घरफिचर्ससमाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Subscribe

तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी बंडोजी व मंजुळामाता (वंशायाती ठाकूर, ब्रह्मभाट) या दाम्पत्यापोटी विदर्भातील यावली शहीद (जि. अमरावती) येथे झाला. भक्तीसंपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर होती. बालमाणिकाला एकांती ध्यान, लोकांती भजन, गायन या गोष्टींची आवड होती.

पोहणे, अश्वारोहण, योगासने आदी नव्या कला तो निर्भयपणे आत्मसात करत होता. वरखेड येथे मराठीत चवथीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने शाळा सोडली. समर्थ आडकोजी महाराजांच्या सेवेत असताना बालमाणिकाचे अंतरंग गुरूकृपेने, अध्यात्मशक्तीने फुलले. तेथे ते पंचपदीनंतर रोज अनेक संतांची भजने-अभंग गात असत. नंतर सद्गुरूंची आज्ञा मानून तुकडोजी स्वकाव्य करू लागले व त्यातूनच पुढे असंख्य अभंग, भजने त्यांनी रचली. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती, राष्ट्र-उन्नती, सर्वधर्मसमभाव, उद्योगशीलता इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून, भाषण-प्रवचनांतून प्रखरतेने मांडले.

- Advertisement -

तुकडोजी महाराज हे स्वकर्तृत्वाने आदर्श पायंडा घालून देणार्‍यांमधील एक आहेत. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांनी प्रेमाने संघटन करून ग्रामोन्नतीची कामे सुरू केली. स्वराज्यानंतर सुराज्याची योजना करून त्यांनी ग्रामोन्नती-समाजोन्नतीविषयक विचारांचा प्रसार करण्यासाठी भजनाचा आधार घेऊन जागृती केली. आपल्या गद्य-पद्य लेखणीतून ‘खंजिरी’ या वाद्याच्या साहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रुढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेशबंदी इ. समाजघातक रुढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचे विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्मांचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. गावे स्वयंपूर्ण बनून तेथील लोक उद्योगशील व निर्व्यसनी कसे होतील याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. त्यासोबतच बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. अशा या महान राष्ट्रसंताचे ११ ऑक्टोबर १९६८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -