घरफिचर्सऐकणारे कान तयार होण्याची गरज आहे

ऐकणारे कान तयार होण्याची गरज आहे

Subscribe

घरी जाऊन हा प्रकार आजीला सांगितलं तर तिने माझच डोकं फोडलं. माझ्या डोक्यात लाटणं घातलं. मी सहन करतच गेले लहान असल्यापासून ताई. लग्न झालं तर माझा नवराही बेवडाच निघाला. नणंदेच्या नवर्‍याचा पहिल्यापासून माझ्यावर डोळा होता. त्यानेही अंगाशी घाण प्रकार करण्याचा प्रकार केला तेव्हा मी पळून गेले. आता तो चांगला साठ वर्षांचा झाला आहे. पण तरीही मला सांगतो, एकदा तरी मी तुला वापरणारच. पाच मिनिट का होईना मी तुला घेणारच. हे घरात कुणाला सांगू ताई? माझा नवरा बेवडा काही काम करत नाही. मी बाहेर अशी स्वयंपाक, लादीपोत्याची कामं करते. नणंदेला सासूला हे सांगितलं तर म्हणतील तूच बेकार आहे. म्हणून तो नाद करतो. मी गप बसते.

कविता मला सांगायला लागली, माझी आई आणि बाबा खतरनाक होते. आपल्या हातून कोणतीही चूक होता कामा नये आणि झाली तर… बस् हीच एक भीती मला सतत वाटायची ताई. एकदा एका मुलाने माझी छेड काढली होती हे कळल्यावर वडिलांनी गरम इस्त्रीच दंड घट्ट पकडून त्यावर टेकवली. तीन भावंडात एक भाऊ सगळ्यात लहाना असेल दोन तीन वर्षांचा आणि मोठा भाऊ पंधरा सोळा वर्षांचा असेल. मी आठ नऊ वर्षांची. आम्ही एकदम साध्या घरात रहायचो, असे बघा वरच्या मजल्यावर. झोपडपट्टीसारखीच वस्ती होती. तिथे पहाटे फार लौकर पाणी यायचं अगदी दोन तास. मोरी बाहेर होती. तिथेच घरातले सगळे सकाळी भांडी कपडे धुवायला निघून जायचे. मी एकटीच असायची नं मग…
एकटीच? अगं भाऊ होते की तुझे सोबत, मी म्हणाले.

काय सांगू ताई माझं नशिबच फालतू आहे एकदम. आई, आजी बाहेर गेलेल असायचे आणि बाप दारू पिऊन ताठ पडलेला असायचा. तेव्हा माझा हा मोठा भाऊ आणि खालच्या मजल्यावर राहणारा एक पंचवीस तीस वर्षांचा माणूस.. तो तेव्हा घरात घुसायचा आणि दोघे माझी चड्डी वर करून आत बोटं फिरवायचे. मला खूप झोप आलेली असायची. काही कळायचंच नाही. शेजारी लहान भाऊ गाढ झोपलेला असायचा. कोणाला हाक मारू..

- Advertisement -

मी एकदम जाडी अत्ता आहे तशीच लहानपणापासून. पुरषाला आपण जाड आहोत की बारीक, काले की गोरे लहान की मोठे काही दिसत नाही अश्यावेळी. एकदा माझी चड्डी त्यांनी खूप जोरात ओढली आणि मला फार दुखलं. मी दचकून जागी झाले. तेव्हा ते दोघे घाबरून गप बसले. त्या दिवसानंतर मी पांघरूण लपेटून झोपायची तर माझा भाऊ ते पांघरूणही ओढून काढायचा. बाप शेजारीच झोपलेला असायचा आणि हा प्रकार व्हायचा. तेव्हा इतकच कळलं की हे जे करतात ते कायतरी भयंकर आहे. मी हा प्रकार घरी सांगितलाच नाही. कारण मलाच मार बसला असता.

नंतर त्याच माणसाने मी खेळत असताना मला त्याच्या जिन्याखालच्या खोलीत बोलावले आणि स्टॉव्ह बंद करून दे, असे सांगितले. मला जमत नाय, असे सांगितले तरी त्याने आग्रह केला. मी आत गेल्यावर त्याने दरवाजा बंद केला मला घट्ट मिठीत घेतले आणि त्याचे लिंग बाहेर काढून त्यावर माझा हात करकचून दाबून धरला आणि तोंडाने विचित्र आवाज करायला लागला. तेव्हा मी जोरात किंचाळले आणि बाहेर पळून गेले.

- Advertisement -

हे सगळं सांगताना कविताच्या डोळ्यातून पाणी वहात होतं. तिच्यासोबत बलात्कार झाला नव्हता, म्हणजे ज्याला टेक्निकली बलात्कार म्हणातात तसा. पण बाकी शरीरासोबत आणि मनासोबत जे झाले ते त्याच तीव्रतेचे भीषण असे काही होते. ज्याच्या आठवणी अजूनही तिचा पाठलाग सोडत नाहीत.

तिचे अनुभव ऐकले आणि वाटलं आपण मध्यमवर्गीय ब्राह्मण वगैरे सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले म्हणजे सगळं कसं तूप लोण्यासारखं आयुष्य गेलं असेल अश्या समजात सगळे असतील नै. तर ही धुणीभांडी करणार्‍याच्या घरात जन्मलेली आणि अजूनही तेच काम करणारी बाई… हिला लहानपणापासून आलेले अनुभव आणि मला आलेले अनुभव किती सारखे आहेत ! ती गरीब असल्याने आणि मी जरा सुखवस्तू घरात असल्याने फारसा फरक पडला नाही. फक्त माणसं बदलली आहेत, नाती वेगळी आहेत. पण वेदनंच्या आठवणींनी अंगावर येणारे शहारे हे अत्यंत एकसारखे आहेत. मला फक्त दाखवता येतं की मी निडर आहे तोंडफाटकी आहे. जगाला उडवून लावणारी आहे. इत्यादी हिला ते करता येत नाही. पण आमच्या जखमांमध्ये काहीच फरक नाहीये. मी माझ्या जखमा खुलेपणाने दाखवल्या तरी समाज मला घाण ठरवणार आणि तिच्या जखमा तिने प्रयत्नपूर्वक घाबरत ओठांवर आणल्या तरी तिला जिंदा गाडण्यात येईल.

खरंच जात, धर्म, वर्ण ह्या गोष्टी स्त्री-पुरूष, लहान मुलं, वयस्क हे जेव्हा वासनेचे शिकार होतात तेव्हा दरवेळी महत्वाची भूमिका निभावत असतील? अश्यावेळी मला नेहमी माझ्या एका मैत्रिणीचं वाक्य आठवतं, पुरषाला काही लागत नाही. फक्त खाली एक आणि वर दोन असलं की त्याला पुरतं. आपण इतके सुंदर असूनही आपल्या आसपास असणार्‍या प्रत्येक दुसर्‍या स्त्रीबरोबर झोपण्यासाठी धडपडणार्‍या नवर्‍याबद्दल तिच्या मनात संताप होता. ती अतीश्रीमंत गटात मोडणारी. वासना विषमता पाहून आपला घास घेत नाही. तिला भूक लागलेली असेल तर ती समोर असेल त्याला फाडून खाते, हेच सत्य आहे.

मी टू चळवळीने सध्या भारतात हातपाय पसरले आहेत. चळवळीचा वणवा पसरत चाललेला आहे. त्यात अनेकांचे खोटे लाखेचे रंगीत मुखवटे जळून खाक झाले आहेत. काहीजणी ह्याला पब्लिसिटी स्टंट म्हणतात. इतक्या वर्षांनी हे सारं उकरून काढण्याची गरज काय, असे अनेक उलटसुलट प्रश्न विचारतात. इतक्या वर्षांनी का होईना. एका चळवळीमुळे मनातली जखम अजूनही ओलीच आहे. हे दाखवण्याची संधी स्त्रियांना मिळते आहे. हे महत्वाचं आहे. माझ्याकडे कामाला येणार्‍या कवितासारख्या गरीब स्त्रिया ह्या चळवळीचा भाग नाहीत ही अतिशय दु:खाची बाब असली तरी त्या ज्या पुरषांचे चेहरे इथे पर्दाफाश करतील त्यांच्याच घोळक्यात, त्याच कुटुंबात त्यांना पुढचे आयुष्य काढायचे असल्याने संधी मिळाली तरी काही उच्चभ्रू, बिंधास्त बोलणार्‍या, सुशिक्षित स्त्रियांसारखे त्या व्यक्त होणे अतिशय कठीण आहे. ही फट कुठे तरी भरून काढली पाहिजे आणि सगळ्यांना बोलतं करणं महत्वाचं आहे. मग तो लढा फक्त पुरषांच्या जिवावर उठलेल्या बाया असा न राहता पिडीत वा त्यातून बचावलेला प्रत्येक पुरूष, स्त्री, लहान मुलं, वयस्क, एलजीबीटी परिवारातले सदस्य ह्या सगळ्यांचा होईल. हे सावकाश होईल. पण त्यासाठी कोणत्याही चळवळीच्या हेतूवर शंका घेणे अविचाराचे ठरेल.

ह्या सगळ्या वावटळीत पुरूष कधी बोलणार किंवा ते का बोलत नाहीयेत हे समजून घेणे फारसे कठीण नाही. जितकी स्त्री दबलेली आहे. त्याहून कितीतर जास्त पटीने लैंगिक गरजा आणि अत्याचारांबाबत बोलण्याचे दडपण पुरषांना येत असावे. मी टू चळवळीत अत्याचार झाल्याच्या घटना नोंदवणार्‍या स्त्रियांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्यावर पुरषांकडून अत्याचार होतात. असे चित्र दिसते. पण पुरषांचे काय… त्यांच्यावर कधीच कुठला ओरखडा न उठल्यासारखे ते अनाघात आहेत की काय?

पुरुष कधी बोलणार? की अत्याचार करणारा तो पुरूष आणि त्यातून तारणारा रक्षण करणारा तो पुरूष ही प्रतिमा जपायचीच त्यासाठी जे झालं ते सांगण्यात कुचंबणा होत असावी? की आपल्याबाबत असे जे काही झाले ते लिहले तर हे व्यक्त करण्यासाठी जशी सहसा स्त्रियांना शाबासी मिळते ती मिळणे दूरच, घरात आई बायको मुलगी बाप भाऊ मित्र समाज आपल्याकडे आयुष्यभरासाठी दुर्बल म्हणून बघत राहतील ह्या भीतीपोटी आपल्याबाबत घडलेल्या लहानसहान लैंगिक मानसिक छळाबाबत व छेडछाडीच्या प्रकारांबाबत पुरूष तोंडाला कुलूप लाऊन बसलेले आहेत?

स्त्रियांपेक्षा पुरूष हे जरी जास्त प्रमाणात सुरक्षित असले तरीही अश्या काहीच घटना, नकोसे स्पर्श, सेक्सिस्ट कमेंट स्त्रियांकडून वा पुरषांकडून त्यांच्या अनुभवास आल्या नाहीत का… का बोलत नाहीत पुरूष? गर्दीत, कामाच्या ठिकाणी, कार्यक्रमात, कुटुंबात, शेजारीपाजारी कुठेच असे अनुभव पुरषांना आले नाहीत? कानकोंडं व्हावं अशी एकही घटना पुरषांच्या वाट्यास येत नाही?

पुरूषसत्ताक वा पितृसत्ताक समाजाचे हे एक भीषण लोढणे पुरषांच्याच मानगुटीवर वेताळासारखे घट्ट पकड घेऊन बसलेले आहे. त्यांना मोकळं होण्याची गरज आहे.. पुरूष कधी बोलणार… त्यांना टवाळी करता येते, वेळप्रसंगी कुणाच्या रक्षणासाठी हातपाय चालवता येतात, जिभेला धार काढून ती तलवार म्हणून सपासप चालवता येते पण कंठ फुटलाय हो आतला दबलेला आवाज कधी फुटणार?

काही सत्य समोर यावीत, काही बदल घडावेत, काही दबलेले आवाज बाहेर यावेत ह्यासाठी काही चळवळी, मोहिमा, ट्रेंड येतात. असे अनेकानेक ट्रेंड येत राहतात. काही काळ त्याचे वादळ येते आणि मग ते शमतेही. मग नवे वादळ येते. शमलेल्या वादळात बर्‍याच समजांची मोडतोड झालेली असते. त्यात अनेकांना विचारांची दिशा मिळते, अनेकांवर वचक बसतो, अनेकांना त्यातून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची, त्याबद्दल सांगण्याची एक संधी देणारे व्यासपीठ मिळते त्यामुळे ते वादळ जरी शमले तो ट्रेंड, ते हॅशटॅग जरी मागे पडले असले तरी त्याने त्याच्या आवाक्यात असलेले योग्य ते मिशन पूर्ण वा काही अंशी तरी तडीस नेलेले असते. जसे चशढेे चळवळीमुळे अलिकडच्या काळात झालेल्या घडामोडी.

ह्याबाबत शंका घेऊ पाहणार्‍यांकडे किंवा अश्या विचारांना, नव्या प्रयोगांना कुचकामी ठरवू पाहणार्‍यांकडे, त्याची खिल्ली टवाळी उडवू पाहणार्‍यांकडे आणि त्यांना काही उत्तर देण्याकडे; ज्यांना ह्याबाबत काही शांत राहून सातत्याने किंवा जितका वेळ देता येतो त्या अवधीत काही करायचे असेल त्यांनी दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. ह्याचे कारण चांगल्या विधायक प्रयत्नांचे कुणी त्याला कितीही हिणावले किंवा त्यात अडसर बननण्याचा प्रयत्न केला तरीही मातेरे होऊ शकत नाही.

कोणत्याही चांगल्या हेतूच्या विरोधात काही मूठभर माणसं जेव्हा उभी राहतात तेव्हा तो हेतू किती टोकदार आहे. त्याला किती धार आहे हे आपोआप अधोरेखीत होत राहतं. आपण कुणालाही उत्तर देणं लागत नाही. त्यामुळे कुणाच्या खिल्लीला टवाळीला वा शंकांना कोणताही प्रतिसाद न देणे हाच त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा इशारा असल्याचे स्वत: मानावे आणि व्यक्त व्हावे. टवाळखोरांना किती जण लक्षात ठेवतात, त्यांनी असे झटक्यात येणारी आणि फटक्यात शमून जाणारी एखादी तरी वावटळ कधी आणली होती का, ते करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे का व त्यांनी असे काही केल्यास त्यांच्यावर किती माणसं विश्वास ठेवतील, ह्या सार्‍याची उत्तरे जशी आपल्याला ठाऊक असतात तशी ती त्यांनाही ठाऊक असतातच. उत्तरे आपोआप मिळत जातात. ज्यांना हे सारे सहन होत नाही त्यांच्याप्रती दयाभाव दाखवत अश्या चळवळीत वा मोहिमांमध्ये पिडीत म्हणून त्यांना कधीही यावे लागू नये, ह्यासाठी आपण फक्त प्रार्थना करू शकतो. अश्यांना गेट वेल सून म्हणावे बस इतकच.

कवितासारख्या सर्वसामान्य स्त्रियाही अश्या मोठ्या चळवळींचा एक आवाज ठरतील कधीतरी. निदान कुणाचेही दु:ख ऐकता येण्यासाठी एक कान असायला हवा, ही मानसिकता अश्या चळवळी तयार करत आहेत, हेच त्यांचे मोठे यश मानायला हवे काही का कू न करता. वेदना घुसमटींनाही तेव्हाच आवाज फुटतील जेव्हा टाळणारी माणसं नसतील. ऐकणारे कान असतील लगेच जजमेंटल न होणार्‍या समाजातले.

रेणुका खोत

(लेखिका ब्लॉगर व ब्लॅक रोझ इंडिया फेसबूक पेजच्या संस्थापक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -