जनता कर्फ्यूतून काय साध्य होईल?

करोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर केला जात आहे. परिसरातील व्यावसायिक आणि नागरिक अशा कर्फ्यूसाठी आग्रही असताना दिसते. जनमत घेतल्यास आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकांना जनता कर्फ्यूने प्रश्न काही प्रमाणात सुटेल, अशी भोळी आशा आहे. पण, कर्फ्यू संपल्यानंतर काय? त्यानंतर व्यापारी बाजारपेठांत गर्दी होणार नाही? व्यवस्थेत आमुलाग्र बदल झालेला असेल?

जगातील ८१ देशांत करोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत. त्यात अमेरिका, इस्रायल, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेशचा समावेश असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. संघटनेच्या अहवालानुसार, दक्षिण आशिया, मध्य-पूर्व व आफ्रिकेतील देशांमध्ये परिस्थिती आणखी वाईट होण्याची चिन्हे आहेत. बहुतांश देशात अनलॉकमध्ये करोना संसर्गाची जोखीम वाढली आहे. लोक करोनापासून बचावाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. या देशांत दोन आठवड्यात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जगभरात काही दिवसांपूर्वी आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी निम्मे रुग्ण अमेरिकेत होते. आफ्रिकेत १०० दिवसांत १ लाख रुग्ण झालेत. येथे १९ दिवसांतच रुग्णसंख्या दुपटीवर गेली. दक्षिण आफ्रिकेत दररोज सरासरी एक हजार रुग्ण आढळून येत आहेत. या ८१ देशांत भारत नसणे, म्हणजे आपण धोक्याची पातळी ओलांडली आहे असा मुळीच होत नाही. करोना विषाणूच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी भारताने ब्रिटनलाही मागे टाकले आहे.

आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनलाही मागे टाकले आहे. त्यापूर्वी आपण चीनला मागे टाकले होते. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार भारतात सद्यस्थितीत करोनाचे ४ लाख २६ हजार ९१० रुग्ण आहेत. मृत्यूच्या बाबतीत अजूनही भारत नवव्या स्थानावर आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत देशात करोनामुळे १३ हजार ७०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या तीन दिवसांत सुमारे १ हजार मृत्यू झाले आहेत, तर मृतांपैकी दोन तृतीयांश लोक फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांतील आहेत. एकूणच काय तर भारतातही करोनाचा धोका टिकून आहे. आजवर केवळ मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येच शेकडोने रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. आता मात्र नाशिक, जळगाव, औरंगाबादसारख्या छोट्या शहरांतही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शेकड्याने आढळून येत आहे. विशेषत: ज्या भागात दाट लोकवस्ती आहे, जेथे घरे एकमेकांना लागून आहेत, अरुंद गल्ल्या आहेत आणि दुकानेही खेटून-खेटून आहेत, अशा ठिकाणी करोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचे आढळून येते. मोहल्ले, जुन्या गल्ल्या, वाडे जास्त असलेल्या परिसरात करोनाचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचे दिसते. लॉकडाऊनच्या काळात नागरिक बाहेर पडतच नसल्याने करोनाचे खरे स्वरूप बाहेर आलेले नव्हते.

लॉकडाऊननंतर मात्र आता करोनाचे भयावह स्वरूप दिसून येत आहे. अनेक शहरांमधील हॉस्पिटल्समध्ये आता रुग्णाला दाखल करण्यासाठी जागादेखील शिल्लक नाहीत. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे. लॉकडाऊननंतर वाढती रुग्णसंख्या बघता व्यावसायिकांमध्ये सर्वाधिक भीतीचे वातावरण आहे. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे नियम केवळ कागदावर राहत असल्याचा या मंडळींचा अनुभव आहे. आपल्याकडे येणारा ग्राहक कुठून आला असेल, तो बाधित असेल का, तो कुणा-कुणाच्या संपर्कात आलेला असेल हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या व्यावसायिकांच्या मनात घोंगावत आहेत. त्यामुळे अनेकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ज्यांची पोटं भरलेली आहेत आणि ज्यांनी काम केले नाही तर पोट भरेल इतके अर्थाजन यापूर्वीच करून ठेवले आहे असे व्यावसायिक दुकाने बंद करण्याचा निर्णय घेताना दिसतात. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती फारशी स्थिर नाही, ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर चालतो अशा व्यावसायिकांचे मात्र कमालीचे हाल होत आहेत. इच्छा असूनही आता त्यांना आपली दुकाने उघडावी लागत आहेत. बहुसंख्य दुकानांवर दोनपेक्षा अधिक कुटुंबांचा संसार चालतो ही बाबदेखील विसरून चालणार नाही.

लॉकडाऊननंतर ही दुकाने उघडण्यात आली. मात्र, अनेक दिवसांपासून घरीच बसून असलेल्या ग्राहकांनी एकाचवेळी गर्दी केली. त्यातून वार्‍याच्या वेगाने संसर्ग वाढला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या व्यापारी पेठांमधून आता जनता कर्फ्यूची मागणी जोर धरत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातून व्यापारी वर्ग आता जनता कर्फ्यूसाठी पुढे येत आहे. काही दिवसांसाठी जनता कर्फ्यू पुकारल्यास करोनाची वाढती साखळी तुटेल अशी भोळी आशा या व्यापार्‍यांना आहे. त्यातूनच जनता कर्फ्यूला डोक्यावर घेतले जात आहे. पण, ही मागणी सहजासहजी मान्य होईल, असे दिसत नाही. आपले हात दगडाखाली असलेली काही राजकारणी आणि प्रशासनातील मंडळी कर्फ्यूसाठी सहजासहजी तयार होताना दिसत नाही. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली म्हणजे आपलीही दुकाने बंद होतील याची भीती या मंडळींना आहे. या माध्यमातून हफ्तेखोरीच बंद होत असल्याने दुकाने बंद करण्यास ते सहजासहजी होकार देताना दिसत नाहीत.

दारूच्या दुकानांमधून शासनाला मोठा महसूल मिळतो हे जरी खरे असले तरीही एक वेगळा ‘महसूल’ या हप्तेखोरांच्या तिजोर्‍या भरतो हे नाकारूनही चालणार नाही. अर्थात बाहुबली राजकारण्यांच्या दहशतीपोटी ही बाब कुणी उघडपणे बोलण्यास धजावत नाही. त्याचाच फायदा ही मंडळी उचलतात. केवळ दारूच नाही तर महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी असलेल्या गुटख्याच्या माध्यमातूनही अनेकांच्या तुंबड्या भरल्या जात असल्याचे कळते. तसे नसते तर गुटख्याची इतकी खुलेआम विक्री झालीच नसती. लॉकडाऊन उठवल्यानंतर अवैध धंद्यांना पुन्हा पेव फुटले आहे. जुगार, मटका, सट्टा यांसारख्या अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. हे धंदे कुणाच्या ‘आशीर्वादा’ने चालतात हे सर्वश्रूत आहेच. एकूणच हफ्तेखोरीसाठी लॉकडाऊन हा शाप ठरतो. या शापातून मुक्तता मिळण्यासाठी ‘अनलॉक’ व्यवस्थेचा ही मंडळी पुरस्कार करताना दिसते. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या मागणीला ठिकठिकाणी उडवून लावण्यात आले आहे. अर्थात जनता कर्फ्यूने करोनाची साखळी तुटेल हा भोळा आशावादही दूर होणे गरजेचे आहे. शहरातील व्यापारी बाजारपेठा काही दिवस बंद ठेवल्यानंतर ग्राहक काही दिवस घरी बसतीलही. पण, ज्यावेळी बाजारपेठ पूर्ववत सुरू करण्यात येईल त्यावेळी पुन्हा एकदा ठिकठिकाणी गर्दीचा महापूर पहायला मिळेल. त्यातून संक्रमण वाढू शकते. शिवाय केवळ एक व्यापारी पेठ वा गल्ली बंद करून चालणार नाही, तर त्यासाठी संपूर्ण शहरच बंद करावे लागेल.

जो नियम दुकानांसाठी असेल तोच हातगाडी व्यावसायिकांसाठीही ठेवावा लागेल. तेव्हाच ही साखळी तुटू शकते. महत्त्वाचे म्हणजे करोना कधी नियंत्रणात येईल हे आजवर जागतिक आरोग्य संघटनाही सांगू शकलेली नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर जनता कर्फ्यू पुकारला जातोय हादेखील प्रश्नच आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी खरे तर एकच प्रभावी उपाययोजना आहे आणि ती म्हणजे स्वयंशिस्त. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडणे हा उत्तम पर्याय आहे. आज टिकल्या-बांगड्या खरेदी करण्यासाठीही महिलावर्ग बाजारपेठ गाठत आहे. शाळा बंद असूनही गणवेश खरेदीसाठी पालकांची गर्दी होत आहे. अनेकांना मोबाईल सुरू असल्याचा आनंद नव्हे तर हेडफोन नादुरुस्त झाल्याचे दुःख आहे. त्यामुळे अशी किरकोळ सामग्री खरेदीसाठीही गर्दी होत आहे. त्यातून करोनाचा आकडा दररोज काही पटीने वाढताना दिसतोय!