घरफिचर्ससमाजविघातक टिवटिव

समाजविघातक टिवटिव

Subscribe

भारतीय घटनेच्या कलम १९ (क) ने सर्व भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. घटना लागू झाल्यापासून उपलब्ध असलेल्या माध्यमातून त्या त्या वेळी अनेकांनी या हक्काचा हवा तसा वापर केलाय. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी अभिव्यक्त होण्याच्या हक्काचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कलमाचा वापर करत असताना राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतीमत्ता आणि अब्रूनुकसानी किंवा अपराधास चिथावणी दिली जाणार नाही, असे वाजवी निर्बंधसुद्धा घातलेले आहेत. कम्युनिकेशनच्या साधनात जसजशी प्रगती होत गेलीय, तसतशी अभिव्यक्तीची व्याख्यासुद्धा बदलत गेलीय. या विषयावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे ट्विटर आणि त्यावर सतत होणारी समाजविघातक टिवटिव.

मागच्याच आठवड्यात अवघ्या मराठीजनांचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि जगाने ज्यांना अहिंसेचे प्रतिक मानले असे महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले गेलेत. बरं ट्विट करणारे कुणी साधी सुधी माणसं नाहीत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शुद्र जातीत झाला’, असे ट्विट कधीकाळची बॉलिवूड सेलिब्रिटी पायल रोहतगीने केले. तर ‘महात्मा गांधींचे जगभरातील पुतळे पाडून टाका, नोटेवरून त्यांचा फोटो काढून टाका’, अशी मुक्ताफळे आयएएस अधिकारी निधी चौधरी यांनी ट्विटरवर उधळली आहेत. दोन्ही ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. निधी चौधरीचे निलंबन, तर पायल रोहतगीला अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली.

- Advertisement -

विषय हा नाही की या दोन महिलांनी सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नीतीमत्तेला तिलांजली देऊन हे ट्विट केले. त्याहून गंभीर विषय असा आहे की केंद्रात सत्ताबदल होताच बिनबोभाटपणे असे ट्विट व्हायला लागले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल साईट्स यांना गंभीरतेने न घेणारा एक मोठा वर्ग देशात आहे. तसे असले तरी त्यामुळे सामाजिक एकोपा गढूळ करण्याची क्षमता या माध्यमांमध्ये आहे. सत्तेत बसलेल्या पक्षाची एक विशिष्ट विचारधारा असून, या विचारधारेचे अनुयायी सोशल मीडियावर चेकाळलेले दिसत आहेत. पायल रोहतगीने स्वतःला जाहीरपणे हिंदुत्ववादी असल्याचे सांगितले आहे. मात्र, सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी आपली विचारधारा प्रकट केलेली नाही. गांधींबद्दल केलेल्या ट्विटनंतर त्यांनी माफीनामाही दिला. आपण उपरोधिक वक्तव्य केले असल्याचे त्यांचे म्हणणे असले तरी त्यात #Thank U Godse या उल्लेखामुळे गोंधळ माजला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येप्रकरणी एक वादग्रस्त ट्वीट केले होते. त्याआधी गौरीलंकेश यांची हत्या झाल्यानंतर त्यांना शेलक्या शब्दांची लाखोली वाहनारे ट्विट केले गेले. विशेष म्हणजे ज्याने हे ट्विट केले होते, त्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करतात. काल परवाच भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपलेच मित्र पक्ष जेडीयुचे नेते नितीश कुमार यांचे इफ्तार पार्टीचे फोटो ट्विट करत नवरात्रीला देखील असेच फलाहाराचे आयोजन करण्याचा सल्ला दिला. त्यावरही बराच गदारोळ झाला. अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना तंबी दिली असली तरी जो संदेश जायचा तो गेलाच.

- Advertisement -

२०१४ साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर बिफ बंदीवरून केली गेलेली वक्तव्ये, अल्पसंख्याक समुदाय, सामाजिक आरक्षण यांना हिणवणारी वक्तव्ये (मग ती सोशल मीडियावरची का असेनात) खूप झाली. त्यावर असहिष्णूतेचा शिक्का बसवत काही सजग भारतीय नागरिकांनी आवाज उठवला. त्या असहिष्णू आंदोलनाचीही हेटाळणी सोशल मीडियावर जोरदार झाली. ज्या लोकांनी असहिष्णू वातावरणाबाबत तोंड उघडले त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ट्रोलर्स आर्मी तुटून पडत होती. यातूनच आमिर खानला परिवारासहित देश सोडावासा वाटला. काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियांका चुतर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली गेली. तटस्थ पत्रकारांना तर सोशल मीडियावर रोजच धमक्या मिळत असतात. मात्र, आतापर्यंत एकाही ट्रोलरवर कारवाई झालेली नाही. ज्यांना अशाप्रकारच्या धमक्या मिळत होत्या, त्यांनीही आता हा विषय गंभीरतेने घेणे सोडून दिले आहे.

विषयाचे गांभीर्य आता सुरू होते. पायल रोहतगीसारख्या एखाद्या नटीने शिवाजी महाराजांच्या कुळावर भाष्य करावे, हे अतिच झाले. ज्यावेळी महाराष्ट्रात जेम्स लेन प्रकरण घडले होते. त्यानंतर मोठा गजहब माजला होता. भांडारकर प्राच्यविद्या भवनाची तोडफोड करण्यात आली होती. पायल रोहतगीने महाराजांच्या बाबतीत केलेल्या ट्विटवरून रस्त्यावर जरी संघर्ष दिसत नसला तरी तो वैचारिक पातळीवर नक्कीच होईल. शिवाजी महाराज हे क्षत्रिय नसून ते शेतकरी कुळातून आले होते, असे वक्तव्य करून पायल रोहतगीला नक्की काय साध्य करायचे होते? त्याचप्रकारे सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांचे पुतळे तोडून टाका? असे विधान करायची काहीच गरज नव्हती. दोघांनीही हे ट्विट डिलीट केले असले तरी त्यातून बेधडक वक्तव्ये करण्याची प्रवृत्ती नक्कीच बळावत आहे.

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे तर या मंडळींचा आत्मविश्वास वाढला नाही ना? अशी शंका घ्यायला जागा आहे. भाजपशी संबंधित असणारे किंवा त्यांची विचारधारा माननारे लोक वारंवार असे ट्विट करताना दिसत आहेत. विरोधी विचारांच्या महापुरुषांचे हनन जास्तीत जास्त कसे होईल, याचा हा प्रयत्न दिसतोय का? असाही संशय घेण्यास जागा आहे. अन्यथा सरकारने त्यावर कठोर कारवाई केली असती. मात्र, सरकारकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. उलट सरकारच्या विरोधात जे आवाज उचलत आहेत, त्यांना नोटीस देण्याचे काम गेल्या काही काळात महाराष्ट्र सरकारने केले होते. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधता असणार्‍या देशात एकच विचारधारा वरचढ होऊन चालणार नाही. याची खबरदारी सरकारने घ्यायची असते. मात्र, सरकार जर अशा समाजविघातक टिवटिवला पाठिंबा देत असेल तर वैचारिक संघर्ष रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -