घरफिचर्सplease ! दिशा सालियानच्या मृत्यूचा तमाशा थांबवा...

please ! दिशा सालियानच्या मृत्यूचा तमाशा थांबवा…

Subscribe

दिशाला जर खरंच न्याय मिळवून देण्याची इच्छा असेल तर या राजकारण्यांनी त्यांच्याजवळील पुरावे किंवा जी काही माहिती असेल तर ती त्यांनी पोलीस यंत्रणा आणि सीबीआयला द्यावी. न्यायालयात जावे आणि खऱ्या आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा. उगाच स्वत:च्या फायद्यासाठी त्या दुर्दैवी तरुणीच्या मृत्यूचं राजकीय भांडवल करू नये.

स्वार्थासाठी राजकारण किती गलिच्छ पातळीवर जाऊ शकते याचा अनुभव सध्या महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश घेत आहे. मेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाणारी ही राजकीय मंडळी कधीच कोणाची नसतात हे सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचं राजकीय फायद्यासाठी भांडवल करणाऱ्या सेना -भाजप नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपातून वारंवार समोर येत आहे. आता तर दिशाच्या आईवडिलांनी हात जोडून कृपा करून हे सगळं थांबवा, आम्हांला जगू द्या अन्यथा आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही अशी विनंतीवजा इशाराच या राजकारण्यांना दिला आहे. माणुसकीच्या नात्यातून तरी राजकारण्यांनी याचा विचार करायला हवां. अन्यथा यापुढे लोकप्रतिनिधी हे आपल्यासाठी असतात. यावर जनतेचा आतापर्यंत उरला सुरला विश्वासही उडेल…

दिशाला जर खरंच न्याय मिळवून देण्याची इच्छा असेल तर या राजकारण्यांनी त्यांच्याजवळील पुरावे किंवा जी काही माहिती असेल तर ती त्यांनी पोलीस यंत्रणा आणि सीबीआयला द्यावी. न्यायालयात जावे आणि खऱ्या आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा. उगाच स्वत:च्या फायद्यासाठी त्या दुर्दैवी तरुणीच्या मृत्यूचं राजकीय भांडवल करू नये. तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यावा. उगाच तोंड वाजवून तिचे मृत्यूंनंतर वाभाडे काढू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अजिबात नाही.

- Advertisement -

आज मुंबईत लाखो तरुण तरुणी भविष्याची स्वप्ने घेऊन येतात. काहीजण येथील स्पर्धेत यशस्वी होतात तर काहीजणांना यश मिळवण्यासाठी सतत झुंजावे लागते. दिशा कुठून आली आणि तिने येथे काय केले यात मी पडत नाही. पण एक स्त्री म्हणून आई म्हणून त्या तरुणीचा अंत बघून काळीज गलबलतं. एकुलती एक लेक अशा पद्धतीने गमावणाऱ्या तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातील व्यथा, अश्रू बघून कसं सहन करताहेत हे सगळं असा प्रश्न पडतो. दिशाने खरंच आत्महत्या केली की तिची हत्या झाली , तिने मद्यपान केलं होत का, ती पार्टी कल्चरवाली होती का, ती काळी गाडी कोणाची होती हे सगळं जर या राजकारण्यांना माहित आहे. तिच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार आहे हे माहित असूनही इतकी महत्वपूर्ण माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी या राजकारण्यांवरच खर तर गुन्हा दाखल व्हायला हवा.

जर एवढी सगळी माहिती पुराव्यासकट यांच्याकडे आहे तर मग वाट कसली पाहातय? ते पुरावे या राजकारण्यांनी सादर करायला हवे. दोन वर्ष कोणाची वाट पाहत आहात? फक्त सोयीने विरोधकांना घाबरवण्यासाठी दिशाचा वापर करू नये. त्या पोरीची लाज वाचवावी आणि महाराष्ट्राचीही. उद्या जर या राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे व्यथित होऊन दिशाच्या आईवडिलांनी जीवाचे काही बरे वाईट केले तर सगळ्यात आधी या राजकारण्यांनाच तुरुंगात टाकायला हवं. कारण दिशाला मृत्यनंतरही छळणारे हेच राजकारणी तिच्या आईवडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरू शकतात हे सध्याचा राजकीय खेळ बघून तरी वाटू लागलं आहे. विरोधक आपली गुपीत फोडणार म्हणून त्यांच तोंड बंद करण्यासाठी टोपलीत ठेवलेल्या विषारी सापाची (दिशा हत्येचा पुरावा तत्सम जे काही असेल ते) भीती दाखवून गारुड्याचा खेळ खेळू नये. ज्या शिवाजी महाराजांच्या नावाचा तुम्ही ऊठ सुठ हवाला देत असता त्यांच्या राज्यात महिलांच्या अब्रूची अशी लक्तरे काढली आल्याचे कधी ऐकले नाही की वाचलेही नाही. मराठी आहोत आपण. मग मराठ्यांसारखे वागा ना. दिशा मृत्यूप्रमाणे सोयीप्रमाणे मराठी असण्याचा आव आणणं बंद करा. खऱ्या अर्थाने मराठी बाणा अंगिकारा.

- Advertisement -

(लेखिका या माय महानगरमध्ये डिजिटल हेड आहेत)

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -