घरफिचर्ससामान्यांचा आवाज आणि पत्रकारितेचा आदर्श!

सामान्यांचा आवाज आणि पत्रकारितेचा आदर्श!

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या निधनाने सामान्यांचा आवाज आणि पत्रकारितेचा आदर्श आपल्यातून निघून गेला आहे. ‘नाही रे’ वर्गासाठी कोणीतरी आवाज हवा असतो, तो आवाज रणदिवे होते. शेवटच्या श्वासापर्यंत या माणसाने फक्त आणि फक्त पत्रकारितेचाच विचार केला. आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांवरील अन्याय दूर होत असेल तर ते आपले पहिले काम आहे आणि यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून आपली लेखणी सतत चालवली. समाजवादी विचारसरणीचे पाईक असणारे रणदिवे हे माणूस म्हणून खूप मोठे होते. या माणूसपणातून, प्रभावी विचारातून आणि अभ्यासूवृत्तीमधून त्यांची लेखणी इतकी प्रभावी ठरली होती की, अधिकारी ते राजकारणी यांच्या मनात त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर असे. मुळात घटनेच्या खोलात शिरून त्यातील बातमी बाहेर काढेपर्यंत ते शांत बसत नसत. मुख्य म्हणजे त्यांना माहिती देणारी माणसे पक्की असत आणि कागदपत्रे हातात असल्यामुळे दुसर्‍या दिवशी येणारी त्यांची बातमी एकच खळबळ उडवून देई. प्रशासन, राजकीय नेते हादरून जात. अशा एक नव्हे शेकडो बातम्या त्यांनी दिल्या. सतत पायाला भिंगरी लावून फिरणारा हा माणूस अतिशय सामान्य जीवन जगला आणि पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांचा ते आवाज झाले! म्हणूनच आदर्श पत्रकारितेचा ते दीपस्तंभ ठरले!

अतिशय साधी राहणी, जगण्यापुरते अन्न, कपडे, निवारा आणि पत्रकारिता असे आयुष्य जगणार्‍या रणदिवे यांचा जन्म 1925 मध्ये डहाणूतील आदिवासीबहुल भागात झाला. त्यांनी 1956 साली पत्रकारितेला सुरुवात केली. समाजवादी पक्षाने 1955 मध्ये छेडलेल्या गोवामुक्ती संग्रामातही ते सक्रिय होते. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. या लढ्यात त्यांनी कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने 1956 साली ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरू केले. त्याचे त्यांनी संपादन केले. याशिवाय ‘लोकमित्र’ या नियतकालिकाचेही संपादन त्यांनी केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची खरी सुरुवात इथूनच झाली. यानंतर रणदिवे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले आणि तिथे त्यांनी मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्षे आपल्या लेखनीने विविध ज्वलंत विषय पुढे आणले. 1972 मध्ये दिनू रणदिवे यांनी केलेले बांगलादेश मुक्तीलढ्याचे वार्तांकन गाजले होते. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते ‘मटा’तून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था ‘एएफपी’साठीही वार्तांकन केले होते. 2002 मधील गुजरात दंगलीचे वास्तवसुद्धा त्यांनी प्रखरपणे लोकांसमोर आणले होते.

- Advertisement -

सडपातळ शरीरयष्टी असणारे आणि वार्‍याच्या वेगाने धावणारे रणदिवे सहजपणे सामान्यांमध्ये सामावून जात. सामान्य लोकांना ते आपले वाटत. हे आपले वाटणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पत्रकारांची अंगभूत आढ्यता न दाखवणारा थोडक्यात म्हणायचे तर हा किरकोळ माणूस ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे पत्र चालवायचा. आचार्य अत्रे, डांगे यांच्याबरोबर त्यांना मोरारजी देसाई यांच्या सरकारने अटक करून तुरुंगात डांबले. यामुळे सरकार त्यांना घाबरून असे. पत्रकारिता करत असताना रणदिवे यांनी आपली साधनसुचिता निष्ठेने पाळली. आपली पत्रकारिता डागाळू नये याची काळजी घेतली. रणदिवे हे सामाजिक दृष्टी आणि जाणीव असलेले पत्रकार होते. दृष्टी असणारे खूप असतात, ते आवर्जून घटना बघतात आणि जे जसे दिसले तसे त्याचे वृत्त सादर करतात. मात्र रणदिवे यांनी जे दिसले त्याची दखल तर घेतलीच; पण जाणीवपूर्वक त्याच्या मुळाशी जाऊन काही वेगळे घडले आहे का याचा शोध घेऊन आपले वृत्त खात्रीलायक बनवले. त्यांची बातमी नुसते शब्द नसत, ती बातमी वाचकाला शब्दापलीकडे नेत असे. अशी सत्याला साकार करणारी बातमीदारी करणारे पत्रकार फार दुर्मिळ होते. आता तर फारच दुर्मिळ झाले आहेत.

रणदिवे यांचे ‘आपलं महानगर’वर विशेष प्रेम होते. 1990 मध्ये ‘आपलं महानगर’ सुरू झाला त्या दिवसापासून त्यांनी सातत्याने येथे लिहिले. सुबोध वळणदार अक्षरात हाताने लिहिलेली त्यांची बातमी घेऊन ते कार्यालयात येत. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी बातमी देणारी माणसे जोडली होती. 1992 साली हर्षद मेहताने केलेल्या शेअर घोटाळ्याची बातमी पहिल्यांदा रणदिवेंनी दिली होती. ‘आपलं महानगर’ मध्ये ती छापून आली. कदाचित छोटे दैनिक असल्यामुळे त्याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. त्यानंतर तीन दिवसांनी सुचेता दलाल यांनी हीच बातमी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये छापली आणि मोठी खळबळ उडाली. वय झाले असतानाही ते एकटे ‘आपलं महानगर’च्या माहिम येथील कार्यालयात येत. कुठलाही आधार न घेता. कोणी दिला तर ते त्यांना आवडत नसे. असा स्वावलंबी आणि स्वाभिमानी बाणा त्यांनी शेवटपर्यंत जपला. ते बातम्या आणि लेख तर देत असत; पण सर्व सहकार्‍यांशी आपुलकीने बोलत.

- Advertisement -

नवीन पत्रकारांना लिहिते करण्यासाठी प्रोत्साहन देत. अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या पुस्तकांवर  आधारित जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सिंहासन’ या गाजलेल्या चित्रपटात दिगू टिपणीस नावाचा एक पत्रकार आहे. सतत बातम्यांचा पाठलाग करणारा. भ्रष्टाचारी व्यवस्थेला जेरीला आणणारा. पत्रकारितेवर अढळ निष्ठा असणारा, असे त्याचे व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे. तो पत्रकार म्हणजे दिनू रणदिवे होत, असे  मानले जात असे. आज लोकशाही मूल्यांना अनेक हादरे बसत असताना ती जिवंत ठेवण्याची मोठी गरज असताना रणदिवे हे जग सोडून गेलेत. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी कधीच भरून निघणार नाही. ‘आपलं महानगर’ परिवारातर्फे दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -