घरफिचर्सयुद्धाचा थरारक अनुभव फॉन रायन्स एक्स्प्रेस

युद्धाचा थरारक अनुभव फॉन रायन्स एक्स्प्रेस

Subscribe

ज्यांना युद्धाचा अनुभवच नसतो, त्यांना मात्र या कथा आवडतात. ते वारंवार त्यांची पारायणे करतात. जवानांचे कौतुक करतात, युद्धातील पराक्रम वाखाणण्याजोगे असतात. याबाबत दुमत होण्याचे कारणच नाही. पण त्याची दुसरी बाजूही विचारात घ्यायची तर युद्धाची विशेषतः आपले माणूस दगावल्याची अथवा जखमी झाल्याची झळ ज्यांना बसते त्यांना मात्र ते सुखावह वाटत नाही.

युद्धाच्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडते. प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव ज्यांनी घेतलेला असतो, त्यांना मात्र शक्यतोवर युद्धे टाळायलाच हवीत असेच वाटते. कारण मृत्यूचे थैमान त्यांनी पाहिलेले असते. जे घायाळ होऊनही जिवंत राहतात, त्यांना तर आपण का जिवंत राहिलो असे वाटत राहते, इतके भोग भोगावे लागतात. कारण नुसत्या शब्दांनी किंवा पैशाने त्यांचे झालेले नुकसान कधीच भरून येणे शक्य नसते. मृत काय किंवा जखमी काय जे सैनिक जिवंत राहतात, त्यांचे पालकही मनोमन युद्धखोरीच्या विरोधातच असतात. कारण त्यांचे नुकसान कधीच भरून येणारे नसते.

ज्यांना युद्धाचा अनुभवच नसतो, त्यांना मात्र या कथा आवडतात. ते वारंवार त्यांची पारायणे करतात. जवानांचे कौतुक करतात, युद्धातील पराक्रम वाखाणण्याजोगे असतात. याबाबत दुमत होण्याचे कारणच नाही. पण त्याची दुसरी बाजूही विचारात घ्यायची तर युद्धाची विशेषतः आपले माणूस दगावल्याची अथवा जखमी झाल्याची झळ ज्यांना बसते त्यांना मात्र ते सुखावह वाटत नाही.

- Advertisement -

म्हणूनच दुरून डोंगर साजरे असे म्हटले जाते. युृद्धाची झळ केवळ पराभूतांना लागत नाही, तर विजेत्यांनाही लागते. त्यांचे झालेले नुकसानही काही कमी नसते. कोण विजयी आणि कोण पराभूत हे ठरवणेच अवघड होते. हे दुसर्‍या महायुद्धानंतर प्रत्ययाला आले. कारण युद्धानंतर पराभूत जर्मनी आणि जपान ज्या झपाट्याने विकसित झाले, तसे दोस्त राष्ट्रांना शक्य झाले नाही.

दुसरे महायुद्ध संपत आलेले असताना घडलेल्या एका प्रसंगाबाबतची कथा ‘फॉन रायन्स एक्स्प्रेस’ (स्पेलिंग वाचताना व्हॉन असे वाटते; पण त्याचा उच्चार फॉन असा आहे.) या चित्रपटात आहे. युद्धकैदी पळून जाण्याच्या अनेक प्रसंगांची नोंद आहे. पण अशा कैद्यांनी थेट एखाद्या आगगाडीचेच अपहरण करावे, ही तशी चटकन विश्वास न बसणारी गोष्ट. पण दुसर्‍या जागतिक महायुद्धात तसे घडले आहे. त्याचीच कथा यात पाहायला मिळते. ‘द ट्रेन’ या चित्रपटामध्ये अमूल्य असा देशाचा चित्रठेवा, जपण्यासाठी ज्या आगगाडीमधून तो नेला जात असतो, तिचेच अपहरण करून, शत्रूकडून पाठलाग होत असतानाही, त्यांना विविध प्रकारे हुलकावण्या देऊन, अनेकदा धोका पत्करूनही, तो वाचवण्यात नायक (बर्ट लँकॅस्टर) आणि त्याचे सहकारी कसे यश मिळवतात, हे पाहायला मिळाले होते.

- Advertisement -

‘फॉन रायन्स एक्स्प्रेस’ या चित्रपटाची कथा त्याहून वेगळी, तरी तितकीच प्रभावीही आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमेरिकन हवाई दलाचा पायलट कर्नल जोसेफ रायनचे विमान दुसर्‍या महायुद्धाच्या काळात इटलीमध्ये पाडले जाते. त्याला युद्ध-कैद्यांच्या छावणीत नेले जाते, तेव्हापासून होते. क्रूरकर्मा मेजर बाट्टाग्लिआ त्या छावणीचा प्रमुख असतो. आपण त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असल्याने बाट्टाग्लिआनेच आपल्याला सलाम करावा, असा आग्रह कर्नल जोेसेफ रायन धरतो. दुभाषाची भूमिका बजावणारा त्याचा दुय्यम असलेला इटलीचा कॅप्टन ओरिआनी ते बाट्टाग्लिआला सांगतो.

दोस्त राष्ट्रांचे यु्द्ध-कैदी ठेवण्यात आलेल्या या तळावर ब्रिटिश यु्द्ध-कैदी बहुसंख्येने असतात. ब्रिटिश लष्कराच्या कमांडिंग ऑफिसरला त्याने बाट्टाग्लिआला काठीने मारल्याबद्दल शिक्षा म्हणून स्वेटबॉक्समध्ये ठेवल्याने, तो थोड्या काळापूर्वी मरण पावलेला असतो. त्याचा दुय्यम मेजर एरिक फिंचमन त्याची जागा घेतो. दोस्त राष्ट्रांचा विजय दृष्टिपथात आहे, याची जाणीव असलेला रायन फिंचमनच्या छावणीतून पलायन करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत नाही. छावणीत अमेरिकन थोडेच असतात. ते पलायनाचा बेत करणार्‍यांनी साठवलेली औषधे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना, फिंचमनकडून पकडले जातात. रायन ती औषधे आजार बळावलेल्या कैद्यांना देण्याचा हुकूम देतो.

त्यानंतर रायन कैद्यांचे पळून जाण्याचे अनेक प्रयत्न उघडकीस आणतो. ब्रिटिश कैदी संतापतात. छावणीतील व्यवस्था सुधारण्याची बाट्टाग्लिआची तयारी नसते. युद्ध-कैद्यांची चांगले कपडे देण्याची मागणी तो फेटाळून लावतो. त्याला उत्तर म्हणून रायन कैद्यांना खराब कपडे जाळून टाकायला सांगतो. त्यामुळे बाट्टाग्लिआला त्यांना नवे कपडे देणे भाग पडते. तेवढ्यात युद्धामध्ये इटलीने शरणागती पत्करल्याचे वृत्त कानावर येताच छावणीतील पहारेकरी पळून जातात. उल्हासित ब्रिटिश युद्ध-कैदी तातडीने बाट्टाग्लिआला युद्ध-गुन्हेगार ठरवतात. त्याच्यावरील खटल्याची सुनावणी लगेच सुरू करतात. बाट्टाग्लिआचा दुय्यम म्हणून काम करणार्‍या इटलीच्या कॅप्टन ओरिआनीला बाट्टालिआची बाजू मांडण्याची संधी देतात. या सुनावणीमध्ये, स्वतःचा बचाव करण्यासाठी, बाट्टाग्लिआ आपण स्वतःच फॅसिझममुळे पुरते खचून गेलेले आहोत, असे सांगतोे. त्याच्या या बचावावर कुणाचाच विश्वास बसत नाही. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रायन त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावतो. पण नंतर तो निर्णय बदलून बाट्टाग्लिआला स्वेटबॅक्समध्ये ठेवण्याची शिक्षा देतो.

जर्मन लढाऊ विमान छावणीवर घिरट्या घालू लागल्याने, रायनसह बाकीचे युद्धकैदी स्वातंत्र्यासाठी इटलीच्या सीमारेषेकडे धाव घेतात. बर्‍याच काळानंतर ते एका उजाड किल्ल्यात आसरा घेतात. ओरिआनी दोस्त राष्ट्रांबरोबर संपर्क साधायचा प्रयत्न करत असतो. सकाळीच जर्मन सैनिक त्या ठिकाणी येऊन त्या युद्धकैद्यांना ताब्यात घेतात. त्यामुळे फिंचमनला वाटते की, ओरिआनीने फितुरी केली आहे. परंतु युद्धकैद्यांना जेव्हा आगगाडीच्या डब्यात बंद केले जाते, तेव्हा तेथे त्यांना ओरिआनी रक्तबंबाळ अवस्थेत दिसतो. त्यांना कळते की, ओरिआनीने फितुरी केलेली नाही, तर बाट्टाग्लिआनेच त्यांना फसवले आहे. दरम्यान जर्मन सैनिक आजारी युद्ध-कैद्यांना गोळ्या घालतात. त्यामुळे संतापलेला फिंचमन बाट्टाग्लिआला जिवंत ठेवल्याबद्दल रायनला दोष देतो. यथावकाश गाडी रोमला पोहोचते. तेथे जर्मन ऑफिसर मेजर फॉॅन क्लेमंट युद्धकैद्यांचा ताबा घेतो.

त्याच रात्री रायन आणि त्याचा सहकारी एका गजाच्या सहाय्याने डब्याच्या तळाच्या फळ्या काढतात आणि गाडी थांबल्यानंतर रायन, फिंचमन आणि लेफ्टनंट ओर्डे लगेच तेथूनच, डब्याच्या तळातून, बाहेर पडतात. बर्‍याच पहारेकर्‍यांना ठार करून इतर कैद्यांची सुटका करतात. नंतर सर्वजण मिळून बाकीच्या पहारेकर्‍यांना संपवतात. रायन आणि फिंचमन, फॉन क्लेमंट आणि त्याची मैत्रिण गॅब्रिएला यांना पकडतात. त्यांची आगगाडी रोममधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याच गाडीच्या वेळापत्रकानुसार जाणारी जर्मन सैनिक घेऊन जाणारी एक गाडी आपल्या गाडीच्या मागे आहे असे त्यांना दिसते. प्रत्येक स्टेशनवर मेजर क्लेमेंटला पुढील ऑर्डर मिळणार असतात. त्यामुळे अडचण होऊ नये म्हणून जर्मन भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणार्‍या कॅप्टन कोस्टांझोला, फ्लॉरेन्सवरून पुढे जाण्यात अडथळा येऊ नये, म्हणून मेजर क्लेमेंटची भूमिका देण्यात येते.

फ्लॉरेन्सला मिळालेल्या कागदपत्रांमुळे त्यांना गाड्या ऑस्ट्रियातील इन्स्ब्रूककडे जात असल्याचे समजते. चलाखीने कैदी त्यांची गाडी बोलोग्नाकडे जाणार्‍या रुळांवर नेतात. जर्मन सैनिकांची गाडी इन्स्ब्रूककडे जाते. क्लेमेंट आणि गॅब्रिएला यांना जखडून, तोंड बांधून ठेवण्यात आलेले असते. गॅब्रिएला खूप प्रयत्नांनी काचेच्या तुकड्याने दोघांची सुटका करते. गाडी एका ठिकाणी थांबलेली असताना ते दोघे ओर्डेला मारून पळतात. रायन त्या दोघांना गोळ्या घालतो.

दरम्यान वॅफेन-एस.एस. दलाचा कर्नल गॉर्टझ्ला कैद्यांची करामत समजते. यु्द्ध-कैदी आपली गाडी साईडिंगला टाकतात. पण ती नेमकी जर्मन पुरवठा केंद्राकडे जाणारी लाइन असते. त्यामुळे दोस्त राष्ट्रांची विमाने, वैमानिकांना काहीच माहीत नसल्याने, ती जर्मन फौजांना रसद पुरवठा नेणारी आगगाडी आहे, असे समजून तिच्यावर बॉम्बफेक करतात. यु्द्ध-कैदी त्या बॉम्बवर्षावातूनच गाडी पुढे नेत असताना, त्या मार्‍याने काही डबे पेटून अनेकजण जखमी होतात. ती धाड संपल्यावर ओरिआनी आणि एक इटालियन इंजिनिअर एका सिग्नल बॉक्समधील सिग्नल निकामी करून जर्मनांना घोटाळ्यात पाडतात. त्यानंतर युद्ध-कैदी हातांनीच सांधे बदलून गाडी पुन्हा स्वित्झर्लंडला जाणार्‍या मार्गावर नेतात.

गॉर्टझ त्याच्या तुकडीसह त्यांचा पाठलाग करतो. आल्पस पर्वताच्या, म्हणजे सुटकेच्या रेषेच्या अगदी जवळ गाडी येऊ लागते, तेव्हा जर्मन विमाने त्यांच्यावर हल्ला करतात. रॉकेट्सच्या मार्‍याने दरडी कोसळतात. एका ठिकाणचे रूळदेखील उखडले जातात. युद्ध-कैदी रुळांची आणि गाडीची दुरुस्ती करतात. एसएस सैनिक पाठलाग करतच असतात. रायन, फिंचमन आणि अन्य काहीजण त्यांना थोपवून ठेवतात. युद्ध-कैद्यांची गाडी पुढे निघते. धावत जाऊन ती पकडण्यात फिंचमन, गिआनिनी आणि अन्य वाचलेले युद्ध-कैदी यशस्वी होतात. रायन थोडा मागे असतो. गाडीचा शेवटचा डबा पकडण्यात यशस्वी झालेले फिंचमन आणि गिआनिनी, धावत येणार्‍या रायनचा हात पकडून त्याला वर घेण्याचा प्रयत्न करतात. पण गाडी सीमा पार करून गाडी स्वित्झर्लंडमध्ये जात असतानाच जर्मन मेजर गॉर्टझ कर्नल जोसेफ रायनला गोळी घालतो. चित्रपट संपतो.

डेव्हिड वेस्थिमर यांची फॉन रायन्स एक्स्पे्रस ही कादंबरी 1963 मध्ये प्रकाशित झाली होती. ती चांगलीच गाजली. डेव्हिड वेस्थिमर हे स्वतः यु्द्धकैदी होते. त्यांनी स्वानुभवावरूनच लिहिलेली ही कादंबरी अतिशय परिणामकारक झाली आहे. तिच्या परीक्षणात न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले होते की, एक कॅमेरा वगळला तर या कादंबरीत चित्रपटासाठी आवश्यक असणारे बाकी सारे काही आहे. अर्थात यावर चित्रपट येणे अपरिहार्यच होते. निर्माता सॉल डेव्हिडने याच कादंबरीवर आधारलेला चित्रपट बनवण्याचे ठरवले. चित्रपटाचे नावही तेच म्हणजे फॉन रायन्स एक्स्प्रेस ठेवण्यात आले. पटकथा वेंडेल मेयेस आणि जोसेफ लंडन यांनी तयार केली आणि दिग्दर्शन मार्क रॉबसन यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी आपले काम प्रभावीपणे केले आहे.

प्रमुख भूमिका फ्रँक सिनात्रा (कर्नल जोसेफ रायन), ट्रॅव्हर हॉवर्ड (मेजर एरिक फिंचमन), अ‍ॅडॉल्फो सेली (मेजर बाट्टाग्लिआला), जॉन लेटन (लेफ्टनंट ओर्डे), वूल्फगँग प्रेसिस (मेजर फॉन क्लेमेंट), राफेल्ला कारा (गॅब्रिएला), जॉन व्हॅन ड्रुलेन (कर्नल गोर्टझ), रिचर्ड बकालीअन (कॅप्टन गिआनिनी) यांच्या आहेत. युद्धातील साहस आणि प्रसंगावधानाचे दर्शन घडवणारा हा चित्रपट एक थरारक अनुभव देतो.

– आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -