घरफिचर्सस्मार्ट फोन, जलद पेमेंट!!

स्मार्ट फोन, जलद पेमेंट!!

Subscribe

मोबाईलमुळे अनेक प्रकारच्या गोष्टी सुलभ व जलद होत असल्याने आज मोबाईल हा आपला जिवलग-सखाच झालेला आहे [स्त्री-पुरुष दोघांचाही !] काही वर्षांपूर्वी इंटरनेट बँकिंग आले, ऑनलाईनचे महत्व वाढले. पण स्मार्ट फोनवर बँकिंग आल्याने, स्मार्ट पेमेंट करण्याची सुविधा हाताशी आली. म्हणजे नेमके काय झालेले आहे? यातील फायदे-तोटे आपण पाहणार आहोत. जगभरात इंटरनेट व मोबाईलधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडेही हे प्रमाण वाढतेच आहे.

जगात कोणतेही जेवण मोफत मिळत नाही, अशी एक लोकप्रिय अशी म्हण आहे. याचा अर्थ जरी कुठे पार्टी, जेवणावळी किंवा अन्नछत्र -भंडारा वगैरे असले तरीही तसी जेवण तयार करण्यास खर्च येत असतो. तो जरी तुमच्या आमच्या खिशातून घेतला जात नसेल तरीही खर्च येतोच. त्यासाठी वाणी, गॅसवाला, स्वयंपाकी असे जे जे संबंधित असतील ते काही मोफत सेवा देत नसतील. कोणी ना कोणी अशा खर्चाचा भार उचलत असतील. देणगी, प्रायोजकत्व अशा काही माध्यमातून ‘निधी’ जमा केला जात असेल. आर्थिक व्यवहार म्हणून जर पाहिले तर जमा आणि खर्च हे अगदी पाठीला पाठ लावून असल्यासारखे असतात.

कोणताही खर्च करायचा म्हटले की, पेमेंट करावे लागते. आजच्या स्मार्ट युगात ते कसे करणार? हे आपल्यासारख्यांना माहीत असते. मोबाईलमुळे अनेक प्रकारच्या गोष्टी सुलभ व जलद होत असल्याने आज मोबाईल हा आपला जिवलग-सखाच झालेला आहे [स्त्री-पुरुष दोघांचाही !] काही वर्षांपूर्वी इंटरनेट बँकिंग आले, ऑनलाईनचे महत्व वाढले. पण स्मार्ट फोनवर बँकिंग आल्याने, स्मार्ट पेमेंट करण्याची सुविधा हाताशी आली. म्हणजे नेमके काय झालेले आहे? यातील फायदे-तोटे आपण पाहणार आहोत.

- Advertisement -

मोबाईलचा आर्थिक कारणांसाठी उपयोग – फार पूर्वी जेव्हा मोबाईल आला तेव्हा त्यात इतक्या सुविधा नव्हत्या. केवळ फोन करणे व घेणे इतक्या मर्यादित उपयोगाकरिता व लँडलाईनला पर्याय म्हणून निर्माण झालेले आधुनिक संपर्क-यंत्र. पुढे याची उपयोगिता इतकी वाढली की, आताच्या घडीला मोबाईल हा जणू मिनी-ऑफिस, व्यक्तीगत सहाय्यक [म्हणजे पी.ए.] अशा लेव्हलवर काम करताना दिसतो आहे. गुगलचा अलेक्स वगैरे तर अगदी अल्लाऊद्दीनच्या जादूच्या दिव्यापेक्षा प्रभावी आहे असे जाणवते. जी कमांड देऊ,ते काम पूर्ण केले जात आहे. शिवाय अनेक तरुणांचा कम्पॅनियन, तर जेष्ठांचा संपर्क साधण्याचा, दृश्य-गप्पांचा व युट्यूब, बातम्या असे सबकुछ मिळत असल्याने एक भक्कम विरंगुळा झालेला आहे. शिकणार्‍यांना रेसिपी, डिक्शनरी तसेच ऑनलाईन कामे होऊ शकतात.

मोबाईलद्वारे पेमेंट करण्याची सोय झाल्याने घरबसल्या वस्तू खरेदी करण्याची, विविध पेमेंट्स करण्याची नामी सोय-सुविधा झालेली आहे. या कारणाने मोबाईल हे आधुनिक यंत्र हे कानामागून आले व तिखट झाले या पूर्वीच्या म्हणीनुसार खूप लाडके झालेले आहे. पूर्वीचा डब्बा कॉम्प्युटर, लॅपटॉप, साधा फोन अशी काही यंत्रे-साधने एकदम मागे पडलेली आहेत. [पेजर तर कधी जन्मला आणि कधी पाताळात गेला ! हे कोणाच्या लक्षात तरी असेल का?] किणी काका म्हणतात तसे पेजरचा अगदी सॉलोमन ग्रॅण्डी झाला, कवितेत सांगितले गेले की, तो सोमवारी जन्मला आणि रविवारी निवर्तला !! तंत्रज्ञान क्रांतीच्या लाटेने एकेक साधन हे कालबाह्य होते आणि त्याची जागा नव्या अधिक प्रभावी साधनाने, नव्या प्रणालीने होते आहे. हा मानवोपयोगी सुधारणांचा वेग हा अचंबित करणारा आहे नक्कीच.

- Advertisement -

डिजिटल पेमेंटचा अधिक प्रमाणात वापर व्हावा व रोखीचे व्यवहार कमी व्हावेत म्हणून अशा पर्यायांना सरकारी पातळीवर कमालीचे प्रोत्साहन मिळत आहे. गेली अनेक वर्षे रोख रकमेत व्यवहार केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत बनावट व्यवहार, भ्रष्टाचार आणि काळा पैसे यांचे प्रमाण अतोनात वाढले. त्यातून दहशतवाद, अवैध मार्ग जन्माला आले, यावर अंकुश ठेवायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स पद्धती स्वीकारली पाहिजे व जास्तीत जास्त व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवेत. थेट व जलद पेमेंट ही खासियत आहेच शिवाय रोखीत पैसे ने-आण करण्याची जोखीम असते, तीही यात दूर झाली. म्हणूनच आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून असे व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. केवळ आपल्याच देशात नव्हे तर परदेशात अनेक ठिकाणी असा दृष्टीकोन स्वीकारलेला असल्याने जागतिक पातळीवरील पेमेंट सिस्टीम ही अधिक प्रमाणात विस्तारली जाते आहे. सायबर हल्ले आणि सिस्टीम हॅकिंग [Hacking] असे काही नुकसानकारक प्रकार सोडले तर अशी व्यवस्था ही सर्वांच्याच हिताची आहे असे जाणवते आहे.

एका नजरेत ऑनलाईन पेमेंट्सबाबतची जागतिक स्थित्यंतरे –
१९९८- पे-पालची स्थापना
२००३- जगभरात मोबाईलद्वारे खरेदीचा शुभारंभ
२००७- आय फोन व अन्ड्रॉइड प्रणालीचा शोध
२०११- गुगल वॉलेटचा प्रारंभ
२०१४- अ‍ॅपल-पे आले

कॅशलेस इकॉनॉमी आणि नोटाबंदीची इष्टापत्ती – गरज ही शोधाची जननी असते, हे आपल्याला एरवी पटले नसते. मात्र जेव्हा नोटबंदी झाली आणि पैशाची चणचण निर्माण झाली, त्यावर उपाय म्हणून ऑनलाईन पेमेंट प्रकार उदयाला आले.

आपल्याकडील प्रचलित असलेले दहा मोबाईल वॉलेट कंपन्या –
१] पे -टी एम २] एमॅझॉन -पे ३] गुगल-पे -[पूर्वीचे तेज] ४] फोन -पे ५] एसबीआय -बडी
६] सिटी मास्टर पास ७] आय सी आय सी आय पॉकेट्स ८] एच डी एफ सी झॅप
९] मोबिक्विक १०] वोडाफोन एम-पेसा ११] ऑक्सिजन मोबाईल वॉलेट

नेमका उपयोग कशासाठी होतो-
१] पैसे पाठवण्यासाठी आधुनिक व सोयीस्कर सुविधा
२] छोट्या खरेदी -विक्रीच्या व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी
३] मोबाईल रिचार्ज करण्यासाठी
४] बिल पेमेंट्सकरीता -ज्याला आपण युटिलिटी बिल्स म्हणतो म्हणजे दर महिन्याचे विजेचे बिल,पाणी पट्टी,मासिक भाडे,मालमत्ता कर, गॅस, यांची बिले भरण्यासाठी, शिवाय शाळेची फी व अन्य पेमेंट्स करण्यासाठी
५]तिकिट्सचे पैसे देण्यासाठी-सिनेमा, नाटक, विमान, बोट, बसेस, ट्रॅव्हेल्स व ट्रेनच्या तिकीट्स काढण्यासाठी उपयुक्त

फायदे –
१] जलदगतीने पेमेंट होते
२] सुरक्षित
३] रोख पैसे जवळ बाळगण्याची जोखीम नाही
४] थेट पैसे भरण्याची मुभा
५] स्वतः कुठे जावून रांगेत उभे राहण्याची गरज नाही
६] वेळेची बचत
७] कोणावर अवलंबून राहायला नको
८] पेमेंट करण्यास उशीर झाला म्हणून दंड भरण्याची गरज नाही
९] मनुष्यबळाची बचत
१०] अनावश्यक प्रशासकीय खर्चात कपात शक्य
११] काही ठिकाणी वेळेआधी भरल्यास काही सवलत मिळते, त्याचा लाभ घेता येतो
१२] काही व्यवहारात कॅशबॅक मिळण्याची सुविधा
१३] डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन
१४] काळा पैसा व अनधिकृत व्यवहारांना प्रतिबंध
१५] अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी
१६] काही अ‍ॅप्स हे विविध भाषांत उपलब्ध असल्याने अन्य भाषिकांना सोयीचे,
इंग्रजीचा अडसर नसल्याने बहुसंख्यांना सोयीचे

काही तोटे -कोणत्याही सिस्टीमचे जसे फायदे असतात, तसेच काही गैरसोयी वा त्रुटी असतात, आपण पाहणार आहोत.
१] सिस्टीम बंद पडल्यास पंचाईत होऊ शकते, अंतिम मुदत चुकू शकते, भूर्दंड पडू शकतो.
२] आपल्या हातून चूक झाल्यास, आपले पेमेंट भलत्या ठिकाणी, दुसर्‍या खात्यात जाण्याची शक्यता
३] सिस्टीम हॅक झाल्यास नुकसान होऊ शकते
४] आपला मोबाईल हरवल्यास/चोरीला गेल्यास पंचाईत होऊ शकते
५] पासवर्ड चुकल्यास, चोरी झाल्यास मोठा गफला होवू शकतो

इंटरनेट, मोबाईल आणि पेमेंट अ‍ॅप्स – जसजसा आपल्या देशात इंटरनेटचा वापर वाढेल, अधिकाधिक लोकसंख्या नेटच्या विश्वव्यापी जाळ्यात सामावली जाईल आणि तितक्याच प्रमाणात मोबाईल्स -विशेषतः स्मार्ट फोन्स वाढत जातील,तितक्याच संख्येने पेमेंट अ‍ॅप्स वाढतील व त्याचा वापर अधिक लोकप्रिय होईल. जगभरात इंटरनेट व मोबाईलधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडेही हे प्रमाण वाढतेच आहे. जशी ग्राहक-संख्या वाढेल तसे अनेक सर्व्हिस प्रोव्हायडर्स वाढतील, त्यांच्या किमती व गुणवत्तेबाबत निकोप स्पर्धा राहील ज्याचा अंतिम फायदा हा तुम्हा-आम्हा ग्राहकांनाच होईल.

याबाबतचे तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस विकसित होते आहे, त्यातून नवनवीन सोयी-सुविधा निर्माण होतील जे सर्व तर्‍हेच्या ग्राहकांना वापर करण्याकरिता अधिक सुलभ व सोयीस्कर होईल आणि हे डिजिटल-चक्र अधिक व्यापक होऊ शकेल. मात्र हे करताना सायबर दरोडे, सिस्टिमला खिंडार पाडणारे आणि त्यात एखादा भयानक व्हायरस शिरला तर मात्र या बोटांवरील सेवेचा[Finger Tip Service] गोंधळ उडून अनर्थ होऊ शकतो. त्याकरिता सिस्टीम निर्मितीइतकेच सिस्टीम संरक्षक योजना व सायबर सुरक्षेचा विचार केला पाहिजे. निर्दोष यंत्रणा असणे, सातत्याने धोक्याबाबत प्रतिबंधक उपाय जारी राखणे हे मात्र अनिवार्य आहे.

-राजीव जोशी – बँकिंग व अर्थ अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -