घरक्राइमजीपची कारला धडक; हवालदारासह महिला पोलीस शिपाई ठार

जीपची कारला धडक; हवालदारासह महिला पोलीस शिपाई ठार

Subscribe

वणी-नाशिक महामार्गावर ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळील घटना

भरधाव काळी पिवळी मॅक्स वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोलीस हवालदारासह महिला पोलीस शिपाई ठार झाले. ही घटना वणी-नाशिक महामार्गावर ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळ मंगळवारी (दि.२३) रात्री ९ वाजेदरम्यान घडली. मृत दोघेही नाशिक पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन परिवहन विभागात होते. त्यांच्या मृत्यूने नाशिक शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार ज्ञानेश्वर नामदेव रौंदळ (वय 52, दोघेही रा. नाशिक पोलीस आयुक्तालय वसाहत), रेणुका भिकाजी कदम (46) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रौंदळ यांची पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागात तांत्रिक म्हणून नेमणूक होती. तर रेणुका कदम यांची याच विभागात तांत्रिक मदतनीस म्हणून नेमणूक होती. दोघे मंगळवारी रात्री परतीच्या प्रवासासाठी व्हर्ना कार (एमएच १५-डीएम ९१८३) ने नाशिकच्या दिशेने येत होते. कार वणी-दिंडोरी रोडवरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरीजवळ आली. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात महिंद्रा कंपनीची मॅक्स काळी पिवळी जीप आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीपने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना उपचारार्थ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी वणीचे पोलीस नाईक मुजम्मिल उस्मान देशमुख फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वणी पोलिसांनी जीपचालक अरुण रामचंद्र गायकवाड (रा.ओझरखेड, ता.दिंडोरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रौंदळ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. तर कदम यांच्या पश्चात पती व एक मुलगा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -