घरफिचर्सशिवलंका सिंधुदुर्ग: एक अकस्मात प्रवास!

शिवलंका सिंधुदुर्ग: एक अकस्मात प्रवास!

Subscribe

‘शिवलंका सिंधुदुर्ग’ हे 32 किल्ल्यांवर आधारित संशोधनपर पुस्तक पूर्ण झाले होते. अर्थातच गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांची गुरूआज्ञेने सोपविलेली जबाबदारी पूर्ण झाली होती. पुस्तकास पुढे 4 पुरस्कार लाभलेत. आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून सलग 32 दिवस श्रीराम केळकर यांच्या सुश्राव्य आवाजात पुस्तकाचे वाचनही झाले. सह्याद्रीवर साडे नऊच्या बातम्यांमध्ये माझी केवळ या पुस्तका अनुषंगाने मुलाखतही झाली. बाबासाहेबांकडून मला इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकातील राजा रुद्रसेन याचे चांदीचे नाणे बक्षीस रुपात मिळाले. आणि नारायणराव राणे यांजकडून पुढील जबाबदारीसाठी, एक निमंत्रण मिळाले.

शिवमंत्राने भारावलेल्या प्रचंड उत्साहात लोकं बाबासाहेबांची व्याख्यानं ऐकावयास गर्दी करीत होते. कणकवली कॉलेजचे भव्य पटांगण अपुरे पडत होते. ‘शिवचरित्र’ म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ देणारा ‘शिव-मंत्रच’ नव्हें का ? तोही साक्षात शिवशाहीरांच्या ओघवत्या वाणीतून प्रत्यक्ष ऐकावयास मिळतोय यासारखे भाग्य ते कोणते ?.
अक्षरशः तुडुंब गर्दी. आज बाबासाहेब कालच्या पुढे काय ऐकवणार? आपण किती किती म्हणून ते सारे मना हृदयात साठवायचे, ही प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अधीरता दिसून येत होती. व्याख्यानमाले वेळी माझे मित्र राजेंद्र टिपरे यांचे महाराष्ट्रातील किल्ले आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले गेले होते.
जिल्ह्यातील किल्ल्यांचे प्रदर्शन म्हणून लोकं, शिवप्रेमी जास्त उत्सुकतेने प्रदर्शन पहात होते, प्रश्न विचारत होते. अभिप्राय लिहून ठेवत होते. शिवचरित्रं व्याख्यानमाला पूर्णत्वास येत होती. ती आटोपून बाबासाहेब दोन दिवसांत पुण्यासाठी निघणार होते. त्यावेळेस त्यांचा मुक्काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊसवर होता.त्या रात्री बाबासाहेबांना कुणाकडे आग्रहाचे निमंत्रण होते. प्रतापराव टिपरे, मी सोबत होतो. त्या संध्याकाळी निवांत असता,बाबासाहेबांकडे मीच विषय काढला आणि मी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजबिस्तरा आवरून पुन्हा मुंबईकडे जात असल्याचे सांगितले.

एकटक बघत म्हणालेत, मग हा भंडारा का उचललात ? (बाबासाहेब बोलत असतात,ते त्यांच्या विशेष शैलीत) मला कळलं नव्हतं. पुन्हा म्हणालेत, जर अर्ध्यावर हा संकल्प सोडून जावयाचे होते, तर हात घातलातच का ?
ते काही नाही. विषय पूर्ण करून तडीस न्या. जे शोधून समोर आणलेत, त्यावर लिहा. ते गड कुणी, केव्हा, का उभारलेत्यावर काय घडले, कोणते युद्ध झडले,आणि त्या त्या स्थलाची आत्ताची अवस्था अन त्यास कोण कारण ?
निक्षून सांगतो, यावर अफाट फिरा-शोधा-लिहा-ते सर्व याच भूमीकडे सुपूर्द करा आणि नंतरच मग पुढचे काय ते ठरवा. अर्ध्यावर डाव सोडून जाणे, तुमच्याकडून मला अपेक्षित नाही. हे कार्य तुम्हीच पूर्ण करणार आहात. यावर एक शब्दही कारण नकोय.

- Advertisement -

ऐकताना शरमिंदा झाल्यागत अवस्था झाली. पण, गुरू आज्ञेत मी बांधला गेलो. माझ्या आयुष्यातील गुंता खरंतर इथे या जिल्ह्यात सुटणारा नव्हता, म्हणून बेचैन होतो. त्यामुळे काही करून मुंबईस निघायचेय,हा निश्चय पक्का होता. फक्त, बाबासाहेबांना कल्पना द्यावी म्हणून बोललो होतो. पण, बाबासाहेबांनी जिल्ह्यातील किल्ल्यांचे संशोधन-लेखन पूर्णत्वास नेण्याची जबाबदारीच सोपविली. तेव्हा वाटलं, जगण्याचे रितेपण जर चेहर्‍यावर दिसत असते तर किती बरे होते. सामान्य माणसाचा सुखी सदरा इथेच मार खातो. सुखी चेहर्‍यामागील मरणासन्न दुःख त्याचे तोच जाणे किंवा तो विधाता. पुन्हा इथे थांबण्याचे सबळ कारण मनास समजाविले.

पुढील काही महिने मग भारतीय इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर सभागृह, करवीर रियासत, बावडा संस्थान, वाडी संस्थान, साळशी महाल,अनेक वाचनालये फिरून-थांबून, सुत-सूत जमा करीत गेलो. आणि त्यापुढील साताठ महिने लोकसंपर्क पूर्ण तोडून केवळ अन केवळ या विषयात स्वतःस अडकवून घेतले. बहुतेकदा भैरवगड, रांगणागड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि पारगडावर मुक्कामी थांबून 32 किल्ल्यांचे संदर्भ मिळवत-जोडत पूर्ण करावयाच्या मागे राहिलो. शारीरिक एवढी नाही,पण मानसिक दगदग होत होती. सहजासहजी संदर्भ माहिती मिळत नव्हती. कारण, किल्ले संशोधन विषय कुणा गावीही नव्हता.

- Advertisement -

भैरवगड आणि रांगणा गडावरच्या त्या भयाण निरव शांततेत त्यावेळचे झालेले एकटेपणी मुक्काम आजही आठवले तरीही शहारे येतात. रांगण्यावर तर त्यावेळी कोणतीच सोय नव्हती. पावसात तर रांगणाई देवी मंदिरावरील पत्रेही गळत होते. एखादा आडोसाही सुखाकोरडा नसायचा. बरं, मंदिरास दरवाजाही नाही. दिवस एकवेळ जायचा,पण रात्रं भयान वाटायची.रातकिड्यांच्या कर्णकर्कश आवाजातही दबक्या पावलांचा कानोसा घेण्यास मिट्ट काळोखातही नजर सताड उघड्या दरवाजाकडे लागून राही. गडावरील लढायांतील वीरगती प्राप्त झालेल्या आत्म्यांचा खरंच वावर असेल का, असलाही प्रश्न नेमका डोकं वर काढायचा. या शरीर देहाच्या चिंतेत एकदाची रात्रं सरायची. मिळालेल्या,मिळणार्‍या नवनव्या संदर्भामुळे किल्ल्यावर चार-सहा पानं झाल्याचेही समाधान वाटे.

दोन-तीनदा लिहून झाल्यावर,तेवढेच ते मला कसवनचे अर्चना-अनिल सावंत बहीण भाऊ संगणक टाईप करून देऊ लागले. तिथेही बसावे लागे, कारण ऐतिहासिक पत्रांतील मजकुरात टाईप करताना चुका होत होत्या. त्या वेळीच सुधाराव्या लागत. दिवस तर असे अन असेच चालले होते.

एके रात्री आमदार राजन तेली यांचा फोन आला. म्हणालेत, नारायण राणे यांच्याद्वारे कुडाळ येथे भव्य सिंधू महोत्सव आयोजित केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या किल्ल्यांवरील एरिअल छायाचित्रांचे प्रदर्शन ठेवलेय. त्यासोबत, तुम्ही जिल्ह्यातील किल्ल्यांच्या काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन ठेवायचे आहे. त्यासाठी दुसर्‍या दिवशी संध्याकाळी कणकवली कार्यालयात भेटायचे ठरले. माझे किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसे फार मोठे नव्हते. दीडेकशे फोटोज आणि तेही लहान साईझचे लॅमिनेशन केलेले होते. प्रत्यक्ष भेटीत मला अजून कोणत्या ऐतिहासिक विषयावर प्रदर्शन देता येईल का,राजन तेलींनी विचारले तेव्हा, तुकाराम जाधव यांचे शस्त्रास्त्रं आणि मित्र प्रशांत ठोसर यांचे जुन्या नाण्यांचे प्रदर्शन मी मिळवून देईन असे सांगितले व तसे भरवलेही.

पुन्हा उदंड प्रतिसाद लोकांचे उत्स्फूर्त अभिप्राय मिळत होते. वर्तमानपत्रातील माहितीवरून जिल्ह्यातील मान्यवरांचीही पावलं इकडे वळू लागली होती. जिल्ह्यात इतके किल्ले? याचे नवल वाटत होते. फोटोज पाहून, जिज्ञासू व्यक्तींकडून प्रश्न विचारले जात होते. आश्चर्य म्हणजे यात मला एकही इतिहासाचा शिक्षक भेटला नाही,हे विशेष.

माझ्याप्रमाणे आदरणीय तुकाराम जाधव, प्रशांत ठोसर,आणि संयोजकांनाही प्रदर्शन भरविल्याचे समाधान मिळत होते.
एके दिवशी सायंकाळी तरुण भारत या दैनिकाचे सर्वेसर्वा आदरणीय किरण ठाकूर आणि नारायणराव राणे यांचे प्रदर्शन पहावयास एकत्रितपणे येणे झाले. प्रदर्शन-उदघाटन स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. पण नंतर आवर्जून वेळ काढून नारायणराव आले होते. प्रदर्शन पहाताना त्यांनी किल्ल्यांविषयी माहिती घेतली आणि विचारले, पुढे याचे पुस्तक काढावयाचे वगैरे काही मनात आहे का? जरूर यावर लिहा,विचार करा म्हणालेत.

मी ‘होय,प्रयत्न करतोय’,इतकंच म्हणालो. त्याचवेळी त्यांनी सांगितले. सर्व माहिती आणि आवश्यक फोटोज माझ्याकडे घेऊन या. जिल्ह्यातील या किल्ल्यांचे चांगल्या प्रतीचे आपण पुस्तक तयार करू. काही क्षण असे अकस्मात अवतरतात, जे आपण कल्पना वा अपेक्षा न बांधता अगदी आपसूकच अनपेक्षितपणे वाट्यास येत असतात. त्यापैकी हा सुखद अनुभव माझ्यासाठी होता. तोच दिवस नव्हें, तर पुढील काही दिवस मी त्या सुंदर अनुभवात जगत होतो.

आत्ता पुढील काळजी नव्हती, पण किल्ल्यांची माहिती दर्जेदार आणि पूर्णत्वास घेऊन जाणारी हवी यासाठी कसून प्रयत्न करावयाचे,ही सर्वार्थाने जबाबदारी माझी होती. पुस्तकाचे हस्तलिखित वाचून माझे गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, निनादजी बेडेकर, प्रा.प्र.के.घाणेकर या आदरणीय महानुभवांनी माझ्या पुस्तकास प्रेमाने प्रस्तावना लिहून आशीर्वाद पाठवलेत.

पुढे नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांकडे माहिती-फोटोज सोपविल्यावर एक सुंदर पुस्तक निर्माण केले. इतकेच काय,तर पुढील कणकवली येथील सिंधू महोत्सवात ‘शिवलंका सिंधुदुर्ग’ या माझ्या पुस्तकाचे अगदी थाटात प्रकाशनही केले. प्रकाशन करावयास त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनाच येण्याविषयी गळ घातली होती. त्यासाठीही मला मुद्दाम फलटणला पाठविले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इच्छा असूनही येऊ शकले नव्हते. मग कुमार केतकर यांना बोलाविले गेले.

या, पुस्तकाची प्रिंटिंग निर्मिती प्रक्रिया मुंबईत सुरू असताना आणि पुढेही नारायणराव राणे यांनी काही सुखद धक्के दिलेत. जे मला अनाकलनीय असेच होते. इथे एक बाब मी आवर्जून सांगेन, मी त्यांचा पूर्वी कधीही फॅन-फॉलोअर नव्हतो आणि आजही नाहीय. मात्र, त्यांचे स्नेहप्रेम जरूर अनुभवले. एखाद्या व्यक्तीची धमक जर समाजाच्या सर्वतोपरी विकासात आमूलाग्र बदल घडवून आणत असेल तर त्या व्यक्तीचे कार्य आणि व्यक्तित्वाची उंची प्रेरणादायी ठरते. पण,तसे न घडल्यास नियतीने पुरविलेल्या शक्तीचा निव्वळ अपव्यय आणि समाजाचा अपेक्षाभंग होतो. त्यांच्या बाबतीत तो हजार टक्क्यांहून अधिक झालाय हे उघड नोंदवावयास मनास आवरू शकत नाहीय.

‘शिवलंका सिंधुदुर्ग’ हे 32 किल्ल्यांवर आधारित संशोधनपर पुस्तक पूर्ण झाले होते. अर्थातच गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांची गुरूआज्ञेने सोपविलेली जबाबदारी पूर्ण झाली होती. पुस्तकास पुढे 4 पुरस्कार लाभलेत. आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून सलग 32 दिवस श्रीराम केळकर यांच्या सुश्राव्य आवाजात पुस्तकाचे वाचनही झाले. सह्याद्रीवर साडे नऊच्या बातम्यांमध्ये माझी केवळ या पुस्तका अनुषंगाने मुलाखतही झाली. बाबासाहेबांकडून मला इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकातील राजा रुद्रसेन याचे चांदीचे नाणे बक्षीस रुपात मिळाले. आणि नारायणराव राणे यांजकडून पुढील जबाबदारीसाठी, एक निमंत्रण मिळाले. याविषयी पुन्हा केव्हा तरी. मुंबईसाठी यु टर्न घेण्याच्या पूर्ण तयारीवर असताना माझ्या आयुष्यात हे काही अकस्मात-अकल्पित घडत होते, इतकं मात्र खास तरीही मी इथे समाधानी नव्हतो.
जीवनात जगणे अधिक करून परिस्थितीला पुरून उरणे याचा प्रत्यय येतो तो शहरातच. आणि त्याची सवय असलेल्या कुणास ग्रामीण भागात रुजणे तसे अवघडच.गावाकडे मोकळेपणातल्या उलाढाली, डावपेचांचे राजकारण, टपरीवरच्या गोष्टी, इतरांच्या जीवनाची फाजील चौकशी, टिंगलटवाळी हा इथल्या जीवनपद्धतीतील ढळढळीत दोष आता लोकस्वभावाचा भाग झालाय. गंजने आणि असेच झिजणे या प्रक्रियांचा स्पर्श आपल्यास न व्हावा असे वाटत असेल तर आपणच जागरूक असावयास हवे ना? शरीराच्या अवयवांना त्यांच्या रचने-क्षमतेनुसार-मूलधर्मानुसार सहज स्वाभाविक हालचाली करता नाही आल्या तर बुद्धीला वाव न मिळाला तर भावनांचे प्रसरण न घडले तर संकल्पांचे प्रकटीकरण कसे होईल? सर्वांगानी आणि सर्वार्थाने जगणे कसे बरे होईल? माझा मीच या चक्रव्यूहात फसलो होतो.

माणसाच्या चांगल्या आशादेखील दैवाचा शह-काटशह लागून जागच्या जागी राहतात. मीसुध्दा शापित आहे. परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होऊन जीविताचा हा प्रवास करतोय. ‘जीवन’ तर एक ‘दिव्य वर’ परमेश्वराचा ‘कृपाप्रसाद’. तो अनेक शापांनी युक्त असाही मी अनुभवतोय. शेवटी तोच नियंता,सर्वकाही ठरविणार.आपण नाममात्र. फक्त श्वासावर श्रद्धा ठेवून जगायचं. ‘शिवलंका सिंधुदुर्ग’ पुढे ‘शिवप्रभूंचे कर्नाटकातील किल्ले’- संशोधन हा ध्यास अधुरा राहिल्याचे शल्य मनात आहेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -