फटकावलं आणि ऑस्ट्रेलियाला निसटता विजय मिळवून दिला. गुरबाझ, इब्राहिम झरदान, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी यांनी अपेक्षेहून चांगली कामगिरी करून सार्‍यांचं लक्ष वेधून घेतलं.

रशीद खान तर अफगाणिस्तानचा जानामाना खिलाडी. त्याच्या फिरकीचा दबदबा सर्वांना ठाऊक. त्याला साथ लाभली मुजीब उर रहमानची. तसेच नवीन उल हक आणि अझमतुल्ला ओमरझाई यांंनी कांगारूंविरुद्ध कमाल केली होती, पण अफगाणी खेळाडूंना अनुभवाची शिदोरी कमी पडल्यामुळे ऑस्ट्रेलियाने सुटका करून घेतली हाच त्यांच्यासाठी कलाटणी देणारा क्षण ठरला अन् विश्वविजेतेपदाची माळ आपसूक त्यांच्या गळ्यात पडली, पण अफगाणिस्तानने सर्व प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला,‘आखिर हम भी तो हैं ’.

इंग्लंडची यंदा पुरती वाताहत झाली. ना त्यांची गोलंदाजी चालली ना फलंदाजी आणि कर्णधार जोस बटलर तर पूर्णत: हरवल्यागत खेळत होता. केवळ नशिबाने पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडला प्रवेश मिळाला. आयसीसी रँकिंगनुसार अव्वल ८ संघांनाच या स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो. इंग्लंडसाठी वर्ल्डकप स्पर्धा विसरण्याजोगीच ठरली. पाकिस्तान आणि श्रीलंका या माजी वर्ल्डकप विजेत्यांनीही सपशेल निराशा केली. श्रीलंका संघाचा बांगलादेशविरुद्धचा सामना गाजला तो श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अंजेलो मॅथूजला ‘टाईम आऊट’ दिल्यामुळे! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे (टाईम आऊट) बाद होणारा मॅथूज हा पहिलाच फलंदाज.

बांगलादेशलाही काही नीट खेळता आलं नाही. नेदरलँड्सने तळ गाठला, पण दक्षिण आफ्रिकेवर त्यांनी विजय मिळवून सनसनाटी निर्माण केली, पण ती तात्पुरतीच ठरली. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही काहीही होऊ शकते. त्याचा अनुभव भारतीय संघाने घेतला. कारण वर्ल्डकपमध्ये विजयाचे सातत्य राखणारा भारतीय संघ जिंकेल असे सगळ्यांनाच वाटत होते, पण खेळातील अनिश्चितता नेमकी हेरून निश्चित विजयाकडे कसे जायचे हे ऑस्ट्रेलियाच्या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आणि सहाव्यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

वर्ल्डकप २०२३
अव्वल ५ भारतीय फलंदाज
१. विराट कोहली (७६५ धावा)
२. रोहित शर्मा (५९७ धावा)
३. श्रेयस अय्यर (५३० धावा)
४. लोकेश राहुल (४५२ धावा)
५. शुभमन गिल (३५० धावा)

अव्वल ५ भारतीय गोलंदाज
१. मोहम्मद शमी (२४ बळी)
२. जसप्रीत बुमराह (२० बळी)
३. रवींद्र जडेजा (१६ बळी)
४. कुलदीप यादव (१५ बळी)
५. मोहम्मद सिराज (१४ बळी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -