पुण्यातील ११ जण बिश्नोई गँगमध्ये सक्रीय, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड

बिश्नोई टोळीतील तब्बल ११ हस्तक पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ११ जणांना शोधण्याचं काम पुणे पोलिसांनी हाती घेतले आहे.

laurance bishnoi

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala Murder Case) याची हत्या झाल्यानंतर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कुप्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangstar Laurance Bishnoi) टोळीने सिद्धूची हत्या केल्याचे सिद्ध झालेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिश्नोई टोळीतील तब्बल ११ हस्तक पुण्यातील असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ११ जणांना शोधण्याचं काम पुणे पोलिसांनी हाती घेतले आहे. (11 people from Pune active in Bishnoi gang, shocking information revealed during interrogation)

हेही वाचा – सलमानला धमकीचे पत्र बिश्नोईनेच लिहिले, सौरभ महाकाळचा मुंबई पोलिसांकडे दावा

मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आलं होतं. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महाकाळची चौकशी सुरू असतानाच इतर कनेक्शन्सविषयीची माहिती पुणे पोलिसांना मिळाली.

शुटर संतोष जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील वॉन्टेड संशयित आरोपी होता. संतोषला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. २० जूनपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली असून जाधवच्या टोळीतील आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा लॉरेन्स बिश्नोई गँगने प्रसिद्धीसाठी सलमान खानला दिली होती धमकी

सिद्धूची हत्या करण्याकरता लॉरेन्स बिश्नोई याने महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. सिद्धूची हत्या करण्यासाठी चार राज्यांतून शार्प शुटर मागवण्यात आले होते. त्यापैकी ३ शूटर्स पंजाबमधील, दोघेजण महाराष्ट्रातून, २ जण हरियाणातील आणि एकजण राजस्थानमधून आला होता.

यापैकी, पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांनी सिद्धूची हत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे पंजाब पोलिसांनी या दोघांची नावे जाहीर केली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी केलेल्या हत्या प्रकरणात संतोष आणि सौरभ दोघेही फरार झाले होते. तेव्हापासून ते पंजाबमध्येच राहत होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांची माहिती पंजाब पोलिसांना दिली.

नेमकं प्रकरण काय?

पंजाब सरकारने ४२४ व्हिव्हिआयपी लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये सिद्धूचाही समावेश होता. ही सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली.